मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

आवाडे कोट (Awade Kot) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी
सिंधुदुर्ग जिह्यातील दोडामार्ग तालुक्यात आवाडे गावात तिलारी नदीच्या काठावर भुईकोट किल्ला आहे. सावंतवाडी परिसरात असलेला या छोटेखानी किल्ल्याचा उपयोग चौकी सारखा केला गेला असावा. किल्ल्यात मोठ्या प्रमाणावर झाडी वाढलेली असल्यामुळे किल्ल्यातील फ़ार थोडे अवशेष पाहायला मिळतात. जानेवारी महिन्यात किल्ल्यात गावातील लोक श्री देव पाटेकर यांचा उत्सव साजरा करतात. त्यामुळे जानेवरी महिन्यानंतर किल्ला बघायला जाणे सोईस्कर आहे.

खाजगी वहानाने आवडे किल्ल्या सोबत बांदा किल्ला , रेडे बुरुज (बांदा) आणि सडा किल्ला एका दिवसात पाहाता येतात.
18 Photos available for this fort
Awade Kot
इतिहास :
वाडीकर फोंड सावंत यांनी जवळच्या गोव्य़ातील पोर्तुगीजांपासून या भागाचे संरक्षण करण्यासाठी आवडे कोट बांधला होता. हा कोट नक्की कधी बांधला याचा उल्लेख सापडत नाही. इ.स.१७३८-५५ च्या दरम्यान नानासाहेब पेशवे यांनी रामचंद्र सावंत यांना लिहिलेल्या पत्रात या किल्ल्याचा उल्लेख आला आहे. त्यावरुन हा कोट इसवीसन १७३८ पूर्वीपासून अस्तित्वात असावा. सांखलीकर राणे आणि देसाई यांच्या संयुक्त फ़ौजेने इसवीसन १७४६ मध्ये वाडीकर फोंड सावंत यांच्याकडून मणेरी कोट, आवडे कोट हे किल्ले जिंकून घेतल्याचा उल्लेख आढळतो.

पहाण्याची ठिकाणे :
आवाडे गावात श्री देव पाटेकर देवस्थान आहे. त्याच्या जवळून किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे. श्री देव पाटेकर देवस्थानाचे मुळ स्थान पूर्वी किल्ल्यात होते. सध्या पाटेकर देव सावंतवाडीच्या राजवाड्याच्या परिसरात आहे. त्यामुळे किल्ल्यात किंवा गावातील देवस्थानात पिंड अथवा मुर्ती नाही. पण गावातील लोकांनी गावात एक मंदिर बांधलेले. दरवर्षी २७ जानेवारीला देवळात उत्सव भरवला जातो. या श्री देव पाटेकर देवळा जवळून एक वाट शेताकडे जाते. या पायवाटेने पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला झाडीभरला एक उंचवटा दिसतो तोच आवाडे किल्ला आहे. किल्ल्यात दाट झाडी असल्यामुळे गावातून वाटाड्या घेऊन किल्यावर जाणे योग्य आहे. वाटाड्या सोबत असेल तरच किल्ल्यावरील अवशेषांचा ठावठिकाणा कळतो. किल्ल्या भोवती अंदाजे १० फ़ूट लांबीचा खंदक आहे. किल्ल्या जवळून वाहाणार्‍या तिलारी नदीचे पाणी या खंदकात वळवून किल्ल्याला संरक्षण दिलेले आहे. खंदकाचा उंचवटा उतरून आपण खंदकात प्रवेश करतो. या खंदकात काही ठिकाणी अजूनही पाणी आहे. तर बराचसा खंदक दाट झाडीने भरलेला आहे.

खंदकात उतरून उंचवटा चढून तुटलेल्या तटबंदीतून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. किल्ल्याचा आकार चौकोनी असून किल्ल्याला चार कोपऱ्यात चार बुरूज आहेत. किल्ल्याचे बुरूज आणि तटबंदी चिर्‍याच्या दगडात बांधलेली आहे. किल्ल्याचे बुरूज ढासळलेले आहेत. तटबंदीचीही मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. सध्या जी तटबंदी उभी आहे, तिची उंची ५ ते ७ फूट आहे. तटबंदीची रुंदी अंदाजे ३ ते ५ फूट आहे. मुळ तटबंदी १० ते १५ फूट उंच असण्याची शक्यता आहे.

किल्ल्यात शिरल्यावर एक ठळक पायवाट एका चिरेबंदी वास्तुकडे जाते. साधारणपणे १५ फूट × १० फूट आकाराच्या या वास्तुच्या चारही भिंती उभ्या आहेत पण वास्तुवर छत नाही. मुळ श्री देव पाटेकर देवस्थान याठिकाणी होते असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आजही वर्षातून एकदा इथे पूजा-अर्चा होते आणि ब्राम्हण भोजन केले जाते. या वास्तुत शिरण्यासाठी एक उध्वस्त दरवाजा आहे. ही वास्तू पाहून पायवाटेने झाडी झुडपं बाजूला करत पाच मिनीटे चालल्यावर एक चौकोनी आकाराची चिर्‍यात बांधलेली सुंदर विहिर पाहायला मिळते. विहिरीत पाणी आहे, पण ते वापरले जात नसल्याने खराब झालेले आहे.


विहिर पाहून पुढे चालत गेल्यावर किल्ल्याचा एक ढासळलेला बुरूज पाहायला मिळतो तो बुरूज पाहून आलेल्या पायवाटेने परत वास्तू पर्यंत येऊन विरुध्द दिशेला झाडीतून मार्ग काढत चालत गेल्यावर तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. या तटबंदीच्या दोन टोकाला दोन बुरूजाचे अवशेष आहेत. त्यावर झाडी वाढलेली आहे. हे बुरूज पाहून पुन्हा किल्ल्यात प्रवेश केला तेथे आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. किल्ला पाहायला अर्धा तास लागतो.

किल्ल्यात बांबूची अनेक बेट आणि दाट झाडी असल्याने इतर अवशेष त्या खाली झाकले गेले असावेत. किल्ल्याची साफसफाई केल्यास अजून काही अवशेष पाहायला मिळतील.

पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई गोवा महामार्गावर बांदा हे मोठे गाव आहे. बांद्या पासून २२ किलोमीटरवर दोडामार्ग हे तालुक्याचे ठिकाण आहे. दोडामार्ग पासून १२ किलोमीटर अंतरावर आवाडे गाव आहे. मुख्य रस्ता सोडून गावात शिरल्यावर श्री देव पाटेकर देवस्थाना पर्यंत डांबरी रस्ता आहे. पाटेकर देवस्थानाच्या पुढे एक पायवाट शेतातून किल्ल्याकडे जाते. या पायवाटेने किल्ल्यात जाण्यासाठी ५ मिनिटे लागतात.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही
जाण्यासाठी लागणारा वेळ :
आवाडे गावातून किल्ल्यावर चालत जाण्यासाठी ५ मिनिटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जानेवारी ते मे
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: A
 आड (Aad)  आमनेर (Aamner)  अचला (Achala)  अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort)
 अग्वाडा (Aguada)  अहिवंत (Ahivant)  अजिंक्यतारा (Ajinkyatara)  अजिंठा (Ajintha Fort)
 अजिंठा सराई (Ajintha Sarai)  अजमेरा (Ajmera)  आजोबा (आजा पर्वत) (Ajoba)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)
 अलंग (Alang)  अंमळनेर (Amalner)  अंबागड (Ambagad)  आंबोळगड (Ambolgad)
 अमरावतीचा किल्ला (Amravati Fort)  अनंतपूर किल्ला (Anantapura Fort)  अणघई (Anghai)  अंजनेरी (Anjaneri)
 अंकाई(अणकाई) (Ankai)  अंतुर (Antoor)  अर्जूनगड (Arjungad)  अर्नाळा (Arnala)
 आसावा (Asawa)  अशेरीगड (Asherigad)  औंढा (अवंध) (Aundha)  औसा (Ausa)
 अवचितगड (Avchitgad)  आवाडे कोट (Awade Kot)