खोलगड (कोबा द राम )
(Cabo de Rama (Kholgad)) |
किल्ल्याची ऊंची : 
200 |
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : गोवा |
श्रेणी : मध्यम |
दक्षिण गोव्या मध्ये कोल गावा जवळ खोलगड उर्फ़ (कोबा द राम) नावाचा किल्ला आहे. राम आणि सीता वनवासात असतांना त्यांनी याठिकाणी वास्तव्य केले होते अशी आख्यायिका आहे. या किल्ल्या जवळ असलेल्या बीचमुळे या किल्ल्यावर पर्यटकांची वर्दळ असते. किल्ला पाहाण्याची वेळ सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० आहे.
खोलगड (कोबा द राम ) किल्ल्या पासून ७ किलोमीटर अंतरावर बेतुल किल्ला आहे. मडगावाहून खाजगी वाहनाने दोन्ही किल्ले अर्ध्या दिवसात पाहून होतात.
|
|
इतिहास : |
खोलगड हा गोव्यातील जून्या किल्ल्यांपैकी एक आहे. इसवीसन १७६३ मध्ये सुंद राजाकडून पोर्तुगिजांनी हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर त्यांनी किल्ल्यात चर्च आणि सैनिकांसाठी बॅरॅक्स बांधल्या. पुढील काळात किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून केला गेला.
|
पहाण्याची ठिकाणे : |
खोलगड उर्फ़ (कोबा द राम) हा किल्ला समुद्रात शिरलेल्या भूशिरावर (डोंगरावर) बांधलेला आहे. त्यामुळे किल्ल्याला तीन बाजूने समुद्राचे संरक्षण मिळालेले आहे. किल्ल्याच्या चौथ्या बाजूला जमिन असल्याने त्या बाजुने किल्ला संरक्षित करण्यासाठी खंदक खोदलेला आहे. किल्ल्याच्या प्रवेशव्दारा समोर असलेल्या खंदकावर सध्या पुल बांधलेला आहे. त्यावरुन आपला किल्ल्यात प्रवेश होते. किल्ल्याचे प्रवेशव्दार पोर्तुगिज बांधणीचे असून त्यात शत्रूवर मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. प्रवेशव्दार इंग्रजी "L" आकारात आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला दोन ओतीव तोफ़ा पडलेल्या पाहायला मिळतात. किल्लयात एकूण २१ तोफ़ा आहेत. प्रवेशव्दारा पासून किल्ल्याच्या दर्या दरवाजा पर्यंत जाण्यासाठी फ़रसबंदी रस्ता बांधलेला आहे. पण तो आता उखडलेला आहे. या रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या तटबंदीवर (फ़ांजी) जाण्यासाठी पायर्या आहेत. किल्ल्याची तटबंदी जांभा दगडाने ( चिर्याने ) बांधलेली आहे. पायर्या चढून फ़ांजीवर पुढे चालत गेल्यावर एक बुरुज आहे. तटबंदीतून बाहेर आलेला हा बुरुज प्रवेशव्दाराचे संरक्षण करण्यासाठी बांधलेला आहे. बुरुजावर दोन तोफ़ा आहेत. बुरुजावरुन किल्ल्याचे प्रवेशव्दार , खंदक आणि किल्ल्याच्या आतील भाग दिसतो. हा बुरुज पाहून फ़ांजी वरुन थोडे पुढे चालत गेल्यावर खाली उतरण्यासाठी जांभा दगडात बांधलेली उतरंड (रॅम्प ) आहे. फ़ांजीवर तोफ़ा, तोफ़गोळे चढवण्यासाठी याचा वापर केला जात होता.
फ़ांजीवरुन खाली उतरल्यावर समोरच सेंट ऍन्थोनी चर्च आहे. चर्च पाहून पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या समुद्राकडील तटबंदी पाशी पोहोचतो. येथून उजव्या बाजूला तटबंदी लगत चालत गेल्यावर एक बुरुज आहे. जमिनीच्या बाजूला असलेल्या तटबंदीतील हा शेवटचा बुरुज आहे. या बुरुजावर जाण्यासाठी एका बाजूला पायर्या आहेत तर दुसर्या बाजूला रॅम्प आहे. या रॅम्पच्या खाली पाहारेकर्यांना चिश्रांतीसाठी खोली आहे. या बुरुजावरुन समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. हा बुरुज पाहून परत मागे येउन तटबंदीच्या बाजूने चालत गेल्यावर किल्ल्याच्या दर्या दरवाजा आहे. येथून खाली उतरण्यासाठी पायर्या आहेत. खाली समुद्रा जवळ पेबल बीच आहे.
दर्या दरवाजा पाहून पुढे चालत गेल्यावर एक मोठा बुरुज आहे. त्यापुढे चालत गेल्यावर अजून एक बुरुज आहे. पुढे किल्ल्यावरील मोठा सडा लागतो. किल्ला १८००० स्केअर मीटर एवढ्या क्षेत्रफ़ळावर पसरलेला आहे. सड्याच्या समुद्राकडील बाजूला तटबंदी आणि बुरुज आहेत. किल्ल्याचा हा भाग पाहून पुन्हा प्रवेशव्दारापाशी येऊन किल्ल्याच्या प्रवेशव्दाराच्या दुसर्या बाजूला असलेल्या तटबंदी लगत चालत गेल्यावर या बाजूच्या जमिनीच्या टोकावर असलेल्या बुरुजावर जाणार्या पायर्या दिसतात. या पायर्या चढून वर गेल्यावर बुरजात तोफ़ांसाठी असलेले झरोके आणि बंदुकांसाठी असलेल्या जंग्या पाहायला मिळतात. हा बुरुज पाहून खाली उतरुन तटबंदी लगत पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला मोठा तलाव आहे. तलावाच्या समोरील बाजूस बुरुज आहे. तलावात उतरण्यासाठी चर्चच्या मागच्या बाजूने पायर्या खोदलेल्या आहेत. येथून पुढे फ़ांजीवर झाडे उगवल्याने जात येत नाही. येथेन आल्या मार्गाने परत येतांना खालच्या वाटेने येतांना तटबंदीत एक ६ फ़ूट उंचीचे प्रवेशव्दार आहे. चोर दरवाजा म्हणून याचा उपयोग होत असावा. हा दरवाजा पाहून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ला पाहाण्यासाठी १ तास लागतो.
|
पोहोचण्याच्या वाटा : |
गोव्यातील मडगाव पासून २५ किलोमीटर अंतरावर खोलगड (कोबा द राम ) किल्ला आहे.
|
राहाण्याची सोय : |
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
|
जेवणाची सोय : |
कोल गावात जेवणाचीसाठी हॉटेल्स आहेत. |
पाण्याची सोय : |
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. |
जाण्यासाठी उत्तम कालावधी : |
वर्षभर |