|  राजधेर  
                                       (Rajdher)     | 
 	  किल्ल्याची ऊंची : 
	  	  3555 | 
	
    
		| किल्ल्याचा प्रकार  : गिरीदुर्ग
		 | 
		डोंगररांग: अजंठा सातमाळ | 
	
	
				
				| जिल्हा : नाशिक | 
		श्रेणी : मध्यम | 
		
	
		
			नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक रांग सुरगणा पासून चालू होते आणि चांदवड पर्यंत येऊन संपते. पुढे तीच मनमाडच्या जवळ असणार्या अंकाईच्या पर्यंत जाते. याच रांगेला अजंठा - सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात राजधेर, कोळधेर , इंद्राई आणि चांदवड हे ४ किल्ले येतात. 
  राजधेरवाडी हे राजधेर व इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव आहे. त्यामुळे येथे २ दिवस मुक्काम करून दोनही किल्ले पाहाता येतात. तसेच तिसर्या दिवशी राजधेर ते कोळधेर हा ट्रेक करता येतो. त्यासाठी गावातून वाटाड्या घेणे आवश्यक आहे. राजधेर - कोळधेर - राजधेरवाडी हा ट्रेक करण्यास साधारणतः १० ते १२ तास लागतात.
  | 
		
	
	
	
        | 
        
         | 
		
	
								
	
	
	| पहाण्याची ठिकाणे : | 
			
	
		
| राजधेर किल्ल्याची एक सोंड राजधेरवाडी गावात उतरते. राजधेरवाडीच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या पुढे एक पाण्याची टाकी आहे तेथून गडावर जाण्यासाठी वाट आहे. या सोंडेवरुन साधारणपणे एक तास चढल्यावर आपण किल्ल्याच्या कातळकड्याच्या खाली पोहोचतो. येथून डावीकडे वळून कातळकड्याला समांतर चालत गेल्यावर अर्धा तासात लोखंडी शिडीजवळ पोहोचतो. २०१९ मध्ये वन खात्याने इथे मजबूत शिडी बसवलेली आहे. या ठिकाणी असलेल्या कातळात कोरलेल्या पायर्या इंग्रजांच्या राजवटीत उध्वस्त करण्यात आल्या होत्या. शिडी चढून गेल्यावर एक गुहा आहे. टेहळणीसाठी बसणार्या टेहळ्यांसाठी बनवलेली गुहा पाहून कातळात कोरलेल्या पायर्यांनी वर चढून गेल्यावर पहिल्या प्रवेशद्वाराच्या डावीकडच्या कमानीवर एक फारसीतील शिलालेख आहे. येथून गडमाथ्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्या लागतात. गडमाथ्यावर पोहोचल्यावर समोरच दोन वाटा फुटतात. एक डावीकडे जाणारी तर दुसरी उजवीकडे जाणारी. आपण उजवीकडची वाट पकडायची , थोडे पुढे गेल्यावर एक वाडा लागतो. आजही वाडा चांगल्या स्थितीत उभा आहे. या वाड्या शिवाय येथे बघण्यासारखे काही नाही. परत फिरून आता डावीकडची वाट पकडायची. या वाटेवरून थोडे पुढे गेल्यावर एक कातळात खोदलेली गुहा लागते. या गुहेत उतरण्यासाठी एक शिडी लावलेली आहे. गुहेच्या वरच्या भागावर एक घुमटाकार कमान असलेली विहीर आहे. येथून परत थोडे पुढे गेल्यावर आणखी एक गुहा लागते. या गुहे समोरून पुढे जाणारी वाट तलावापाशी घेऊन जाते. तलावाच्या काठावर एका गुहेत महादेवाचे मंदिर आहे. तलावाच्या कडेकडेने जाणार्या वाटेने आपण डोंगरमाथ्यावर पोहोचतो. वाटेत अनेक भुयारी टाकी आढळतात. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर एक तलाव आहे. गडमाथ्यावरुन मांगीतुंगी, न्हावीगड , कांचना, कोळधेर ,इंद्राई, धोडप असा सर्व परिसर दिसतो. गडमाथा फिरण्यास २ तास लागतात. | 
	
	
		| पोहोचण्याच्या वाटा : | 
	
	
		| राजधेरवाडी हे इंद्राई आणि राजधेर किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव आहे. नाशिक किंवा मनमाड मार्गे चांदवड गाठावे. नाशिक पासून चांदवड ६४ किमी वर आहे, तर मनमाड पासून चांदवड २४ किमी वर आहे. चांदवड मधून एसटी ने राजधेरवाडी गाठावी. राजधेरवाडीतून गडावर जाण्यास ठळक वाट आहे. याशिवाय नाशिक - चांदवड - राजधेरवाडी ही मुक्कामाची बस राजधेरवाडीत रात्री ७ वाजता राजधेरवाडीत पोहोचते. | 
	
		| राहाण्याची सोय : | 
		किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे. यात १० लोकांची राहण्याची सोय होते. 
  | 
	
		
| जेवणाची सोय : | 
		| राजधेरवाडीत जेवणाची सोय होते. | 
	
		
| पाण्याची सोय : | 
		किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याची टाकी आहेत. 
  | 
	
		
| जाण्यासाठी लागणारा वेळ : | 
		| राजधेरवाडी गावातून दीड तास लागतो. | 
	
		
| सूचना : | 
		१) राजधेरवाडी हे राजधेर व इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव आहे. त्यामुळे येथे २ दिवस मुक्काम करून दोनही किल्ले पाहाता येतात. तसेच तिसर्या दिवशी राजधेर ते कोळधेर हा ट्रेक करता येतो. त्यासाठी गावातून वाटाड्या घेणे आवश्यक आहे. राजधेर - कोळधेर - राजधेरवाडी हा ट्रेक करण्यास साधारणतः १० ते १२ तास लागतात.
  २) इंद्राई किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
  |