मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
तारापुर किल्ला (Tarapur Fort) | किल्ल्याची ऊंची :  0 | ||||
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||||
जिल्हा : पालघर | श्रेणी : सोपी | ||||
तारापूरची खाडी जेथे समुद्राला मिळते तेथेच खाडीच्या मुखावर तारापूरचा किल्ला बांधलेला आहे. बाराव्या शतकापासून ज्ञात असलेला तारापूरच्या किल्ल्याचा ताबा नंतरच्या काळात पोर्तुगिज, पेशवे , मराठे यांच्याकडे गेला. वसईच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणार्य़ा या ऐतिहासिक किल्ल्याचा ताबा सध्या तरापूर मधिल श्री चोरगे यांच्याकडे आहे. त्यांनी किल्ल्यात चिकू, आंबा, नारळ व सुपारी यांची बाग फुलविलेली आहे. किल्ल्याच्या आत "श्रीमंताचा वाडा" नावाचे रिसॉर्ट बनवलेले आहे. तारापूरचा किल्ला खाजगी मालमत्ता असल्यामुळे गडाच्या प्रवेशद्वाराला भलामोठा लोखंडी दरवाजा कडी कुलप लावून बंद केलेला असतो. त्याची चावी श्री चोरगे यांच्या घरुन मागून आणावी लागते. किल्ल्याच्या दरवाजाची चावी देणे किंवा न देणे हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला एक रस्ता आहे. त्या रस्त्याने १० मिनिटे चालत गेल्यावर टॉवर जवळ श्री चोरगे यांचे घर आहे. |
|||||
|
|||||
इतिहास : | |||||
इसवीसन १२८० मध्ये माहीमचा राजा भीम याने नाईक लोकांकडून तारापूरचा ताबा मिळवला. पुढे पोर्तुगीजांनी तारापूरचा किल्ला जिंकून घेऊन त्याची इसवीसन १५९३ पुनर्बाधणी केली. पोर्तुगीजांनी ठाण्यात पारसिक किल्ला बांधून आगळीक केल्यामुळे छत्रपती संभाजीराजांनी चिडून पोर्तुगीजांच्या दीव, दमण, सायवन व अशेरीगडावर हल्ला केला. त्याच वेळी त्यांनी तारापूरवर हल्ला करून संपूर्ण गाव बेचिराख केले. पण त्यांना तारापूरच्या किल्ला घेण्याएवढा अवधी नसल्यामुळे किल्ला सुरक्षित राहिला. इ.स. २४ डिसेंबर, १७३८ रोजी चिमाजी आप्पांनी या किल्ल्यावर जातीने हल्ला केला आणि जिंकून घेतला. | |||||
पहाण्याची ठिकाणे : | |||||
तारापूर चौकातून तारापूर किल्ल्यापर्यंत चालत जाण्यासाठी १० मिनिटे लागतात . किल्ल्याच्या अलीकडे डाव्या बाजूला तारपूरचे ग्राम दैवत असलेल्या पांगला मातेचे मंदिर डाव्या बाजूला आहे तर उजव्या बाजूला तारकेश्वर महादेवाचे पेशवेकालीन मंदिर आहे. हे कौलारु मंदिर दाट झाडीत असल्याने पटकन लक्षात येत नाही. मंदिराच्या बाहेर असलेल्या लोखंडी दरवाजातून आत शिरल्यावर दाट झाडीत कौलारु मंदिर आहे. मंदिरा समोर छोटी दिपमाळ आणि गणपतीच मंदिर आहे. मंदिरासमोर छोट्याश्या कौलारु नंदिमंडपात नंदिची सुबक मुर्ती आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे. गाभार्याच्या प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला असलेल्या देव कोष्टकात गणपतीची मूर्ती आहे, तर उजव्या बाजूला असलेल्या देव कोष्टकात देवीची मुर्ती आहे . तारकेश्वर मंदिरामागे सुंदर घोडेबाव आहे. घडीव दगडात बांधलेल्या या विहीरीत उतरण्यासाठी प्रशस्त पायऱ्या आहेत. पायर्यांच्या बाजूने छोट्या ओवऱ्या आहेत. विहिरीवर दोन कमानी आहेत. मंदिर आणि घोडेबाव पाहून परत रस्त्यावर येऊन मंदिराला वळसा घालून २ मिनिटे चालल्यावर आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. तारापूर किल्ल्याचे पूर्वाभिमुख कमान असलेले प्रवेशव्दार काळ्या पाषाणात बांधलेले आहे. प्रवेशव्दारावर कमानीच्या बाजूला दोन दगडात कोरलेली कमळ आहेत. किल्ल्याची काळ्या दगडात बांधलेली तटबंदी अंदाजे २० फ़ूट उंच आहे, तटबंदीत ५ बुरुज असून त्यातील समुद्राच्या बाजूला असलेले दोन बुरुज त्रिकोणी आकाराचे असून इतर ३ बुरुज अर्धगोलाकर आहेत. किल्ल्याच्या तिन बाजूंना खंदक खोदून किल्ला पूर्वीच्या काळी संरक्षित केलेला होता . आज मात्र खंदक अस्तित्वात नाही. . किल्ल्यात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पाहारेकर्यांसाठी असलेल्या देवड्या आहेत. डाव्या बाजूला नव्याने बांधलेले रिसॉर्ट आहे. किल्ल्यात चिकू, आंबा, नारळ व सुपारी यांची बाग असल्याने मुळचे ऐतिहासिक अवशेष त्याखाली दबलेले आहेत. किल्ल्याच्या फांजीवर जाण्यासाठी तटबंदीत बांधलेले दगडी जिने आहेत. पण जीने बर्याच ठिकाणी ढासळलेले आहेत तर तटबंदीवर झाडी वाढल्यामुळे फ़ांजीवरुन फ़िरता येत नाही. प्रवेशव्दारापासून सरळ चालत गेल्यावर एक मारुती मंदिर आहे. मंदिर पाहून मागे येऊन उत्तरेकडे चालत गेल्यावर एक विहिर आहे. या विहिरी पासून तटबंदीकडे चालत गेल्यावर डाव्या बाजूला किल्ल्याचे दुसरे उत्तराभिमुख प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला चिमाजी आप्पांनी स्थापन केलेल्या रोकडा हनुमानेचे मंदिर आहे. या मुळ छोट्या मंदिराचा जिर्णोध्दार करुन त्या जागी मोठे मंदिर बांधण्यात आलेले आहे. त्याच बरोबर बाजूचा किल्ल्याचा दरवाजा फ़ोडून नव्याने बांधून त्यालाही लोखंडी दरवाजा लावून किल्ल्याचा दुर्गप्रेमीं पासून कडक बंदोबस्त केलेला आहे. उत्तरेकडील प्रवेशव्दारातून बाहेर पडून डाव्या बाजूला समुद्राच्या दिशेला चालायला सुरुवात केल्यावर तटबंदीत बाहेरच्या बाजूल असलेल्या एका देवळीत गणपतीची मुर्ती आहे. पुढे गेल्यावर किल्ल्याच्या टोकावर असलेल्या त्रिकोणी बुरुजावर जाण्यासाठी बाहेरुन जीना आहे. अर्थात हा जीना इंग्रजांच्या काळात बांधला असावा. या जिन्याने बुरुजावर चढून गेल्यावर बुरुजात असलेल्या जंग्या पाहायला मिळतात. बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. बुरुजावरुन समुद्र आणि तारपूरची खाडी दिसते. किल्ल्याची चावी जर मिळाली नाही तर किल्ल्याचे दरवाजे रोकडा मारुती आणि त्रिकोणी बुरुज बाहेरुन पाहून किल्ला पाहिल्याच समाधान मानावे लागते. | |||||
पोहोचण्याच्या वाटा : | |||||
ट्रेनने जाण्यासाठी :- तारापूरच्या किल्ल्यास भेट देण्यासाठी आपणास प्रथम पश्चिम रेल्वे मार्गावरील बोईंसर स्टेशन गाठावे लागते . त्यासाठी चर्चगेट - डहाणू लोकल अथवा विरारहून सुटणार्या शटलने बोईसर स्थानक गाठावे . बोईसर स्थानका जवळ असलेल्या बस स्थानकातून तारापूरला जाण्यासाठी भरपूर बस आहेत, तसेच बस स्थानाकाच्या बाहेर ६ आसनी शेअर रिक्षा मिळतात. या बस / रिक्षाने तारापूर चौकात उतरावे. चौकातून एक रस्ता थेट किल्ल्यापर्यंत जातो. चौकातून किल्ल्यापर्यंत चालत जाण्यास १० मिनिटे लागतात. तारापूर किल्ला आणि डहाणू किल्ला एकाच दिवशी पाहाता येतात. त्यासाठी तारापूरचा किल्ला पाहून झाल्यावर पुन्हा तारापूर चौकात येऊन डहाणूसाठी बस पकडावी. बस न मिळाल्यास चिंचणी गावापर्यंत जाण्यासाठी ६ आसनी शेअर रिक्षा मिळतात. या रिक्षाने चिंचणी चौकात उतरावे. तेथून डहाणूला जाण्यासाठी बस आणि शेअर रिक्षा मिळतात. डहाणूचा किल्ला पाहून झाल्यावर रिक्षा पकडून डहाणू रेल्वे स्थानक गाठावे. रस्त्याने जाण्यासाठी :- मुंबई - सुरत मार्गावर असलेल्या चिल्हार फ़ाट्यावरुन बोईसर मार्गे तारापूरला पोहोचता येते. मुंबई तारापूर रस्त्यामार्गे अंतर १२२ किलोमीटर आहे. | |||||
राहाण्याची सोय : | |||||
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही. | |||||
जेवणाची सोय : | |||||
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. गावात जेवणासाठी हॉटेल्स आहेत. | |||||
पाण्याची सोय : | |||||
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. | |||||
जाण्यासाठी उत्तम कालावधी : | |||||
वर्षभर |
जिल्हा Palghar | अर्नाळा (Arnala) | आसावा (Asawa) | अशेरीगड (Asherigad) | बल्लाळगड (Ballalgad) |
डहाणू किल्ला (Dahanu Fort) | काळदुर्ग (Kaldurg) | कोहोजगड (Kohoj) | मांडवी कोट (Mandvi Kot) |
सेगवा किल्ला (Segawa) | तारापुर किल्ला (Tarapur Fort) |