वारी भैरवगड
(Wari Bhairavgad) |
किल्ल्याची ऊंची : 
200 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : अकोला |
श्रेणी : सोपी |
बुलढाणा जिल्ह्याच्या टोकाला वारी भैरवगड हे गाव आहे, गावात असलेल्या समर्थ स्थापित हनुमानाच्या मंदिरामुळे या गावाला वारी हनुमान या नावाने पंचक्रिशीत ओळखले जाते. श्रावणी शनिवार आणि हनुमान जयंतीला या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. या मंदिराच्या मागे वाण नदीवर असलेली धरण आहे. मंदिराजवळ एक ओढा वाण नदिला मिळतो. या संगमावर निसर्गरम्य परिसरात वारीचे हनुमान मंदिर आहे, हनुमान मंदिर गावाच्या उत्तरेला आहे तर वारे भैरवगड हा किल्ला गावाच्या दक्षिण टोकावर आहे. या गावातून वाण नदी आणि तीची उपनदी वाहाते. या नद्यांच्या संगमावर असलेल्या टेकडीवर वारी भैरवगड हा किल्ला आहे.
|
|
पहाण्याची ठिकाणे : |
वारी भैरवगड गावात शिरल्यावर भैरवगडच्या पायथ्या पर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे. भैरवगडाची टेकडी आणि गावाचा भाग वेगळा करण्यासाठी एक खंदक खोदलेला आहे. या ठिकाणी उभे राहिल्यावर समोरच विटांनी बांधून काढलेले भव्य प्रवेशव्दार पाहायला मिळते. या प्रवेशव्दाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूस तटबंदी आणि टेकडीच्या टोकाला मातीने बांधलेले बुरुज पाहायला मिळतात. या बुरुजांवरही विटा लावलेल्या असाव्यात. आता मात्र केवळ आतली माती पाहायला मिळते.
खंदकात उतरुन किल्ल्याच्या प्रवेश्व्दाराकडे जातांना अर्ध्या उंचीवर एका भिंतीचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराचे रक्षण करण्यासाठी ही भिंत बांधलेली होती. किल्ल्याचे भव्य प्रवेशव्दार भाजलेल्या विटांनी बांधलेले आहे, या विटांचा वापर करुन सुंदर नक्षी तयार केलेली आहे. प्रवेशव्दाराच्या वर नगार खाना आहे, नगारखान्याला नक्षीदार खिडक्या (झरोके ) आहेत. प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला नगारखान्यात जाण्यासाठी दगडात बांधलेल्या पायर्या आहेत. या पायर्यांनी नगारखान्यात चढून गेल्यावर किल्ल्याच्या त्रिकोणी आकार आणि छोटा आवाक दिसतो. किल्ल्याच्या टोकाला भैरवाचे मंदिर आहे. यावरुनच किल्ल्याला भैरवगड हे नाव असावे.
नगारखान्याच्या भिंतीत अनेक ठिकाणी जंग्या व तोफांसाठीचे बांधलेले झरोके पाहायला मिळतात. . नगारखाना पाहून खाली उतरुन भैरवनाथ मंदिराकडे जातांना डाव्या बाजूस विटात बांधलेली खूप खोल विहीर आहे. ही विहीर थोडी उतारावर असल्याने व तिच्या भोवतीने झुडपे असल्याने ती पटकन दिसत नाही. किल्ल्याच्या टोकावर असलेल्या भैरवनाथ मंदिराच्या मागे गेल्यावर याठिकाणी एक बुरुजाच्या खुणा दिसतात. येथून वाण आणि तीच्या उपनदीचा संगम दिसतो. किल्ल्याच्या तटावरुन फ़िरताना अजून दोन ठिकाणी बुरुजांचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ला छोटा असल्याने १५ मिनिटात पाहून होतो.
|
पोहोचण्याच्या वाटा : |
श्री गजानन महाराजांमुळे प्रसिध्द असलेले शेगाव हे मुंबई नागपूर लोहमार्गावर असलेले महत्वाचे स्थानक आहे. शेगाव ते वारी भैरवगड अंतर ५० किलोमीटर आहे. शेगावहून खाजगी वहानाने मैलगड आणि वारी भैरवगड हे दोन्ही किल्ले एका दिवसात पाहाता येतात.
गाविलगड किल्ला पाहून नरनाळ्याला जातांना अकोट मार्गे गेल्यास अकोट वारी भैरवगड हे अंतर ३४ किलोमीटर आहे .
|
राहाण्याची सोय : |
राहाण्याची सोय किल्ल्यावर आणि गावात नाही. |
जेवणाची सोय : |
गावात जेवणासाठी हॉटेल्स नाहित. |
पाण्याची सोय : |
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही. |
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी १० मिनिटे लागतात. |
जाण्यासाठी उत्तम कालावधी : |
वर्षभर |