मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

भूषणगड (Bhushangad) किल्ल्याची ऊंची :  2970
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात दूरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भूषणगडचा एकमेव डोंगर आपले दुरुनच लक्ष वेधून घेतो. या डोंगरावर सुस्थितीत असलेला भूषणगडचा किल्ला व नवसाला पावणारी हरणाइ देवी, या मुलुखात प्रसिध्द आहे. गावकर्‍यांनी गडाला पायर्‍या बांधल्या आहेत व गडावर वृक्षारोपण करुन गड हिरवागार केलेला आहे. यात पिवळ्याजर्द फुलांची झाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गडाला वेगळीच शोभा आली आहे. तसेच अनेक छोटे पक्षी व फुलपाखर यांनी गड गजबजून गेला आहे.

16 Photos available for this fort
Bhushangad
Bhushangad
Bhushangad
इतिहास :
देवगिरीचा सम्राट राजा सिंघण दूसरा (१२१०-१२४७) याने हा किल्ला बांधला. इ.स. १६७६ मध्ये शिवाजीराजांनी आदिलशहाकडून भूषणगडचा किल्ला जिंकून घेतला व त्याची फेरउभारणी केली. नंतरच्या काळात औरंगजेबाने किल्ला जिंकून त्याचे नाव ‘‘इस्लामतारा’’ ठेवले. पेशवेकाळात हा गड पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. इ.स १८४८ मध्ये इंग्रजांनी सातार्‍याचे राज्य खालसा केल्यावर भूषणगडचा ताबा इंग्रजांकडे आला.
पहाण्याची ठिकाणे :

भूषणगडवाडीतून पायर्‍यांची वाट गडावर जाते. पायर्‍यांच्या सुरुवातीला सिमेंटमध्ये बांधलेली आधुनिक कमान आहे. पायर्‍यांची रचना अशी केलेली आहे की, गड चढतांना गडाची तटबंदी व बुरुज सतत उजव्या बाजूस रहातात. या रचनेमुळे शत्रू कायम गडावरुन मार्‍याच्या टप्प्यात रहातो. गडाच्या प्रवेशद्वाराची भग्न कमान नव्याने बांधून काढलेली आहे. पण त्याच्या बाजूचे बुरुज सुस्थितीत आहेत. हे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून त्याची बांधणी ‘‘गोमुखी’’पध्दतीची आहे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. प्रवेशद्वारासमोरील वाट तटबंदीच्या बाजूने जाते, या मार्गावर आपल्याला एक खोल विहीर पाहायला मिळते. गडाची तटबंदी आजही सुस्थितीत असल्यामुळे त्यात जागोजागी आपल्याला जंग्या पाहायला मिळतात.

प्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीकडील पायर्‍यांची वाट मोठ्या बुरुजाकडे जाते. या बुरुजाला तोफेसाठी जंग्या आहेत. या बुरुजावरुन गडाचा मधला उंचवटा दिसतो. बुरुज पाहून मधल्या उंचवट्याकडे जाताना, उजव्या हाताला भव्य बांधीव कुंड दिसते. या कुंडाजवळच महादेवाचे छोटे मंदीर आहे. या मंदिरावरुन पुढे गेल्यावर किल्ल्याची अधिष्ठात्री असलेल्या हरणाई देवीचे उत्तराभिमुख मंदिर दिसते. या जिर्णोध्दारीत मंदिरात हरणाई देवीची दिड फूट उंचीची मुर्ती आहे. मूर्तीवर पितळी मुखवटा बसविलेला आहे. हरणाई देवीच्या उजव्या बाजूस सिध्दनाथाची काळ्या दगडात कोरलेली मूर्ती आहे. मंदिरासमोर दिपमाळ व शेंदूर फासलेले दगड आहेत. मंदिरासमोरील पायवाटेने उंचवटा उतरुन आपण गडाच्या उत्तर तटबंदीपाशी येतो. येथून किल्ल्याची तटबंदी व बुरुज नजरेस पडतात. याशिवाय भूषणगडची तटबंदीच्या खालच्या अंगाला असलेली दक्षिणोत्तर पसरलेली लांब सोंड दिसते.तटबंदीवरुन चालत गेल्यास देवळाच्या खालच्या बाजूस साचपाण्याचा तलाव दिसतो. याच तटबंदीवरुन आपण संपूर्ण किल्ल्याची प्रदक्षिणाकरुन पुन्हा प्रवेशद्वारापाशी येतो.

प्रवेशद्वारातून बाहेर पडून काही पायर्‍या उतरल्यावर डाव्याबाजूला एक रुंद मळलेली पायवाट दिसते. ही तटबंदी व बुरुजाखालुन जाणारी पायवाट भूयारी देवी मंदिराकडे जाते. वाटेत आपल्याला तटबंदीवरुन दिसणारी भूषणगड डोंगराची सोंड लागते. भूयारी देवीचे मंदिर भूयार बुजवून नविनच बनविण्यात आलेले आहे. भूषणगडची गडफेरी येथे पूर्ण होते; ती करण्यास १ तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
भूषणगड सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात येतो. दहीवडी - कराड मार्गावरील वडूज या मोठ्या गावातून भूषणगडला जाण्यासाठी बसेस आहेत. खाजगी वाहानाने भूषणगडला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत.

१) पुणे - फलटणमार्गे - भुषणगडला जाण्यासाठी :

अ) दहीवडी - कराड मार्गावर वडूज पासून २० किमी अंतरावर पुसेसावळी गाव आहे. या गावात शिरल्यावर उजव्याबाजूला जाणारा रस्ता भूषणगडच्या पायथ्याशी जातो. या ५ किमी रस्त्यापैकी अर्धा रस्ता कच्चा आहे.

आ) दहीवडी - वडूज - उंबर्डेफाटा - शिरसेवाडी - होळीचेगाव - भूषणगड हा छोट्या गावांमधून जाणारा रस्ता खराब आहे. तसेच चुकण्याची शक्ययता जास्त आहे

२) पुणे - सातारा मार्गे भुषणगडला जाण्यासाठी :

क) पुणे - सातारा - कोरेगाव - रहिमतपुर - पुसेसावळी - भुषणगड.

२) पुणे - सातारा - कोरेगाव - पुसेगाव रहिमतपुर पुसेसावळी - रहाटणी - भुषणगड.
राहाण्याची सोय :
गडावरील हरणाई देवीच्या मंदिरासमोरील शेडमध्ये रहाण्याची व्यवस्था होऊ शकेल.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची व्यवस्था नाही.आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
भूषणगडवाडीतून गडावर जाण्यास ३० मिनीटे लागतात.
सूचना :
वर्धनगड , भूषणगड, महीमानगड हे तीन किल्ले खाजगी वाहानाने एका दिवसात पाहून होतात.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...