मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

चौल्हेर (Chaulher) किल्ल्याची ऊंची :  3700
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बागलाण
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
किल्ले चौल्हेर हा चौरगड उर्फ तिळवणचा किल्ला अथवा चाल्हेरीचा किल्ला य़ा नावाने देखील ओळखला जातो. किल्ले चौल्हेर हा साल्हेरचा जुळा भाऊ आहे. चौल्हेरचा आकार हा साधारणपणे साल्हेरशी साधर्म्य दाखविणारा आहे. चौल्हेर किल्ल्याच्या प्रवेशव्दारांची रचना पाहाण्यासारखी आहे. चौल्हेर किल्ल्यावर दरवर्षी पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे पिठुरी अमावस्येला जत्रा भरते.
9 Photos available for this fort
Chaulher
पहाण्याची ठिकाणे :
वाडी चौल्हेर गावाच्या मागे चौल्हेर किल्ला आहे. गावातून गडावर जाण्यासाठी दोन टेकड्या पार कराव्या लागतात. गावा जवळील टेकडीच्या पायथ्याशी एक कमान उभारलेली आहे. या टेकडीवर चढून जाण्यास १० मिनिटे लागतात. या टेकडीवर वनखात्याने पर्यटकांसाठी सिमेंटचे विश्रांतीस्थान बांधलेली आहेत. या टेकडीच्या समोरील डोंगराच्या डाव्या बाहूने वळसा घालून एक ठळक पायवाट जाते. दरी उजवीकडे आणि डोंगर डावीकडे ठेवत या पायवाटेने २० मिनिटात आपण किल्ल्याच्या डोंगरा समोरील छोट्याश्या पठारावर पोहोचतो. येथून समोरच किल्ल्याचा बुरुज दिसतो. पठारावरुन वाट खाली उतरते आणि किल्ल्याच्या डोंगराला लागते. या वाटेवर भरपूर घसारा (स्क्री) आहे. किल्ल्याचा डोंगर डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत किल्ला चढायला सुरुवात करावी. साधारणपणे अर्ध्या तासात आपण रेलिंगपाशी पोहोचतो. याठिकाणी रेलिंग लावून दरीकडील बाजू सुरक्षित केलेली आहे. रेलींग संपल्यावर कातळात खोदलेल्या पायर्‍या लागतात. त्या पार केल्या की आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशव्दाराच्या खाली पोहोचतो.

प्रवेशव्दाराकडे जाणार्‍या कातळात कोरलेल्या पायर्‍यांच्या वरच्या बाजूला एक पाण्याचे टाके आहे. प्रवेशव्दारातून आत गेल्यावर वाट काटकोनात वळते . काही पायर्‍या चढल्यावर दुसरा दरवाजा आहे. पुन्हा वाट काटकोनात वळते तेथे तिसरा दरवाजा आहे. पायर्‍या चढून वर गेल्यावर चौथा दरवाजा लागतो. हे सर्व दरवाजे अशा प्रकारे बांधलेले आहेत की या प्रवेशव्दार संकुलात फ़ारसा प्रकाश येणार नाही. त्यामुळेच या दरवाजांचा भूयारी दरवाजे असा उल्लेख केलेला आढलतो. चौथ्या दरवाजातून बाहेर पडल्यावर आपला माचीवर प्रवेश होतो. उजव्या बाजूला पाहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. त्याच्या पुढे पाचवा दरवाजा होता पण आज तो अस्तित्वात नाही. या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर एक पूर्ण झिजलेली मुर्ती आहे. दरवाजा समोरुन गड माथ्यावर जाणारी वाट आहे . तर उजव्या बाजूला पिंड , नंदी आणि मंदिराच्या खांबाचे अवशेष उघड्यावर ठेवलेले आहेत. या अवशेषांच्या पुढे टोकावर जाऊन खाली पाहिल्यावर एक टाक दिसते. हे सर्व अवशेष पाहून गडमाथ्याकडे न जाता विरुध्द बाजूला जावे. याठिकाणी लांबलचक पसरलेले पठार आहे. मध्यभागी एक उंचवटा आहे. त्यावर वास्तूचे अवशेष आहेत. या उंचवट्या खाली उजव्या बाजूला पाण्याची दोन टाकी आहेत. या टाक्यांच्या पुढे पठाराच्या टोकाला बुरुज आहे. किल्ल्यावर येण्याच्या वाटेवरुन हाच बुरुज आपल्याला सतत दिसत असतो.

किल्ल्याच्या माचीवरुन परत फ़िरुन प्रवेशव्दारापाशी येऊन गड माथ्याच्या दिशेने चढायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेल्या पायर्‍या लागतात. पायर्‍या चढून गेल्यावर समोरच एक पत्र्याची शेड लागते. त्या ठिकाणी एका साधूचे वास्तव्य आहे. या भागातून गडमाथ्याला पूर्ण फ़ेरी मारता येते. शेडच्या पुढे एक सिमेंटने बांधलेले चौरंगीनाथांचे मंदीर आहे. त्यात हनुमानाची मुर्ती आणि इतर झिजलेल्या मुर्ती आहेत. मंदिराच्या पुढे गेल्यावर एक पाण्याचे टाके आहे. टाक्याच्या खालच्या बाजूला एक बुरुज आहे. टाक्याच्या वरच्या बाजूला चढून गेल्यावर गड माथ्याच्या कातळटोपी खाली पाण्यचे प्रचंड मोठे टाके आहे. सध्या त्यात दगड पडून ते भरलेले आहे. इथून पुढे जाणारी वाट ढासळलेली असल्याने पुन्हा चौरंगीनाथ मंदिरापाशी यावे. इथून समोर किल्लाची माची दिसते. त्या माचीच्या खालच्या अंगाला एक टाके खोदलेले आहे. चौरंगीनाथ मंदिराच्या पुढे असलेल्या साधूच्या कुटीच्या पुढे पायवाट गड माथ्यावर चढत कातळभिंतीपाशी येते. इथे उजव्या बाजूला मोती टाके आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. मोती टाके पाहून पुन्हा पायवाटेवर येऊन पुढे गेल्यावर कातळात कोरलेली दोन टाकी बाजूबाजूला आहेत. टाक्यांच्या पुढे गडमाथ्यावर (बाले किल्ल्यावर) जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. या पायर्‍या चढून गेल्यावर उध्वस्त प्रवेशव्दारातून आपला गडावर प्रवेश होतो. प्रवेशव्दाराचे नक्षीदार दगड तिथे विखूरलेले पाहायला मिळतात. गडमाथ्यावर डाव्या बाजूला एक वास्तू आहे. त्याच्या तळघरात धान्य कोठार आहे. त्याच्या बाजूला वास्तूचा चोर दरवाजा आहे. ही मोठी वास्तू पाहून गडमाथ्यावर आल्यावर इतरही काही उध्वस्त वास्तू दिसतात. पण त्यात माजलेल्या झाडझाडोर्‍यामुळे आणि निवडुंगामुळे वास्तूत प्रवेश करता येत नाही. गडमाथ्यावर मध्यभागी कातळात कोरलेली पाण्याची टाकी आहेत. टाक्यांजवळ असलेल्या उंचवट्यावर ध्वजस्तंभ लावलेला आहे. बालेकिल्ल्याच्या तटबंदीला असलेल्या दुसर्‍या दरवाजातून आपण बाहेर पडतो आणि बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारापाशी येतो . याठिकाणी आपली गडफ़ेरी पूर्ण होते. संपूर्ण गड फिरण्यास दोन तास पुरतात.

पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई - पुण्याहून नाशिक मार्गे ९५ किमी वरील सटाणा गाठावे. सटाण्यावरुन (१५ किलोमीटर) तिळवणला जाणारी एसटी पकडावी. तिळवण पासून २० मिनिटांवर असणार्‍या वाडी चौल्हेर गावात पोहचावे. वाडी चौल्हेर हे पायथ्याचे गाव. गावातच किल्ल्याला लागून असलेल्या डोंगराची डोंगरसोंड उतरते. याच डोंगरसोंडेवरुन चालत दीड तासात गडमाथा गाठता येतो.. खाजगी गाडीने थेट गडाच्या पायथ्या पर्यंत जाता येते. वाडी चौल्हेर गावातून कच्च्या रस्त्याने किल्ल्याला लागून असलेल्या डोंगराच्या डोंगरसोंडे पर्यंत जाता येते.
राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची व्यवस्था नाही., आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
मोती टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
वाडी चौल्हेर वरुन दीड तास लागतो.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...