मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

गोवळकोट (Gowalkot) किल्ल्याची ऊंची :  150
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रत्नागिरी ,कोकण
जिल्हा : रत्नागिरी श्रेणी : मध्यम
चिपळूण शहरात वाशिष्ठी नदीच्या काठावरील एका टेकडीवर गोवळकोट उर्फ गोविंदगड हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या तीन बाजूंनी वाशिष्ठी नदीचे नैसर्गिक संरक्षण आहे, तर उरलेल्या बाजूला खंदक खोदून किल्ला बळकट केला होता. आज हा खंदक बुजलेला आहे.चिपळूण हे प्राचिनकाळात बंदर म्हणून प्रसिध्द होते. या बंदराच्या संरक्षणासाठी गोवळकोटची उभारणी करण्यात आली होती.


10 Photos available for this fort
Gowalkot
Gowalkot
Gowalkot
इतिहास :
इ.स १६६० च्या सुमारास शिवाजी महाराजांनी अंजनवेलचा किल्ला व गोवळकोट हे किल्ले जिंकले व त्यांची नावे गोपाळगड व गोविंदगड अशी ठेवली. संभाजी महाराजांच्या काळात गोवळकोट सिद्दीच्या ताब्यात गेला. २० मार्च १७३६ रोजी पिलाजी जाधव, चिमाजी अप्पा यांच्या नेत्वृत्वाखालील मराठी सैन्याची व सिद्दी सात याची लढाइ झाली. यात सिद्दी सात मारला गेला. त्याचे १३००, तर मराठ्यांचे ८०० लोक पडले. यावेळी सिद्दी बरोबर झालेल्या तहात गोवळकोट सिद्दीने आपल्याच ताब्यात ठेवला. १७४५ नंतर तुळाजी आंग्रे यांनी या गडाचा ताबा घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
गडाच्या पायथ्याशी करंजेश्वर देवीचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराच्या मागे गडावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. गडाच्या उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण गडात प्रवेश करतो. प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूचे बुरुज शाबूत आहेत. यातील उजव्या बुरुजावरुन प्रवेशफेरी चालू केल्यास, प्रथम बुरुजावरील दोन तोफा दिसतात. तटावरुन पुढे जाताना डाव्या हाताला घरांचे चौथरे दिसतात, तर उजव्या बाजूस वाशिष्ठी नदी, त्यामागिल शेते, कोकण रेल्वे व मागचा परशुराम डोंगर यांचे विहंगम दृश्य दिसते.
तटावरुन पुढे गेल्यावर एक पाण्याचा प्रशस्त बांधिव तलाव दिसतो. या तलावात उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. पण यात पाणी नाही आहे. तलावाच्या मागिल बाजूस एक १५ फूटी मातीचा उंचवटा आहे. त्यावरुन संपूर्ण किल्ला पाहाता येतो.
गडाची तटबंदी ८ फूट रुंद असून शाबूत आहेत; पण गडाला असलेली दोनही प्रवेशद्वार नष्ट झालेली आहेत. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायर्‍या केलेल्या आहेत. गडावर रेडजाइ देवीच मंदिर आहे. गडफेरी पूर्ण झाल्यावर प्रवेशद्वारातून बाहेर पडून पायर्‍यांनी खाली न उतरता, समोर दिसणार्‍या चिपळूण जलशुध्दीकरण केंद्राकडे चालत जातांना डाव्या हाताला तटबंदीचे काही अवशेष दिसतात. तर जलशुध्दीकरण केंद्रा पलिकडे एक सुस्थितीतील बुरुज दिसतो.
गडाच्या उध्वस्त पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून पायर्‍यांनी खाली उतरुन गोवळकोट जेटीवर जाता येते. जेटीवर ५ तोफा उलट्या गाडलेल्या होत्या. २०१७ साली त्या तोफ़ा तिथून काढून गडावर नेण्यात आल्या . रेडजाई देवीच्या मंदिरा जवळ एक सिमेंटचा चौथरा बांधून त्यावर तोफ़ा ठेवण्यात आल्या आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :
चिपळूण शहरापासून २ कि.मी वर असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत म्हणजे करंजेश्वरी देवीच्या मंदिरापर्यंत रिक्षा मिळतात. मंदिरामागील पायर्‍यांच्या मार्गाने १५ मिनीटात गडावर जाता येते.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...