मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

थाळनेर (Thalner) किल्ल्याची ऊंची :  100
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : धुळे श्रेणी : मध्यम
धुळे जिल्हयात तापी नदी काठी थाळनेर हा पुरातन किल्ला आजही काळाशी व स्थानिक लोकांच्या अनास्थेशी झुंज देत उभा आहे. अनेक राजवटी व त्यांचा वैभवशाली काळ पाहिलेला हा किल्ला आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. थाळनेर ही एकेकाळी खानदेशची राजधानी होती, सुरत - बुर्‍हाणपूर या व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे केंद्र होता. लता मंगेशकर यांचे आजोळ थाळनेरला होते.


Thalner
13 Photos available for this fort
Thalner
इतिहास :
इ.स. ११२८ मध्ये जिवाजी आणि गोवाजी या गवळी किंवा अहीर कुटुंबाकडे थाळनेरचा ताबा होता. देवगिरीचा राजा बाजीराव ह्याचा मुलगा दौलतराव खानदेशची पाहाणी करण्यासाठी आला असता त्याला थाळनेरची भरभराट झाल्याच आढळले, (त्याचवेळी खानदेशातील इतर २३ किल्ल्यांची धुळधाण झाली होती.) त्यामुळे खुश होऊन त्याने जिवाजी आणि गोवाजीच्या कुटुंबाला थाळनेरचा प्रमुख बनविले.

इ.स. १३७० मध्ये फिरोजशहा तुघलक याने हा प्रदेश जिंकून घेतला आणि मलिकराजा फारुकी याला दक्षिण गुजरातची सुभेदारी बहाल केली. मलिकने थाळनेरला आपली राजधानी बनविली. पुढच्याच वर्षी गुजरातच्या सुलतानाने मलिकवर हल्ला करुन त्याचा प्रदेश हिसकावून घेतला, मलिक थाळनेरच्या आश्रयाला जाऊन राहीला. इ.स.१३९९ मध्ये मलिक मेल्यावर त्याने आपल्या दुसर्‍या मुलाला थाळनेरचा ताबा दिला. त्यामुळे चिडलेल्या पहिल्या मुलाने माळव्याच्या सुलतानाच्या मदतीने थाळनेरवर हल्ला करुन त्याचा ताबा घेतला.(१४१७)

इ.स. १४९८ मध्ये गुजरातचा सुलतान मो. बेगाडा याने थाळनेर जिंकून आजूबाजूच्या प्रदेशात लुटालुट केली. १५११ मध्ये मो. बेगाडाने अर्धा खानदेश आपला वजिर मलिक हसनुद्दीन याला बहाल केला. पण पुढच्याच वर्षी त्याचा खुन झाला.गुजरातचा सुलतान चंगेज खानने इ.स. १५६६ मध्ये खानदेशचा राजा मिरान मुहम्मद खान याचा पराभव केला. इ.स. १६०० मध्ये थाळनेरचा ताबा अकबराकडे गेला, त्यावेळी सुरत - बुऱ्हाणपूर या व्यापारी मार्गावर असलेला हा किल्ला अतिशय मजबूत व संपन्न होता. १७५० मध्ये थाळनेरचा ताबा पेशव्यांकडे गेल्यावर त्यांनी तो होळकरांना दिला. १८०० मध्ये होळकरांनी तो निंबाळकरांना दिला, पण पुढच्याच वर्षी परत आपल्या ताब्यात घेतला.

इ.स. १८१८ मध्ये ब्रिटीश जनरल सर थॉमस हिसॉप जेव्हा थाळनेरचा किल्ला घेण्यासाठी गेला, त्यावेळी खानदेशच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित प्रतिकार त्याला इथे झाला. यात मराठ्यांचे २५० लोक तर इंग्रजांचे २५ जण ठार झाले.


पहाण्याची ठिकाणे :
तापी नदी थाळनेर गावाजवळ नालेच्या (यू) आकाराचे वळण घेते. तेथे असलेल्या १०० मीटर उंच टेकडीवर थाळनेरचा किल्ला वसलेला आहे. आज दुदैवाने किल्ल्याची पाताळेश्वर मंदीराच्या बाजूची ६० फूट उंच भाजलेल्या विटांमध्ये बांधलेली भिंत व २ बुरुज उभे आहेत. बाकी सर्व बाजूच्या भिंती व बुरुज नष्ट झालेले आहेत. किल्ल्यावर दोन छोट्या देवळ्या आहेत. एकात सप्तशृंगी देवीची अलिकडची मुर्ती आहे व दुसरे देऊळ रिकामे आहे.
किल्ल्यात फारसे काही बघण्यासारखे नसले तरी गावात दोन ठिकाणे पहाण्यासारखी आहेत.
१) जमादार वाडा :- गावातून पाताळेश्वर शंकर मंदीराकडे जाताना एक गढी आपले लक्ष वेधून घेते. त्याला स्थानिक लोक ‘‘जमादार वाडा’’ म्हणतात. या गढीत आजमितीला अनेक कुटुंब रहातात. वाड्याच्या ४ टोकांना विटांनी बांधलेले १२ फुटी बुरुज आहेत. प्रवेशद्वार २० फुट उंच असून त्यावर अणकुचीदार खिळे बसविलेले आहेत. वाड्याचे प्रवेशद्वार, त्यावरील सज्जा लाकडी असून त्यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. वाड्याच्या आतील भागातील घरांच्या दारा खिडक्यावरही सुंदर नक्षीकाम आहे. घरातील साध्या खुंट्या, कोनाडे यांच्यावरचे नक्षीकाम गढी बांधणार्‍यांच्या रसिकतेची कल्पना देते. गढीला तळघर व त्यात उतरण्यासाठी जिना आहे. या दोन मजली गढीत सध्या अनेक कुटुंबे रहातात ते आस्थेने गढी दाखवतात, पण त्याच्या इतिहासाबद्दल व पूर्वजांच्या कर्तृत्वाबद्दल ते अनभिज्ञ आहेत. गढीच्या प्रवेशद्वाराशेजारी रामसिंग व गुमान सिंग ही नावे लिहीलेली दिसतात.

२) १० कबरी:- थाळनेरवर राज्य करणार्‍या फारुकी घराण्यातील राजांच्या व महत्त्वाच्या व्यक्तींच्या कबरी थाळनेर गावात आहेत. त्यातील एक मोठी कबर अष्टकोनी असून त्यावर अरेबिक भाषेतील शिलालेख आहे. बाकीच्या कबरी साधारण एकाच मापाच्या (११फूट * ११ फूट) व आकाराच्या आहेत. त्या कबरीपैकी चार ज्ञात राजांच्या कबरी पुढीलप्रमाणे, १) मलिक राजा (१३९६), २) मलिक नसिर (१४३७), ३) मिरान अदील शहा (१४४१) ४) मिरान मुबारक खान (१४५७).
पोहोचण्याच्या वाटा :
थाळनेर गाव धुळे शहरापासून ४८ किमी वर आहे.
राहाण्याची सोय :
गडावर किंवा गावात राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर किंवा गावात राहण्याची सोय नाही.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही.
सूचना :
१) धुळ्याहून सकाळी लवकर निघून २१ किमी वरील सोनगिर, २७ किमी वरील थाळनेर पाहून धुळ्याला परत येता येते. अथवा तसेच पुढे जाऊन (४० किमी) वरील अंमळनेर, (२० किमी) पारोळा, (८ किमी) बहादरपूर हे किल्ले पाहून धुळ्याला परत येता येते.
२) साईटवर अंमळनेर, पारोळा, बहादरपूर या किल्ल्यांची माहिती दिलेली आहे.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...