मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

लोहगड (Lohgad) किल्ल्याची ऊंची :  3400
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: लोणावळा
जिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम
पवना मावळात असणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचा संरक्षक असणारा हा लोहगड पुणे - मुंबई हमरस्त्यावरून सहजच नजरेस पडतो. पुण्या आणि मुंबईपासून जवळ असल्या कारणाने येथे ट्रेकर्स मंडळींची नेहमीच ये जा चालू असते. याच डोंगराच्या पोटात भाजे आणि बेडसे या प्रसिध्द लेण्या आहेत. मुंबई - पुणे रेल्वेमार्गावरील मळवली स्टेशनवर उतरून आपण किल्ल्याकडे जाऊ शकतो. महामार्गापासून जवळच असल्याने पायथ्याच्या गावात सर्व सुखसुविधा आहेत.
Lohgad
Lohgad
इतिहास :
लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आहे. किल्ल्याची निर्मिती जवळ असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच सत्तावीशसे वर्षांपूर्वी झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. इ.स १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले, त्यापैकीच लोहगड हा एक महत्वाचा किल्ला होता. इ.स १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्‍हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लूटेच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंगर्‍यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा, शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्‍यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुर्‍यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला पण नंतर दुसर्‍या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
पहाण्याची ठिकाणे :
गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमुळे तयार झालेल्या सर्पिलाकार मार्गावरून जावे लागते. त्या प्रवेशद्वारांची नावे पुढील प्रमाणे:-

१) गणेश दरवाजा:- या दरवाच्या दोन्ही बाजूला गणपतीची मुर्ती व वरच्या बाजूला कमळे कोरलेली आहेत. या दरवाजाच्या आतील बाजूस शिलालेख आहेत.उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटिलकी देण्यात आली होती.

गणेश दरवाजातून पायर्‍या चढून महा दरवाजाकडे जातांना महादरवाजाच्या खालच्या बाजूला असलेल्या बुरुजाच्या आत जाण्यासाठी छोटा दरवाजा आहे. या दरवाजातून आत गेल्यावर एक शौचकुप पाहायला मिळते. त्याच्या पुढे तळघरात बांधलेल्या दोन खोल्या आहेत. तेथून पुढे गेल्यावर बुरुजाच्या तटबंदीत छोटा दरवाजा आहे, त्यातून बाहेर पडल्यावर कड्यात एक गुहा आहे.

२) महादरवाजा: - महादरवाजाच्या पायर्‍या घडीव दगडात बांधलेल्या आहेत. त्या चढून गेल्यावर महादरवाजा ओलांडून गेल्यावर समोरच कड्यात पाण्याची टाकी आहेत.

३) नारायण दरवाजा: - दरवाजाच्या आत पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. या दरवाजाच्या काटकोनात हनुमान दरवाजा आहे, .

४) हनुमान दरवाजा:- हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. या दरवाजाच्या दोनही बाजूस शरभाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.

चार दरवाजे ओलांडून किल्ल्यात शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी एका वास्तूचे (सदरचे) भग्न अवशेष आढळतात. ते पाहून पुढे गेल्यावर महादेव मंदिर पाहायला मिळते. महादेव मंदिराच्या समोर त्र्यंबक हा अष्टकोनी तलाव आहे. तलावाच्या बाजूला तीन टाकी आहेत. टाकी पाहून पुढे गेल्यावर पीराचे थडगे आणि त्यापुढे सोळाकोनी तलाव आहे. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली होती.

तलावाच्या पुढे चुन्याचा घाणा डाव्या बाजूला पाहायला मिळतो. तर उजव्या बाजूला एक पाण्याचे टाक आहे. पुढे विंचुकाट्याकडे जातांना वाड्यांचे काही अवशेष आणि टाकी पाहायला मिळतात.या विंचूकाट्यास बघून आपल्याला आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाटयावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात.या भागात पाण्याची उत्तम सोय आढळते.

विंचूकाट्याकडे उतरतांना एक पडझड झालेला बुरुज आहे. या बुरुजावरुन पुढे गेल्यावर एक पाण्याचे टाक आहे ते पाहून पुढे गेल्यावर विंचूकाट्याच्या टोकाशी एक बुरुज आहे. बुरुजावर जाण्यासाठी छोटा दरवाजा आहे . बुरुजावरुन बाजूला असलेला विसापूर किल्ला दिसतो.

विंचुकाटा पाहून आल्या मार्गाने बुरुजाच्या पुढे येऊन सोळाकोनी तलावाकडे न जाता डाव्या बाजूच्या पायवाटेने पुढे गेल्यावर दोन तलाव त्यांच्या मध्ये असलेला पीर पाहायला मिळतो. तलावाच्या बाजूने कड्याकडे जातंना वाटेत उध्वस्त वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. त्यापुढे कड्याच्या पोटात टाक आणि लक्ष्मी कोठी आढळते. या कोठीत राहाण्याची सोय होते.या कोठीत अनेक खोल्या आढळतात. त्याच्या दुसर्‍या बाजूला पण गुहेतील पाण्याची टाकी आहेत. लक्ष्मी कोठी पाहून पुन्हा गडप्रवेश केला तेथे पोहोचल्यावर आपली गडफ़ेरी पुर्ण होते.

संपूर्ण गड पाहण्यास ३ तास लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :
१ पूण्यावरून अथवा मुंबईवरून:-
पूण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या पुढे असणार्‍या मळवली स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणरी वाट पकडावी. वाट मोठी आणि प्रशस्त आहे. तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलिकडेच एक गाव आहे त्याचे नाव लोहगडवाडी.खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास पोहचतो आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहचतो.या मार्गे लोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात.


२ लोणावळ्याहून:-
लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडावाडी पर्यंत जाता येते. पवना धरणाकडे जाणार्‍या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो, तेथून ३ ते ४ किमी अंतरावर लोहगडावाडी आहे.उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत.साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे.मात्र येथे एसटी महामंडळाची सोय नाही. स्वत:चे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून जीपने जाता येते. मात्र जीपचे भाडे १००० रु आहे.


३ काळे कॉलनीहून :-
काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे. तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो. पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेकडीवर जातो. तेथून एक मळलेली पायवाट आपणास लोहगडावाडीत घेऊन जाते. या टेकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात.

राहाण्याची सोय :
लक्ष्मी कोठी मध्ये रहाण्याची सोय होते. ३० ते ४० जण आरामात राहू शकतात.
जेवणाची सोय :
आपण स्वत: जेवणाची सोय करावी अथवा लोहगडवाडी मध्ये जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :
बारामही पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) भाजे गावातून २ तास लागतात. २) लोहगडावाडी ३० मिनीटे लागतात.
जिल्हा Pune
 अणघई (Anghai)  भोरगिरी (Bhorgiri)  चाकणचा किल्ला (Chakan Fort)  चावंड (Chavand)
 दौलतमंगळ (Daulatmangal)  धाकोबा (Dhakoba)  दुर्ग (Durg)  घनगड (Ghangad)
 हडसर (Hadsar)  हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri))  हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri)  इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi))
 जीवधन (Jivdhan)  कैलासगड (Kailasgad)  कोरीगड (कोराईगड) (Korigad)  लोहगड (Lohgad)
 मल्हारगड (सोनोरी) (Malhargad)  मोहनगड (Mohangad)  मोरगिरी (Morgiri)  नाणेघाट (Naneghat)
 नारायणगड (Narayangad)  निमगिरी (Nimgiri)  प्लस व्हॅली ट्रेक (Plus Valley)  पुरंदर (Purandar)
 रायरेश्वर (Raireshwar)  राजगड (Rajgad)  राजमाची (Rajmachi)  रोहीडा (Rohida)
 शिवनेरी (Shivneri)  सिंदोळा (Sindola)  सिंहगड (Sinhagad)  सुभानमंगळ (Subhan Mangal)
 तैलबैला (Tailbaila)  तिकोना (Tikona)  तोरणा (Torna)  तुंग (Tung)
 उंबरखिंड (Umberkhind)  विसापूर (Visapur)