मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
मैलगड (महलगड) (Mailgad (Mahalgad)) | किल्ल्याची ऊंची :  1700 | ||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: सातपुडा (मेळघाट) | ||
जिल्हा : बुलढाणा | श्रेणी : मध्यम | ||
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या सातपुडा डोंगर रांगेत मैलगड (महलगड) नावाचा किल्ला आहे. सातपुडा डोंगररांगेपासून वेगळ्या झालेल्या एका डोंगरावर हा सुंदर किल्ला आहे. बुर्हाणपूरहून सातपुडा पर्वतरांगा पार करुन येणार्या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली असावी. किल्ल्यावरील पाण्याची टाकी बघता किल्ला प्राचीन काळात बांधला असावा. मध्ययुगात अचलपूरच्या नवाबाने किल्ला भाजक्या वीटा आणि दगडांची तटबंदी बांधून संरक्षित केला. त्यावेळी किल्ल्याच्या टोकावर बांधलेल्या हवा महालाचे अवशेष आजही पाहायला मिळतात. या हवा महालामुळे हा किल्ला महलगड या नावाने ओळखला जात होता . त्याचा अपभ्रंश होऊन सध्याचे मैलगड हे नाव प्रचलित झालेले आहे. बुलढाणा जिल्ह्यात असलेला मैलगड हा एकमेव डोंगरी किल्ला आहे. किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर नितांत सुंदर आहे. पण किल्ला महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर एका बाजूला असल्याने अल्पपरिचित आहे. मैलगड सोबत वारी भैरवगड आणि वारी हनुमान मंदिर एका दिवसात पाहून होते. |
|||
|
|||
पहाण्याची ठिकाणे : | |||
बुलढाणा जिल्ह्यात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर रायपूर नावाचे गाव आहे. रस्त्याने या गावाकडे जातांना डाव्या बाजूला एक झाडी भरला डोंगर आणि त्याच्या टोकावर असलेला बुरुज दिसतो तोच मैलगड किल्ला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी रायपूर गावाच्या अलिकडे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या महलगड वस्ती पर्यंत जावे लागते. याठिकाणी जाण्यासाठी शेतांमधून जाणारा कच्चा रस्ता असल्याने जीप सारखे वहान असल्यास थेट वस्ती पर्यंत जाता येते. अन्यथा गाडी डांबरी रस्त्यावर लावून पायी चालत वस्ती पर्यंत जाण्यासाठी १५ मिनिटे लागतात. महलगड वस्ती मध्ये ४-५ घरे आहेत. या वस्तीतून किल्ल्याचा डोंगर आणि त्यावरील बुरुज स्पष्ट दिसतो. या घरांच्या मागच्या बाजूला एक डोंगरसोंड खाली उतरलेली आहे. हा डोंगर किल्ल्याच्या डोंगराच्या काटकोनात आहे. या डोंगर सोंडेवरुन एक ठळक पायवाट वर चढत जाते. या वाटेने १५ मिनिटाचा उभा चढ चढून गेल्यावर वाट एका छोट्या पठारावर येते. येथून पुढे आडवी जाणारी वाट किल्ल्याच्या दिशेने हळुहळू चढत जाते. यावटेवर दाट झाडी अहे. या वाटेने १५ ते २० मिनिटात आपण किल्ल्याचा डोंगर आणि बाजूचा डोंगर यामधील खिंडीत पोहोचतो. या ठिकाणी वरच्या बाजूला किल्ल्याचा बुरुज दिसतो. हा बुरुज ३ पाकळ्यांचा आहे. खिंडीतून बुरुज उजव्या बाजूला ठेवत किल्ल्याच्या डोंगरावर चढून १० मिनिटे लागतात. या ठिकाणी किल्ल्याच्या दगडात कोरलेल्या पायर्या आहेत. पायर्या चढतांना दोन्ही बाजूला भाजलेल्या वीटांमध्ये बांधलेले बुरुज आणि तटबदी पाहायला मिळाते. या बुरुजांमध्ये किल्ल्याचे प्रवेशव्दार बांधलेले होते. पण आज ते अस्तित्वात नाही. उध्वस्त प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला किल्ल्याचा भव्य बुरुज आहे. पण तिथे न जाता डाव्या बाजूने गडफ़ेरी चालू करावी. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच एक पाण्याचे कोरड टाक आहे. थोडे पुढे चालत गेल्यावर जमिनीच्या खालच्या स्तरावर पाण्याचे अर्धवर्तुळाकार पाण्याचे टाक आहे. हे खांब टाक असून त्याचे छत पाच खांबांवर तोललेले आहे. याच वाटेने पुढे गेल्यावर डाव्या बाजूला बुरुजचे अवशेष आहेत तर उजव्या बाजूला पायवाटेपासून थोडे वर पाण्याचे एक टाक आहे. हे टाक पाहून पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूला लांबलचक आयताकृती टाक आहे. पण त्यात माती भरली आहे तसेच मोठी झाड उगवलेली आहेत. हे टाक पाहून पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या दक्षिण टोकावर पोहोचतो. येथून दुरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. दक्षिण टोकावर एक छोटा उंचवटा आहे त्यावर भगवा ध्वज लावलेला आहे. उंचवट्यावर चढून गेल्यावर खालच्या बाजूला एका झाडावर भगवा झेंडा लावलेला दिसतो. त्याठिकाणी दगडात कोरलेली पिंड आहे. खाली उतरुन गेल्यावर पाच खांबांवर तोललेल खांब टाक पाहायला मिळते. या टाक्याच्या खांबांवर शेंदुराचे पट्टे ओढलेले आहेत. हे टाक पाहून उत्तरेकडे चालत गेल्यावर एक मोठे टाक आहे. त्याचे ३ भाग केलेले आहेत. पुढे डाव्या बाजूला दरीच्या लगत भाजलेल्या विटांनी बांधलेल्या तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. हे अवशेष पाहून पुढे गेल्यावर एक आयतकृती मोठे टाक आहे. या टाक्याच्या वरच्या बाजूला अजून एक टाक खोदलेले असून त्याच्या बाजूला दगडात गोलाकार खड्डा कोरलेला आहे. हे सर्व पाहून समोर दिसणार्या किल्ल्याच्या उत्तर बुरुजाकडे जातांना वाटेत दगडात कोरलेली काल्पनिक किल्ल्याची प्रतिकृती पाहायला मिळते. यात किल्ल्यावर जाणारे जीने, मुख्य प्रवेशव्दार त्याच्या बाजूचे बुरज, तटबंदी , बालेकिल्ला , किल्ल्यावरील पाण्याची टाकी व्यवस्थित दाखवलेली आहेत. ही किल्ल्ल्याची प्रतिकृती पाहून किल्ल्याच्या उत्तर बुरुजावर गेल्यावर अनेक झरोके आणि कमान असलेल्या खोल्या , कोनाडे पाहायला मिळतात. हा बुरुज तीन पाकळ्यांचा बनलेला असून हा घडीव दगडात बांधून काढलेला आहे. या बुरुजात हवा महाल बांधलेला आहे. बुरुजाच्या बाहेरच्या बाजूला चर्या बनवलेल्या आहेत. एकेकाळी हा बुरुज आणि त्यातील हवामहाल फ़ार सुंदर दिसत असणार , पण आता बरीच पडझड झालेली आहे. बुरुज पाहून पुन्हा प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ल्यावरुन सातपुडा पर्वतरांग आणि दुरवरचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. किल्ला पाहाण्यासाठी पाऊण तास लागतो. | |||
पोहोचण्याच्या वाटा : | |||
मैलगड किल्ला जळगाव जामोद या तालुक्याच्या गावापासून जवळ असला तरी, पायथ्याच्या गावापर्यंत जाण्यासाठी खाजगी वहान सोईचे आहे. किल्ला पाहाण्यासाठी श्री गजानन महाराजांमुळे प्रसिध्द असलेले शेगाव हे जवळाचे मोठे शहर आहे. शेगाव हे मुंबई नागपूर लोहमार्गावर असलेले महत्वाचे स्थानक आहे. शेगाव ते रायपुर या मैलगड किल्ल्याच्या पायथ्याच्या गावापर्यंत अंतर ६८ किलोमीटर आहे. शेगावहून खाजगी वहानाने मैलगड किल्ल्याच्या पायथ्याच्या रायपूर गावापर्यंत दिड तासास पोहोचता येते. शेगावला मुक्काम करुन मैलगड किल्ला, वारी भैरवगड आणि वारी हनुमान मंदिर ही ठिकाण एका दिवसात पाहाता येतात. | |||
राहाण्याची सोय : | |||
किल्ल्यावर रहाण्याची सोय नाही. | |||
जेवणाची सोय : | |||
जेवणाची सोय जळगाव जामोद या तालुक्याच्या गावात होऊ शकेल. | |||
पाण्याची सोय : | |||
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. | |||
जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||
रायपूर महालगड वस्तीतून किल्ला चढायला पाऊण ते एक तास लागतो. | |||
जाण्यासाठी उत्तम कालावधी : | |||
वर्षभर |
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: M | मच्छिंद्रगड (Machindragad) | माचणूर (Machnur) | मदनगड (Madangad) | मदगड (Madgad) |
मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort)) | माढा गढी/किल्ला (Madha Fort) | मधुमकरंदगड (Madhu makarandgad) | महादेवगड (Mahadevgad) |
माहीमचा किल्ला (Mahim Fort) | माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim)) | महिमानगड (Mahimangad) | महिमतगड (Mahimatgad) |
महिपालगड (Mahipalgad) | महिपतगड (Mahipatgad) | माहुली (Mahuli) | माहूर (Mahurgad) |
मैलगड (महलगड) (Mailgad (Mahalgad)) | मलंगगड (Malanggad) | मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) | मल्हारगड (सोनोरी) (Malhargad) |
मंडणगड (Mandangad) | मांडवी कोट (Mandvi Kot) | मानगड (Mangad) | मंगळगड (Mangalgad) |
मंगळवेढा (Mangalwedha) | मांगी - तुंगी (Mangi-Tungi) | माणिकदूर्ग (Manikdurg) | माणिकगड (Manikgad) |
मणिकपूंज (Manikpunj) | मांजरसुभा (Manjarsubha Fort) | मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad) | मार्कंड्या (Markandeya) |
मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) | मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka)) | मोहनगड (Mohangad) | मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort) |
मोरागड (Moragad) | मोरधन (Mordhan) | मोरगिरी (Morgiri) | मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort) |
मृगगड (Mrugagad) | मुडागड (Mudagad) | मुल्हेर (Mulher) |