मार्मागोवा किल्ला
(Mormugao Fort) |
किल्ल्याची ऊंची : 
200 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : गोवा |
श्रेणी : सोपी |
दक्षिण गोव्यात असलेल्या दाबोली विमानतळा पासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (Mormugao Port Authority ) आवारात मार्मागोवा किल्ला आहे.
|
|
इतिहास : |
पोर्तुगीजानी इसविसन १६२४ मध्ये मार्मागोवा बंदराचे रक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली होती. या किल्ल्या जवळ असलेल्या वास्को द गामा ही पोर्तुगीजांची पहिली राजधानी होती. १७०३ मध्ये पोर्तुगीज व्हॉइसराय मध्ये किल्ल्यातून गावात स्थलांतर केले होते. मार्मागोवा बंदरावर मराठ्यांचे हल्ले होत असल्याने पुढील काळात पोर्तुगीजांनी त्यांची राजधानी ओल्ड गोव्यात हालवली.
|
पहाण्याची ठिकाणे : |
मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या आवारात शिरल्यावर पार्कींग पर्यंत चालत जाण्यासाठी २ मिनिटे लागतात. या पार्कींगच्या समोरच एक सिमेंट मध्ये बांधलेली छोटी पायवाट आहे. या पायवाटेने किल्ल्याकडे जातांना डाव्या बाजूला विहिर आहे. पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या तटबंदी जवळ पोहोचलो. या तटबंदीत एक बुरुज आहे. त्या बुरुजा मागे किल्ल्याचे प्रवेशव्दार आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी त्याच्या समोर बुरुजाची रचना करण्यात आलेली आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला एक चर्च आहे , तर डाव्या बाजूला एक क्रॉस आहे. चर्च जवळून किल्ल्याच्या फ़ांजीवर जाण्यासाठी जिना आहे. फ़ांजी वरुन तटबंदीच्या बाजूने पुढे चालत गेल्यावर टोकावर एक बुरुज आहे. या बुरुजा वरुन समुद्र आणि बंदर दृष्टीक्षेपात येते. समुद्राला लागून असलेल्या डोंगरावर हा किल्ला मोक्याच्या जागी बांधलेला आहे.
बुरुज पाहून परत पायर्या उतरुन चर्चपाशी आल्यावर खाली उतणार्या पायर्या उतरुन गेल्यावर उजव्या बाजूच्या तटबंदीत एक अर्धगोलाकार छत असलेली वास्तू आहे. किल्ल्याच्या खालच्या भागात तटबंदीचे अवशेष आहेत. समुद्राच्या बाजूने किल्ला संरक्षित करण्यासाठी या ठिकाणी दोन टप्प्यात तटबंदी आणि बुरुज बांधलेले असावेत. या तटबंदीच्या खालच्या बाजूला पूर्वीच्या काळी समुद्राला लागूनही तटबंदी आणि आणि बुरुज असावेत. आज या ठिकाणी बंदर असल्याने ते नष्ट झाले असावेत . हे पाहून किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते.
किल्ला पाहायला अर्धा तास लागतो.
|
पोहोचण्याच्या वाटा : |
मार्मागोवा किल्ला गोव्यातील मडगाव पासून ३३ किलोमीटर अंतरावर आहे आणि दाबोली विमानतळा पासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. |
राहाण्याची सोय : |
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
|
जेवणाची सोय : |
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.
|
पाण्याची सोय : |
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
|
जाण्यासाठी उत्तम कालावधी : |
वर्षभर |