मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
नाणेघाट (Naneghat) | किल्ल्याची ऊंची :  2500 | ||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: नाणेघाट | ||
जिल्हा : पुणे | श्रेणी : मध्यम | ||
नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला. प्रतिष्ठान (पैठण) ही सातवाहनांची राजधानी होती. सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान या राजमार्गावर जुन्नर जवळ डोंगर फोडून नाणेघाटाची निर्मिती केली गेली. सातवाहन कुल हे महाराष्ट्रातील प्राचीन असे कुल आहे आणि त्र्यांचे राज्य इ.स पूर्व २५० ते इ.स नंतर २५० असे जवळजवळ पाचशे वर्ष होते. प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये उतरणारा माल व्यापारी घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत. हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई. नाणेघाटाचा वापर केल्याबद्द्ल या व्यापार्र्यांकडून जकात जमा केली जात असे. त्या जकातीचा दगडी रांजण आजही नाणेघाटात पाहावयास मिळतो. गेली सुमारे सव्वादोन हजार वर्षे वापारात असणारा नाणेघाट आजही नव्या- जून्या ट्रेकर्सना खुणावत असतो. |
|||
|
|||
पहाण्याची ठिकाणे : | |||
नाणेघाटाची संरक्षक फळी ही शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन या चार किल्ल्र्यांनी बनलेली आहे. साठ मीटर लांब आणि जागोजागी दोन ते पाच मीटर रूंद अशी ही नाणेघाटाची नळी आहे. या नळीच्या मुखाशी एक दगडी रांजण आहे. अदमासे चार फूट व्यासाचा आणि पाच फूट उंचीचा हा रांजण पूर्वी जकातीसाठी वापरला जात असे. जकात कर रुपाने यात तत्कालीन ‘कर्षापण’ नावाची नाणी टाकली जात असत. नाणेघाट चढून गेल्यावर प्रथम दर्शनी दृष्टिक्षेपात पडणारी कातळात कोरलेली ऐसपैस आणि सुंदर गुहा हेच येथील महत्वपूर्ण वैशिष्ट्य होय. या गुहेत साधारणत: ४० - ४५ जण राहू शकतात. हे महाराष्ट्रातील एकमेव ऎहीक लेणे आहे. या लेण्यात तिन्ही भिंतीवर लेख आहेत. हा लेख एकूण २० ओळींचा असून मध्य भागातील भिंतीवर १० तर उजवीकडील भागावर दहा ओळी आहेत. हा लेख ब्राम्ही लिपीतला असून, या लेखामध्ये अनेक अंकनिर्दिष्ठ संख्या आहेत. पुराणकालातील इतकी संख्या असलेल्या भारतातील हा प्राचीन असा लेख आहे. या लेखात सातवाहन सम्राज्ञी ‘नागतिका’ हिने केलेल्या यज्ञांची नावे आहेत. येथे वाजपेय, राजसूय, अश्वमेध अशा प्रकारचे यज्ञ केले असल्याचे उल्लेख सापडतात. या यज्ञात ब्राह्मणांना केलेल्या दानांचा देखील उल्लेख या लेखांमध्ये आढळतो. या गुहेत सातवाहनांची शिल्पे देखील कोरलेली आहेत. यापैकी पहिले शिल्प सातवाहन संस्थापक शालिवाहनाचे, दुसरे शिल्प राजा सातकर्णी याची पत्नी देवी नायनिकीचे तर तिसरे शिल्प राजा सातकर्णीचे आहे. गुहेवर पाण्याची तीन ते चार टाकी आढळतात. गुहेच्या वर पाहिल्यावर एक प्रचंड कातळ भिंत दिसते, यालाच नानाचा अंगठा असे म्हणतात. घाटमाथ्यावर पोहचल्यावर ,उजवीकडे वळल्यावर आपण नानाच्या अंगठ्यावर येऊन पोहोचतो. येथेच बाजूला एक गणेशाची मूर्तीही दृष्टिक्षेपात येते. समोर दिसणारे गोरखगड, मच्छिंद्रगड , सिध्दगड, हरिश्चंद्रगड, भैरवकडा, कोकणकडा आणि डावीकडे असणारा जीवधन आपले मन मोहून टाकतात. घाटावरील विस्तीर्ण असे पठार हे नाणेघाटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. अशाप्रकारे मुंबईकरांना एका दिवसात जाऊन येता येईल असा नाणेघाटाचा ट्रेक हा एक सुरेख अनुभव ठरतो. | |||
पोहोचण्याच्या वाटा : | |||
नाणेघाटाला जायचे झाल्यास मुंबई किंवा पुणे गाठावे, १ कल्याण - मुरबाड मार्गे :- मुंबईकरांना नाणेघाटाला यायचे असल्यास माळशेज घाटामार्गे जाणार्या एसटी ने कल्याण - मुरबाड मार्गे वैशाखरे गावी यावे. वैशाखरे हे जरी पायथ्याचे गाव असले तरी तेथे न उतरता, वैशाखरे पासून पुढे दोन किमी अंतरावर असलेल्या "नाणेघाट" या नामनिर्देशित फलकाच्या जवळ उतरावे. येथून दोन तासात आपल्याला नाणेघाटावर पोहचता येते. या वाटेवर पावसाळ्यात दोन ओढ्र्यांचे दर्शन होते. २ पुण्याहून ;- पुण्याहून नाणेघाटाला जायचे झाल्यास पुणे - जुन्नर एसटी पकडून जुन्नरला यावे. जुन्नर ते घाटघर एसटी पकडून घाटघरला यावे. येथ पर्यंत पोहचण्यास दीड तास लागतो. घाटघर वरून ५ किमी चालत नाणेघाट गाठता येतो. | |||
राहाण्याची सोय : | |||
गुहेत ४० - ४५ जणांच्या रहाण्याची सोय होते. | |||
जेवणाची सोय : | |||
नाणेघाटात कोणत्याही प्रकारच्या जेवणाची सोय नसल्याने ही सोय आपण स्वत:च करावी. | |||
पाण्याची सोय : | |||
गुहेशेजारील तीसर्या व चौथ्या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. | |||
जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||
पायथ्यापासून दोन तास लागतात. |
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: N | नगरचा किल्ला (Nagar Fort) | नगरधन (Nagardhan) | नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort) | नळदुर्ग (Naldurg) |
नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri)) | नांदरुखी कोट (Nandrukhi Kot) | नाणेघाट (Naneghat) | नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort)) |
नारायणगड (Narayangad) | नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli)) | नरनाळा (Narnala) | नस्तनपूरची गढी (Nastanpur) |
न्हावीगड (Nhavigad) | निमगिरी (Nimgiri) | निवतीचा किल्ला (Nivati Fort) |