मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

कन्हेरगड(चाळीसगाव) (Kanhergad(Chalisgaon)) किल्ल्याची ऊंची :  2165
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अजंठा सातमाळ
जिल्हा : जळगाव श्रेणी : कठीण
चाळीसगाव पासून १८ किमी अंतरावर पाटणादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. हे पुरातन मंदिर शक्तीपीठ असून याचे नाव "वरदहस्त" आहे. चंद्रकोरीच्या आकाराच्या डोंगररांगेच्या मध्ये कोंदणात बसवल्या सारखे हे मंदिर आहे. धवलतीर्थात उगम पावणारी डोंगरी नदी या मंदिराजवळून वाहाते. या डोंगररांगेत धवलतीर्थ, केदारेश्वर, केदारकुंड, पितळखोरे लेणी, हेमाडपंथी महादेव मंदिर, कन्हेरगड अशी पौराणिक व ऎतिहासिक महत्व असलेली ठिकाण आहेत. गौताळा अभयारण्याच्या निसर्गरम्य परीसरात दोन दिवस राहून ही सर्व ठिकाणं पाहाता येतात.

पाटणा गावातील हेमाडपंथी मंदिराच्या मागेच कन्हेरगड आहे. हेमाडपंथी मंदिराच्या मागील डोंगरावर नागार्जून कोठडी, सीता न्हाणी व शृंगार चावडी ही ३ लेणी खोदलेली आहेत. लेण्यांचा डोंगर व त्यामागील डोंगरावर कन्हेरगडाचे अवशेष पसरलेले आहेत. कन्हेरगड किल्ला कान्हेरगड या नावानेही ओळखला जातो.
56 Photos available for this fort
Kanhergad(Chalisgaon)
Kanhergad(Chalisgaon)
Kanhergad(Chalisgaon)
इतिहास :
पौराणिक कथेनुसार पार्वतीच्या उजव्या हाताचा पंजा मंदिरा मागील डोंगरावर पडल्यामुळे "वरदहस्त" शक्तीपीठ निर्माण झाले.या ठिकाणी गोविंदस्वामी यांनी देवीची तपश्चर्या केली. देवीने प्रसन्न झाल्यावर तीने वर दिला मी स्वयंभू मुर्तीच्या रुपाने प्रकट होईन. त्याप्रमाणे देवीची मुर्ती गोविंदस्वामीना कुंडात मिळाली. त्यांनी तिची स्थापना मंदिरात केली. या गोविंदस्वामींची समाधी मंदिरा समोर आहे.
पाटणादेवी जवळ असलेली पितळखोरे लेणी निर्मिती सातवहानांच्या काळात झाली असे मानले जाते. त्यानंतर ५- ६ व्या शतकात वाकटाकांच्या काळात या लेण्यांना पुन्हा उर्जितावथा आली. देवगिरीच्या यादवांच्या काळात हा भाग विज्जलगड या नावाने प्रसिध्द होता. पाटणादेवीचे मंदिर यादवराय खेमचंद्र व गोविंदराज मौर्य यांनी ११२० मध्ये जनतेसाठी खुले केले.
शुन्याचा शोध लावणारे महान गणिती भास्कराचार्य यांचा जन्म व वास्तव्य विज्जलगड परीसरात इ.स.१११४ ते इ.स. ११८५ या काळात होते. त्यांचे सिध्दांत शिरोमणी, करण कुतुहल, वासनाभास्य, भास्कर व्यवहार, विवाहपटल, सर्वोतोभद्र यंत्र, वासिष्ठतुल्य असे ग्रंथ प्रसिध्द आहेत. सिध्दांत शिरोमणी ग्रंथातील लिलावती हा गणितावरील खंड प्रसिध्द आहेत


पहाण्याची ठिकाणे :
कन्हेरगड गौताळा अभयारण्यात आहे. अभयारण्यापासून पाटणादेवी मंदिरापर्यंत जाणार्‍या रस्त्यावर अभयारण्याच्या गेटपासून १.५ किमी अंतरावर महादेव मंदिर अशी पाटी आहे. या मंदिराच्या मागेच कन्हेरगड आहे. पाटणा गावाच्या पुढे रस्त्यावरून उजव्या बाजूला वळून ५ मिनिटात आपण पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिरापाशी पोहोचतो. ८ फूट उंच दगडी चौथर्‍यावर हे पूर्वाभिमुख मंदिर उभे आहे. चौथर्‍यावर फरसबंदी केलेली आहे. या चौथर्‍यापसून ६ फूट उंचीवर मंदिर बांधलेल आहे. मंदिर ७५ फूट लांब ,३६ फूट लांब ,१८ फूट उंच आहे. मंदिराचे गर्भगृह, सभामंडप व वर्‍हांडा असे तीन भाग आहेत. मंदिराच्या सभामंडपात नंदीची मुर्ती आहे. गर्भगृहात शंकराची पिंड आहे. गर्भगृहाच्या पट्टीवर गणपती , सप्तमातृका कोरलेल्या आहेत. मंदिराच्या छ्तावर नक्षी बनवलेली आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस वेगवेगळया मुर्ती कोरलेल्या आहेत.
महादेव मंदिर पाहून मंदिराच्या बाजूने (मंदिर उजव्या बाजूला ठेऊन) जाणार्‍या पायवाटेने मंदिराच्या मागे जावे. थोडे अंतर चालल्यावर पायवाट डावीकडे वळावे. पुढे सरळ जाणारी पायवाट सोडून उजवीकडे जाणारी पायवाट पकडावी. येथे सिमेंटमध्ये बांधलेली एक छत्री (समाधी) आहे. ही समाधी ओलांडली की आपण कन्हेरगडाच्या पायथ्याशी पोहोचतो. मंदिरापासून गड पायथ्याला जाण्यास १० मिनिटे लागतात.

कन्हेरगडाचा डोंगर आग्नेय - वायव्य ( South East - North West) पसरलेला आहे. या डोंगरावरील कातळ टोपीखाली नागार्जून कोठडी, सीता न्हाणी व शृंगार चावडी ही ३ लेणी खोदलेली आहेत. ती पाहून गडावर जाण्यासाठी प्रथम डोंगराच्या पायथ्याच्या समाधी पासून डोंगरावर चढणार्‍या पायवाटेने ५ मिनिटांचा खडा चढ चढून जावे. येथे आपल्याला आडवी जाणारी पायवाट मिळते. या वाटेवर डाव्या बाजूला वळावे, (डोंगर उजव्या बाजूला व दरी डाव्या बाजूला) २ मिनिटे सरळ चालल्यावर उजव्या बाजूला डोंगरावर चढणारी पायवाट दिसते. या वाटेवर सिमेंटने बांधलेल्या काही पायर्‍या आहेत. ५ मिनिटांचा खडा चढ चढून गेल्यावर पायवाट उजवीकडे वळते (डोंगर डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला) आपण या वाटेने २ मिनिटात नागार्जून लेण्यांपाशी पोहोचतो.

नागार्जून कोठडी लेणी ही जैन लेणी दहाव्या शतकात खोदण्यात आली होती. या लेण्यांच्या बाहेर अर्धवट कोरलेला किर्तीस्तंभ असून स्थानिक लोक त्याला "सतीचा खांब" म्हणून मूल होण्यासाठी नवस बोलतात. त्यामुळे या लेण्यापर्यंत लोकांची वर्दळ असते. नागार्जून लेण्याच्या व्हरांडा २ खांबांवर तोललेला आहे. व्हरांद्याच्या उजव्या बाजूला बाकं असलेली बैठकीची खोली आहे. सभामंडपाच्या व्दारपट्टीवर तिर्थंकर कोरलेले आहेत. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला दोन हत्तींची मस्तक कोरलेली आहेत. सभामंडप २ खांबांवर तोललेला आहे. खांबाच्या खाली अंबिकेची मुर्ती आहे. सभामंडपात समोरच्या भिंतीवर भगवान महावीरांची पद्मासनात बसलेली मुर्ती आहे. सोबत गंधर्व, सेविका कोरलेल्या आहेत. गुहेच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर गोमटेश्वराची ४ फूटी मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या बाजूला ४ तिर्थंकर कोरलेले आहेत. गुहेच्या उजव्या बाजूला वरच्या अंगाला पाण्याच टाक आहे. त्याच्या खालून पायवाटेने सरळ (डोंगर डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला ठेवत) पुढे चालत गेल्यावर २ मिनिटात आपण सीता न्हाणी या लेण्यांपाशी पोहोचतो. गुहेच्या दर्शनी भागात २ खांब असून गुहेत कोणतीही मुर्ती नाही.

सीता न्हाणी लेणी पाहून पायवाटेने ५ मिनिटे चालत गेल्यावर आपण डोंगराच्या वायव्य (North West) टोकाकडे पोहोचतो. येथे डाव्या बाजूला २०-२५ फूटी कातळ कडा (रॉक पॅच) दिसतो. इथे कातळात पायर्‍या कोरलेल्या आहेत. या ठिकाणी आता लोखंडी रेलिंग लावण्यात आलेले आहे. पायर्‍यांनी वर चढून गेल्यावर आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. खालच्या पाटणा गावातून येणारी ठळक पायवाट या ठिकाणी येऊन मिळते. पाटणा गावातील लोक याच वाटेने गडावर किंवा पलिकडच्या गावात जातात. या कड्याजवळ आल्याची दुसरी खूण म्हणजे येथून खालच्या जंगलात वन खात्याने बांधलेला वॉच टॉवर उठून दिसतो. प्रथम गडावर न जाता राहीलेले तिसर लेण म्हणजे "शृंगार चावडी लेणी" प्रथम पाहून घ्यावी. त्यासाठी (रॉक पॅच) खालून जाणार्‍या पायवाटेने डोंगराला वळसा घालुन सरळ चालत जावे. ५ मिनिटात आपण २ डोंगरांमधील घळीत पोहोचतो. या घळीत असलेला ओढा ओलांडून डाव्या बाजूस थोडेसे वर चढून गेल्यावर कातळात कोरलेल्या ४-५ पायर्‍या लागतात. पायर्‍या संपल्यावर पाण्याचे टाक व त्यामागिल शृंगार चावडी लेणी दिसतात. ही ब्राम्हणी (हिंदु) लेणी अकराव्या शतकात खोदण्यात आली होती. या लेण्याचा व्हरांडा इंग्रजी "L" आकारात कोरलेला आहे. व्हरांडा ४ सुंदर नक्षीदार खांबांवर तोललेला आहे. व्हरांड्याच्या बाहेरच्या बाजूला अनेक शिल्पपट कोरलेले आहेत. सभामंडपाच्या व्दारपट्टीवर नक्षी कोरलेली आहे. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला दोन फूलं कोरलेली आहेत. सभामंडपात कोणतीही मुर्ती नाही.

शृंगार चावडी लेणी पाहून परत कातळकड्याकडे येऊन, कातळकडा चढून एक वळण घेतल्यावर तटबंदीचे अवशेष दिसू लागतात. तटबंदी ओलांडून आपला किल्ल्याच्या माचीवर प्रवेश होतो. माचीवरून उजव्या बाजू्ला त्रिकोणी आकाराचे डोंगराचे शिखर दिसते, तोच कन्हेरगडाचा माथा (बालेकिल्ला) आहे. माचीवर पूर्वेला कातळात जमिनीवर कोरलेले पाण्याच टाक आहे. टाक्याच्या बाजूने चढत जाणार्‍या वाटेवर डाव्या बाजूला एक कबर पाहायला मिळते. पुढे २ मिनिटात एक ठळक पायवाट आडवी येते. या पायवाटेवर प्रथम उजवीकडे वळावे. थोडे चालत गेल्यावर डाव्या बाजूस २ बुजलेली पाण्याची खांब टाकी दिसतात. या टाक्यांच्या अलिकडे वरच्या बाजूस एक कबर आहे. हे सर्व पाहून मागे फिरावे, डोंगर उजव्या बाजूला व दरी डाव्या बाजूला ठेवत ५ मिनिटे चालल्यावर डाव्या बाजूला खाली पाटणादेवीचे मंदिर दिसायला लागते, त्यामागे पितळखोरा लेण्यांचा डोंगर व त्याच्याही मागून डोकावणारा पेडका किल्ल्याचा आयताकृती माथा दिसतो. या पायवाटेने अजून ५ मिनिटे चालल्यावर आपण पश्चिमाभिमुख दरवाजापाशी येतो. या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना भक्कम बुरुज आहेत. दरवाजाच्या आत पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. दरवाजाच्या बाहेर डाव्या बाजूला , खालच्या बाजूस कातळात एक खाच केलेली दिसते, या ठिकाणी किल्ल्याचा पुरातन दरवाजा असावा.

दरवाजा पाहून पुन्हा किल्ल्यात प्रवेश करावा. दरवाजा जवळून एक पायवाट किल्ल्याच्या माथ्याकडे जाते. या पायवाटेने किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या कातळ टोपीच्या खाली जाता येते. येथे उजवीकडे वळून (दरवाजाच्या विरुध्द दिशेला) डोंगर डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला ठेवत ५ मिनिटे चालल्यावर डाव्या बाजूला वरच्या अंगाला कातळात कोरलेल खांब टाक आहे. ते पाहून ५ मिनिटे चालल्यावर आपण माथ्याच्या वायव्य (North West) टोकाकडे पोहोचतो. येथे उजव्या बाजूला काही पायर्‍या दिसतात. पायर्‍या चढुन गेल्यावर तटबंदीचे व उध्वस्त दरवाजाचे अवशेष दिसतात. गडमाथ्यावर वाड्याचा चौथरा, एक कबर , हनुमानाची मूर्ती व एक कोरड पाण्याच टाक आहे. कन्हेरगडावरून दक्षिणेला खाली पाटणादेवीचे मंदिर दिसायला लागते, त्यामागे पितळखोरा लेण्यांचा डोंगर व त्याच्याही मागून डोकावणारा पेडका किल्ल्याचा आयताकृती माथा दिसतो. गडमाथा पाहून पायर्‍या उतरून पायवाटेने परत न जाता सरळ खाली उतरावे ही वाट बुजल्रेल्या खांब टाक्यांपाशी येते.

कन्हेरगड लेण्यासह पूर्ण पाहाण्यासाठी २ ते ३ तास लागतात.

पोहोचण्याच्या वाटा :
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हे महत्वाचे शहर रेल्वेने व रस्त्याने सर्व महत्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. चाळीसगाव पासून १८ किमी अंतरावर पाटणादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. पाटणादेवीचे मंदिर व कन्हेरगड गौताळा अभयारण्यात आहे. अभयारण्याचे गेट सकाळी ६.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत उघडे असते. चाळीसगावातून सकाळी ६.०० पासून दर अर्ध्या तासाने पाटणादेवीला जाण्यासाठी एसटीची बससेवा आहे. त्याशिवाय चाळीसगावातून पाटणादेवीला जाण्यासाठी ६ आसनी रिक्षापण उपलब्ध आहेत. अभयारण्यापासून पाटणादेवी मंदिरापर्यंत जाणार्‍या रस्त्यावर अभयारण्याच्या गेटपासून १.५ किमी अंतरावर (पाटणा गावाच्या पुढे) महादेव मंदिर अशी पाटी आहे. या मंदिराच्या मागेच कन्हेरगड आहे. रस्त्यावरून उजव्या बाजूला वळून ५ मिनिटात आपण पूरातन हेमाडपंथी महादेव मंदिरापाशी पोहोचतो.

मंदिराच्या बाजूने (मंदिर उजव्या बाजूला ठेऊन) जाणार्‍या पायवाटेने मंदिराच्या मागे जावे. थोडे अंतर चालल्यावर पायवाट डावीकडे वळावे. पुढे सरळ जाणारी पायवाट सोडून उजवीकडे जाणारी पायवाट पकडावी. येथे सिमेंटमध्ये बांधलेली एक छत्री (समाधी) आहे. ही समाधी ओलांडली की आपण कन्हेरगडाच्या पायथ्याशी पोहोचतो. मंदिरापासून गड पायथ्याला जाण्यास १० मिनिटे लागतात. कन्हेरगडाचा डोंगर आग्नेय - वायव्य ( South East - North West) पसरलेला आहे. या डोंगरावरील कातळ टोपीखाली नागार्जून कोठडी, सीता न्हाणी व शृंगार चावडी ही ३ लेणी खोदलेली आहेत. ती पाहून गडावर जाण्यासाठी प्रथम डोंगराच्या पायथ्याच्या समाधी पासून डोंगरावर चढणार्‍या पायवाटेने ५ मिनिटांचा खडा चढ चढून जावे. येथे आपल्याला आडवी जाणारी पायवाट मिळते. या वाटेवर डाव्या बाजूला वळावे, (डोंगर उजव्या बाजूला व दरी डाव्या बाजूला) २ मिनिटे सरळ चालल्यावर उजव्या बाजूला डोंगरावर चढणारी पायवाट दिसते. या वाटेवर सिमेंटने बांधलेल्या काही पायर्‍या आहेत. ५ मिनिटांचा खडा चढ चढून गेल्यावर पायवाट उजवीकडे वळते (डोंगर डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला) आपण या वाटेने २ मिनिटात नागार्जून कोठडी लेण्यांपाशी पोहोचतो. नागार्जून कोठडी लेण्यांखालून पायवाटेने सरळ (डोंगर डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला ठेवत) पुढे चालत गेल्यावर २ मिनिटात आपण सीता न्हाणी या लेण्यांपाशी पोहोचतो.

सीता न्हाणी लेणी पाहून पायवाटेने ५ मिनिटे चालत गेल्यावर आपण डोंगराच्या वायव्य (North West) टोकाकडे पोहोचतो. येथे डाव्या बाजूला २०-२५ फूटी कातळ कडा (रॉक पॅच) दिसतो, तो चढून गेल्यावर आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. खालच्या पाटणा गावातून येणारी ठळक पायवाट या ठिकाणी येऊन मिळते. पाटणा गावातील लोक याच वाटेने गडावर किंवा पलिकडच्या गावात जातात. या कड्याजवळ आल्याची दुसरी खूण म्हणजे येथून खालच्या जंगलात वन खात्याने बांधलेला वॉच टॉवर उठून दिसतो.
राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
चाळीसगावात जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय :
किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सोबत पाणी बाळगावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्या पासून कण्हेरगडावर जाण्यासाठी १ ते दिड तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुलै ते फेब्रुवारी
डोंगररांग: Ajantha - Satmal Range
 हातगड (Hatgad)  इंद्राई (Indrai)  कांचन (Kanchan)  कन्हेरगड(चाळीसगाव) (Kanhergad(Chalisgaon))
 कण्हेरगड (Kanhergad(Nashik))  कात्रा (Katra)  लोंझा (Lonza)  मणिकपूंज (Manikpunj)
 मार्कंड्या (Markandeya)  पेडका (Pedka)  राजदेहेर (ढेरी) (Rajdeher)  राजधेर (Rajdher)
 सप्तश्रुंगी (Saptashrungi)  सुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort))