मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
लहुगड (Lahugad) | किल्ल्याची ऊंची :  2700 | ||||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: अजंठा | ||||
जिल्हा : छ.संभाजीनगर | श्रेणी : सोपी | ||||
छ.संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात अजिंठा, वेरूळ ही दगडात कोरलेली अजोड लेणी आहेत. त्याचप्रमाणे दगड तासून / कोरून बेलाग बनवलेला देवगिरी किल्लाही सर्वांच्या परीचयाचा आहे. यांच्याच पंक्तीत बसणारा लहुगड हा दगडात कोरलेला एक छोटेखानी किल्ला छ.संभाजीनगर शहरापासून साधारण ४० किमीवर आहे. या किल्ल्यावर दगडात कोरलेले गुहा मंदिर, कातळात कोरलेली वेगवेगळ्या प्रकारची १८ पाण्याची पाण्याची टाकी, दगडात कोरलेले प्रवेशव्दार, पायर्या, गुहा असे कोरीवकामाचे वैविध्य पहायला मिळते. छ.संभाजीनगर - अजिंठा व छ.संभाजीनगर - जालना या पुरातन मार्गाच्या मधून अजिंठा डोंगररांग या मार्गांना समांतर धावते. या दोन मार्गांना जोडणार्या खिंडीवर लक्ष ठेवण्यासाठी लहूगडाची निर्मिती करण्यात आली होती. अजिंठा डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर कोरलेल्या किल्ल्याला एकदा तरी आवर्जून भेट द्यावी. |
|||||
|
|||||
इतिहास : | |||||
लहुगडचा इतिहास उपलब्ध नाही. देवगिरी या राजधानाच्या गडाशी जवळीक व गडावर कातळात खोदलेली टाकी व गुहा पहाता हा गड ७ व्या किंवा ८व्या शतकातला असावा. |
|||||
पहाण्याची ठिकाणे : | |||||
लहूगडाचा ताबा सध्या एका साधूबाबाने घेतला असल्यामुळे आसपासच्या गावकर्यांनी गडावर बर्याच सोई निर्माण केल्या आहेत. गडावर जाण्यासाठी ३ बाजूंना सिमेंटच्या पायर्या बांधून काढलेल्या आहेत. यातील खिंडीच्या जवळ असलेल्या पायर्यां जवळ मारूती मंदिर आहे. पायर्या चढतांना डाव्या बाजूस कातळात खोदलेला एक चौकोनी खळगा आहे व त्याच्या बाजूला एक शिवलिंग व नंदी आहे. या नंदीचे वैशिष्ट्य म्हणजे याचे शरीर नेहमी प्रमाणे ३ मितीत (३ डायमेंशन) असून तोंड मात्र २ मितीत (२ डायमेंशन) बनवलेले आहे. पुढे थोड्या पायर्या चढून उजव्या बाजूला वळल्यावर एका झाडाखाली गणपतीची पूरातन मुर्ती पहायला मिळते. पूर्वी ही मुर्ती गुहा मंदिरा समोरच्य देवळीत होती. तिथे नविन मुर्ती बसवल्यामुळे ही मुर्ती बाहेर ठेवण्यात आलेली आहे. येथेच उजव्या बाजूस गडावर पूर्वी रहात असलेल्या साधूचे मंदिर बांधलेले आहे. या मंदिराच्या पुढेच डाव्या बाजूला किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायर्या बनविलेल्या आहेत. पण तेथे न जाता प्रथम पायर्यांच्या बाजूला असलेले गुहा मंदिर पहावे. हे गुहा म्हणजे कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना आहे. गुहेच्या समोरच कातळात खोदलेले चार फूट उंच मंदिर आहे. आधी कळस मग पाया याप्रकारे कोरलेल्या या मंदिरात गणपतीची नविन मुर्ती व दोन पुरातन मुर्त्या ठेवलेल्या आहेत. गुहा मंदिराच्या डाव्या हाताला उघड्या चौथर्यावर अनेक मुर्तींचे मुखवटे, छोट्या पिंडी, नंदी मांडून ठेवलेले आहेत. त्याच्या पुढे कातळात खोदलेले रुंद व खोल पाण्याच प्रचंड मोठ खांब टाक आहे. गुहा मंदिराच्या वर असणार्या कातळावर पडणारे पाणी टाक्यात जमा होण्यासाठी कातळात पन्हाळी/ पाट कोरलेले आहेत. (या कातळावर बाधलेल्या सिमेंट्च्या पायर्यांमुळे ह्या पन्हाळी/ पाट काही ठिकणी बंद झालेल्या दिसतात.) मंदिराच्या बाहेरच्या बाजूला दोन गोलाकार खांब कोरलेले आहेत. त्यानंतर थोडीशी जागा सोडून मंदिराचे दार कोरलेल आहे. दारावर व्दारपट्टीका व दोन बाजूंना खांब व नक्षी कोरलेली आहे. मंदिरात हवा व प्रकाश येण्यासाठी दरवाजाच्या दोनही बाजूंना खिडक्या कोरलेल्या आहेत. दरवाजातून आत गेल्यावर मंदिराचा कातळात कोरून काढलेला सभामंडप ४ खांबावर तोललेला दिसतो. या ४ खांबामधे नंदी बसवलेला आहे. मंदिराच्या गाभार्यात पिंड बसवलेली असून तिला रामेश्वर नावाने ओळखतात. गाभार्या समोर व डाव्या बाजूला अशा दोन खोल्या कोरून काढलेल्या आहेत. दुरुनही लोकांना दिसावा म्हणून गुहा मंदिरावर हल्लीच सिमेंटचा कळस बांधलेला आहे. मंदिराच्या समोर लाद्या बसवलेल्या आहेत. तसेच झाडांना पार बांधलेले आहेत. मंदिराच्या पुढे साधूबाबाची मठी व स्वयंपाक घर नव्याने बांधलेले आहे. गुहा मंदिर पाहून बाजूच्या कातळात कोरलेल्या पायर्या चढून प्रवेशव्दाराकडे जातांना जेथे पायर्या डावीकडे वळतात तेथे उजव्या हाताला एक कोरड टाक आहे. तिथून थोडस पुढे किल्ल्याच कातळात कोरलेल सुबक ठेंगण प्रवेशव्दार पायर्यांच्या मार्गावरच आहे.प्रवेशव्दारच्या आतल्या बाजूस डाव्या हाताला वरच्या बाजूस एक गुहा कोरलेली आहे. त्याचा वापर देवडी म्हणून होत असावा. गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर समोरच ८ टाक्यांचा समुह आहे. तो पाहून उजव्या बाजूला वळून गड प्रदक्षिणा चालू करावी. प्रथम जमिनीच्या पोटात कोरलेले खांब टाक पहायला मिळत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पुढे ओळीने ६ पाण्याची टाकं लागतात. त्यापैकी एका टाक्यातच पिण्यायोग्य पाणी आहे. त्यानंतर झाडीत लपलेले झेंडा टाक पाहून वळसा मारला की आपण गडाच्या पिछाडीला येतो. येथे कातळात कोरलेली १ खांबी प्रशस्त गुहा आहे. या गुहेला एक दरवाजा व ४ खिडक्या आहेत. गुहेच्या थोड पुढे किल्ल्याच्या मागिल प्रवेशव्दाराचे अवशेष व अंजनडोह गावाकडे उतरणारी वाट आहे. ती पाहून गुहेच्या उजव्या बाजूने गुहेच्या वरच्या भागात जाणार्या पायर्या चढून गेल्यावर आपण सीता न्हाणी पाशी जाऊन पोहोचतो. येथे कातळात खोदलेल टाक व सीतेच छोट मंदिर आहे. ते पाहून उजवीकडे खाली उतरल्यावर कातळात कोरलेली प्रशस्त गुहा आहे. ती पाहून परत वर येऊन किल्ल्याच्या प्रवेशव्दाराकडे येतांना वाटेत एक पाण्याच टाक आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील सपाटीवर वास्तूंचे अवशेष आहेत. किल्ल्याचा माथा छोटा असल्यामुळे गडफेरी करायला अर्धा तास लागतो. या गडाच्या बाजूला असलेल्या डोंगरावर ३ गुहा (लेणी) आहेत. ही लेणी म्हणजे कातळात कोरलेल्या केवळ गुहा असल्यामुळे गडाच्या पायथ्या पासून १० मिनिटात आपण लेणी पाहून परत येऊ शकतो. | |||||
पोहोचण्याच्या वाटा : | |||||
स्वत:चे वहान असल्यास संभाजीनगरहून २ मार्गांनी लहूगडावर जाता येते. १) छ.संभाजीनगरहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या छ.संभाजीनगर - जळगाव रस्त्यावर छ.संभाजीनगर पासून २९ किमी अंतरावर फुलंब्री गाव आहे. फुलंब्रीच्या पुढे ४ किमी अंतरावर पालफाटा आहे. या फाट्यावर उजवीकडे वळल्यावर आपण राजूर रस्त्याला लागतो. या रस्त्यावर पाल फाट्यापासून ६ किमी अंतरावर जातेगाव फाटा आहे. या फाट्यापासून जातेगाव ३ किमीवर आहे. जातेगाव पासून नांद्रा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव ४ किमीवर आहे. नांद्रा गावाच्या मागे ३ किमीवर लहूगड आहे. २)छ.संभाजीनगरहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या छ.संभाजीनगर - जळगाव रस्त्यावर छ.संभाजीनगर पासून १५ किमी अंतरावर चौका गाव आहे.या गावातून एक रस्ता २८ किमीवरील नांद्रा गावात जातो.नांद्रा गावाच्या मागे ३ किमीवर लहूगड आहे. हा रस्ता छोट्या गावांमधून फिरत जातो. रस्त्यात दिशादर्शक पाट्या नसल्याने चुकण्याचा संभव आहे. ३) छ.संभाजीनगर - जालना रस्त्यावर संभाजीनगर पासून २१ किमी अंतरावर करमाड गाव आहे. या गावातून लाडसावंगी - अंजनडोह मार्गे जाणारा रस्ता लहूगडापर्यंत जातो. परंतू हा रस्ता बर्याच ठिकाणी कच्चा आहे. स्वत:चे वहान नसल्यास १) छ.संभाजीनगरहून लहूगडाच्या पायथ्याशी असलेल्या नांद्रा गावात जाण्यासाठी दुपारी १२ व संध्याकाळी ६ वाजता एसटीच्या बसेस आहेत. नांद्रा गावातून लहूगडावर चालत जाण्यास पाऊण तास लागतो. २)छ.संभाजीनगरहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या छ.संभाजीनगर - जळगाव रस्त्यावर छ.संभाजीनगर पासून २९ किमी अंतरावर फुलंब्री गाव आहे. फुलंब्री गावातून फुलंब्रीच्या पुढे ४ किमी अंतरावर जातेगावला जाण्यासाठी एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत. जातेगाव पासून नांद्रा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव ४ किमीवर आहे. जातेगाव ते नांद्रा सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत. नांद्रा गावाच्या मागे ३ किमीवर लहूगड आहे. नांद्रा गावातून लहूगडावर चालत जाण्यास पाऊण तास लागतो. | |||||
राहाण्याची सोय : | |||||
गडावरील मंदिरात ४ जण राहू शकतात, तर मंदिरासमोरील ओट्यावर १५ जण आरामात राहू शकतात. याशिवाय गडाखाली धर्मशाळा बांधलेली आहे. परंतू तेथे पाण्याची सोय नसल्याने कोणी राहात नाही. | |||||
जेवणाची सोय : | |||||
जेवणाची सोय फुलंब्री किंवा औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर होऊ शकते. | |||||
पाण्याची सोय : | |||||
लहूगडावर पिण्यायोग्य पाणी २ टाक्यात आहे. त्याबद्दलची माहीती किल्ल्यावरील साधूबाबा कडून घ्यावी. |
Depot | Village | From Depot | From Village | km |
Aurangabad | Nandra | 12.00,18.00 (Night Halt) | 15.00, 6.00 | 50 |
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: L | लहुगड (Lahugad) | लळिंग (Laling) | लिंगाणा (Lingana) | लोहगड (Lohgad) |
लोंझा (Lonza) |