मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad)) किल्ल्याची ऊंची :  3100
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कर्जत
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
कोथळीगड हा कर्जतपासून ईशान्येला साधारण २१ किमी अंतरावर आहे. या किल्ल्याला पायथ्याच्या ’पेठ’ या गावामुळे याला ‘पेठचा किल्ला’ असेही संबोधले जाते. काही ठिकाणी याचा उल्लेख कोथळीगड (कोथळा) असाही आढळतो. लहानशा दिसणार्‍या या किल्ल्याचा इतिहास मोठा रक्तरंजित आहे. त्याविषयाची माहिती मराठी व इंग्रजी कागदपत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रांमधून मिळते. हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही, पण एक संरक्षक ठाणं होता. मराठ्यांचे या किल्ल्यावर शस्त्रागार होते. संभाजीमहाराजांच्या काळात त्याला विशेष महत्त्वही प्राप्त झाले होते.
3 Photos available for this fort
Peth (Kothaligad)
Peth (Kothaligad)
Peth (Kothaligad)
इतिहास :
औरंगजेबाने नोव्हेंबर १६८४ मध्ये अब्दुल कादर व अलईबिरादरकानी र्‍यांना संभाजींच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. ’कोथळागड’ हा महत्त्वाचा असून जो कोणी तो ताब्यात घेईल, त्याचा ताबा तळकोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे राहणार्‍या लोकांना त्याने आपले नोकर म्हणून ठेवून घेतले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची नेआण करतात, हे कळताच अब्दुल कादर व त्याचे ३०० बंदूकधारी नोव्हेंबर १६८४ मध्येच गडाच्या पायथ्याशी पोहोचले. मराठ्यांनी त्र्‍यांना मागे हटवले, पण तरीही काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाज्याजवळ पोहोचले आणि त्र्‍यांनी ‘दरवाजा उघडा‘ अशी आरडाओरड सुरू केली. किल्ल्यावरील मराठा सैन्याला वाटले की आपलेच लोक हत्यारे नेण्यासाठी आले आहेत, म्हणून त्र्‍यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मोगल सैनिक आत शिरले मराठे व मोगल र्‍यांच्यात लढाई झाली. अब्दुल कादरच्या मदतीसाठी माणकोजी पांढरेही आले, झालेल्या लढाईत मोगलांना यश आले.

दुसर्‍याच दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला, फार मोठी लढाई झाली. या लढाईत बाणांचा व बंदुकींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.या लढाईत किल्ल्यावरचा दारूगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गडावर जाणारी सामुग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारूगोळा व धान्य मिळेनासे झाले. दरम्यानच्या काळात अब्दुल कादरच्या मदतीला कोणीच न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली. वेढा टाकल्यानंतर दहा बारा दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिजखान याने आपला मुलगा अब्दुलखान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. अब्दुलखान तेथे पोहचला तेव्हा त्याची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदार नारोजी त्रिंबक र्‍यांनी तेथील खोरे रोखून धरले होते. येथेही लढाई झाली नारोजी त्रिंबक व इतर सरदार धारातीर्थी पडले आणि कोथळागड मुघलांच्या ताब्यात गेला. इहमतखानाने नारोजी त्रिंबकाचे डोके रस्त्यावर टांगले किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. औरंगजेबाने कोथळागड नावाचा असा कोणता गड अस्तित्वात आहे का? याची खात्री करून मगच अब्दुलखानाला बक्षिसे दिली. मुघलांनी गडाला ‘मिफ्ताहुलफतह‘ (विजयाची किल्ली) असे नाव दिले. फंदफितुरीमुळे मराठ्यांच्या हातून हा मोक्याचा किल्ला निसटला.

गड परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न सुरू केले. डिसेंबर १६८४ मध्ये गडाकडे जाणार्‍या मुघल सैन्याला मराठ्यांनी अडवले. नंतर मऱ्हामतखानालाही ७००० मराठ्यांच्या तुकडीने अडवले. पण मराठ्यांना यश लाभले नाही. त्यानंतर एप्रिल १६८५ मध्ये ७०० जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला. २०० जण दोरीच्या शिडीच्या मदतीने किल्ल्यात उतरले. बरेच रक्त सांडले, पण मराठ्यांची फत्ते होऊ शकली नाही. मराठ्यांनी हा महत्त्वाचा किल्ला गमावला होता. पुढे १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये दुसर्‍या बाजीराव पेशव्याच्या वतीने बापुराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला. सुमारे १८६२ पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता.


पहाण्याची ठिकाणे :
पेठ किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावातून तसेच घाट माथ्यावरील अनेक गावतून पेठच्या किल्ल्याच्या माचीवर असलेल्या पेठ गावात वाटा येतात. त्यापैकी आंबिवली गावातून येणारी वाट जास्त प्रमाणात वापरली जाते. या वाटेने आंबिवलीहून साधारणपणे दिड ते दोन तासात पेठ गावात पोहोचता येते. पेठ गावातून चहुबाजूंनी तासल्या सारखा पेठचा सुळका दिसतो. पेठ गावात वस्ती आहे. या वस्तीतूनच किल्ल्यावर जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग आहे. या पायर्य़ांनी २० मिनिटे चढून गेल्यावर आपण उध्वस्त प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दार ओलांडून ५ मिनिटे चढून गेल्यावर एक ठळक पायवाट वळसा मारुन पेठच्या सुळक्याकडे जाते. या पायवाटेवर डाव्या बाजूला कातळात खोदलेल्या पायर्‍या दिसतात. पावसाळा सोडून इतरवेळी या पायर्‍यांनी किल्ल्यावर जाता येते. पायर्‍या संपतात तेथे किल्ल्याच्या दुसर्‍या प्रवेशव्दाराचे अवशेष दिसतात. ता प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूला बुरुज आहेत. प्रवेशव्दारातून वर चढून गेल्यावर समोर कातळात कोरलेल्या गुहा दिसतात. गुहेकडे जातांना उजव्या बाजूला दोन गाड्यावर ठेवलेल्या तोफ़ा दिसतात.

पेठ किल्ल्यावरील कातळाच्या कातळाच्या पोटात गुहा, टाकी, लेणं आणि गडमाथ्यावर जाणारा जीना खोदलेला आहे. प्रथम आहे ती देवीची गुहा, पाण्याचं टाके आणि मग डावीकडे ऐसपैस अशी भैरोबाची गुहा. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे सपाट, समतल भूमी आणि छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब आहेत.

गुहेजवळच एका ऊर्ध्वमुखी भुयारात किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायर्‍या कोरलेल्या आहेत.पायर्‍यांच्या मार्गावर उजवीकडे गज शिल्प कोरलेले आहे. पायर्‍यांच्या शेवटी दगडात कोरून काढलेला दरवाजा आहे. त्यावर शरभ शिल्प आहेत. गडमाथ्यावर तलाव आणि उध्वस्त वास्तूंचे अवशेष आहेत. गडमाथ्यावरुन भीमाशंकर डोंगररांगेतील, तुंगी, पदरगड(कलावंतिणीचा महाल), नागफणी, त्यामागे सिद्धगड, लोणावळा बाजूकडील नेढ नाखिंड डोंगररांगेवरील पवनचक्क्या, कौल्याची धार, ढाकची डोंगररांग हा विस्तृत मुलूख नजरेच्या टप्प्यात येतो.

गडमाथ्यावरुन परत गुहेजवळ येउन सुळक्याला प्रदक्षिणा घातलताना वाटेत पाण्याच्या टाक्यांचे समुह व टेहळणीसाठी कोरलेली गुहा पाहायला मिळते.
पोहोचण्याच्या वाटा :
१)कर्जतहून एस्‌टीने अथवा टॅक्सीने कशेळे मार्गे आंबिवली या गावात जाता येते. हे अंतर साधारण ३० किमी आहे.
२) नेरळहून येताना कशेळे या गावी यावे आणि जामरुखची एस्‌टी पकडून आंबिवली गावात यावे.
आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास मळलेली वाट आहे. गडाच्या माचीवर ‘पेठ‘ हे गाव आहे. या गावातून गडावर जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग आहे.
३) डुक्करपाडा (देवाचा पाडा ) जामरुंग :- आंबिवलीच्या पुढे चार किलोमीटर अंतरावर डुक्करपाडा आहे. या पाड्याच्या पुढे " Reach field " नावाची बंगल्यांची वसाहत आहे. या वसाहतीमधून एक पायवाट पेठ गावत जाते.डुक्करपाडा (देवाचा पाडा ) जामरुंग गावातून पेठवाडीत जाण्यासाठी १ तास लागतो.
राहाण्याची सोय :
भैरोबाच्या गुहेत २० - २५ जण व्यवस्थित राहू शकतात.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय पेठ गावात आहे.
पाण्याची सोय :
गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
आंबिवली गावापासून २ तास लागतात, तर पेठ गावापासून १ तास लागतो.
डोंगररांग: Karjat
 भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad))  ढाक बहिरी (Dhak-Bahiri)  पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad))