मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

रामदरणे (Ramdarne) किल्ल्याची ऊंची :  605
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रामदरणेश्वर रांग
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात अलिबाग तालुक्यात रामदरणेश्वर नावाचे प्रसिध्द देवस्थान आहे. या भागातील सर्वोच्च डोंगरावर रामदरणेश्वरचे देऊळ आहे. या डोंगराचा विस्तार मोठा असल्याने पंचक्रोशीतील भाल, वायशेत, चोरंडे, कार्ला खिंड, मुळे, परहूरपाडा या गावांमधून रामदरणेश्वरच्या डोंगरावर जाण्यासाठी वाटा आहेत, पंचक्रोशीतील गावकर्‍यांचा या देवळात राबता असतो. त्यामुळे या वाटा मळलेल्या आहेत. शिवरात्रीला या डोंगरावर यात्रा भरते. या देवस्थानाच्या दोन डोंगर पलिकडे रामदरणे नावाचा किल्ला आहे. काळाच्या ओघात आपले अस्तित्व हरवत चाललेला हा किल्ला आपल्या अंगाखाद्यावर अवशेष बाळगत अजूनही उभा आहे. या परिसरातील गावकर्‍यांनाही या भागात किल्ला आहे याची माहिती नाही. इतिहासाच्या पानातही या किल्ल्याबद्दल उल्लेख सापडत नाही. किल्ल्याचे स्थान आणि आकार पाहाता या किल्ल्याचा उपयोग टेहळणीचा किल्ला म्हणून झाला असावा.
24 Photos available for this fort
Ramdarne
पहाण्याची ठिकाणे :
रामदरणे किल्ल्याला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यापैकी त्यातल्या त्यात चांगला मार्ग म्हणजे रामदरणे पाड्यातून जाणारा मार्ग. रामदरणे पाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी अलिबाग - रेवस मार्गावर जाणार्‍या एसटी बस किंवा रिक्षांनी वायशेत गाव गाठावे. वायशेत गावातील सायमन कॉलनी जवळील दगडाच्या खाणी पर्यंत यावे. पाड्याच्या खालच्या बाजूला ही दगडाची खाण असल्याने पाड्या पर्यंत कच्चा रस्ता बनवलेला आहे. तेथून कच्च्या रस्त्याने चालत पाऊण तासत आपण रामदरणे पाड्यात पोहोचतो. हा रस्ता अनेक ठिकाणी खचलेला असल्याने जीप किंवा दुचाकीने सारख्या वहानानेच पाड्या पर्यंत जाता येते. रामदरणेश्वर किल्ल्याला जाणारी वाट फ़ारशी वापरात नसल्याने पाड्यावरुन वाटाड्या घ्यावा. न मिळाल्यास मळलेल्या वाटेने रामदरणेश्वर मंदिराकडे जावे. वाटेत एक विस्तिर्ण पठार आहे. त्यावर एक मोठा तलाव आहे. पठारावरुन थळचा RCF चा प्रकल्प आणि समुद्रातले उंदेरी आणि खांदेरी किल्ले दिसतात. तलावाच्या काठी एकवीरा मातेचे छोटेसे मंदिर आहे. पाड्या पासून रामदरणेश्वर मंदिरा पर्यंत जाण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो. शेवटच्या टप्प्यात चढ आहे. रामदरणेश्वराचे मंदिर या डोंगररांगेतल्या सर्वोच्च डोंगरावर आहे. त्यामुळे येथून सागरगड, खांदेरी, उंदेरी हे किल्ले आणि कनकेश्वराचा डोंगर दिसतो. रामदरणेश्वर मंदिर सर्वोच्च स्थानी असले तरी तेथून रामदरणे किल्ला मात्र दिसत नाही. कारण किल्ल्याचा डोंगर आणि रामदरणेश्वर मंदिर यांच्या मध्ये एक डोंगर असून त्याची उंची किल्ल्याच्या डोंगरापेक्षा जास्त आहे. रामदरणेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार केलेला आहे. जुन्या मंदिरातील नंदी देवळाच्या बाहेर ठेवलेले आहेत.

रामदरणेश्वर मंदिरासमोर (पिंडीकडे तोंड करुन) उभे राहील्यावर डाव्या बाजूने एक पायवाट खाली उतरतांना दिसते. खालच्या बाजूला एक पत्र्याने शाकारलेली झोपडी दिसते. ते देवीचे मंदिर आहे. रामदरणेश्वर मंदिरा जवळून दरीत उतरणार्‍या वाटेने आपण १० मिनिटात मंदिरापाशी पोहोचतो. वाटेत एक ओढा ओलांडावा लागतो. त्यात पाण्याचे कुंड खोदलेले आहे. मंदिरात एक हल्लीच्या काळातील मुर्ती आणि काही तांदळे आहेत. मंदिराच्या बाहेर जुन्या मुर्ती ठेवलेल्या आहेत, पण त्या ओळखण्या पलिकडे झिजलेल्या आहेत. मंदिराच्या समोर डोंगर आहे. तो चढायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला झाडीत काही मुर्ती उघड्यावर ठेवलेल्या आहेत. त्यात महिषासुर मर्दीनी, खंडोबा यांच्या दगडात कोरलेल्या मुर्ती आहेत. त्यांचे दर्शन घेऊन डॊंगराच्या उजव्या बाजूने जाणार्‍या पायवाटेने डोंगर चढून जावा. साधारणपणे १० मिनिटात आपण डोंगर माथ्यावर पोहोचतो. येथून समोर जो झाडी भरला डोंगर दिसतो तोच रामदरणे किल्ला आहे. तेथे पोहोचण्यासाठी खालच्या बाजूला असलेले छोटेसे पठार पार करावे लागते. पठार पार केल्यावर पठार आणि किल्ल्याचा डोंगर या मधील छोटी दरी आहे . त्यात उतरल्यावर एका झाडाखाली आपल्याला ४ फ़ुटी वारुळ दिसते. या वारूळापासून उजव्या बाजूला जाणारी पायवाट टाक्यांकडे तर डाव्या बाजूला जाणारी पायवाट किल्ल्यावर जाते. प्रथम उजव्या बाजूने जाणार्‍या पायवाटेने टाक्याकडे जावे. ही पायवाट अनेक ठिकाणी ढासळलेली आहे. या पायवाटेवरुन किल्ल्याला वळसा घालून टाक्यांपर्यंत पोहोचण्यास १० मिनिटे लागतात. या ठिकाणी कातळात कोरलेली ३ टाकी आहेत. पहिली दोन टाकी बुजलेली आहेत. टाक्यात जास्त झालेले पाणी बाहेर जाण्यासाठी कातळात चर कोरलेले आहेत. तिसरे टाके हे प्रशस्त खांब टाके आहे. या टाक्याचे छत दोन खांबांवर तोललेले आहे. टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. टाक्याच्या भिंतींवर देवतांची चित्र असलेल्या टाईल्स लावलेल्या आहेत. या टाक्यापुढे जाणारा मार्ग तुटलेला आहे. त्यामुळे टाक्यातील पाणी भरुन घेऊन परत आल्या वाटेने वारुळापाशी यावे आणि किल्ल्यावर जाणारी वाट पकडावी. या वाटेवर किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याखाली शेजारी शेजारी दोन बुरुज पाहायला मिळतात. घडीव दगड एकमेकांवर रचून बनवलेल्या या दोन बुरुजांच्या मध्ये किल्ल्याचे प्रवेशव्दार होते.. आज ते नष्ट झालेले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या परहूररपाडा गावातून किल्ल्यावर येणारा मार्ग असावा. आज तो मार्ग अस्तित्वात नाही. बुरुज पाहून परत पायवाटेवर येऊन वर चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर असणार्‍या पठारावर प्रवेश करतो. किल्ल्याचा माथा छोटासाच असून त्यावर काही उध्वस्त चौथर्‍यांचे अवशेष आहेत. किल्ल्यावरुन कार्ले खिंड परिसर, सागरगडाची डोंगररांग, आणि कनकेशवराचा डोंगर दिसतो.

वायशेत गावातून किल्ल्यावर येण्यास २ तास लागतात, तर खाजगी वाहानाने रामदरणेश्वर पाड्यापर्यंत आल्यास रामदरणेश्वर मंदिर पाहून दिड तासात किल्ल्यावर पोहोचता येते. रामदरणेश्वर मंदिर न पाहाता त्या डोंगराला वळसा घालून देवीच्या मंदिरा पर्यंत जाण्याचा पर्याय आहे, असे केल्यास सव्वा तासात किल्ल्यावर पोहोचता येते.
पोहोचण्याच्या वाटा :
अलिबाग हे रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण रस्त्याने सर्व गावांशी जोडलेले आहे. मुंबईहून समुद्रामार्गेही रेवस पर्यंत जाऊन तेथून अलिबागला जाता येते. रामदरणे किल्ल्याचा डोंगर लांबवर पसरलेला असून त्या डोंगरावर खालील दिलेल्या सर्व गावांमधून वाटा आहेत.

१) वायशेत गावातून:- अलिबाग- किहीम - रेवस रस्त्यावर अलिबागपासुन अंदाजे ५ किमीवर वायशेत गाव आहे. वायशेत गावातून रामदरणे पाड्याकडे जाणारा रस्ता आहे. अलिबाग- रेवस मार्गावर जाणार्‍या एसटी बस किंवा रिक्षांनी वायशेत गाव गाठावे. वायशेत गावातील सायमन कॉलनी जवळील दगडाच्या खाणी पर्यंत यावे. पाड्याच्या खालच्या बाजूला ही दगडाची खाण असल्याने पाड्या पर्यंत कच्चा रस्ता बनवलेला आहे. तेथून कच्च्या रस्त्याने चालत अर्ध्या तासत आपण रामदरणे पाड्यात पोहोचता येते. हा रस्ता अनेक ठिकाणी खचलेला असल्याने केवळ जीप किंवा दुचाकीने पाड्या्पासून ५ मिनिटांच्या अंतरा पर्यंत जाता येते. पुढे रस्ता खचलेला असल्याने गाड्या तेथेच उभ्या करुन ५ मिनिटात पाड्यात पोहोचता येते. पाड्या पासून अर्ध्या तासात रामदरणेश्वर मंदिर आणि त्यापुढे अर्ध्या ते पाऊण तासात किल्ला गाठता येतो. या मार्गाने दिड तासात किल्ल्यावर जाता येते. (मध्ये खचलेला रस्ता दुरुस्त झाल्यास थेट रामदरणेश्वरच्या पायथ्या पर्यंत गाडीने जाता येईल. पाड्यापासून पुढे रस्ता बनवलेला आहे.) . रामदरणे किल्ल्यावर जाण्यासाठी हा सगळ्यात सोपा मार्ग आहे.

२)चोरोंडे गावातून:- मुंबई अलिबाग मार्गावर पोयनाड गाव आहे. पोयनाड गावा बाहेर पेझारीला पोलिस चेक पोस्ट आहे. येथून एक रस्ता परहुरपाडा मार्गे चोरंडे गावापर्यंत जातो. चोरंडे गावापर्यंतचे अंतर ४ किमी आहे. या गावातील खेळाच्या मैदानावरुन पुढे गेल्यावर कनक मारुतीचं मंदीर आहे. त्याच्या बाजूने रामदरणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट आहे. या मार्गाने दिड तासात किल्ल्यावर जाता येते.

३) परहुरपाडा गावातून:- मुंबई अलिबाग मार्गावर पोयनाड गाव आहे. पोयनाड गावा बाहेर पेझारीला पोलिस चेक पोस्ट आहे. येथून एक रस्ता परहुरपाडा मार्गे चोरंडे गावापर्यंत जातो. परहुरपाडा गावापर्यंतचे अंतर २ किमी आहे. या गावातील खेळाच्या मैदानावरुन पुढे गेल्यावर कनक मारुतीचं मंदीर आहे. त्याच्या बाजूने रामदरणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट आहे. या मार्गाने दिड तासात किल्ल्यावर जाता येते.

४)भाल गावातून:- अलिबाग - किहीम - रेवस रस्त्यावर भाल नावाच गाव आहे. भाल गावातून रामदरणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट आहे.या मार्गाने दोन तासात किल्ल्यावर जाता येते.

५)मुळे गावातून :- भाल गावाच्या अलिकडे मुळे नावाचं गाव आहे. मुळे गावातून रामदरणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट आहे. मार्गाने दोन तासात किल्ल्यावर जाता येते.

६) कार्ला गावातून :- रामदरणेश्वर डोंगराच्या दक्षिणेकडील बाजूला कार्ला गाव आहे. कार्ला गावातून रामदरणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट आहे.

रामदरणेश्वर मंदिरापासून किल्ल्याकडे कसे जावे हे वर सविस्तर लिहीलेले आहे.

राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय अलिबाग रेवस रस्त्यावर आहे.
पाण्याची सोय :
किल्ल्यावरील टाक्यात पिण्याचे पाणी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्या पासून दिड ते दोन तास.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
मार्च ते मे सोडून वर्षभर जाता येते.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: R
 रायगड (Raigad)  रायकोट (Raikot)  रायरेश्वर (Raireshwar)  ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse))
 राजदेहेर (ढेरी) (Rajdeher)  राजधेर (Rajdher)  राजगड (Rajgad)  राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort))
 राजकोट (Rajkot)  राजमाची (Rajmachi)  रामदरणे (Ramdarne)  रामदुर्ग (Ramdurg)
 रामगड (Ramgad)  रामशेज (Ramshej)  रामटेक (Ramtek)  रांगणा (Rangana)
 रांजणगिरी (Ranjangiri)  रसाळगड (Rasalgad)  रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort))  रतनगड (Ratangad)
 रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg))  रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg)  रवळ्या (Rawlya)  रेवदंडा (Revdanda)
 रिवा किल्ला (Riwa Fort)  रोहीडा (Rohida)  रोहिलगड (Rohilgad)