| मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
| मदगड (Madgad) | किल्ल्याची ऊंची :  520 | ||||
| किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: मदगड | ||||
| जिल्हा : रायगड | श्रेणी : मध्यम | ||||
| सह्याद्री डोंगररांगांमुळे महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी सह्याद्रीची रांग व त्यावरील पठार किंवा घाटमाथा असे तीन भाग पडले आहेत. येथील राज्यकर्त्यांचा प्राचीन काळापासून परदेशासी व्यापार चाले. कोकण किनारपट्टीवर उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे. त्यामुळे या परिसरात संपन्न बंदरे, शहरे, बाजारपेठा तयार झाल्या. त्याकाळी वापरण्यात येणारी शिडांची गलबते समुद्रातून खाडी मार्गे नदीत आतपर्यंत येत. श्रीवर्धन, दिवेआगार या सागर किनारी असलेल्या परिसरातून जाणार्या अशाच एका व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचे संरक्षण करण्यासाठी मदगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. मदगड किल्ला आता विस्मृतीत गेलेला आहे. मुंबई पुण्यापासून लांब असल्याने मदगडावर जाणार्या लोकांचे प्रमाण फ़ारच कमी आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या वांजळे गावातील बहुतांश लोक कामधंद्या निमित्ताने गावा बाहेर राहातात. घरात गॅस आल्याने पूर्वी लाकूड फ़ाटा गोळा करण्यासाठी गडावर जाणारे गावकरी आता गडावर जात नाहीत. त्यामुळे गडावर जंगल झाडी माजलेली आहे. त्यात गडावर रानडूकरांची वस्ती आहे. गडावर बिबट्याचाही वावर आहे. बोर्ली पंचायतन व आजूबाजूच्या परिसरात सापडलेले साप या ठिकाणी सोडले जातात. या सर्व धोक्यामुळे मदगडावर जातांना गावातील स्थानिक माणसाला सोबत गडावर घेऊन जावे. गडावर एकटे दुकटे जाणे टाळावे. |
|||||
|
|||||
| इतिहास : | |||||
| इसवीसन १७३३ मध्ये पेशव्यांनी कोकणातील किल्ले व जंजिरा घेण्यासाठी मोहीम आखली. सिद्दीच्या दंडाराजपुरीपर्यंत पेशव्यांचे सैन्य येऊन पोहोचले, तेव्हा पेशवे व सिद्दी यांच्यात तह होऊन मदगड किल्ला पेशव्यांना मिळाला. इसवीसन १७४४ मध्ये कुलाब्याच्या आंग्र्यांकडे मदगड जाऊ नये म्हणून पेशवे व सिद्दी यांच्या तहानुसार सिद्दीने पेशव्यांना मदत केली. पुढे काही वर्षे मदगड सिद्दींकडे होता. इसवीसन १७६९ मध्ये राघोजी आंग्रे यांनी आपल्या आरमारासह व माधवराव पेशव्यांनी खुष्कीच्या मार्गाने एकाच वेळी मदगडावर हल्ला केला. त्याच रात्री जंजिरेकर खानजादा याने या दोघांवर हल्ला केला. अनेकजण यात जखमी झाले. अखेर दि. १० डिसेंबर १७६९ रोजी पेशव्यांनी मदगड जंजिरेकरांस दिला. नंतर लगेचच दि. २३ मार्च १७७० मध्ये सिद्दी अब्दुल रहिम खानजादा हा मदगड किल्ला पेशव्यांच्या हवाली करून स्वतः चौलला निघून गेला. अखेर सिद्दी महम्मद खान याने इ. स. १८३० साली मदगड किल्ला उद्ध्वस्त केला. त्यामुळेच किल्ल्यावरील बरेचसे बांधकाम नष्ट झाले व किल्ला ओस पडला. |
|||||
| पहाण्याची ठिकाणे : | |||||
| बोर्ली पंचायतन गावाहुन मदगडला जाताना वस्ती संपली की चढाचा रस्ता सुरु होतो. या रस्त्यावरून जातांना उजव्या बाजूला मदगड आणि त्याची तटबंदी पाहायला मिळते. या रस्त्याने मदगडाला वळसा मारून पुढे गेल्यावर उजवीकडे जाणारा रस्ता वांजळे गावाकडे जातो. या रस्त्याला उजवीकडे एक फ़ाटा फ़ुटलेला आहे. त्या फ़ाट्यापासून एक कच्चा रस्ता मदगडाच्या अर्ध्या उंची पर्यंत जातो. या कच्च्या रस्त्याने १० मिनिटे चढत गेल्यावर, मातीत खोदलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी अंगावर येणार चढ चढून गेल्यावर १० मिनिटात आपण किल्ल्याच्या पहिल्या तटबंदीपाशी पोहोचतो. याठिकाणी आता तटबंदी अस्तित्वात नाही पण तटबंदीचे दगड सर्वत्र विखूरलेले पाहायला मिळतात. हि उध्वस्त तटबंदी ओलांडल्यावर किल्ल्यावर सर्व ठिकाणी दाट झाडी आणि उंच गवत आहे. उध्वस्त तटबंदी ओलांडल्यावर काही कातळात कोरलेल्या तर काही घडीव दगडात बनवलेल्या पायर्या पाहायला मिळतात. या पायर्या चढून गेल्यावर दुसरी उध्वस्त तटबंदी पाहायला मिळते. याठिकाणी डाव्या बाजूला एका उध्वस्त बुरुजाचे अवशेष पाहायला मिळतात. सध्या तेथे मोठ्या घडीव दगडांचा ढिग पाहायला मिळतात. दुसरी तटबंदी ओलांडल्यावर आपला गड माथ्यावर प्रवेश होतो. गड माथ्यावर समोरच काही मोठ्या वास्तूंचे चौथरे आहेत. त्यातील एका चौथर्यावर छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवलेली आहे. बोर्ली पंचायतन परिसरातील दुर्ग संवर्धन करणार्या संस्थांनी काम केल्याने गडावरील हाच भाग जरा मोकळा आहे. या चौथर्याच्या डाव्या बाजूला असलेले किल्ल्यावरील अवशेष अवशेष पाहाण्यासाठी काट्याकुट्यातून दाट झाडी आणि उंच गवतातून मार्ग काढत पुढे जावे लागते. या बाजूला आंब्याचे एक उंच झाड आहे, त्याच्या दिशेने चालत गेल्यावर एका मोठ्या वाड्याचे उंच जोते पाहायला मिळते. त्यावर चढून जाण्यासाठी ५ पायर्या आहेत. या जोत्याच्या मागच्या भागात एक माणुस उभा राहिल एवढी खोली आहे. खोलीच्या अंदाजे ४ फ़ूट उंच असलेल्या भिंती आजही उभ्या आहेत. हा वाडा पाहून डाव्या बाजूला आंब्याच्या झाडाच्या दिशेने चालत गेल्यावर एक गोल आकाराची विहिर पाहायला मिळते. या विहिरीच्या भिंती घडीव दगडांनी बनवलेल्या आहेत. विहिर ५ ते ६ फ़ूट खोल आहे. त्यात पाणी नाही. या विहिरीच्या मागच्या बाजूला पण घडीव दगडांनी रचलेल्या तटबंदीचे अवशेष दिसतात. हिच तटबंदी दोन्ही बाजूला गेलेली पाहायला मिळते. वाड्याचे जोते आणि विहिर हे गडमाथ्यावरील उंच भागात आहे. कदाचित या वास्तू भोवती तटबंदी असू शकेल पण झाडीमुळे पूर्ण परिसर पाहाता येत नाही त्यामुळे केवळ अंदाज करावा लागतो. किल्ल्याचा हा परिसर पाहून पुन्हा छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवलेल्या चौथर्यापाशी येऊन चौथर्याच्या उजव्या बाजूला असलेल्या पायवाटेने चौथर्याच्या मागच्या बाजूला चालत गेल्यावर पायवाटेच्या बाजूला घडीव दगडांचे अवशेष पाहायला मिळतात. यावाटेने ५ निमिटे चालल्यावर एक दगडात कोरलेली डोणी पाहायला मिळते. डोणीच्या पुढे एक आयताकृती बारव आहे. सध्या ही बारव कोरडी आहे. या बारवेच्या मागच्या बाजूला एक मोठे झाड आहे. त्या झाडाच्या बाजूने एक प्रचंड घसार्याची (स्क्री) असलेली वाट खाली जाते. या वाटेवर असलेल्या वेली आणि झाडांच्या मुळांचा आधार घेत खाली उतरतांना तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. ते ओलांडून खाली उतरल्यावर आपण एक आयताकृती टाक्या जवळ पोहोचतो. किल्ल्यावरच्या या टाक्यात पाणी आहे पण ते पिण्या योग्य नाही. टाक्यात उतरण्यासाठी पायर्या आहेत. टाक्याच्या भिंती घडीव दगडांनी बांधलेल्या आहेत. टाक्याच्या एका बाजूला किल्ल्याची तटबंदी आहे. हीच तटबंदी आपल्याला बोर्ली पंचायतन वरुन किल्ल्याकडे येणार्या रस्त्यावरुन दिसते. किल्ल्याच्या या बाजूला दोन टप्प्यावर तटबंद्या बांधून किल्ला संरक्षित केलेला आहे. टाक पाहून तटबंदीवरुन पुढे चालत गेल्यावर बुरुज पाहायला मिळतात. टाक्या पासून ५ मिनिटे तटबंदीवरुन चालत गेल्यावर डाव्या बाजूला तटबंदीच्या आतल्या बाजूला बांधलेला घडीव दगडांचा बुरुज पाहायला मिळतो. या बुरुजाच्या आत विहिर आहे. तटबंदी पेक्षा उंच असलेल्या या बुरुजाचा उपयोग टेहळणीसाठी केला जात होता. हा बुरुज पाहून पुढे गेल्यावर तटबंदीच्या उजव्या बाजूला गडाच्या डोंगरापासून सुटा असलेला एक छोटा सुळका आहे. त्याला स्थानिक लोक "काळकाई देवी" या नावने ओळखतात. त्याची पूजा केली जाते. या सुळक्याकडे जाण्यासाठी गडावरुन वाट नाही. गावातून दुसर्या वाटेने सुळक्याच्या पायथ्याशी जाता येते. काळकाई देवीचा सुळका पाहून आल्या वाटेने परत पुन्हा छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवलेल्या चौथर्यापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ल्यावर अजूनही अवशेष असण्याची शक्यता आहे. पण दाट जंगलामुळे ते पाहाता येत नाहीत. किल्ल्यावरुन जाख मातेचा डोंगर दिसतो.> किल्ला पाहाण्यासाठी १ ते १.५ तास लागतात. | |||||
| पोहोचण्याच्या वाटा : | |||||
| मुंबई - गोवा महामार्गावर माणगाव हे मोठे गाव आहे. तसेच कोकण रेल्वेवरचे एक स्थानक आहे. माणगाव मधून एक रस्ता श्रीवर्धन, दिवेआगारकडे जातो. या रस्त्यावर माणगाव पासून ४८ किलोमीटर अंतरावर बोर्ली पंचायतन हे गाव आहे. गावाची बाजारपेठ संपल्यावर एक रस्ता डावीकडे जातो. या रस्त्याने बोर्ली पंचायतन ते मदगड हे अंतर ३.५ किलोमीटर आहे. बोर्ली पंचायतन गावाहुन मदगडला जाताना वस्ती संपली की चढाचा रस्ता सुरु होतो. या रस्त्यावरून जातांना उजव्या बाजूला मदगड आणि त्याची तटबंदी पाहायला मिळते. या रस्त्याने मदगडाला वळसा मारून पुढे गेल्यावर उजवीकडे जाणारा रस्ता वांजळे गावाकडे जातो. या रस्त्याला उजवीकडे एक फ़ाटा फ़ुटलेला आहे. त्या फ़ाट्यापासून एक कच्चा रस्ता मदगडाच्या अर्ध्या उंची पर्यंत जातो. या कच्च्या रस्त्याने १० मिनिटे चढत गेल्यावर, मातीत खोदलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी अंगावर येणार चढ चढून गेल्यावर १० मिनिटात आपण किल्ल्याच्या पहिल्या तटबंदीपाशी पोहोचतो. | |||||
| राहाण्याची सोय : | |||||
| वांजळे गावातील मंदिरात राहाण्याची सोय होऊ शकते. श्रीवर्धन, दिवेआगार येथे राहाण्यासाठी भरपूर हॉटेल्स आहेत. | |||||
| जेवणाची सोय : | |||||
| श्रीवर्धन, दिवेआगार येथे जेवणासाठी भरपूर हॉटेल्स आहेत. | |||||
| पाण्याची सोय : | |||||
| गडावर पिण्यासाठी पाणी नाही. | |||||
| जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||||
| पायथ्यापासून ३० मिनिटे लागतात. | |||||
| जाण्यासाठी उत्तम कालावधी : | |||||
| जानेवारी ते मे | |||||
| सूचना : | |||||
| गडावर जंगल झाडी माजलेली आहे. त्यात गडावर रानडूकरांची वस्ती आहे. गडावर बिबट्याचाही वावर आहे. बोर्ली पंचायतन व आजूबाजूच्या परिसरात सापडलेले साप या ठिकाणी सोडले जातात. या सर्व धोक्यामुळे मदगडावर जातांना गावातील स्थानिक माणसाला सोबत गडावर घेऊन जावे. गडावर एकटे दुकटे जाणे टाळावे. | |||||
| जिल्हा Raigad | अवचितगड (Avchitgad) | भीमाशंकर (Bhimashankar) | भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad)) | बिरवाडी (Birwadi) |
| चांभारगड (Chambhargad) | चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक (Chandragad to Arthur seat) | चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad)) | कुलाबा किल्ला (Colaba) |
| दासगावचा किल्ला (Dasgaon Fort) | ढाक बहिरी (Dhak-Bahiri) | द्रोणागिरी (Dronagiri) | घारापुरी (Gharapuri) |
| घोसाळगड (Ghosalgad) | हिराकोट (Hirakot) | ईरशाळ (Irshalgad) | जंजिरा (Janjira) |
| कर्नाळा (Karnala) | खांदेरी (Khanderi) | खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort)) | कोकणदिवा (Kokandiva) |
| कोंढवी (Kondhavi) | कोर्लई (Korlai) | कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad) | लिंगाणा (Lingana) |
| मदगड (Madgad) | मानगड (Mangad) | मंगळगड (Mangalgad) | माणिकगड (Manikgad) |
| मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) | मृगगड (Mrugagad) | पाचाड कोट (Pachad Fort) | पदरगड (Padargad) |
| पद्मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa)) | पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg) | पेब (विकटगड) (Peb) | पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad)) |
| प्रबळगड (Prabalgad) | रायगड (Raigad) | रामदरणे (Ramdarne) | रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg)) |
| रेवदंडा (Revdanda) | सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) | सामराजगड (Samrajgad) | सांकशीचा किल्ला (Sankshi) |
| सरसगड (Sarasgad) | सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug)) | शिवथरघळ (Shivtharghal) | सोंडाई (Sondai) |
| सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat)) | सुधागड (Sudhagad) | सुरगड (Surgad) | तळगड (Talgad) |
| तुंगी (कर्जत) (Tungi (Karjat)) | उंदेरी (Underi) | ||