मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

साल्हेर (Salher) किल्ल्याची ऊंची :  5441
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बागलाण
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान कळसूबाईचा आहे , तसा गडकिल्ल्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा मान साल्हेर किल्ल्याचा आहे. बागलाण हा मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्यांमुळे समृध्द झालेला प्रदेश आहे. साल्हेर गडाचा घेरा साधारणपणे ११ किमी असून व्यापलेले क्षेत्र ६०० हेक्टर आहे. हा गड डांग - गुजरात आणि बागलाण यांना जोडणार्‍या व्यापारी मार्गावर असल्याने संरक्षण दृष्ट्या महत्वाचा होता.
7 Photos available for this fort
Salher
Salher
Salher
इतिहास :
साल्हेर गड हा परशुरामाची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वत:साठी भूमी मिळवण्यासाठी सागराला मागे हटवायला त्यांनी बाण सोडला तो याच भूमीवरून अशी लोखाण्ची श्रध्दा आहे. पौराणिक स्थान असलेल्या साल्हेरचे, शिवकालीन इतिहासातील देखील महत्वाचे स्थान आहे, ते येथे झालेल्या प्रसिद्ध लढाईमुळे.

शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला. त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली ते एकून पातशहा कष्टी झाला ,नि म्हणाला ,‘काय इलाज करावा ,लाख लाख घोड्याचे सुभे रवाना केले, ते बुडवले नामोहरम होऊन आले आता कोण पाठवावे, ’ तेव्हा पातशहाने ‘शिवाजी जोवर जिवंत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही’ असा विचार केला आणि इखलासखान व बहोलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी सालेरीस (साल्हेरला) रवाना केले.

मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले, ‘तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बेलोलखानास धारून चालविणे, आण कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले. ’ हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे. असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे. ’ अशी पत्रे पाठविली. त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव तर दुसरीकडून पेशवे, उभयता सालेरीस आले,आणि मोठे युध्द झाले.

सभासद बखरीत याचा उल्लेख् खालील प्रमाणे आढळतो.

‘‘चार प्रहर दिवस युध्द जाहले मोगल, पठाण, रजपूत, तोफांचे, हत्ती, उंट आराबा घालून युध्द जाहले. युध्द होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की , तीन कोश औरस चौरस ,आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते. हत्ती रणास आले. दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले. पूर वहिले रक्ताचे चिखल जाहले. त्यामध्ये रुतो लाबले ,असा कर्दम जाहला मराठ्यांनी इखलासखान आणि बेलोलखानाचा पाडाव केला. युध्दात प्रचंड प्रमाणावर हानी झाली. या युध्दात शिवरायांच्या एक लाख २० हजार सैन्याचा समावेश होता, पैकी १० हजार माणसे कामीस आले. सहा हजार घोडे, सहा हजार उंट, सव्वाशे हत्ती तसेच खजिना ,जडजवाहीर ,कापड अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली. या युध्दात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. मोरोपंत पेशवे आणि प्रतापराव सरनौबत यांनी आणीबाणी केली. सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवतांना आपला देह ठेवावा लागला. ते तोफेचा गोळा लागून पडले. ‘सूर्यराव काही सामान्य योध्दा नव्हे. भारती जैसा कर्ण योध्दा त्याचा प्रतिमेचा, असा शूर पडला.’ विजयाची बातमी शिवरायांकडे गेली राजे खूप खूश झाले.खबर घेऊन आलेल्या जासूदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनौबत ,मोरोपंत पेशवे, आनंदराव ,व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्रव्य देण्यात आले. हा पराभाव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो पातशहा असे कष्टी जाले ‘खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवाजीसच दिधली असे वाटते. आता शिवाजी अगोदर आपणास मृत्यु येईल तर बरे, आता शिवाजीची चिंता जीवी सोसवत नाही’ असे बोलिले.

मोगलांच्या सैन्याशी मैदानात समोरासमोर लढाई करून महाराजांना हा विजय प्राप्त झाला होता .या युध्दात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युध्दकौशल्याची व शौर्याची किर्ती चहुकडे पसरली आणि त्यांचा दरारा अधिकच वाढला. साल्हेर जिंकल्यावर त्यासमोरील मुल्हेर किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि संपूर्ण बागलाण प्रांतावर त्यांनी आपली मजबूत पकड बसवली. त्यामुळे सुरत शहरास कायमची दहशत बसली.
पहाण्याची ठिकाणे :
साल्हेरवाडीहून गडावर येतांना पायर्‍या लागतात. पायर्‍या चढून गेल्यावर गडाचा पहिले प्रवेशव्दार लागते. या प्रवेशव्दाराच्या बाजूला बुरुज आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूला पाण्याचे कोरडे टाके पाहायला मिळते. पुढे किल्ल्याचे दुसरे प्रवेशव्दार आहे . दुसर्‍या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर काटकोनात तिसरे प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारावर शिलालेख आहे. हि तीन प्रवेशव्दारांची माळ पार करुन किल्ल्याच्या सर्वात खालच्या माचीवर प्रवेश होतो. माची वरुन पुढे चालत जातांना डाव्या बाजूस टोका जवळ एक उध्वस्त वास्तूचे अवशेष दिसतात. साल्हेरवाडीतून येणार्‍या वाटेवर लक्ष ठेवणार्‍या टेहळ्यांसाठी ही वास्तू बांधलेली असावी. वळसा घालून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला पाण्याचे एक टाक पाहायला मिळते. टाक्याच्या पुढे उध्वस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात.

माची वरुन पुढे चालत गेल्यावर माचीच्या टोकाला पाय‍र्‍या बांधलेल्या पाहायला मिळतात. या पायर्‍यांवरुन वर चढत गेल्यावर तीन प्रवेशव्दार लागतात. यातील दुसर्‍या प्रवेशव्दारातून तिसर्‍या प्रवेशव्दाराकडे जातांना उजव्या बाजूला गुहा आहे. या गुहेचा उपयोग देवडी म्हणून केला जात असावा. या गुहेत गणपतीचे शिल्प आहे. तिसर्‍या प्रवेशव्दारा जवळ उध्वस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. तिसरे प्रवेशव्दार ओलांडून काही पायर्‍या चढून गेल्यावर आपला किल्ल्याच्या मुख्य माचीवर प्रवेश होतो. किल्ल्यावरील अनेक वास्तू याच माचीवर आहेत.

तिसर्‍या प्रवेशव्दारा पासून पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर उजव्या बाजूला पाण्याचे टाक आहे, पुढे अनेक उध्वस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. पुढे गेल्यावर पायवाटेच्या उजव्या बाजूला पाण्याचे टाक असून डाव्या बाजूला यज्ञकुंड आहे. या ठिकाणीही काही उध्वस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. पुढे थोडयाच अंतरावर पायवाटेच्या डाव्या बाजूला गंगासागर तलाव दृष्टीस पडतो. तलावाच्या बाजूलाच पाण्याचे टाक आणि उध्वस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. या वास्तूंच्या पुढे पाण्याची दोन टाकी आहेत. त्याच्या जवळच हनुमानाची भग्न मुर्ती आहे. गंगासागर तलावाच्या समोर , पायवाटेच्या उजव्या बाजूला भग्न मंदिरांचे अवशेष आढळतात . या मंदिराच्या जवळून दोन वाटा फुटतात. सरळ जाणारी वाट गंगासागर तलावा जवळून किल्ल्याच्या पूर्व टोकाला असलेल्या प्रवेशव्दारांकडे घेऊन जाते, प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर उध्वस्त वास्तूंचे चौथरे पाहायला मिळतात. वळसा घालून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेल्या गुहा पाहायला मिळतात .तेथून पुढे ही वाट साल्हेर आणि सालोटा गडाच्या खिंडीकडे जाते. या वाटेवर एका खाली एक तीन प्रवेशव्दार बांधलेली आहेत. त्यातील दुसर्‍या प्रवेशव्दारावर शिलालेख आहे. पुढे ही वाट साल्हेर आणि सालोटा गडाच्या खिंडीतून खाली माळदर गावाकडे उतरते.

मंदिरापासून फ़ुटणारी दुसरी वर चढत जाते . या वाटेवर आपल्याला देवीची मुर्ती पाहायला मिळते पुढे वाट आपल्याला तीन गुहांपाशी घेऊन जाते. गुहांच्या समोर मारूतीचे मंदिर आहे. या गुहांमध्ये रहाता येऊ शकते. गुहां शेजारुन वर जाणारी वाट आपल्याला गडाच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जाते. या शिखरावर श्री परशुरामाचे मंदिर आहे. या मंदिरात परशुरामांची मूर्ती व पादुका आहेत, आणि जोडीला भान हरपून टाकणारा निसर्ग आहे. येथून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य नजरेस पडते. येथून संपूर्ण बागलाण विभाग दिसतो. हा गड डांग - गुजरात आणि बागलाण यांना जोडणार्‍या व्यापारी मार्गावर असल्याने संरक्षण दृष्ट्या महत्वाचा होता. समोर दक्षिण बाजूला अजंठा - सातमाळा डोंगरातले धोडप, इखारीया हे सुळके दिसतात. पूर्वेकडे मांगीतुंगी, तांबोळया, न्हावीगड, हनुमान टेकडी, मुल्हेरगड, हरगड, मोरागड आणि सालोटा नजरेस पडतात. समोरच हरणबारीचे धरण लक्ष वेधून घेते.
पोहोचण्याच्या वाटा :
१) वाघांबे मार्गे :-
साल्हेरला जाण्यासाठी नाशिक - सटाणामार्गे ताहराबाद गाठावे. गुजरातमधून यायचे झाल्यास डांग जिल्हयातून ताहराबादला जाण्यास रस्ता आहे. ताहराबादहून मुल्हेरमार्गे वाघंबे अशी एसटी अथवा जीप सेवा देखील उपलब्ध आहे. वाघंबे गाठल्यावर गावातूनच साल्हेर-सालोटा यांच्या खिंडीतून साल्हेरला जाणारी वाट आहे. वाटेत कुठेही पाणी नसून खिंडीपर्यंत चालणारी वाटचाल दमछाक करणारी आहे. या वाटेने गडावर जाण्यासाठी साधारण अडीच तास लागतात.
या वाटेने गडावर जातांना चार दरवाजे लागतात. तिसर्‍या ते चौथ्या दरवाजाच्या दरम्यान कड्यात खोदलेल्या १८ ते २०गुहा आहेत. चौथ्या दरवाजाच्या कमानीवर एक शिलालेख आढळतो. येथून आत आल्यावर समोरच एक पठार दिसते.

२) माळदर मार्गे:-
गडावर जाण्यासाठी असलेली ही वाट फारशी वापरात नाही. ही वाट माळदर गावतूनच जाते.सटाण्याहून एसटीने माळदरला जाता येते. ही वाट साल्हेर व सालोटा यांच्या दरम्यानच्या खिंडीमधून जाते. या वाटेने गडावर जायला साधारण तीन तास लागतात.

३) साल्हेरवाडी मार्गे :-
साल्हेरवाडी हे गाव वाघंबे गावाच्या पुढे आहे. साल्हेरवाडीला दोन मार्गांनी जाता येते. एक सटाणा - ताहराबाद - मुल्हेर - साल्हेरवाडी असा आहे. साल्हेरवाडीहून गडावर जाणारी वाट दमछाक करणारी आहे. या वाटेने सहा दरवाजे पार करून सुमारे तीन तासांनी आपण गडावर पोहोचतो. वाट मळलेली असल्याने चूकण्याची शक्यता नाही. या वाटेत कुठेही पाणी नाही.
राहाण्याची सोय :
गडावर असलेल्या तीन गुहांमध्ये रहाण्याची सोय व्यवस्थित होऊ शकते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :
गंगासागर तलाव व त्याच्या बाजूस असणारी दोन पाण्याची टाकी यातील पाणी पिण्यास योग्य आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
वाघांबे मार्गे अडीच तास , साल्हेरवाडी मार्गे तीन तास, माळदर मार्गे तीन तास लागतात.
सूचना :
१) साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, हरगड हे आसपासचे किल्ले ३ दिवसात पाहाता येतात.
२) सालोटा, मुल्हेर, मोरागड, हरगड यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: S
 सडा किल्ला (Sada Fort)  सदानंदगड (Sadanandgad)  सदाशिवगड (Sadashivgad)  सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad)
 सज्जनगड (Sajjangad)  साल्हेर (Salher)  सालोटा (Salota)  सामानगड (Samangad)
 सामराजगड (Samrajgad)  सांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat)  सांकशीचा किल्ला (Sankshi)  संतोषगड (Santoshgad)
 सप्तश्रुंगी (Saptashrungi)  सरसगड (Sarasgad)  सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug))  सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))
 साटवलीचा किल्ला (Satavali Fort)  सेगवा किल्ला (Segawa)  शिवडीचा किल्ला (Sewri Fort)  शिरगावचा किल्ला (Shirgaon)
 शिवगड (Shivgad)  शिवनेरी (Shivneri)  शिवथरघळ (Shivtharghal)  सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan))
 सिध्दगड (Sidhhagad)  सिंधुदुर्ग (Sindhudurg)  सिंदखेडराजा (Sindkhed Raja)  सिंदोळा (Sindola)
 सिंहगड (Sinhagad)  सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort)  सिताबर्डी किल्ला (Sitabuldi fort(Sitabardi Fort))  सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)
 सोंडाई (Sondai)  सोनगड (Songad)  सोनगिर (धुळे) (Songir (Dhule))  सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat))
 सोनगिरी (नाशिक) (Songir (Nashik))  सुभानमंगळ (Subhan Mangal)  सुधागड (Sudhagad)  सुलतान गढी (Sulatan Gadhi)
 सुमारगड (Sumargad)  सुरगड (Surgad)  सुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort))  सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)