मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

सिंहगड (Sinhagad) किल्ल्याची ऊंची :  4400
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: भुलेश्वर,पुणे
जिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम
तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाने पावन झालेला सिंहगड किल्ला, पुणे शहराच्या सानिध्यात असल्याने कायम गजबजलेला असतो. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर "कोंढाणा" नावाचा प्राचीन किल्ला होता. पुढील काळात तो किल्ला सिंहगड नावाने ओळखला जाऊ लागला. सिंहगडावरून पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूख गडावरून दिसतो.
6 Photos available for this fort
Sinhagad
Sinhagad
Sinhagad
इतिहास :
हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे विजापूरकरांकडून म्हणजेच आदिलशाहि कडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवांचे निधन झाल्यावर कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला व या गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी तो परत आदिशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले, त्यामध्ये सिंहगड पण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंढाण्याचा अधिकारी होता हा मूळचा राजपूत होता पण तो बाटून मुसलमान झाला.

सिंहगड हा मुख्यत: प्रसिद्ध आहे, तो तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे, शिवाजी महाराज जेव्हा आग्र्‍याहून सुटून परत आले, तेव्हा त्यांनी मोगलांना दिलेले गड परत घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तानाजीने कोंढाणा आपण घेतो म्हणून कबूल केले.

या युद्धाबाबत सभासद बखरीत पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो:

तानाजी मालूसरा म्हणून हजारी मावळियांचा होता. त्याने कबूल केले की, ‘कोंढाणा आपण घेतो’ , असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता त्यांस कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरबस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्यांशी व तानाजी मालुसरा सुभेदार यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महाशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डावे हातची ढाल तुटली दुसरी ढाल समयास आली नाही, मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवरि वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा (तानाजीचा भाऊ),याने हिंमत धरून, कुल लोक सावरून, उरले राजपुत मारिले, किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजाना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली. तेव्हा ते म्हणाले ,‘एक गड घेतला, परंतु एक गड गेला‘ माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७० च्या रात्री हे युद्ध झाले.

तानाजींच्या बलिदाना नंतर छ. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव "सिंहगड" ठेवले अशी आख्यायिका आहे. पण कोंढणा किल्ल्याचे सिंहगड हे नाव त्यापूर्वीच प्रचलित होते असे ऐतिहसिक कागदपत्रां वरुन सिध्द होते. खुद्द छ. शिवाजी महाराजींनी ०३/०४/१६६३ रोजी मोरो त्रिमळ पेशवे आणि राजश्री निळो सोनदेऊ मुजूमदार यांना लिहीलेल्या पत्रात," तुम्ही लष्करी लोकानसी व खासकेली हशमानसी कागद देखताच स्वार होवून किले सिंहगडास जाणे". असा सिंहगडाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.

इ.स. १६८९ च्या मे महिन्यात मोगलांनी मोर्चे लावून हा गड घेतला. पण पुढे चार वर्षांनी १६९३ मध्ये विठोजी कारके आणि नावजी बलकवडे यांनी कोंडाणा परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. शनिवार दि २ मार्च इस १७०० या दिवशी छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावरती निधन झाले. पुढे इ.स. १७०३ च्या मे महिन्यात हा किल्ला परत मोगलांकडे गेला व स्वत: औरंगजेबाने हा किल्ला पाहून त्याचे नाव ’बक्षिंदाबक्ष’ (ईश्वराची देणगी) ठेवले. पुढे इ.स. १७०५ च्या जुलै महिन्यात हा गड मराठ्यांनी परत ताब्यात मिळवला.
पहाण्याची ठिकाणे :
सिहगडाच्या पायथ्या पासून गडावर जाण्याचे दोन मार्ग आहेत. रस्त्याच्या मार्गाने थेट गडावर जाता येते. तसेच हातकर वाडीतून गडावर पायी चढून जाता येते. यापैकी कुठल्याही मार्गाने किल्ल्यावर पोहोचल्यावर आपण गडाच्या उत्तरेला असलेल्या पुणे दरवाजातून गडावर प्रवेश करतो. शिवकालाच्या पूर्वीपासून याच दरवाजाचा मुख्यत: वापर होत असे. तेथून पुढे गेल्यावर अजून दोन दरवाजे आहेत. अशाप्रकारे पुण्याच्या बाजूस एकामागोमाग एक असे तीन दरवाजे किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी बांधलेले आहेत. यापैकी तिसरा दरवाजा हा यादवकालीन आहे.

तिसर्‍या प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजवीकडील वाट दारु कोठाराकडे जाते. दिनांक ११ सप्टेंबर १७५१ मध्ये या कोठारावर वीज पडली. ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसांचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली होती .दारु कोठार पाहून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला बुरुज आहे. त्यावर एक तोफ आहे. येथून पुढे टिळकांच्या बंगल्याकडे जातांना एका उध्वस्त वास्तू जवळ दोन तोफ़ा ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक राहात असत. इसवीसन १९१५ साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली. टिळकांच्या बंगल्याच्या मागे तलाव आहे.

टिळकांच्या बंगल्याच्या पुढे उजवीकडे जाणार्‍या वाटेने पुढे जाऊन खाली उतरल्यावर राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी घुमटी दिसते ती छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणार्‍या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी शनिवार दि. २ मार्च इ.स १७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जात असे. समाधी जवळच पाण्याचे टाक आहे. समाधी पाहून परत आल्यावाटेने बंगल्याजवळ येऊन पायवाटेने कलावंतीणीच्या बुरुजाकडे जातांना वाटेत एक पाण्याचे टाक, तलाव आणि उध्वस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात.

कलावंतीण बुरुज पाहून दक्षिणेला असलेल्या झुंजार बुरूजाकडे जातांना एक पायवाट तानाजीच्या कड्याकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मावळ्यांसह किल्ल्यावर चढले होते. तानाजी कडा पाहून परत पायवाटेवर येऊन झुंजार बुरुजाकडे जातांना वाटेत एक पाण्याचे टाक लागते, त्यापुढे गेल्यावर एका टेकडीवर उदेभान राठोडचे स्मारक आहे. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता. उदेभानाच्या स्मारकाकडे जातांना डाव्या बाजूला कल्याण दरवाजा आहे. गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास या दरवाजातून आपला गड प्रवेश होतो. येथे एकामागोमाग असे दोन दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. या ठिकाणी,

" श्रीशालीवाहन शके १६७२ कारकीर्द

श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान"

असा शिलालेख आढळतो.

कल्याण दरवाजा पाहून पुन्हा वर चढून पायवाटेवर येऊन उदयभानाचे स्मारक असलेल्या टेकडीला वळसा घालून पुढे झुंजार बुरुजाकडे जातांना एक पाण्याचा तलाव आहे. झुंजार बुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानाच्या स्मारका पुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात, तर खाली पानशेतचे खोरे दिसते, पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो.
झुंजार बुरुज पाहून टाक्यापर्यंत येऊन तेथून कलावंतीण बुरुजाकडे न जाता पुणे दरवाजाच्या दिशेने जातांना डाव्या बाजूला एक तलाव लागतो. पुढे उजव्या बाजूला एक हनुमानाची मुर्ती आणि त्यामागे देवटाक हे पाण्याचे टाके पाहायला मिळते. . या टाक्यातील पाण्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम ह्या टाक्याचे पाणी मागवत असत.

देवटाक्यापासून जवळच हत्ती तलाव आहे, त्या तलावाच्या पुढे तानाजींचे स्मारक दिसते. ’तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दिनांक ४ फेब्रुवारी १६७० या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी माघ वद्य नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो. स्मारका जवळ अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मुर्ती दिसतात भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे. अमृतेश्वर मंदिराच्या पुढे कोंढाणेश्वर हे यादवकालीन मंदिर आहे. हे शंकराचे मंदिर असून ते यादवांचे कुलदैवत होते.

कोंढाणेश्वर मंदिर पाहून पुढे गेल्यावर मंदिर व टाक्यांचा समुह पाहायला मिळतो. हे पाहून पुढे खंदकड्याकडे जातांना डाव्या बाजूला काही गुहा आहेत, त्यांना घोड्याच्या पागा म्हटले जाते. खंदकड्यावर पाण्याचे दोन तलाव पाहायला मिळतात. खंदकडा उतरून पुन्हा पुणे दरवाजापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते.
पोहोचण्याच्या वाटा :
पुण्याच्या नैऋत्येला साधारण ३९ किमी अंतरावर सिंहगड किल्ला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता बनविलेला असल्यामुळे. खाजगी वाहनाने थेट गडावर जाता येते. पायी जाणार्‍यांसाठी गडाच्या पायथ्याला असलेल्या हातकरवाडी गावात पोहोचणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिकेच्या (PMT) बसेस स्वारगेट पासून हातकरवाडी जातात. हातकरवाडीतून मळलेली पाऊलवाट आपल्याला १.३० तासात गडावर घेऊन जाते.
१) पुणे - कोंढणपूर मार्गे :-
पुणे - कोंढणपूर बसने कोंढणपूरला उतरून कल्याण गावातून कल्याण दरवाजातून आपण गडावर जातो. या मार्गाने दोन दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.

२) पुणे दरवाजा मार्गे :-
पुणे - सिंहगड या बसने जाताना वाटेत खडकवासला धरण लागते. या मार्गाने तीन दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.


राहाण्याची सोय :
गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावरील हॉटेल्स यामध्ये जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :
देवटाक्यांमधील पाणी बारा महिने पुरते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्या पासून २ तास लागतात.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: S
 सडा किल्ला (Sada Fort)  सदानंदगड (Sadanandgad)  सदाशिवगड (Sadashivgad)  सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad)
 सज्जनगड (Sajjangad)  साल्हेर (Salher)  सालोटा (Salota)  सामानगड (Samangad)
 सामराजगड (Samrajgad)  सांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat)  सांकशीचा किल्ला (Sankshi)  संतोषगड (Santoshgad)
 सप्तश्रुंगी (Saptashrungi)  सरसगड (Sarasgad)  सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug))  सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))
 साटवलीचा किल्ला (Satavali Fort)  सेगवा किल्ला (Segawa)  शिवडीचा किल्ला (Sewri Fort)  शिरगावचा किल्ला (Shirgaon)
 शिवगड (Shivgad)  शिवनेरी (Shivneri)  शिवथरघळ (Shivtharghal)  सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan))
 सिध्दगड (Sidhhagad)  सिंधुदुर्ग (Sindhudurg)  सिंदखेडराजा (Sindkhed Raja)  सिंदोळा (Sindola)
 सिंहगड (Sinhagad)  सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort)  सिताबर्डी किल्ला (Sitabuldi fort(Sitabardi Fort))  सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)
 सोंडाई (Sondai)  सोनगड (Songad)  सोनगिर (धुळे) (Songir (Dhule))  सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat))
 सोनगिरी (नाशिक) (Songir (Nashik))  सुभानमंगळ (Subhan Mangal)  सुधागड (Sudhagad)  सुलतान गढी (Sulatan Gadhi)
 सुमारगड (Sumargad)  सुरगड (Surgad)  सुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort))  सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)