|  सोनगिर (धुळे)  
                                       (Songir (Dhule))     | 
 	  किल्ल्याची ऊंची : 
	  	  1000 | 
	
    
		| किल्ल्याचा प्रकार  : गिरीदुर्ग
		 | 
		डोंगररांग: गाळणा टेकड्या | 
	
	
				
				| जिल्हा : धुळे | 
		श्रेणी : मध्यम | 
		
	
		
			महाराष्ट्र हा दगडांचा देश आहे. या दगडांच्या देशातच सह्याद्रीचा उगम झाला आहे. या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर अनेक गडकिल्ले वसलेले आहेत. या सह्याद्रीची एक रांग धुळे जिल्ह्यात गेलेली आहे. या सह्याद्रीच्या रांगेत धुळे - आग्रा महामार्गावर दोन किल्ले आहेत. त्यांची नावे सोनगिर आणि लळींग. यापैकी सोनगिर हा धुळ्या पासून २१ कि.मी अंतरावर आहे.
 
 
  | 
		
	
	
	
        | 
        
         | 
		
	
								
	
	
	| पहाण्याची ठिकाणे : | 
			
	
		
सोनगिर किल्ला लहानशा टेकडीवर वसलेला आहे. गावातून किल्ल्यावर जातांना एक उध्वस्त प्रवेशव्दार लागते. सध्या या प्रवेशव्दाराची चौकट शिल्लक आहे. बाकी सर्व भाग पडून गेला आहे. या प्रवेशव्दाराच्या कमानीवर एक शिलालेख होता, मात्र आज तो धुळ्याच्या राजवाडे संशोधन केन्द्रात ठेवला आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर समोरच एक पायर्यांचा रस्ता कातळातून वर गेलेला दिसतो. प्रवेशव्दाराच्या आजुबाजुला अनेक खाबांचे अवशेष पडलेले दिसतात. थोडेसे खाली उतरल्यावर एक पाण्याचे टाके दिसते. कातळातील पायर्या चढून वर गेले की, आपण गडमाथ्यावर पोहोचतो. येथून गड फिरण्यासाठी आपल्याकडे दोन मार्ग आहेत. एक उजवीकडचा तर दुसरा डावीकडचा, आपण डावीकडे वळायचे. गडाच्या या बाजूला काहीच अवशेष नाहीत. शेवटच्या टोकावर तटबंदीचे अवशेष आहेत. हा सर्व भाग पाहून पुन्हा कातळातील पायर्यांपाशी यावे. येथून उजवीकडची वाट धरावी. येथून थोडे पूढे गेल्यावर एक बाव (विहीर) लागते. खरे तर याला बावं म्हणणे चुकीचेच आहे, कारण आत कितीही डोकावले तरी तळाकडील पाणी काही दिसत नाही, याची खोली ही दहामजली इमारती एवढी असावी. याच्याच थोडेसे पुढे पुष्करणीचा हौद लागतो. पूर्वी या विहीरीतून पाणी काढून या हौदात साठविले जात असे. या पुष्कर्णीचे सध्या १४ कोनाडे शिल्लक आहेत. थोडे अंतर गेल्यावर किल्ल्यावरील वाड्यांचे काही अवशेष दिसतात. किल्ल्याच्या शेवटच्या टोकाशी बुरुजांचे काही अवशेष दिसतात. सध्या किल्ल्याचे बांधकाम बरेच ढासळलेले आहे. किल्ला मात्र अत्यंत मोक्याच्या ठिकाणी बांधला आहे. प्राचीन सुरत - बुर्हाणपूर व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.
  | 
	
	
		| पोहोचण्याच्या वाटा : | 
	
	
		सोनगिर किल्ला हा धुळ्यापासून २१ किमी अंतरावर आहे. धुळे - आग्रा रस्त्यावर सोनगिर नावाचा फाटा लागतो. या फाट्यावरच सोनगिर नावाचे गाव आहे. धुळेहून शिरपूर मार्गे जाणार्या किंवा शहादा, धोंधाईचा अशा कोणत्याही मार्गाने जाणार्या एसटीने सोनगिर फाट्यावर उतरावे. या फाट्यावरुन साधारण १० मिनिटात सोनगिर गावात पोहोचायचे. गावातून ग्रामपंचायतीच्या ऑफिस समोरुनच एक छोटीशी वाट गडावर जाते. सोनगिर गावातून गडावर जाण्यास १० मिनिटे लागतात. गडावर जाणारी ही एकमेव वाट आहे. 
  | 
	
		| राहाण्याची सोय : | 
		गडावर राहण्याची सोय नाही. 
  | 
	
		
| जेवणाची सोय : | 
		सोनगिर फाट्यावर काही हॉटेल्स आहेत, तेथे जेवणाची सोय होऊ शकते. 
  | 
	
		
| पाण्याची सोय : | 
		गडावर पिण्याचे पाणी नाही. 
  | 
	
		
| जाण्यासाठी लागणारा वेळ : | 
		| सोनगिर गावातून १० मिनीटे लागतात. |