मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

अकलूजचा किल्ला (Akluj Fort) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सोलापूर श्रेणी : सोपी
अकलूज शहरात नीरा नदीच्या काठावर अकलूजचा किल्ला उभा आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार श्री दिनकरराव थोपटे व अविनाश थोपटे यांनी किल्ल्यात शिवसृष्टी निर्माण केलेली आहे. किल्ल्याचा जिर्णोध्दार व शिवसृष्टी उभारण्यासाठी मोहीते पाटील घराण्याने विशेष प्रयत्न केलेले आहेत.

88 Photos available for this fort
Akluj Fort
पहाण्याची ठिकाणे :
तिकीट काढून किल्ल्यात शिरताना प्रथम फायबरच्या हत्ती व घोड्यावर बसलेले मावळे आपले स्वागत करतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून त्यात विवीध वादकांचे पुतळे बसविलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस चालत गेल्यावर किल्ल्याच्या तटबंदीवर शिवाजी महाराजांच्या जीवन चरीत्रावर आधारीत फायबरची म्युरल्स्‌ पाहायला मिळतात. यातील पहिली तीन म्युरल शिवजन्माशी संबंधीत आहेत. त्यानंतर शिवनेरी वरली शिवजन्मस्थानाच्या महालाची प्रतिकृती बनविली असून त्यात शिवाजी महाराजांच्या बारशाचा देखावा उभा केलेला आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगावर आधारीत म्युरल्स्‌ व त्यांच्या बाजूला प्रसंगाची माहिती या गोष्टी पाहायला मिळतात. म्युरल्स्‌ मधील बारकावे, व्यक्तींच्या चेहर्‍यावरील भाव, आवेश पहाण्यासारखे आहेत. सर्वात शेवटी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाचा देखावा मोठ्या दालनात साकारला आहे. त्यातील प्रत्येक मुर्तीचा पेहराव, त्यांची रंगसंगती, चेहर्‍यावरील भाव, डोळे पहाण्यासारखे आहेत.

किल्ल्याच्या मधोमध असणार्‍या उपल्या बुरुजावर (या बुरुजाचा वापर टेहळणीसाठी करण्यात येत असावा.) छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसविलेला आहे. जिन्याने तिथपर्यंत जाऊन किल्ल्याच्या व आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहाता येते. याच बुरुजावर एका बाजूला दोर लावून बुरुज सर करणारे मावळे दाखवले आहेत. तर दुसर्‍या बाजूस शेकोटी पेटवून पहार्‍यावर बसलेले मावळे रामोशी दाखविलेले आहेत.

किल्ल्याच्या तटावर विविध जाती धर्माचे मावळे आपापल्या पेहरावातील वैशिष्ट्यासह उभे केलेले आहेत. यात तोफची, मशालजी, तिरंदाज, पहारेकरी, रामोशी इ समावेश आहे. हे पुतळे पहात किल्ल्याच्या तटबंदीवर फिरुन नंतर प्रवेशद्वारापाशी असलेल्या संग्राहलयात जावे. या संग्राहालयासमोर हत्तीवरुन दवंडी देणार्‍या मावळ्याचा पुतळा उभारलेला आहे. संग्राहलयात महत्त्वाच्या किल्ल्यांच्या फायबरमधील प्रतिकृती बनविलेल्या आहेत. त्यात राजगड, रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, प्रतापगड, देवगिरी यांचा समावेश आहे.

किल्ल्यात ठिकठिकाणी हिरवळ, फुलझाडे व कारंजी आहेत. त्यामुळे किल्ल्याचा फेरफटका नेत्रसुखद होतो. किल्ल्यातून बाहेर पडून नदीकाठाने बुरुजाला लागून असलेल्या वाटेने गेल्यास तटबंदीतील विरगळ व इतर पूरातन अवशेष पाहाता येतात.

पोहोचण्याच्या वाटा :
अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. १) पुणे - अकलूज अंतर १६६ कि.मी आहे. २) पुणे - सोलापूर मार्गावरील इंदापूर येथून अकलूजला जाणारा फाटा आहे. ३) सोलापूर पंढरपूर(३५ किमी) अकलूज आहे.
सूचना :
किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी तिकीट काढावे लागते. मोठ्यांसाठी २०/- रु व लहानांना (१२ वर्षापर्यंत) १५/- रु तिकीट आहे. किल्ला सकाळी १०:०० ते १:३० व संध्याकाळी २:३० ते ६:३० पाहाण्यासाठी उघडा असतो. संध्याकाळी लाइट आणि साऊड शो असतो, परंतू त्यासाठी किमान २५ प्रेक्षक असणे आवश्यक आहे.
जिल्हा Solapur
 अकलूजचा किल्ला (Akluj Fort)  धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))  करमाळा (Karmala Fort)  माचणूर (Machnur)
 माढा गढी/किल्ला (Madha Fort)  मंगळवेढा (Mangalwedha)  मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort)  पिलीवचा किल्ला (Piliv Fort)
 सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)