मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort)) किल्ल्याची ऊंची :  1710
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : नगर श्रेणी : सोपी
बहादूरगड उर्फ पेडगावचा किल्ला उर्फ धर्मवीर गड हा भूईकोट किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आहे . अष्टविनायकापैकी सिध्दटेक पासून केवळ ९ किलोमीटरवर असलेला हा सुंदर किल्ला केवळ आडबाजूला असल्यामुळे उपेक्षेचा धनी झालेला आहे . किल्ल्यावर पाहाण्यासारख्या अनेक वास्तू आणि मंदिरे आहेत. किल्ल्यावरेल पाणीपुरवठा योजनाही पाहाण्यासारखी आहे.

शिवदुर्ग संस्था आनि पेडगाव ग्रामस्थांनी मिळून किल्ल्याची व्यवस्था उत्तम ठेवलेली आहे. गडावर दोन गडपाल नेमलेले आहेत ते गडाची साफ़सफ़ाई, सुशोभीकरणासाठी लावलेल्या झाडांची निगा राखणे, विध्वंसक पर्यटकांकडून होणारे गडाचे नुकसान रोखणे इत्यादी कामे करतात. किल्ल्यातील रस्ते आणि पायवाटा दगड लावून आखीव - रेखीव बनवलेल्या आहेत.
37 Photos available for this fort
Bahadurgad (Pedgaon Fort)
इतिहास :
इतिहास :- पेडगावचा भूईकोट किल्ला देवगिरीच्या यादवांच्या काळात अस्तित्वात होती. किल्ल्यातील शिवमंदिर त्याची साक्ष देत आजही उभी आहेत. यादवांकडून किल्ला निजामशाहाच्या ताब्यात गेला. निजामशाहीचा पाडाव झाल्यावर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांचा सरदार बहादूरशहा कोकलताश हा औरंगजेबाचा दुध भाऊ होता. दक्षिणेचा सुभेदार असतांना त्याचा तळ पेडगावला होता. त्याने पेडगावच्या किल्ल्याची डागडूजी करुन या किल्ल्याचे नाव बहादूरगड ठेवले.

इसवीसन १६७४ मध्ये बहादुरगडावर २०० अस्सल अरबी घोडे आल्याची खबर छ. शिवाजी महाराजांना मिळाली. त्यांनी गमिनी कावा या युध्दतंत्राचा सुयोग्य वापर करुन गडावर हल्ला करण्याची योजना आखली. या मोहिमेचा प्रमुखाने सैन्याचे दोन भाग केले. सैन्याची एक तुकडी भल्या सकाळी बहादूरगडावर चालून गेली. बहदूरखानाने पेडगावातले मोगल सैन्य गोळा केले आणि मराठ्यांवर चालून गेला. थोडावेळ हातघाईची लढाई झाल्यावर मराठ्यांनी अचानक माघार घेतली आणि मराठ्यांचे सैन्य पळायला लागले. मराठे पळत आहेत हे पाहून मुघल सैन्याला चेव आला आणि त्यांनी त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. मराठ्यांनी मोगल सैन्याला पेडगाव पासून जवळजवळ २५ कोस लांब नेले. अशा प्रकारे किल्ल्यातल्या मोगल सैन्याचे मराठ्यांनी दोन भाग केले. मोगल सैन्य लांब गेल्याची खात्री झाल्यावर मराठ्यांच्या सैन्याच्या दुसर्‍या मोठ्या तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला आणि किल्ल्यातील घोडे,. खजिना आणि सामान घेउन पोबारा केला. किल्ल्यातेल तंबू जाळून टाकले.

छत्रपते संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मोगल सैन्याने संगमेशवर जवळ कैद केले. दिनांक १५ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी त्या दोघांना बहादूरगडावर आणण्यात आले. तिथे त्यांची उंटावरुन धिंड काढण्यात आली.

इसवीसन १७५१ मध्ये सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर इंग्रजांनी तो मराठ्यांकदून जिंकून घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
पेडगावाच्या वस्तीतून थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारा पर्यंत खाजगी वहानाने जाता येते. प्रवेशव्दाराच्या अगोदर डाव्या बाजूला हनुमानाची ४ फ़ुटी मुर्ती एका देवळीत ठेवलेली आहे. मुर्तीच्या पायाखाली पनवती आहे. याठिकाणी एक छोटी गणेश मुर्ती आहे. गावत किंवा किल्ल्यात सापडलेल्या एखाद्या समाधी वरील दगडाअवर कोरलेली पावले आणि छोट्या पिंडी येथे ठेवलेल्या आहेत. किल्ल्याचे गावाकडील प्रवेशव्दार उत्तराभिमुख आहे. भव्य प्रवेशव्दाराची कमान शाबूत आहे. प्रवेशव्दाराच्या बाजूचे बुरुज मात्र ढासळलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला भैरवनाथाचे मंदिर आहे. हे मंदिर गावकर्‍यांच्या ताब्यात असल्याने जून्या मंदिरावर नवा सिमेंत कॉंक्रीटचा कळस चढवलेला आहे. मंदिराला आणि कळसाला ऑईलपेंटने रंगवून त्याची मुळ शोभा घालवून टाकलेली आहे. मूळ मंदिर यादवकालिन असून दगडात बांधलेले आहे. मंदिराची ओसरी, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे. ओसरी २ खांब २ अर्ध खांभांवर तोललेली आहे. ओसरीत डाव्या बाजूच्या भिंतीला टेकून हनुमानाची ३ फ़ूटी मुर्ती आणि गणपतीची दोन फ़ुटी मुर्ती आहे. सभामंडप ४ पूर्ण खांब आणि ४ अर्धखांबांवर तोललेला आहे. गर्भगृहात पिंड आहे. मंदिरा समोरील दिपमाळे खाली अनेक जुन्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. त्यात उमा महेश्वर, विष्णू, सर्पशिळा सतीचा हात, समाधीचे दगड, कोरीव दगड, दोन स्त्रीयांचे मुख कोरलेले एक दगड इत्यादी पाहायला मिळतात. दिपमाळे समोरील पायऱ्या उतरुन खाली उतरल्यावर गजलक्ष्मीची ३ फ़ुटी मुर्ती आहे.

पायवाटेने थोडे पुढे जाऊन उजवीकडे वळल्यावर मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिराचा कळस कोसळलेला आहे. छत कसेबसे उभे आहे. मंदिराचा सभामंडप २ खांबावर तोललेला आहे . मंदिरासमोर एक वीरगळ आहे. मंदिराच्या पुढे दारु कोठाराची भग्न इमारत आहे.

दारु कोठार पाहून पुन्हा मुख्य पायवाटेवर येऊन पुढे गेल्यावर रामेश्वर मंदिर आहे. हे मंदिर त्रिदल प्रकारातले असून त्याला एक मुख्य गर्भगृह व उजव्या आणि डाव्या बाजूला दोन छोटी गर्भगृहे आहेत. सभामंडप चार मुख्य खांबावर व चार अर्ध खांबावर तोललेले आहे. गर्भगृहात पिंड आहे. गर्भगृहाच्या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीला टेकून एक गणेशाची ३ फुटी मूर्ती ठेवलेली आहे, तर उजव्या बाजूला एक ३ जैन तिर्थंकरांची मुर्ती आहे. अंतराळाच्या भिंतीला एक गणेशाची २ ५ फुटी मुर्ती टेकून ठेवलेली आहे. बाकीची दोन गर्भगृहे रिकामी आहेत . सभामंडपातील रंगशीळा तोडलेली आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर वरच्या बाजूला दोन बाजूला मूर्ती आहेत, पण त्या झिजलेल्या असल्याने ओळखता येत नाहीत. त्यातील उजव्या बाजूची मूर्ती नरसिंहाची असावी. मंदिरासमोर फ़ुलझाडे लावलेली आहेत. मंदिराचा कळस कोसळलेला आहे.

रामेश्वर मंदिरा जवळ एक वीटांनी बांधलेला ६ फ़ूटी पोकळ मनोरा आहे. किल्ल्याला लागूनच असलेल्या भिमा नदीतले पाणी किल्ल्यावर खापरांच्या पाईपांमधून खेळवण्यात आले आहे. या पाईपातून जाणार्‍या पाण्यातील हवा बाहेर निघून जाण्यासाठी मनोरे (Air release Valves) बांधण्यात आलेले आहेत. अशाप्रकारचे दोन मनोरे किल्ल्यात आहेत. त्यांना उच्छवास म्हणतात. दुसरा मनोरा ओलांडून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या मधोमध एक ३० फ़ूट उंच बुरुजासारखी रचना दिसते. त्यावर जाण्यासाठी मातीचा उतार बनवलेला आहे. हा बुरुज नसून हत्ती मोट आहे. या मोटे खाली एक हौद आहे. वरच्या टोकाला भिंतीत दोन मोठी भोके असलेले दगद बसवलेले आहेत. या भोकातून लाकडाचा भक्कम वासा टाकून त्यावर कप्पी बसवून हत्ती / घोडे/ बैलाच्या सहाय्याने पाणी वर खेचून घेतले जात असे. या हौदापर्यंत पाणी आणण्यासाठी नदी जवळ अशाप्रकारची दुसरी ५० फ़ूट उंचीची मोट बांधलेली पाहायला मिळते.

या दोन्ही मोटा पाहून झाल्यावर उजव्या बाजूला असलेल्या लक्ष्मी नारायण मंदिराकडे जावे. हे किल्ल्यावरील अप्रतिम मंदिर आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशव्दार पश्चिमेकडे असून उत्तर आणि दक्षिण दिशेलाही प्रवेशव्दार आहेत. प्रवेशव्दारांच्या व्दारशाल्हांवर आणि पट्टीवर सुंदर क्प्रीवकाम आहे. तिन्ही प्रवेशव्दारांच्या बाजूच्या भिंतींवर सुंदर गवाक्ष कोरलेली आहेत. मंदिराच्या बाह्यभिंतींवर सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. देवकोष्ठकात दक्षिण दिशेला वराहाची, पूर्वेला विष्णूची मुर्ती आहे. उत्तरेच्या देवकोष्ठकातील मुर्ती ओळखंण्याच्या पलिकडे झिजलेली आहे. मंदिराचा सभामंडप १२ खांबावर तोललेले आहे. सभामंडपावरील कळस ४ खांबावर तोललेला आहे. कळसाच्या आतील भागावर कमळ कोरलेले आहे. त्याच्या चारही कोपर्‍यात व्यालमुख आहेत. अंतराळाच्या छतावरही अशाच प्रकारचे कोरीव काम आहे. सभामंडपाच्या खांबांवर मुर्ती आणि इतर कोरीवकाम आहे. मंदिराच्या गाभार्‍याच्या दरवाजावर व्याल, गंधर्व, वेलबुट्टी यांचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गाभार्‍यात लक्ष्मी नारायणाची मुर्ती नसून एक वीरगख ठेवलेली आहे. लक्ष्मी नारायण मंदिरासमोर बालेश्वर मंदिर आहे. मंदिराचा सभमंडप कोसळलेला आहे. पण खांब उभे आहेत. खांबांवर मुर्ती आणि इतर कोरीवकाम आहे. गाभार्‍याच्या दरवाजावर व्याल, गंधर्व, वेलबुट्टी यांचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गाभार्‍यात पिंड आहे.

बालेश्वर मंदिरापासून पुढे गेल्यावर पाताळेश्वर मंदिर आहे. या मंदिराचे सर्व अवशेष नष्ट झालेले आहेत. पिंड असलेले गर्भगृह जमिनीच्या पातळीच्या खाली आहे तर नंदी जमिनीवर आहे.
पाताळेश्वर मंदिराच्या पुढे गेल्यावर एक ६ फुटी चौकोनी प्रवेशद्वार दिसते याला पाण दरवाजा या नावाने ओळखतात . या दरवाजाच्या बाजूला दोन बुरुज आहेत . या ठिकाणी दोन तटबंद्या आहेत . एक नदी जवळची आणि दुसरी दरवाजाचे संरक्षण करण्यासाठी बांधलेली . या दरवाजातून नदीवर जाता येत असे .

पाण दरवाजा पाहून आल्या मार्गाने परत येउन लक्ष्मी नारायण मंदिर आणि हत्ती मोट ओलांडून पुढे गेल्यावर नदीचा बाजूला एक मोठे टेकाड दिसते. या ठिकाणी बांधकामाचे काही अवशेषही दिसतात . टेकाडाला वळसा घालून पुढे गेल्यावर दक्षिणाभिमुख प्रवेशद्वार आहे . प्रवेशव्दाराला लागून मशीद आहे . प्रवेशद्वातून आत शिरल्यावर आत्ता तयार केलेली सुंदर बाग दिसते . या भागाला सदर किंवा दिवाणे आम म्हणतात. या ठिकाणी एक कोरीव खांब आहे त्याला शौर्य स्तंभ म्हणतात. छ. संभाजी महाराज आणि कवी कलश यांना कैद करुन १५ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी या गडावर आणण्यात आले होते. त्याठिकाणी आता असलेल्या कोरीव खांबाला शौर्य स्तंभ म्हणून पुजले जाते. प्रवेशव्दारा समोर एक इमारत आहे. ही हमामखान्याची इमारत आहे. या इमारतीत कलाकुसर केलेले वेगवेगळ्या आकाराचे हौद आहेत . इमारतीत प्रकाश येण्यासाठी छतावरील घुमटात झरोके ठेवलेले आहेत . छतावर जाण्यासाठी जीना आहे छतावर एक हौद आहे. छतावरुन नदीच्या पात्रात एक हत्ती बुरुजासारखा बुरुज दिसतो. त्यावरुन हमामखान्यात पाणी आणले जात असावे
.

हमामखान्या शेजारी एक उध्वस्त इमारत आहे . त्याच्या राहीलेल्या अवशेषांवरुन तो महाल असावा. त्या महालाला आता राणी महाल म्हणून ओळखले जाते. महालातून खाली उतरल्यावर एक कारंजे आहे . ते पाहून प्रवेशव्दारापाशी येउन पायऱ्यांनी बाजूच्या टेकाडावर चढून जावे . या टेकाडावरुन किल्ला, नदी आणि आजूबाजूचा परिसर नजरेत येतो. टेकाड उतरुन किल्ल्याच्या पूर्व तटबंदीत असलेल्या प्रवेशव्दाराच्या दिशेने चालत जावे. या प्रवेशव्दाराच्या बाहेर भवानी मंदिर आहे. या मंदिरा भोवती चार बुरुज आणि तटबंदी आहे. हे भवानी मंदिर पाहून परत किल्ल्यात येउन पुढे चालत गेल्यावर अजून एक प्रवेशव्दार आहे. पूर्वेकडील दोन्ही प्रवेशव्दारे पाहून मुख्य प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.

.
पोहोचण्याच्या वाटा :
बहादूरगड उर्फ पेडगावचा किल्ला पाहाण्यासा्ठी जवळचे मोठे गाव दौंड आहे . मुंबई - पुण्याहून अनेक ऱेल्वे गाड्या आणि एसटी बसेस दौंडमार्गे पुढे जातात. एसटी स्थानकातून पेडगावला जाणाऱ्या बसेस मिळू शकतात . पण उत्तम पर्याय म्हणजे दौंडहून खाजगी वहानाने अष्टविनायका पैकी एक असलेले सिध्दटेक (अंतर २६ किलोमीटर ) आणि सिध्दटेक पासून बहादूरगड (अंतर ९ किलोमीटर) ही दोन्ही ठिकाणे एका दिवसात पाहावीत .

दौंडवरुन अजनूज मार्गे थेट बहादूरगड उर्फ पेडगावला जाता येते . हे अंतर २० किलोमीटर आहे.
राहाण्याची सोय :
गडावर राहाण्याची सोय नाही
जेवणाची सोय :
पेडगावात जेवणाची सोय नाही .
पाण्याची सोय :
गडावर पिण्याचे पाणी नाही .
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
सप्टेंबर ते मार्च
जिल्हा Nagar
 बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort))  भैरवगड(कोथळे) (Bhairavgad(kothale))  भैरवगड(शिरपुंजे) (Bhairavgad(Shirpunje))  भोरवाडीचा किल्ला (Bhorwadi Fort)
 बितनगड (Bitangad)  हरिश्चंद्रगड (Harishchandragad)  जामगावचा किल्ला (Jamgaon Fort)  कलाडगड (Kaladgad)
 कळसूबाई (Kalsubai)  खर्डा (Kharda)  कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad))  मांजरसुभा (Manjarsubha Fort)
 नगरचा किल्ला (Nagar Fort)  पाबरगड (Pabargad)  पळशीचा किल्ला (Palashi Fort)  पट्टागड (Patta)
 पेमगिरी(शहागड) (Pemgiri(Shahagad))  रतनगड (Ratangad)  सांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat)