मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

जंजिरा (Janjira) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रायगड श्रेणी : सोपी
महाराष्ट्राला सुमारे ७५० कि.मी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनार्‍य़ावरील किल्ले पाहणे म्हणजे एक आगळी वेगळी आनंदयात्राच ठरते. ही भटकंती चालू होते डहाणूपासून तर संपते तेरेखोल येथे. येथील नारळी फोफळीच्या वनांमधून फिरताना कोकणी समाजाचे दर्शन घडते. रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यात चहुबाजूंनी सागरी पाण्याचा वेढा पडलेला, राजापुरीच्या खाडीच्या तोंडावर मोक्याच्या जागी हा अजेय जलदुर्ग उभा आहे.
5 Photos available for this fort
Janjira
Janjira
Janjira
इतिहास :
जंजिरा किल्ल्यालाच ‘किल्ले मेहरुब ऊर्फ किल्ले जंजिरा’ अशी नावे होती. इ.स. १५०८ मध्ये मलिक अहमद निजामशाहा मरण पावला. त्याचा ७ वर्षाचा अल्पवयीन मुलगा बुर्‍हाण निजामशाहा गादीवर आला. मिर्झाअल्ली आणि कलबअल्ली हे दोन निजामशाही सरदार उत्तर कोकणातील दंडाराजपुरास आले. त्यावेळी समुद्रातील चाचे कोळ्यांना फार त्रास देत असत म्हणून त्यांनी राजपुरीच्या खाडीवर लाकडी मेढेकोट उभारला. रामपाटील या कोळ्याचा अंमल त्यावेळी त्या सर्व परिसरावर होता. निजामशाहाने पिरमखान नावाच्या सरदाराला रामपाटीलचा काटा काढण्यासाठी पाठवलं. पिरमखानाने मेढेकोटच्या आजुबाजूला गलबते लावली आणि रामपाटीलाला दारू पाजून बेहोष केले व मेढेकोट आपल्या ताब्यात घेतला. रामपाटीलला निजामशाहाकडे पाठवून त्याचे धर्मांतर केले. इ.स १५२६ ते १५३२ च्या कारकिर्दीनंतर इ.स १५३२ मध्ये पिरामखान मरण पावला. पुढे १५६७ मध्ये हुसेन निजामशहाच्या हुकुमानुसार लाकडी मेढेकोटा ऐवजी दगडी कोट बांधण्यास सुरुवात झाली. हे काम इ.स १५७१ पर्यंत पूर्ण झाले आणि हा दगडी कोट ’किल्ले मेहरुब’ नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे १८५७ मध्ये अलर्गखान याची येथे नेमाणुक झाली. १६१२ मध्ये याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इब्राहीमखान याची नेमणूक झाली. याच्या मृत्यूनंतर १६१८ ते १६२० च्या कालावधीत सिध्दी सुरुदखान हा ठाणेदार झाला. यानंतर सुमारे १९४७ पर्यंत २० सिध्दी नवाबांनी जंजिरा किल्ल्यावर हक्क गाजवला. मुरुड परिसरातून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांची सांगड बसत नसल्याने मलिक अंबरने हा मुलूख तोडून देऊन याठिकाणी नवीन जहागीरदारी स्थापन केली आणि सिध्दी अंबरसानक या मुलूखाची जबाबदारी पाहू लागला. अर्थात या जंजिरा संस्थानाचा संस्थापक सिध्दी अंबरसानकच ठरला.

इ.स १६२५ मध्ये मलिक अंबर मरण पावला जंजिरेकर स्वतंत्र सत्ताधीश झाले होते. २० सिध्दी सत्ताधिशांनी मिळून ३३० वर्षे राज्य केले आणि १९४८ मध्ये जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले. इ.स १६४८ मध्ये शिवरायांनी तळेगड, घोसाळगड आणि रायगड परिसरातील मुलूख जिंकला. १६५७ मध्ये जावळी जिंकली आणि त्यांनी आपली नजर उत्तर कोकणावर वळवली. किल्ले जंजिरा आपल्या ताब्यात आल्याशिवाय उत्तर कोकणावर आपण वर्चस्व गाजवू शकणारा नाही, हे सत्य शिवरायांना उमगले होते. १६५९ मध्ये शिवरायांनी शामराजपंत व त्यांच्या सोबत बाजी घोलपला जंजिरा घेण्यासाठी पाठवले पण, हा पहिला प्रयत्न फसला. पुन्हा १६५९ मध्ये निळोजीपंत रघुनाथ मुजुमदार ,मायाजी भाटकर यांनी जंजिराच्या सिध्दीची कोंडी केली. पण पुन्हा हा प्रयत्न फसला. तिसर्‍या स्वारीचे वर्णन सभासद बखरीत खालीलप्रमाणे दिलेले आहे.

‘‘ राजियांनी व्यंकोजी दत्तो फौजेनिशी नामजाद रवाना केले. त्यांनी जाऊन मुलूख मारून तलफ केला. मग शिद्दीने आपले जातीचे हापशी लष्कर घोडेस्वार व हशम नामजाद व्यंकोजी दत्तोवर रवाना केले, त्याशी युद्ध झाले, तीनशे हबशी व्यंकोजीपंत मारिले. घोडे पाडाव केले. व्यंकोजीपंत कस्त फार केली, बारा जखमा व्यंकोजीपंतास लागल्या असा चौका बसून आले. शिद्दीने सल्याचे नाते लावले, पण राजियांनी सला केलाच नाही’.’

ही जंजिर्‍यावरील तिसरी स्वारी होती. १६७८ च्या जुलै मध्ये शिवरायांनी जंजिर्‍यावर स्वारी करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला. सन १६८२ मध्ये संभाजीराजांनी दादाजी रघुनाथाला जंजिरा घेण्यासाठी पाठवले, पण त्याचवेळी औरंगजेब दक्षिणेत उतरल्याने त्याचा जंजिरा घेण्याचा प्रयत्न अपुराच राहीला. या संस्थानाचा शेवटचा अधिपती म्हणजे सिध्दी मुहंमदखान याच्याच कारकिर्दीत अजेय असे जंजिरा संस्थान ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संस्थानात विलीन झाले.
पहाण्याची ठिकाणे :
दंडा राजापुरी गावापासून होडी जंजिरा किल्ल्याच्या पायर्‍यांपाशी थांबते प्रवेशद्वारावरील पांढर्‍या दगडातील फारशी लेख स्पष्ट दिसतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूच्या बुरुजांवर "शरभाचे" दगडात कोरलेले शिल्प आढळते. प्रवेशव्दाराच्या कमानीवर दोनही बाजूला "शरभाचे" दगडात कोरलेले शिल्प आढळते. प्रवेशव्दाराच्या आतल्या बाजूस पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. जंजिरा किल्ल्याच्या महाद्वारावर नगारखाना आहे. किल्ल्याच्या तटावर जाणार्‍या पायर्‍यांनी वर गेल्यावर समोरच तटावर तोफा ठेवल्या आहेत, त्यापैकी सर्वात मोठ्या तोफेचे नाव ‘कलाडबांगडी ’ असे आहे.

१ पीरपंचायतन
किल्ल्याच्या प्रवेशव्दारातून आत गेल्यावर डाव्या बाजूला आणखी एक दरवाजा आहे, उजवीकडे खोली सारखे एक बांधकाम आहे यालाच पीरपंचायतन असे म्हणतात. ह्या वास्तूत ५ पीर आहेत. या पंचायतनाच्या पटांगणातच काही वास्तू आहेत. याच ठिकाणी जहाजाचे तीन नांगर गंजलेल्या अवस्थेत पडलेले आहेत.

२ घोड्याच्या पागा
पीर पंचायतनाच्या समोरच्या दिशेने तटावरून पुढे गेल्यावर घोड्याच्या पागा लागतात.

३ सुरुलखानाचा वाडा
येथून बाहेर पडल्यावर समोरच ३ मजली पडकी परंतू भक्कम बांधणीची इमारत दिसते, यालाच "सुरुलखानाचा वाडा" असे म्हणतात अनेक वर्षात या वाड्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे.

४ तलाव
या वाड्याच्या उत्तरेस सुंदर बांधकाम केलेला शोडषट्‌कोनी गोड्या पाण्याचा तलाव आहे. हा तलाव सुमारे २० मीटर व्यासाचा आहे. तलावाच्या चार कोपयात चार हौद आहेत.

५ सदर
बालेकिल्ल्याच्या मागे चुनेगच्ची इमारत आहे, यालाच सदर असे म्हणतात.

६ बालेकिल्ला
तलावाच्या बाजूने बांधीव पायर्‍यांनी थोडे वर गेल्यावर बालेकिल्ला लागतो. आज तेथे एक झेंडा उभारलेला आहे.

७ पश्चिम दरवाजा
गडाच्या पश्चिमेला तटाखाली, तटातून बाहेर पडण्यासाठी छोटा दरवाजा आहे, यालाच दर्या दरवाजा असे म्हणतात. संकटकाळी बाहेर पडण्यास याचा उपयोग होत होता. दरवाजाच्या वरच्या भागातच तटबंदीच्या जवळ कैदखाना होता. किल्ल्याला स्वतंत्र असे २२ बुरुज आहेत. आजही ते सुस्थित आहेत. सर्व किल्ला पाहण्यास तीन तास लागतात.

पोहोचण्याच्या वाटा :
१ अलिबाग मार्गे :-
जंजिरा जलदुर्ग पाहायचा असेल तर, पुणे ,मुंबई मार्गे अलिबाग गाठावे. पुढे अलिबागवरुन रेवदंडामार्गे मुरुड गाठता येते. मुरुड गावातून ५ कि.मी. वरील दंडा राजापूरी गाव गाठावे .दंडा राजापूरी गावातून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बोटसेवा उपलब्ध आहे. किनार्‍या पासून शिडाच्या बोटीने किल्ला गाठण्यास अर्धा तास पुरतो.

२ दिघी मार्गे :-
कोकणातून यायचे झाल्यास महाड - गोरेगाव - म्हसळे - बोर्लिपचंतन - दिघी गाठावे दिघीहून किल्ला पाहण्यासाठी बोटसेवा उपलब्ध आहे.

३ पाली- रोहा - नागोठणे - साळाव - नांदगाव - मार्गे :-
अलिबाग मार्गे न जाता पाली - रोहा - नागोठणे - साळाव - नांदगाव मार्गे मुरुडला जाता येते.

राहाण्याची सोय :
मुरुड गावात राहाण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
मुरुड गावात जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
दंडा राजापूरी गावापासून बोटीने अर्धा तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
पावसाळा सोडून इतर सर्व ऋतुत गडावर जाता येते.
सूचना :
मुरुडला २ दिवस मुक्काम करून जंजिरा , सामराजगड आणि पद्मदुर्ग हे किल्ले पाहाता येतात. अधिक माहितीसाठी सामराजगड आणि पद्मदुर्ग यांची साईट वरील माहिती वाचावी.
प्रकार: Sea forts
 अर्नाळा (Arnala)  कुलाबा किल्ला (Colaba)  जंजिरा (Janjira)  केळवे पाणकोट (Kelve Pankot)
 खांदेरी (Khanderi)  पद्‌मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa))  पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan))  सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug))
 सिंधुदुर्ग (Sindhudurg)  सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)  उंदेरी (Underi)  विजयदुर्ग (Vijaydurg)