मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

कंधार (Kandhar) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : नांदेड श्रेणी : सोपी
नांदेड शहरापासून ५८ किलोमीटरवर असलेले कंधार हे गाव बालाघाट रांगेच्या उतारावर मन्याड नदीच्या खोर्‍यात वसलेल आहे. इसवीसनाचा चौथ्या शतकात काकतीय घराण्याने कंधार किल्ल्याची निर्मिती केली आणि त्याला आपली राजधानी बनवले. त्यानंतर आलेल्या राष्ट्रकुटांचीही ही राजधानी होती. त्यांनी कंधारपूर ही नगरी वसवली आणि जगत्तुंग समुद्र या विशाल तलावाची निर्मिती केली . राष्ट्रकुटांच्या काळात कंधार किल्ला कृष्णदुर्ग या नावाने ओळखला जात असे.

इसवीसनाच्या चौथ्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत विविध राजवटींच्या ताब्यात हा किल्ला होता. त्यांनी या किल्ल्यात अनेक बदल, बांधकाम केली. आजही हा बदल आपल्याला पाहाता येतो. पुरातत्त्व खात्याने किल्ला उत्तम रितीने ठेवलेला आहे. किल्ल्यात भरपूर वास्तूंचे अवशेष आहेत. त्यांच्या बांधकाम शैलीतही वैविध्य आहे. सकाळी ९ . ३० ते संध्याकाळी ५ .०० पर्यंत किल्ला पाहाता येतो. किल्ला आणि आजूबाजूचा परिसर पाहाण्यासाठी पूर्ण दिवस लागतो.

कंधार किल्ल्या सोबत आजूबाजूला असलेली ऐतिहासिक ठिकाणही किल्ल्या बरोबर पाहाता येतात.
१) कंधार गावात राष्ट्रकुटांनी बांधलेला जगत्तुंग सागर हा तलाव आहे.
२) कंधार किल्ल्यापासून १ किलोमीटरवर मानसपुरी हे गाव आहे. या गावात किल्ल्यात सापडलेल्या मुर्ती शांतीघाटावर ठेवलेल्या आहेत.
३) कंधार किल्ल्यापासून अर्धा किलोमीटरवर बहाद्दरपुरा हे गाव आहे. या गावात रस्त्यालगत आणि म्युझियम मध्ये काही मुर्ती ठेवलेल्या आहेत.
४) कंधार लोहा रस्त्यावर कंधार पासून ३ किमीवर एक फ़ाटा गोळेगावात जातो. या गोळेगावात बामणाची गढी आहे.
22 Photos available for this fort
Kandhar
Kandhar
Kandhar
इतिहास :
इसवीसनाच्या चौथ्या शतकात वरंगळचा काकतीय राजा नंदगिरीने कंधार किल्ला बांधला. त्याचा पुत्र सोमदेव याने कंधार ही राजधानी बनवली असा उल्लेख प्रतापरुद्र यशोभूषण या ग्रंथात आहे. इसवीसनाच्या सातव्या शतकात राष्ट्रकुट घराण्यातील राजा कृष्ण पहिला याने कंधार नगरास राजधानीचा दर्जा दिला . त्याच काळात कंधारला पाणी पुरवठा करण्यासाठी जगत्तुंग समुद्र या तलावाची निर्मिती करण्यात आली आणि कंधारचा किल्ला बांधण्यात आला. वेंगीचा चालुक्य राजा गुणग विजयादित्य तिसरा याने इसवीसनाच्या ९ व्या शतकात कंधार जाळून टाकले . राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याने कंधार नगराची उभारणी केली. त्याच बरोबर किल्ला भक्कम केला. पुढील काळात राष्ट्रकुटानी त्यांची राजधानी गुलबर्गा जवळील म्यानखेटला याठिकाणी हलवली आणि कंधारला उपराजधानीचा दर्जा दिला .

इसवीसनाच्या १२ व्या शतकात यादवांच्या ताब्यात हा किल्ला होता. १३ व्या शतकात मलिक काफूरने हा किल्ला जिंकून घेतला. महमद तुघलकाने १३४७ मध्ये हा किल्ला जिंकून घेतला. त्याने नसरत सुलतान याला कंधारचा किल्लेदार नेमले . १२ वर्ष किल्लेदार म्हणून राहील्यावर त्याने बंड केले ते तुघलकाने मोडून काढले.इसवीसन १३४७ मध्ये हसनगंगूने बहामनी सत्तेची स्थापना केली तेंव्हा कंधार किल्ला त्याच्या ताब्यात गेला. बहामनी साम्राज्याचा अस्त झाल्यावर इसवीसन १५६५ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात किल्ला गेला. इसवीसन १५९६ मध्ये चांदबिबीने कंधार मोगलांच्या ताब्यात दिला. पुढे मलिक अंबरने हा किल्ला इसवीसन १६२० मध्ये मोगलांकडून जिंकून घेतला. त्याने किल्ला मजबूत केला . किल्ल्यात अंबरी बुरूज, दर्गा , मशीद बांधली आणि किल्ल्यात पाणीपुरवठा योजना राबवली . मोगल बादशाह शहाजहानने इसवीसन १६३१ मध्ये नसिरखान यास कंधार घेण्यास पाठवले. मोगलानी किल्ल्याला वेढा घातला. कंधारच्या किल्लेदाराने १९ दिवस किल्ला लढवला पण किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. इसवीसनाच्या १८ व्या शतकात हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात कंधार किल्ला गेला . त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत तो निजामाच्या ताब्यात होता.
पहाण्याची ठिकाणे :
कंधार किल्ला भूईकोट असल्यामुळे संरक्षणासाठी त्याच्या चारी बाजूला खंदक खोदलेला आहे . हा खंदक घडीव दगडानी बांधून काढलेला आहे. कंदकाच्या भिंतीची जाडी साधारणपणे १२ फ़ूट आहे. खंदकातील पाण्याचा बाहेर निचरा होऊ नये यासाठी भिंत एवढी जाड ठेवलेली आहे. खंदकाची रुंदी १०० फ़ूट आणि खोली ५० फ़ूट आहे. अनेक वर्ष खंदकात गाळ साठल्यामुळे त्याची खोली कमी झालेली आहे. खंदकात पावसाचे पाणी साठवले जात असे तसेच कंधार गावात राष्ट्रकुटांनी बांधलेल्या जगत्तुंग तलावातून खंदकात पाणी सोडले जात असे. त्यासाठी बनवलेल्या मोर्या आणि सांडवे खंदकाच्या तलावाकडील भागात पाहाता येतात. खंदक साफ करण्यासाठी तसेच दुरुस्त करण्यासाठी त्यात उतरावे लागते. त्यासाठी ठराविक अंतरावर जीने बांधलेले आहेत. सध्याच्या मार्गाने खंदकात उतरल्यावर डाव्या बाजूला एक विहिर आहे. तसेच किल्ल्याच्या दक्षिण दिशेला खंदकात एक दर्गा आहे.

आज आपल्याला किल्ल्यात जाण्यासाठी खंदकात उतरुन जावे लागते. पुरातत्व विभागाने त्यासाठी व्यवस्थित मार्ग बांधलेला आहे. खंदकाच्या भिंतीत कंधार गावाच्या बाजूला एक उत्तराभिमुख उध्वस्त प्रवेशव्दार आहे. पूर्वीच्या काळी या खंदकावर काढता घालता येणारा पूल होता. या प्रवेशव्दारातून खंदकात उतरल्यावर पूरातत्व विभागाने केलेल्या बांधकामात एक कमान बांधलेली आहे. खंदक पार करुन किल्ल्यासमोर पोहोचल्यावर भक्कम उत्तराभिमुख लोहबंदी दरवाजा आपल्याला दिसतो. या दरवाजावर लोखंडी खिळे मारलेले असल्यामुळे त्याला लोहबंदी दरवाजा हे नाव पडले आहे. या दरवाजावर थेट मारा करता येउ नये यासाठी त्यासमोर जीभीची भिंत बांधलेली आहे. लोहबंदी दरवाजाची उंची १२ फ़ूट आणि रुंदी १० फ़ूट आहे. पूरातत्व खात्याने याठिकाणी नविन लोखंडी दरवाजा बनवलेला असून त्याला कुलूप लावलेले असते. त्यामुळे सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.०० इतकाच वेळ किल्ल्यात जाता येते.

किल्ल्याला दोन तटबंद्या आहेत. लोहबंदी दरवाजा बाहेरच्या तटबंदीत आहे. बाहेरील तटबंदीची उंची १२० फ़ूट असून रूंदी १२ फ़ूट आहे. आतील तटबंदीची उंची १५० फ़ूट असून रूंदी १२ फ़ूट आहे. आतील व बाहेरील तटबंदीमध्ये १५ फ़ूटांचे अंतर आहे. दोन्ही तटबंदींना लागून फ़ांज्या आहेत . तसेच तटबंद्यांवर चर्या आहेत.

लोहबंदी दरवाजातून आत शिरल्यावर वाट काटकोनात वळते. समोरच एक पूर्वाभिमुख प्रवेशद्वार आहे. त्याला मछली दरवाजा/मत्स्य दरवाजा या नावाने ओळखले जाते . दरवाजाची उंची १५ फ़ूट आणि रुंदी ८ फ़ूट आहे. मछली दरवाजावर दोन शिलालेख आहेत. दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला एक फ़ारसी लिपीतील शिलालेख आहे. त्यात" हा लेख मुहम्मद तुघलक या़चा आहे हिजरी ७४४/इ.स.१३४४ चा असून त्यात सरदार सैफ़ुद्दीन या किल्लेदाराचे नाव लिहिलेले आहे". मछली दरवाजातून आत शिरल्यावर त्याच्या घुमटाकार छतावर नक्षीकाम केलेले आहे . या छतावर दोन मासे कोरलेले दिसतात. त्यावरुन या दरवाजाचे नाव मत्स्य दरवाजा उर्फ़ मछली दरवाजा असे पडले. मछ्ली दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजूला भिंतीवर एक फ़ारसी लिपीतील शिलालेख आहे. " हा लेख बुर्हाण निजाम शाह याच्या काळातील हिजरी ९४७/ इ.स. १५२७ चा आहे. "ईश्वर सर्वांचा मित्र आहे. निजामशाह याने बाराव्या इमामसाठी सगळे नवस फ़ेडले" असे त्यात लिहिले आहे. मछली दरवाजातून आत आल्यावर प्रशस्त प्रांगण आहे. प्रांगणात दरवाजाच्या डाव्या बाजूला ६ देवड्या आहेत. या देवड्यांच्या शेवटी एक जीना आहे. त्याठिकाणी एक फारसी लिपीतील शिलालेख आहे. दरवाजाच्या समोरच्या बाजूला म्हणजेच प्रांगणात शिरल्यावर उजव्या बाजूला एक मजली इमारत आहे. त्या इमारतीला अंबरखाना म्हणतात. या इमारतीच्या भिंतीत एक व्यालाचे शिल्प पाहायला मिळते. राष्ट्रकुट काळातील किल्ल्यातील मंदिर आणि इतर वास्तू पाडून त्याचेच दगड किल्ल्याच्या पूर्नबांधणीसाठी त्यानंतरच्या इस्लामी शासकांनी वापरल्यामुळे असे अवशेष जागोजागी पाहायला मिळतात. किल्ल्याच्या बाहेरच्या भागात दरवाजा जवळ अंबरखाना (धान्यकोठार) असण्याची शक्यता कमी आहे. कारण किल्ल्याच्या आतही एक अंबरखाना आहे. या इमारतीचा उपयोग कचेरी सारखा होत असावा. कंधार प्रशासकीय किल्ला असल्याने, प्रशासकीय कामासाठी आलेल्या लोकांना किल्ल्यात प्रवेश करण्याची आवश्यकता पडू नये त्यांची काम बाहेरच्या बाहेर व्हावीत याकरीता याठिकाणी कचेरी असण्याची शक्यता जास्त आहे. आता या इमारतीत पुरातत्त्व खात्याच कार्यालय आहे. या अंबरखान्याच्या मागच्या बाजूस जो भव्य बुरुज आहे त्याला टेहळणी बुरुज म्हणतात. या बुरुजावर एक कमानदार छत असलेली एक खोली आहे. या खोलीत बसून किल्ल्याच्या दरवाजावर तसेच बाहेर नजर ठेवता येते.

लोहबंदी दरवाजा, मछली दरवाजा आणि प्रांगणातल्या इमारती हा भाग बाह्य आणि आतल्या तटबंदीच्या मध्ये आहे. देवड्या संपल्यावर उजव्या बाजूला एक मार्ग जातो या मार्गाने गेल्यास आपल्याला बाह्य तटबंदीवरुन फिरता येते. प्रांगणाच्या टोकाला आतील तटबंदीत एक भव्य दरवाजा आहे. या दरवाजाला रंगीन दरवाजा किंवा महाकाली दरवाजा म्हणतात. दरवाजाची उंची २० फ़ूट आणि रुंदी ८ फ़ूट आहे. प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन भव्य बुरुज आहेत. उजव्या बाजूला महाकाली बुरुज उर्फ़ धन बुरुज आहे. या बुरुजावर फ़ारसी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. रंगीन दरवाजाच्या डाव्या बाजूला भव्य बुरुज आहे. तो बुरुज शहा बुरुज किंवा इब्राहिमी बुरुज या नावाने ओळखला जातो. औरंगजेबाच्या काळात बहादूरशहा या किल्ल्याचा किल्लेदार होता. त्याने किल्ल्याच मजबूतीकरण केले. त्यावेळी हा भक्कम बुरुज बांधला. या बुरुजावर बाहेरच्या बाजूला एक आणि आतील बाजूला २ फ़ारसी लिपीतील शिलालेख आहेत. रंगीन दरवाजातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला भक्कम खांबांवर तोललेल्या कमानदार ओवर्‍या आहेत. या कमानदार छ्तावर पूर्वी चुन्यात कोरीवकाम केलेले होते व त्यात रंग भरलेले होते म्हणून या दरवाजाला रंगीन दरवाजा असे नाव पडले होते. पण पूरातत्व खात्याने दुरुस्ती करतांना येथे सिमेंटचा गिलावा केल्यामुळे केवळ उजव्या बाजूच्या कोपर्‍यात आपल्याला नक्षीचा एक रंगीत तुकडा पाहायला मिळतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला आपल्याला भव्य दगडी शिल्पाचे अवशेष दिसतात. यात नाकापासून डोक्या पर्यंतचा भाग, पावल, बीजपूरक फ़ळ धरलेले हात दिसतात. इ.स. १९६० मध्ये कंधार जवळ असलेल्या मानसपुरी गावातील श्री मानसपुरे यांच्या शेतात हे अवशेष मिळाले होते. राष्ट्रकुट नृपती कृष्ण तिसरा याने कंधार लेखात उल्लेख केलेल्या क्षेत्रपालीची ही मुर्ती असावी असा अंदाज आहे. कंधार गावात केलेल्या उत्खननात गणेशाच्या मुर्ती, पार्श्वनाथाचे मुर्ती व इतर अनेक मुर्ती मिळालेल्या त्याही या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. हे अवशेष पाहिल्यावर दरवाजाच्या उजव्या बाजूला महावीर जैनांची बसलेली मुर्ती आहे. ती मुर्ती पाहून त्याच्या बाजूला असलेल्या प्रवेशव्दारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला महाकाली / धन बुरुजात एक वास्तू दिसते त्याचा दरवाजा ३ फ़ूट उंच व २ फ़ूट रुंद आहे. या वास्तूत एक भूयार आहे. ही वास्तू तिजोरी किंवा जवाहिरखाना म्हणून वापरण्यात येत होती. त्यावरूनच महालकाली बुरुजाला धन बुरुज असे नाव नंतरच्या काळात पडले असावे. या वास्तूच्या समोरच्या बाजूस मशिदेचे उत्तराभिमुख प्रवेशव्दार आहे ते ओलांडून आपण मशिदीपाशी पोहोचतो. काकतीय राजा सोमदेव व महादेव यांनी याठिकाणी शिवमंदिर बांधले होते. ते पाडून निजामाच्या काळात मशिद बांधण्यात आली. शिवमंदिराचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार बुजवून त्याठिकाणी उत्तराभिमुख प्रवेशव्दार बांधण्यात आले. पूर्वाभिमुख प्रवेशव्दार बुजवले असले तरी त्याच्या दोन्ही बाजूना असलेली नागशिल्प आणि आजही पाहायला मिळतात. मशिदीच्या इमारतीची लांबी ५० फ़ूट व रूंदी २५ फ़ूट आहे. मशिदीवर तीन घुमट आहेत. मशिदीवर चार फ़ारसी लिपीतील शिलालेख आहेत.मशिदी समोर १५ फ़ूट लांब आणि १५ फ़ूट रूंद आणि ४ फ़ूट खोल तलाव आहे. या तलावाच्या मागच्या बाजूला शिवमंदिराचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार होते ते बंद करून त्याठिकाणी दोन मजली महाल बांधलेला आहे. मशिदीच्या बाजूला चुन्याचा घाणा, जात आणि शिवलिंग ठेवलेल आहे.

मशिदीच्या बाजूने जाणार्‍या जीन्याने अंबरी बुरुजावर जाता येते. निजामाचा सेनापती मलिक अंबरने या बुरुजाची फ़ेरबांधणी केली. त्यामुळे हा किल्ल्यावरील सर्वात भव्य आणि मोठा बुरुज मलिक अंबरच्या नावाने ओळखला जातो. या बुरुजावर मकरमुख असलेली मोठी १५ फ़ूट लांब बांगडी तोफ़ आहे. तोफ़ेला दोन्ही बाजूला गोलाकार कडी आहेत. अंबरी बुरुजावरून फ़ांजीवर उतरून दक्षिण दिशेकडे चालत जाताना आपल्याला उजव्या बाजूला बुरुज तर डाव्या बाजूला किल्ल्याच्या आतल्या वास्तू दिसतात. अंबरी बुरुजा पासून दुसर्‍या बुरुजावर एक खोली आहे. पुढे गेल्यावर फ़ांजीला लागून डाव्या बाजूला एक उध्वस्त वास्तू आहे. तो शाही हमामखाना म्हणजेच शाही स्नानगृह आहे. किल्ल्यातील राणी महालात आनि राजवाड्यातही स्नानगृह आहेत त्या व्यतिरीक्त हे स्नानगृह बांधलेल आहे. यात पाणी आणण्यासाठी तांब्याचे नळ वापरलेले आहेत ते आजही पाहायला मिळतात. स्नानगृह पाहून परत फ़ांजीवर येऊन पुढे चालायला सुरुवात केल्यावर पुढच्या बुरुजावर खोली आहे. त्याच्या पुढील बुरुज (अंबरी बुरुजा पासून चौथा बुरुज ) दर्गा बुरुज या नावाने ओळखला जातो. कारण या बुरुजाच्या खाली खंदकात एका उंचवट्यावर दर्गा बांधलेला आहे. बुरुजावर चढल्यावर आपल्याला खंदकातील दर्गा आणि खंदकाच्या भिंतीत बाहेरुन पाणी आणण्यासाठी केलेला कमानदार बोगदा पाहायला मिळतो. दर्गा बुरुजावरुन फांजीवर उतरल्यावर डाव्या बाजूला फांजीला लागून एका वास्तूचे छत दिसते . या छताला ९ गोल आकाराची, ३ फुट व्यासाची तोंड दिसतात . हे किल्ल्यावरचे कैदखाने (तुरुंग) आहेत . त्याची उंची २० फूट आहे. यात कैद्यांना वरुनच सोडले जात असे तसेच कैद्यांना अन्न पाणी याच ठिकाणीहून सोडण्यात येत असे.

कैदखाने पाहून परत फांजीवर येउन दक्षिण तटबंदीतील शेवटच्या बुरुजापाशी पोहोचतो. हा बुरुज बहाद्दरपूर गावाच्या दिशेला असल्यामुळे त्याच नाव बहाद्दरपूर बुरुज आहे. बुरुजावर एक खोली व तोफ आहे. बुरुजावरुन खाली उतरुन आता फांजीवरुन पूर्वेला चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला फांजीला लागून (किल्ल्याचा आतल्या बाजूला) कैदखाना आणि त्याला लागूनच एक इमारत आहे. या इमारतीला लागून खाली उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. पायर्‍यांनी खाली उतरल्यावर एक ५ फूट उंच आणि ३ फूट रुंद प्रवेशद्वार दिसते. या ठिकाणी किल्ल्यावरील धान्यकोठार आहे. प्रवेशव्दाराच्या आतमध्ये कमानी असलेली ८ दालने आहे. अंबरखान्यात हवा खेळती राहावी यासाठी ३ फ़ूट उंचीचे व २ फ़ुट रुंदीचे झरोके ठेवलेले आहेत. वास्तूच्या बाहेर पाहारेकर्‍यांसाठी ३ खोल्या आहेत. अंबरखान्याची वास्तू इंग्रजी "L" आकाराचे असून पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण तटबंदीला समांतर बांधलेली आहे. अंबरखाना पाहून परत फांजीवर येउन पुढे चालायला सुरुवात केल्यावर पूर्व तटबंदीतल्या शेवटच्या बुरुजापाषी पोहोचतो या बुरुजाचे नाव मानसपूरी बुरुज आहे. मानसपूर गावाच्या दिशेने असल्यामुळे त्याला हे नाव पडलेले आहे. मानसपूर बुरुजावर एक तोफ आणि एक खोली आहे.

मानसपूर बुरुजावरुन उतरून उत्तरेकडे चालत गेल्यावर दुसर्‍या बुरुजाखाली एक खोली आहे. त्यावर एक फ़ारसी लिपीतील शिलालेख कोरलेला आहे. बुरुजावर एक बांगडी तोफ आहे. बुरुजावरुन फांजीवर उतरुन चालत गेल्यावर उत्तर टोकावरचा शेवटचा बुरुज आहे. या बुरुजावर एक तोफ आहे. बुरुजा समोर तटबंदीला लागून तीन मजली राणी महालाचे अवशेष आहेत . राणी महालात जाण्यासाठी फांजीवरुन जीना आहे . पुढे एक प्रवेशव्दार आहे. त्यातून आत गेल्यावर एक कमानदार बोळ आहे त्याच्या शेवटी पायर्‍या आहेत त्या चढून गेल्यावर आपला राणी महालाच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश होतो. या ठिकाणी अनेक दालन, त्यातील कोनाडे, हौद, स्नानगृह, शौचालय आणि त्यात तांब्याच्या नळांद्वारे खेळवलेले पाणी पाहायला मिळते. राणी महालाच्या पुढे राजमहाल शहा बुरुजा पर्यंत पसरलेला आहे. राज महालातून शहा बुरुजावर चढून जाताना दोन कमानी असलेली छोटी प्रवेशद्वार आहेत. एक फारसी लिपीतील शिलालेख आहे. बुरुजावर चढून गेल्यावर दुसरा शिलालेख आहे. बुरुजावर एक बांगडी तोफ तोंड खाली करुन उभी करुन ठेवलेली आहे. शहा बुरुज पाहून परत राणी महालात येउन खाली उतरणार्‍या पायर्‍याच्या वाटेवर पुन्हा दोन प्रवेशद्वार आहेत. राजमहाल, राणी महाल ही महत्वाची ठिकाणे दोन्ही बुरुज आणि इतर किल्ल्यापासून वेगळी करण्यासाठी सर्व दिशांना प्रवेशद्वार ठेवलेली आहेत. खाली उतरल्यावर आपण मानसपुरीहून मिळालेल्या मुर्ती ठेवल्या आहेत तेथे पोहोचतो. याठिकाणी आपली किल्ल्याची तटबंदीवरुन संपूर्ण प्रदक्षिणा होते. शहा बुरुजाच्या पायथ्याशी आणि जीन्याजवळ काही वास्तूंचे अवशेष आहेत. राजमहालात आणि राणी महालात काम करणार्या अधिकारी आणि नोकर वर्गासाठी या वास्तू बाधलेल्या असाव्यात.

तटबंदी वरून किल्ला पाहिल्यावर किल्ल्याच्या आतील वास्तू पाहाण्यासाठी रंगिन दरवाजाच्या समोरच्या भागात जावे. या ठिकाणी एक चौकोनी विहिर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. या परिसरात झालेल्या उत्खननात येथे सार्वजनिक हमामखाना (स्नानगृह ) असल्याचे आढळून आले आहे. त्याच्या बाजूला जी दोन मजली उध्वस्त वास्तू दिसते ती नक्षी महाल या नावाने ओळखली जाते. या महालात ५ हौद व स्नानगृह व शौचालय यांच्या वेगळ्या वास्तू आहेत. हा महाल मुघल सरदार बहादूरखानने बांधला होता.
नक्षी महालाच्या बाजूला एक प्रवेशव्दार आहे त्यातून आत गेल्यावर आपण एका उद्यानात पोहोचतो. या जागी शाही उद्यान होते. येथे असलेल्या हौदांमध्ये तांब्याच्या नळांव्दारे पाणी खेळवून कारंजी उडवली जात. हौदातील तांब्याचे नळ आजही पाहायला मिळतात. या उद्यानाच्या दुसर्‍या बाजूला एक प्रवेशव्दार आहे ते राजाबाघ प्रवेशव्दार या नावाने ओळखले जाते. हे सुंदर बांधणीचे प्रवेशव्दार राष्ट्रकुट काळातले असून त्याकाळी त्यावर दोन्ही बाजूला शरभाचे शिल्प होते. दरवाजा दुरुस्त करतांना पुरातत्व खात्याने ती शिल्प काढून टाकाली. त्यावरून याला पूढच्या काळात व्याघ्र दरवाजा आणि नंतर मुस्लिम शासकांच्या काळात बाघ दरवाजा असे नाव प्रचलित झाले. या व्याघ्र दरवाजाच्या बाजूला शीश महाल (काच महाल) आहे. हा महाल उत्तराभिमुख असून दोन मजली आहे.हा महाल १५ फ़ूट लांब व १० फ़ूट रुंद आहे. या महालात अनेक कोनाडे, देवळ्या चुन्यात कोरलेल्या आहेत. यात विविध रंगाच्या काचा आरसे बसवून हा महाल सजवण्यात आला होता. या महालाच्या पूर्व भिंतीवर एक पाण्याचा छोटा कृत्रिम धबधबा ही तयार केला होता. त्यासाठी लागणारे पाणी आणण्यासाठी येथे तांब्याचा नळही दिसणार नाही अशाप्रकारे आतल्या बाजूला बसवलेला आहे. या ठिकाणी लावलेल्या काचा आणि आरश्यांमुळे या महालाला शीशमहाल हे नाव पडल आहे. शीश महाल पाहून वाघ दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या कमानीतून बाहेर पडल्यावर समोर एक पाण्याचा हौद दिसतो, तर डाव्या बाजूला अनेक कमानी असलेले इंग्रजी "L" आकाराचे दारु कोठार आहे. त्यात अनेक आकारचे तोफ़गोळे पडलेले पाहायला मिळतात. दारू कोठार पाहून आल्या मार्गाने वाघ दरवाजा पाशी यावे. वाघ दरवाजातून बाहेर गेल्यावर उजव्या बाजूला दर्गा आहे. ही वास्तू १० फ़ुट लांब, १० फ़ूट रुंद आणि १० फ़ूट उंच आहे. त्यावर घुमटाकार छत आहे. ही एका सुफ़ी संताची कबर आहे पण ती कोणाची आहे हे सांगता येत नाही.. दर्ग्याच्या बाजूला कमानी असलेल्या वास्तू आहेत. त्याच्या बाजूला अनेक कोनाडे असलेला दोन मजली महाल आहे. महालाच्या समोर एक छत्री आहे.ती मुघल काळात राजपूत सरदाने बांधली असावी. या संकुलातून बाहेर पडतांना दोन कमानी आहेत. त्याच्या डाव्या बाजूला ज्या वास्तू आहेत त्यांना घोड्याच्या पागा म्हणतात. शाही घोडे येथे बांधले जात. कमानीतून बाहेर पडून उजव्या बाजूला वळल्यावर आपण लालमहालाच्या परिसरात जातो. निजामाच्या काळात हा महाल आणि त्यासमोरचा सुंदर तलाव बांधण्यात आला. तलावातील पाणी बाहेर जाण्यासाठी बांधलेली नक्षीदार नाली पाहाण्यासारखी आहे. या महालाच्या दक्षिण बाजूच्या कुंपणाच्या भिंतीत अनेक कोनाडे आहेत. याठिकाणी कबूतर खाना होता. लाल महाल पाहून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला वळल्यावर समोर एक प्रवेशव्दार दिसते त्यातून पुढे गेल्यावर परिस विहिर आहे. त्यात उतरण्यासाठी पायर्या आहेत. बाजूला हत्तीची शिल्प कोरलेली आहेत. पायर्यांनी खाली न उतरता डाव्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर आपण एका प्रांगणात येतो. याठिकाणी विहीरीच्या भिंतीला लागून जलमहाल बांधलेला आहे.उन्हाळ्याच्या दिवसात थंदावा मिळावा याकरिता या जलमहालाची निर्मिती राष्ट्रकुटांच्या काळात करण्यात आली होती. या महालाचे प्रवेशव्दार पूर्वाभिमुख आहे. जलमहाल १८ फ़ूट लांब आणि ११ फ़ूट रुंद आहे. त्याच्या छताची उंची १२ फ़ूट आहे. जलमहालाला विहिरीच्या बाजूला ३ खिडक्या आहेत. त्यातून विहिरीच्या पाण्यावरुन येणारी गार हवा महालात येते. महाल दोन मजली होता. पूर्णपणे दगडाने बांधलेला असल्याने बाहेरच्या उष्णतेने तो तापत नाही. आज महालाचा वरचा मजला नष्ट झालेला आहे. महालाच्या आतल्या बाजूस एका दगडी व्दार पट्टीवर गणपती आणि फ़ुल कोरलेली आहेत. या जलमहालात प्रवेश केल्यावर डाव्या १० फ़ूट लांब २ फ़ूट रुंद आणि ८ फ़ूट उंच खोली आहे. मुख्य जलमहालाला लागून एक वास्तू आहे . हा सुध्दा एक छोटा जलमहालच आहे. याचे प्रवेशव्दार उत्तराभिमुख असून ४ फ़ूट उंच आणि२ फ़ूट रुंद आहे. या जलमहालाला एकच झरोका आहे.

पारस विहिर आणि जलमहाल पाहून बाहेर आल्यावर तटबंदीच्या दिशेने गेल्यावर एक मशीदची इमारत दिसते, तीला एक खांबी मशिद म्हणतात. मशिदीच्या मागच्या बाजूला तटबंदी लगत घोड्याच्या पागा आहेत. मशिद पाहून परत विहिरीच्या प्रवेशद्वारापाशी येउन बाहेर पडल्यावर एक स्टेज आणि त्याच्या दोन्ही बाजूला इमारत दिसते . हा रंगमहाल आहे. या ठिकाणी नाचगाण्याचे कार्यक्रम होत असत. समोर बसण्यासाठी पटांगण आहे. मागच्या भिंतीत दिवे लावण्यासाठी कोनाडे केलेले आहेत. रंगमहाल पाहून समोर असलेल्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर आपण राणी महाला समोरील बारादरी या इमारतीपाशी पोहोचतो. या इमारतीला चारही बाजूला मिळून कमानदार १२ खिडक्या आहेत. बारादरी महालाच्या दक्षिणेस १० वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. ही किल्ल्यावरील अधिकार्‍यांची निवासस्थाने असावीत.

बारदरी पाहून रंगीन दरवाजापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. किल्ल्यावर या व्यतिरिक्त अनेक वास्तूंचे अवशेष विखुरलेले आहेत. किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला तटा बुरुजांवर काही शिल्प आहेत. मानसपूरी बुरुजावर शरभ आणि हत्तीचे शिल्प आहेत. बहाद्दुरपुरा बुरुजावर दोन शरभ शिल्प आहेत. दर्ग्या जवळील बुरुजावत माकडाची शिल्प आहेत. किल्ल्याच्या बाहेरुन खंदका पलिकडून फ़ेरी मारतांना ही शिल्प पहाता येतात.
पोहोचण्याच्या वाटा :
कंधारला जाण्यासाठी नांदेड हे जवळचे शहर आहे. नांदेड शहर रस्ते आणि रेल्वे मार्गाने देशाशी जोडलेले आहे. महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या शहरातून येथे एसटी तसेच खाजगी बसेस येतात. मुंबईहून नांदेडला जाण्यासाठी नंदिग्राम, देवगिरी एक्सप्रेसने नांदेड गाठावे. नांदेडहून कंधारला लोहा मार्गे जाता येते. हे अंतर ५७ किमी आहे. नांदेडहून कंधारला थेट बस सेवा आहे. पण तशी बस न मिळाल्यास मिळेल ती बस पकडून लोहा गाठावे. लोहा ते कंधार १२ किमी अंतर जाण्यासाठी अनेक एसटी आणि खाजगी गाड्या आहेत.

पुण्याहून नांदेडला जाणार्‍या बसेस लोहा मार्गे जातात. त्यामुळे पुण्याहून येत असल्यास लोहाला उतरून कंधारला जावे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही. नांदेड गावात अनेक हॉटेल्स आहेत.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. कंधार गावात हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी नाही.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: K
 कैलासगड (Kailasgad)  काकती किल्ला (Kakati Fort)  काळाकिल्ला (Kala Killa)  कलाडगड (Kaladgad)
 कलानिधीगड (कलानंदीगड) (kalanidhigad (kalanandigad))  काळदुर्ग (Kaldurg)  कळसूबाई (Kalsubai)  कल्याणगड (नांदगिरी) (Kalyangad(Nandgiri))
 कमळगड (Kamalgad)  कामणदुर्ग (Kamandurg)  कनकदुर्ग (Kanakdurg)  कांचन (Kanchan)
 कंधार (Kandhar)  कन्हेरगड(चाळीसगाव) (Kanhergad(Chalisgaon))  कण्हेरगड (Kanhergad(Nashik))  कंक्राळा (Kankrala)
 कर्‍हा (Karha)  करमाळा (Karmala Fort)  कर्नाळा (Karnala)  कात्रा (Katra)
 कावनई (Kavnai)  केळवे किल्ला (Kelve Fort)  केळवे पाणकोट (Kelve Pankot)  केंजळगड (Kenjalgad)
 खैराई किल्ला (Khairai)  खांदेरी (Khanderi)  खारेपाटण (Kharepatan fort)  खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))
 कोहोजगड (Kohoj)  कोकणदिवा (Kokandiva)  कोळदुर्ग (Koldurg)  कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi)
 कोंढवी (Kondhavi)  कोरीगड (कोराईगड) (Korigad)  कोर्लई (Korlai)  कोटकामते (Kotkamate)
 कुलंग (Kulang)  कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad))  कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)