मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad) किल्ल्याची ऊंची :  3880
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: आंबोली (सिंधुदुर्ग)
जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : मध्यम
कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. यापैकी आंबोली घाटवर व कुडाळ वरून घाटावर जाणार्‍या हणमंत घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मनोहर- मनसंतोषगड हे किल्ले बांधण्यात आले. मनोहर- मनसंतोषगड हे जोड किल्ले त्यावरील अवषेशांसह आजही दिमाखाने उभे आहेत. या किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे छ. शिवाजी महाराजांचे या गडावर १ महिना वास्तव्य होते. तारकर्ली- देवबाग (मालवण) येथे समुद्राला मिळणार्‍या कर्ली नदीचा उगम याच किल्ल्यांच्या परीसरात होतो. ४८ किमी अंतर कापून ही नदी समुद्राला मिळते.

मनोहर- मनसंतोष हे गड एका खिंडीमुळे एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. यापैकी मनोहर गडावर पूरातन अवशेष आहेत व तो चढण्यासही सोपा आहे. तर मनसंतोष गड हा एक सुळका असून त्यावर चढण्यासाठी प्रस्तरारोहण करावे लागते. ही किल्ल्यांची जोडगोळी आंबोली घाटाच्या परीसरात असल्यामुळे पावसाळ्याचे ४ महीने सोडून वर्षभर गडावर जाता येते.


Manohar- Mansantoshgad
17 Photos available for this fort
Manohar-Mansantoshgad
Manohar-Mansantoshgad
Manohar-Mansantoshgad
इतिहास :
हा किल्ला कोणी व केंव्हा बांधला हे ज्ञात नाही, पण गडाच्या बांधणी वरून या गडाची डागडूजी / फेररचना शिवाजी महाराजांनी केली असावी. आग्र्याहून सुटका झाल्यावर शिवाजी महाराज राजगडावर पोहोचले. तेथून रांगणा गडाला घातलेला वेढा उठवण्यासाठी महाराज ११ एप्रिल १६६७ ला या भागात दाखल झाले. रांगण्याचा वेढा उठवून १३ मे १६६७ रोजी महाराज मनोहर गडावर गेले. तेथे त्यांनी १५ जून १६६७ पर्यंत म्हणजे तब्बल ३४ दिवस मुक्काम केला.

पुढील काळात मनोहर- मनसंतोष गडाचा ताबा कोल्हापूरच्या छत्रपतींकडे गेला.१८३४ मध्ये गडावर गडकर्‍यांनी बंड केले, ते मोडण्यासाठी छत्रपतींनी आपल्या सरदारांना पाठविले , त्यांनी बंडाचा बिमोड केला, पण पुढील काळात बंड वारंवार होऊ लागल्यामुळे, बंड मोडून काढण्यासाठी छ.शहाजी महाराज (बुवा महाराज) स्वत: १९३६ साली गडावर चालून आले, त्यांनी गडकर्‍याला अटक करून गडावरील २ तोफा नेल्याची नोंद आहे. १८३८ मध्ये छ.शहाजी महाराज (बुवा महाराज) यांच्या निधना नंतर गडावर गडकर्‍यांनी पुन्हा बंड केले, ते मोडण्यासाठी छत्रपतींनी आपल्या सरदारांना पाठविले , त्यांनी बंडाचा बिमोड केला व बंडकर्‍यांना अभय दिले.

इ.स. १८४४ मध्ये इंग्रजां विरुध्द झालेल्या बंडात मनोहर- मनसंतोष गडाने इंग्रजांना जेरीस आणले. या बंडाचा सुत्रधार फोंड सावंत तांबूळकर याने सावंतवाडी संस्थानाचे युवराज अनासाहेब यांना सावंतवाडीच्या राजवाड्यातून पळवून मनोहर गडावर आणून ठेवले व त्यांच्या नावाने आजूबाजूच्या परीसरात वसूली केली. त्याचप्रमाणे बंडवाल्यांनी मनोहर गडाच्या परीसरात स्वत:चा दारूगोळा बनविण्याचा कारखाना सूरु केला. त्यात तयार होणारा माल सामानगड, रांगणा इत्यादी किल्ल्यांवर इंग्रजां विरुध्द लढण्यासाठी पाठविण्यात आला. या सर्व घटनांमुळे इंग्रजांनी जनरल डेला मोंटी व कर्नल औट्राम यांना मनोहर गडावरील बंडाचा बिमोड करण्यासाठी पाठविले. त्यांनी केलेल्या कुलपी गोळ्यांच्या मार्‍यात गडाच्या तटबंदीला भगदाड पडले. २६ जानेवारी १८४५ रोजी बंडकरी गड सोडून पळून गेले. इंग्रजांनी मनोहर- मनसंतोष गडाच्या पायर्‍या उध्वस्त केल्या.
पहाण्याची ठिकाणे :
शिवापूर व गोठणेवाडीतून येणार्‍या वाटा जेथे मिळतात तिथून थोड्या अंतरावर पहिले प्रवेशव्दार होते. या प्रवेशव्दाराचा एकच बुरूज आज शाबूत आहे. या बुरूजाच्या पुढे बांधीव पायर्‍यांची वाट आहे. तटबंदी खालून जाणार्‍या या वाटेच्या उजव्या बाजूला कातळकडा आहे, तर डाव्या बाजूस खोल दरी. या रचनेमुळे पहीला दरवाजा पार करून आलेला शत्रू तटावरील सैनिकांच्या मार्‍याच्या टप्प्यात येतो आणि शत्रूच्या सैनिकांना तटावरून होणारा मारा व बाजूची खोल दरी चुकवत गडावर जाणे जवळजवळ अशक्य होते.

थोडा चढ चढून गेल्यावर आपण उध्वस्त प्रवेव्दारातून गडावर प्रवेश करतो. गड माथ्यावरून लांबवर पसरलेली तटबंदी. पडक्या वाड्याचे अवशेष, व विहिर दिसते. प्रथम पडक्या वाड्याकडे जावे. एका उंच जोत्यावर हा वाडा बांधलेला आहे. वाड्याला दोन दालने आहेत. त्यातील मोठ्या दालनाला मुख्य़ दरवाजा व दिंडी/ चोर दरवाजा असे दोन दरवाजे आहेत.वाड्यातील लाकडी खांब, दरवाजांच्या चौकटी, तुळ्या, छप्पर आज अस्तित्वात नाहीत, पण त्यांच्यासाठी दगडी भिंतीत केलेल्या खाचा पहायला मिळतात.

वाड्याच्या पुढे एका औदुंबराच्या झाडाखाली काही देवतांच्या मुर्त्या ठेवलेल्या आहेत. पुढे मनसंतोष गडाच्या दिशेने चालत जातांना अनेक वास्तूंचे अवशेष पाहिला मिळतात. यावरून गडावर बर्‍यापैकी वस्ती असावी. वाटेत लागणार्‍या झेंड्याच्या उंचवट्याला वळसा घालून गेल्यावर आपण मनोहर गडाच्या टोकाला येतो. समोर दोन गडांमधील दरी व मनसंतोष गड दिसतो. मनसंतोष गडाची उंची मनोहरगडा पेक्षा कमी असल्यामुळे त्यावरील वास्तूंचे अवशेष इथून पहाता येतात.

येथून परत फिरून गोठणेवाडी गावाच्या बाजूच्या गडाच्या तटबंदीच्या कडेकडेने चालत गेल्यावर एका झाडाखाली बांधीव विहिर व त्याभोवती केलेले अळे पहायला मिळते. या विहिरीत बारमाही पिण्याचे पाणी असते. विहिरीच्या पुढे तटबंदीत दोन शौचालय पहाता येतात. यांची रचना सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शौचालयां सारखी आहे. पुढे प्रवेशव्दार ओलांडून तटबंदीच्या कडेकडेने जातांना अजून एक तटबंदीतील शौचालय दिसते. पुढे गडाच्या पश्चिम टोकाला पोहोचल्यावर कड्याच्या बरोबर खालच्या बाजूस एक बुरुज दिसतो. त्याखाली डोंगराची एक सोंड खाली उतरलेली दिसते. त्यामुळे ही बाजू मजबूत करण्यासाठी या बुरुजाची रचना केलेली असावी. आज या बुरुजा पर्यंत उतरून जाता येत नाही. त्यासाठी रोप लावावा लागतो. या ठिकाणाहून गड पाहीला असता तो पंख पसरलेल्या गरुडासारखा दिसतो.

गडावरून नारायणगड, रांगणा किल्ला, महादेवगड हे किल्ले दिसतात.
पोहोचण्याच्या वाटा :
मनोहर गडावर जाण्यासाठी २ मार्ग आहेत.

१) शिरशिंगे मार्गे :- सावंतवाडी - आंबोली मार्गावर सावंतवाडी पासून १० किमीवर "खालची धबकडी" हे गाव आहे. या गावातून डाव्या बाजूचा रस्ता शिरशिंगे या १७ किमी वरील गावात जातो. शिरशिंगेच्या पुढे ११ किमीवर गोठवेवाडी ही शिरशिंगे गावाची वाडी आहे. येथे पर्यंत पक्का रस्ता आहे व सावंतवाडीहून गोठवेवाडी पर्यंत बससेवा उपलब्ध आहे. गोठवेवाडी गावातून कच्चा रस्ता शिवापूरला जातो. या रस्त्यावर गोठवेवाडी गावापासून ४ किमी अंतरावर एक पायवाट डाव्या वाजूच्या डोंगरावर जाते. (येथे पर्यंत जीप सारख्या वहानाने जाता येते.) या पायवाटेने खडा चढ चढुन मनोहर - मनसंतोष गडाच्या बाजूला असलेल्या गरूडझाप या डोंगराला वळसा घालून आपण गडाच्या डोंगरावर जातो. येथे शिवापूरहून येणारी पायवाट मिळते. पुढे शेवटच्या टप्प्यात पायर्‍यांवर माती पडल्यामुळे जपून चढावे लागते. यामार्गे गडावर चढण्यासाठी १.५ ते २ तास लागतात. यामार्गाचा फायदा म्हणजे गाडीने आपण गडाच्या पाव उंची पर्यंत पोहोचतो.

२) शिवापूर मार्गे :- शिवापूरला जाण्यासाठी कुडाळ (३७ किमी) व सावंतवाडी (३६ किमी) या दोनही ठिकाणांहून एसटी बसेसची सोय आहे. शिवापूर गावातून मळलेली पायवाट गडावर जाते. या वाटेने गडावर जाण्यासाठी २ ते २.५ तास लागतात.

मनसंतोष गडावर जाण्यासाठी :- मनोहरगड चढतांना पायर्‍या लागण्यापूर्वी पहीले उध्वस्त प्रवेशव्दार लागते. या प्रवेशव्दाराच्या पुढे डाव्या बाजूला एक पायवाट जाते व खालच्या बाजूला काही नैसर्गिक गुहा दिसतात. या पायवाटेने गुहेच्या बाजूने जात आपण गडाला एक वळसा घालून गोठणेवाडी गावाच्या दिशेला येतो. खालच्या बाजूस दूरवर गोठणेवाडी गाव व वर मनोहर गडाचा कातळकडा यांच्या मधून ही पायवाट दोनही गडांमधील खिंड ओलांडून मनसंतोष गडाच्या पायथ्याशी जाते. मनसंतोष गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍यांचा मार्ग आहे. पण एका टप्प्या नंतर पायर्‍या तुटल्यामुळे व पायर्‍यांवर माती पडल्यामुळे (घसर्‍यामुळे) रोप लावूनच चढावे लागते. पुढे एक वळसा घेऊन (ट्रॅव्हर्स मारून) आपण गडाच्या उध्वस्त प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश करतो.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही त्यामुळे मुक्काम करण्यासाठी सोबत तंबू घेउन जावेत. गोठणेवाडी व शिवापूरच्या शाळेच्या व्हरांड्यात रहाण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
गडावरील विहिरीत बारमही पिण्याचे पाणी उपलब्ध असते.
पाण्याची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
शिवापूर गावातून गडमाथा गाठण्यास २ ते २.५ तास लागतात. गोठवेवाडीतून गडमाथा गाठण्यास २ ते २.५ तास लागत
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
पावसाळ्याचे ४ महीने सोडून वर्षभर गडावर जाता येते.
सूचना :
१) मनसंतोष गड सर करण्यासाठी गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे व साहित्य बरोबर असणे असणे आवश्यक आहे.

२) सोबत १०० फूटी दोर घेतल्यास कातळटप्पा चढता उतरताना खोळंबा होत नाही.

३) मनोहर गडावर जाण्यासाठी वाटाडे मिळतात पण, गावात कातळटप्प्याची माहिती असणारे वाटाडे नाहीत.

४) सुळके व भिंती चढणारे गिर्यारोहक हा कातळटप्पा फ्रि क्लाईंबींगने चढू शकतात.

५) मनोहर गडावरून मनसंतोष गडाकडे जातांना वाटेत गुहा लागतात.या गुहांच्या छतावर मधमाशांची पोळी आहेत. त्यामुळे येथून सावधगिरीने व शांतपणे जावे लागते. गावातल्या २१ जणांवर या ठिकाणी मधमाशांचा हल्ला झाला आहे. त्यामुळे वाटाडे या भागात जाण्यासाठी नाखुश असतात.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: M
 माचणूर (Machnur)  मदनगड (Madangad)  मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))  माढा गढी/किल्ला (Madha Fort)
 मधुमकरंदगड (Madhu makarandgad)  महादेवगड (Mahadevgad)  माहीमचा किल्ला (Mahim Fort)  माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))
 महिमानगड (Mahimangad)  महिमतगड (Mahimatgad)  महिपालगड (Mahipalgad)  महिपतगड (Mahipatgad)
 माहुली (Mahuli)  माहूर (Mahurgad)  मलंगगड (Malanggad)  मालेगावचा किल्ला (Malegaon Fort)
 मल्हारगड (सोनोरी) (Malhargad)  मंडणगड (Mandangad)  मानगड (Mangad)  मंगळगड (Mangalgad)
 मंगळवेढा (Mangalwedha)  मांगी - तुंगी (Mangi-Tungi)  माणिकदूर्ग (Manikdurg)  माणिकगड (Manikgad)
 मणिकपूंज (Manikpunj)  मांजरसुभा (Manjarsubha Fort)  मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad)  मार्कंड्या (Markandeya)
 मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir))  मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka))  मोहनगड (Mohangad)  मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort)
 मोरागड (Moragad)  मोरधन (Mordhan)  मोरगिरी (Morgiri)  मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort)
 मृगगड (Mrugagad)  मुडागड (Mudagad)  मुल्हेर (Mulher)