मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

शिरगावचा किल्ला (Shirgaon) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : ठाणे श्रेणी : सोपी
पालघर गावापासून ५ किमी वर शिरगाव हे निसर्गरम्य गाव आहे. या गावात मुख्य रस्त्याला लागून शिरगावचा किल्ला अतिशय दिमाखाने उभा आहे. पश्चिमेकडे समुद्र व तीन बाजूला जमिन असलेला हा किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. किल्ल्याचे सर्व भाग, बुरुज, तटबंदी, फांजी, जंग्या, जिने, कोठ्या, हौद इत्यादी एकाच ठिकाणी या शिरगावाच्या दुर्गात पाहाता येतात. याशिवाय इतर किल्ल्यांवर न आढळणारे टेहाळणीचे मनोरे व रावणमाड नावाचे दुर्मिळ झाड हे या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण आहे.


Shirgoan
26 Photos available for this fort
Shirgaon
Shirgaon
Shirgaon
इतिहास :
नोव्हेंबर १७३७ मध्ये मराठ्यांनी पोर्तुगिजांच्या ताब्यातील या किल्ल्याला वेढा घातला. महिना झाला तरी किल्ला सर होत नव्हता म्हणून मराठ्यांनी डिसेंबर अखेर वेढा उठवला.

जानेवारी १७३९ रोजी मराठ्यांनी पुन्हा शिरगावला वेढा घातला व दिनांक २२ जानेवारी १७३९ रोजी गड मराठ्यांच्या ताब्यात आला. १७७२ मध्ये मराठ्यांनी किल्ल्याची दुरुस्ती केली. पुढे १८१८ मध्ये शिरगावचा ताबा इंग्रजांकडे गेला.
पहाण्याची ठिकाणे :
शिरगाव किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. या भव्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर नक्षी कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला बुरुज असून त्यावर टेहाळणीसाठी मनोरा आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर काटकोनात दूसरे प्रवेशद्वार आहे. या दोन प्रवेशद्वारांच्या मध्ये पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. दोन प्रवेशद्वारांमधील भागात पूर्वीच्याकाळी दोन मजले असावेत. या ठिकाणी वाश्यांसाठी केलेल्या खाचा, भिंतीतील नक्षीदार कोनाडे नजरेस पडतात.

दुसर्‍या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजवीकडील भिंतीच्या तळाच्या दगडावर पुसट झालेल्या आकृत्या कोरलेल्या दिसतात; तसेच एका दगडावर १७१४ हे साल कोरलेले दिसते. किल्ल्याच्या पूर्नबांधणीत हे जुन्या काळातील दगड किल्ल्याच्या भिंतीच्या पायात गेले असावेत.

किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या हाताला कोठीचे अवशेष व जिना आहे. उजव्या हाताला एक वास्तूचे अवशेष व जिना आहे. या जिन्याने बुरुजावर जाता येते. या बुरुजावर एक तोफ आहे. किल्ल्याला एकूण ५ बुरुज आहेत. चार टोकाला अष्टकोनी बुरुज असून, पाचवा बुरुज प्रवेशद्वाराजवळ असून तो अर्धगोलाकार आहे. किल्ला २०० फूट लांब व १५० फूट रुंद असून किल्ल्याची तटबंदी ३५ फूट उंच व १० फूट रुंद आहे किल्ल्याच्या फांजीवरुन किल्ल्याची प्रदक्षिणा करता येते.

प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला पाण्यासाठी बांधलेला मोठा हौद आहे. त्याच्या बाजूला असलेल्या जिन्यावरुन प्रवेशद्वारा समोरील बुरुजावर जाता येते. या बुरुजाच्यावर टेहाळणी मनोरा आहे. एका वेळी एक माणूस जाऊ शकेल अशा वर्तुळाकार जिन्याने दोन मजली मनोर्‍यात जाता येते. या मनोर्‍यातून प्रवेशद्वार व आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवता येते. मनोर्‍यातून उतरुन प्रवेशद्वारा जवळील बुरुजावरच्या मनोर्‍यात जाता येते.

किल्ल्याच्या समुद्राकडील बाजूस चोर दरवाजा आहे. त्याच्या उजव्या बाजूस तटबंदीत दुमजली खोल्या असून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आत मधूनच काढलेला जिना आहे. चोर दरवाज्याच्या उजव्या बाजूस धान्य कोठाराचे अवशेष आहेत.

शिरगाव किल्ल्याच्या मध्यभागी आपल्याला अनेक फांद्या फुटलेले वैषिष्ट्यपूर्ण ताडाचे झाड किंवा "रावणमाड" पाहायला मिळतात. या झाडाच्या प्रत्येक फांदीला दोन फांद्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे हे ताडाचे झाड एखाद्या डेरेदार वृक्षाप्रमाणे दिसते. अशी अजून काही झाडे किल्ल्याच्या बाहेर आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :
पश्चिम रेल्वेवरील लोकलचे शेवटचे स्टेशन म्हणजे विरार. विरारच्या पुढे जाण्यासाठी मेल अथवा शटल पकडावी व पालघरला उतरावे. पालघरला पोहोचल्यावर तेथून सातपाटी मार्गावर धावणार्‍या बस अर्धा-अर्धा तासाने आहेत. या बस पकडून आपल्याला ’मशीद स्टॉपवर’ उतरावे लागते. हे अंतर बसने १५ मिनिटाचे आहे. याशिवाय पालघरहून या स्टॉपवर यायला रिक्षासुद्धा आहेत.मशीद स्टॉपवरून १० मिनिटे चालल्यावर आपण किल्ल्यापाशी येतो. किल्ल्याला लागूनच एक शाळा आहे.
शिरगाव किल्ला पालघर पासून ५ किमी वर आहे. याठिकाणी येण्याकरीता पालघरहून बस आणि ६ आसनी रिक्षा मिळू शकतात. शिरगाव - केळवे रस्त्यावर प्राथमिक शाळेच्या मागे किल्ला आहे.
राहाण्याची सोय :
गडाजवळील शाळेत रहाण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही, पण केळवे गावात होऊ शकते.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पाण्याची सोय नाही.
सूचना :
१) केळवेमाहिम परिसरातील ६ किल्ले स्वत:च्या वहानाने किंवा रिक्षाने एका दिवसात पाहाता येतात. त्यासाठी प्रथम भरती ओहोटीचे वेळापत्रक पाहावे, कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पाहाता येतो.

जर ओहोटी सकाळी असेल, तर प्रथम केळवे पाणकोट पाहावा. नंतर दांडा किल्ला, भवानगड पाहून परत केळवेत यावे. जेवण करुन केळवे भूईकोट, माहिमचा किल्ला, शिरगावचा किल्ला पाहून परत पालघरला जावे.

ओहोटी संध्याकाळी असल्यास पालघर स्थानकात उतरुन रिक्षा करुन ५ किमी वरील शिरगाव किल्ला पाहून (५ किमी) वरील माहिमचा किल्ला, महकावती देवीचे मंदिर पाहावे. तेथून (४ किमी वरील) केळवे भूईकोट व केळवे पासून (३ कि मी) वरील भवानगड पाहून, शेवटी परत केळवे गावात येऊन ओहोटीला केळवे पाणकोट पाहावा व ८ किमी वरील केळवे स्थानक गाठावे.

२) केळवे पाणकोट, दांडा किल्ला, भवानगड, केळवे भूईकोट, माहिमचा किल्ला यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
प्रकार: Coastal Forts
 आंबोळगड (Ambolgad)  बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)  दांडा किल्ला (Danda Fort)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)
 फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad)  गोवा किल्ला (Goa Fort)  जयगड (Jaigad)  कनकदुर्ग (Kanakdurg)
 केळवे किल्ला (Kelve Fort)  खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))  मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))  माहीमचा किल्ला (Mahim Fort)
 माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))  मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort)  नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort))  पूर्णगड (Purnagad)
 राजकोट (Rajkot)  रेवदंडा (Revdanda)  सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))  साटवलीचा किल्ला (Satavali Fort)
 वसई (Vasai)  वरळीचा किल्ला (Worli Fort)