मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

उंबरखिंड (Umberkhind) किल्ल्याची ऊंची :  2108
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: लोणावळा
जिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम
उंबरखिंड हा पुण्या - मुंबईहून एका दिवसात करता येण्यासारखा सुंदर व सोपा ट्रेक आहे. उंबरखिंडी बरोबर लोणावळ्याच्या ‘ड्युक्स नोज’ चा डोंगरही पाहाता येतो. शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या भौगोलीक रचनेचा फायदा घेऊन गनिमीकाव्याने, कमीत कमी सैन्याने मोघलांच्या बलाढ्य फौजेचा धुव्वा उंबरखिंडीत उडवला होता. ह्या अप्रतिम घटनेची साक्षिदार असलेल्या उंबरखिंडीचा सोपा ट्रेक एकदा तरी करावाच असा आहे.


Umberkhind
8 Photos available for this fort
Umberkhind
इतिहास :
उंबरखिंडीचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी तीची भौगोलिक रचना जाणून घेणे महत्वाचे आहे. घाटावरुन कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटवाटा आहेत. त्यातील एक कुरवंडे घाट, हा घाट लोणावळ्यापासून कोकणातील उंबरे गावापर्यंत जातो. लोणावळ्याकडून येताना सह्याद्रीचा खडा पहाड उतरुन आपण हा चावणी गावापाशी येतो. इथे आपल्याला अंबा नदी भेटते. ही नदी ठाकूरवाडीपर्यंत आपली सोबत करते. चावणी ते ठाकूरवाडी दरम्यान अंबानदीच्या पात्राच्या बाजूने जाणारी चिंचोळी पायवाट दाट जंगलातून जाते. या वाटेच्या दोन्ही बाजूला टेकड्या आहेत. त्यामुळे या मार्गाची रचना नळीसारखी आहे. या नळीचे बूच म्हणजे ठाकूरवाडीची टेकडी. या टेकडीखालीच अंबानदी उजवीकडे वळण घेते. या नळीत एकदा शिरले की मागील खडा सह्याद्री, बाजूच्या टेकड्या व अंबानदीचे पात्र व पूढील ठाकूरवाडीच्या टेकडीचे बूच यामुळे शत्रू आपसूकच कोंडला जातो. या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन महाराजांनी मोघलांच्या बलाढ्य सैन्याचा कमीत कमी सैन्याने व कमीत कमी वेळात सपशेल पराभव केला.

इ.स. १६६१ च्या जानेवारीत शाहीस्तेखानाने कारतलबखानाला शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले उत्तर कोकण काबीज करण्याच्या मोहीमेवर पाठविले. कारतलबखानाबरोबर, कछप, जसवंत कोकाटे, जाधवराव हे सरदार व रायबाघन ही स्त्री सरदार होती. याशिवाय पायदळ व घोडदळ अंदाजे २०,०००, घोडे, बैल, छोट्या तोफा, बंदूका, डेरे, हत्ती, खजिना असा मोगली सरंजाम होता.

खान पूणे, तळेगाव- वडगाव- मळवली मार्गे लोणावळ्याकडे सरकला वास्तविक पाहाता वाटेवरील लोहगड, विसापूर किल्ले स्वराज्यात होते, पण महाराजांच्या आज्ञेमुळे या किल्ल्यावरुन खानाच्या सैन्याला कोणताच विरोध झाला नाही. कारण उंबरखिंडीत खानाला कोंडीत पकडून झोडपून काढणे शक्य होते. महाराजांनी नेताजीला खानाच्या वाटेवरील पाणवठ्यांची, विहिरींची कोंडी करण्याचा हुकूम दिला. त्यामुळे खानाची फौज तहानेने हैराण झाली.

खानाला उंबरखिंडीत खेचून आणण्यासाठी महाराजांनी पेण जवळ सैन्याची जमवाजमव केली व ही खबर खानापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. खानाने कुरवंडा घाटाने उतरण्याचा निर्णय घेतला व खानाची फौज तो दुष्कर घाट उतरु लागली. फौज दुपारपर्यंत कशीबशी चालत चावणी गावात आली. जानेवारी महिना असल्यामुळे अंबा नदीला पाणी नव्हते. आधीच तहानलेली फौज दुपारच्या उन्हाने व घाट उतरल्यामुळे गलितमात्र झाली होती. अशावेळी खानाने सैन्याला पुढे जाण्याची आज्ञा केली. खानाचे सैन्य उंबरखिंडीच्या नळीत गाभ्यात शिरले. सैन्याचे पुढचे टोक ठाकूरवाडीच्या टेकडीजवळ व मागील टोक चावणी गावात अशी अवस्था असतांना महाराजांच्या सैन्याने अचानक मोघली सैन्यावर हल्ला केला. बाजूच्या टेकड्यामुळे व घनदाट अरण्यामुळे मराठ्यांना नैसर्गिक संरक्षण मिळत होत. पण खानाची फौज वेगाने कापली, मारली जात होती. त्यांना हल्ला कुठून होत आहे तेच कळत नव्हते. त्यातच शिवाजी महाराज स्वत: ठाकूरवाडीच्या टेकडीवर सैन्य घेऊन उभे आहेत, म्हटल्यावर मोघलांचा धीर खचला मागे सह्याद्रीचा खडा पहाड चढणे शक्य नव्हते, तो रस्ता नेताजीच्या सैन्याने बंद केला होता.

अशा परिस्थितीत शरण जाण्याशिवाय खानाला पर्यायच नव्हता. त्याने महाराजांकडे अभयदान मागण्यासाठी वकील पाठवला. महाराजांनी खानाला सर्व साहीत्य आहे तसेच सोडून जाण्याचा हुकूम दिला. खानाचे सैन्य रिकाम्या हातानी परत पुण्याकडे गेले. उंबरखिंडीत २ फेब्रुवारी १६६१ रोजी खानाचा सपशेल पराभव झाला. मोगलांचे घोडे, हत्ती, खजिना, डेरे, शस्त्रे हे साहित्य मराठ्यांना मिळाले.

पहाण्याची ठिकाणे :
पोहोचण्याच्या वाटा :
लोणावळा स्थानकाच्या फलाट क्र ५ च्या बाजूने (भूशी डॅमच्या) बाहेर पडावे. तेथून कुरवंडे गावात जाण्यासाठी बस किंवा खाजगी जीप मिळतात. त्याने १० मिनीटात आपण कुरवंडे गावात पोहोचतो. गावातूनच उजव्या हाताला ‘‘ड्यूक्स नोजचा’’ सुळका दिसतो तो चढून परत येण्यास साधारण १ तास लागतो.

कुरवंडे गाव घाट माथ्यावर आहे. तेथून उंबरखिंड उतरण्यासाठी मळलेली पायवाट होती. पण अलिकडेच गॅस कंपनीने पाईप लाईन टाकताना कच्चा रस्ता बनविलेला आहे. त्या रस्त्याने १ तासात आपण पायथ्याच्या चावणी गावात पोहोचतो. चावणी गावापासून ३० मिनीट अंतरावर ‘समरभूमी उंबरखिंड’ असा फलक डाव्या हाताला दिसतो. तेथून अंबानदीचे पात्र ओलांडल्यावर आपण स्मारकापाशी येतो. या स्मारकावर महाराजांची आज्ञापत्रे व उंबरखिंडीचा इतिहास कोरलेला आहे. येथून ठाकूरवाडी मार्गे पाली - खोपोली रस्त्यावरील शेमडी गावात पोहोचण्यासाठी १ तास लागतो. शेमडी गावातून बस अथवा रिक्षाने खोपोलीला जाता येते. उंबरखिंडीचा ट्रेक ९ मैलाचा व पूर्ण दिवसाचा आहे.

लोणावळा - कुरवंडे - चावणी - ठाकूरवाडी - शेमडी - खोपोली या मार्गाने जाता येते किंवा खोपोली -शेमडी या मार्गाने उंबरखिंड स्मारकापर्यंत जीपसारखे वहान पावसाळा सोडून आणता येते.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
१) लोणावळा मार्गे कुरवंडे गावातून उंबरखिंडीत पोहोचण्यास १ तास लागतो.यासाठी डोंगर उतरावा लागतो. २) खोपोली मार्गे शेमडी पासून उंबरखिंडीत पोहोचण्यास १ तास लागतो. त्यापुढे उंबरखिंड - चावणी - कुरवंडे या पायी प्रवासाला १ तास लागतो. यासाठी डोंगर पायथ्यापासून चढावा लागतो. कुरवंडे गावातून ‘ड्युक्स नोज’ पाहून परत येण्यास एक तास लागतो.
सूचना :
हा ट्रेक सप्टेंबर- ऑक्टोबर दरम्यान केल्यास अनेक रानफूले पाहायला मिळतात. या भागात कारवीची झाडे आहेत ती दर ७ - ८ वर्षांनी फुलतात. २००८ मध्ये फूलली होती. अंबानदीला पाणी नोव्हेंबर महीन्यापर्यंत असते.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: U
 उदगीर (Udgir)  उंबरखिंड (Umberkhind)  उंदेरी (Underi)