मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

उंदेरी (Underi) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
इंग्रज व सिद्दी यांना शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी थळ जवळील खांदेरी बेटावर किल्ला बांधला. ह्या जलदुर्गामुळे इंग्रज व सिद्दी यांच्या समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवणे. मराठ्यांना सहज शक्य होते. त्यामुळे इंग्रज व सिद्दी अस्वस्थ झाले. खांदेरीच्या ह्या किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी आणि मराठ्यांच्या समुद्रातील हालचालींना चाप लावण्यासाठी सिद्दीने खांदेरी पासून दीड किमी अंतरावर असलेल्या उंदेरी बेटावर किल्ला बांधला. हा किल्ला खांदेरी बेट व खुबलढा किल्ला(थळचा किल्ला) ह्यांच्या दरम्यान असल्यामुळे उंदेरीचा किल्ला बांधल्यापासून सिद्दी व मराठे यांच्यात कायम चकमकी होत राहील्या.
8 Photos available for this fort
Underi
Underi
Underi
इतिहास :
९ जानेवारी १६८० रोजी सिद्दीने उंदेरी बेटाचा ताबा घेऊन किल्ला बांधण्यास सुरुवात केली. अर्थातच मराठ्यांनी सिद्दीचा हा बेत तडीस जाऊ नये म्हणून उंदेरीवर अनेक हल्ले केले. २७ जानेवारीला पहाटेच केलेल्या हल्ल्याला यश आले नाही. संभाजीराजांच्या काळात १८ ऑगस्ट १६८० रोजी रात्रीच्या वेळी हल्ला करण्यात आला, पण सिद्दीला आधीच सुगावा लागल्यामुळे ८० मराठे मारले गेले. तसेच प्रतिकुल परिस्थितीत खांदेरी किल्ला बांधणार्‍या मायनाक भंडारीचा मुलगा ठार झाला.

१८ जुलै १६८१ रोजी पहाटे संभाजी महाराजांनी सिद्दीचा कायमचा काटा काढण्यासाठी उंदेरीवर निर्णायक हल्ला केला. या युध्दात सिद्दीचे प्रचंड नुकसान झाले. पण त्यांना किल्ला जिंकता आला नाही. दिनांक २८ जानेवारी १७६० रोजी नारो त्रिंबकनी उंदेरी किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव ‘‘जयदुर्ग‘‘ ठेवले. सिद्दीने अनेक प्रयत्न करुनही १८१८ पर्यंत किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडेच राहीला. १८१८ मध्ये इंग्रजांकडे उंदेरीचा ताबा गेला, त्यांनी १८२४ मध्ये तो आंग्रेना दिला. आंग्रे यांचे संस्थान १८४० ला खालसा केल्यावर किल्ला परत इंग्रजांच्या ताब्यात आला.

मे २००६ मध्ये महाराष्ट्र सरकारने उंदेरी किल्ला ‘‘मे डॉल्फिन स्टोनक्रेस्ट इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड’’ या कंपनीला विकला. पण शिवप्रेमींनी केलेल्या जन आंदोलनामुळे हा विक्री करार रद्द करण्यात आला व उंदेरी किल्ला ही ऐतिहासिक वास्तु असल्याचे शासनाला जाहीर करावे लागले.
पहाण्याची ठिकाणे :
होडीतून उंदेरीच्या खडकावर उतरल्यावर आपण भग्नावस्थेतील प्रवेशद्वारापाशी येतो. प्रवेशद्वाराची कमान शाबुत आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर दक्षिणोत्तर पसरलेला हा किल्ला पाहाण्यासाठी दक्षिणेकडून सुरुवात करावी. डाव्या बाजूने चालत गेल्यावर पावसाळी पाणी साठवण्यासाठी ३ हौद (टाक्या) आहेत. त्यापैकी तिसरा हौद हा इतर हौदांपेक्षा मोठा असून त्यात उतरण्यासाठी कमान व पायर्‍य़ा आहेत. हौदांच्या पुढे राजवाड्याचे अवशेष आहेत. ह्यात भिंतीतील कोनाडे, देवळ्या व प्रवेशद्वार पाहाता येते. राजवाड्याच्या पुढे तुळशीवृंदावन आहे. त्याच्या जवळील बुरुजावर ३ तोफा आहेत. किल्ल्याच्या दक्षिणेकडील बुरूजावर २ तोफा व तटबंदीवर ४ तोफा इतस्तत: पडलेल्या आहेत. दक्षिणेकडील दुसर्‍य़ा बुरुजात चोर दरवाजा आहे, तेथे जाण्यासाठी फरसबंदी मार्ग बनवलेला आहे. किल्ल्याच्या पश्चिमेची तटबंदी ढासळलेली आहे. तेथून खांदेरी दुर्गाचे दर्शन होते. पश्चिम तटावरील बुरुजात एक दरवाजा आहे. गडाच्या उत्तरेकडे दोन बुरुज आहेत, त्यापैकी एकावर २ व दुसर्‍य़ावर ४ तोफा आहेत. इशान्येकडील बुरुजात किल्ल्यातून वर बुरुजावर जाण्यासाठी छोटा दरवाजा आहे.

उंदेरी किल्ल्याच्या चार कोपर्‍य़ावर ४ भक्कम बुरुज आहेत व पूर्व-पश्चिमेला प्रत्येकी ४ असे एकूण १२ बुरुज आहेत. ह्या बुरुजांच्या मध्यभागी चौकोनी / गोलाकार खोलगट जागा ठेवलेल्या आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :
हा गड मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात आहे. त्यावर जाण्यासाठी मु. पो. ट्र. ची लेखी परवानगी लागते. उंदेरी बेटावर जाण्यासाठी अलिबाग जवळील थळ गावाच्या किनार्‍य़ावर जावे लागते. तिथे होडी ठरवून खांदेरी व उंदेरी हे दोन्ही किल्ले एका दिवसात पाहाता येतात. उंदेरी बेटावर उतरण्यासाठी धक्का नसल्यामुळे भरती - ओहटीच्या वेळा पाहून किल्ल्यावर जाता येते. सिंधुदुर्ग, जंजिरा ह्याप्रमाणे बोटींचा दर ठरलेला नसल्यामुळे घासाघीस करुन रक्कम ठरवावी लागते. खांदेरी - उंदेरी हे दोनही किल्ले बोट ठरवून एकत्र बघता येतात.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत:… करावी.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पाण्याची सोय नाही.
सूचना :
१) खांदेरी, उंदेरी व खुबलढा किल्ल्याचे अवशेष एका दिवसात पाहाता येतात.
२) खांदेरी, खुबलढा माहिती साईटवर दिलेली आहे. तसेच भरती ओहटीचे वेळापत्रक साईटवरील कुलाबा किल्ला व सर्जेकोट किल्ल्याच्या माहितीमध्ये दिलेले आहे.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: U
 उदगीर (Udgir)  उंबरखिंड (Umberkhind)  उंदेरी (Underi)