मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
अर्नाळा (Arnala) | किल्ल्याची ऊंची :  0 | ||||||
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||||||
जिल्हा : पालघर | श्रेणी : सोपी | ||||||
अर्नाळा नावाच्या लहानशा बेटाच्या वायव्य दिशेस हा जलदुर्ग बांधला आहे. उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्राला मिळत असल्यामुळे खाडीच्या सर्वच प्रदेशावर या जलदुर्गावरून नजर ठेवता येत असे. |
|||||||
|
|||||||
इतिहास : | |||||||
चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुंगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे २०० वर्षांच्या पोर्तुंगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुंगीजांप्रमाणेच पहिल्या बाजीरावानेही या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी १८१७ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला. |
|||||||
पहाण्याची ठिकाणे : | |||||||
अर्नाळा किल्ल्यावर जाणासाठी गावातल्या घरांच्या दाटीतून वाट काढत जावे लागते.अर्नाळा जेटीपासून ५ मिनिटात आपण किल्ल्याच्या उत्तराभिमुख प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुलंद बुरुज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूला गज व शरभ प्रतिमा कोरलेली आहे. प्रवेशद्वारावरच एक शिलालेख कोरलेला आहे. , बाजीराव अमात्य मुख्य सुमती आज्ञापिले शंकर! पाश्चात्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!! या ओळींवरुन किल्ल्याची पुनर्बांधणी बाजीराव पेशव्यांननी केली हे लक्षात येते. प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला तटबंदीत देवडी आहे. किल्ल्याच्या फ़ांजीवर जाण्यासाठी प्रवेशव्दारच्या मागून वळसा घालून जावे लागते. या ठिकाणी फ़ांजीवर जाण्यासाठी जीना आहे. प्रवेशव्दराच्या वर ध्वजस्तंभ आहे. येथून संपूर्ण किल्ला दृष्टीक्षेपात येतो. अर्नाळा किल्ला चौकोनी असून दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ताठपणे उभे आहेत. फ़ांजीवरुन किल्ल्याला प्रदक्षिणा सुरु करावी. वाटेत एक आयतीकृती बुरुज आहे. बुरुजाच्या पुढे गेल्यावर तटबंदीत एक खोली आहे. पाहारेकर्यासाठी बांधलेल्या या खोलीत दोन जंग्या आहेत. पुढे गेल्यावर दक्षिण दिशेच्या तटबंदीत असलेल्या तीनही बुरुजात खोल्या आहेत. त्यात उतरुन जाण्यासाठी पायर्या बांधलेल्या आहेत. पश्चिम तटबंदी असलेल्या बुरुजाखाली उत्तराभिमुख प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारात उतरण्याकरीता बुरुजातून पायर्या बांधलेल्या आहेत. त्या पायर्यांनी खाली उतरुन प्रवेशव्दारच्या बाहेर आल्यावर प्रवेशव्दारच्या भिंतीवर कोरलेले शरभ पाहायला मिळतात. प्रवेशव्दाराच्या बाहेरच्या बाजूला एक एक विहिर आहे. प्रवेशव्दार पाहून परत बुरुजावर येऊन फ़ांजीवरुन उत्तरेकडच्या बुरुजावर आल्यावर त्या बुरुजातही एक खोली पाहायला मिळते. हा बुरुज अजूनही व्यवस्थित टिकून आहे. यात तोफ़ांसाठी अनेक झरोके आणि जंग्या आहेत. या बुरुजाच्या बांधणीवरुन इतर बुरुजांची बांधणी कशी असेल याची कल्पना येते. हा बुरुज पाहून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली तटबंदीवरील फ़ेरी पूर्ण होते. जीन्याने खाली उतरुन पुढे गेल्यावर प्रवेशव्दाराच्या मागच्या बाजूलाच वाड्याचे अवशेष आहेत. वाड्याच्या उजव्या बाजूला विहिर आहे. पायवाटेने पुढे गेल्यावर डाव्या बाजूला शंकर मंदिर व त्या समोर अष्टकोनी बारव आहे. त्या लगत असलेल्या तटबंदीत एक खोली आहे. बाजूला गणपतीचे छोटे मंदीर आहे. मंदिर पाहून पुन्हा पायवाटेवर येऊन उजवीकडे गेल्यावर दर्गा आहे. दर्ग्या जवळ एक विहिर आहे. दर्ग्याच्या पुढे तटबंदीकडे चालत गेल्यावर दत्तमंदिर आहे. जवळच एक विहिर आणि वास्तूचा चौथरा आहे. हे सर्व पाहून परत पायवाटेवर येऊन पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला एक चौकोनी विहिर आहे. पुढे तटबंदीला लागून एका वास्तूचे अवशेष आहेत. पुढे चालत गेल्यावर किल्ल्याचा चोर दरवाजा (छोटा दरवाजा) आहे. या दरवाजाच्या दोन्ही बाजूला वास्तूंचे अवशेष आहेत. किल्ल्याच्या तटबंदीत अनेक ठिकाणी खोल्या आहेत. पण किल्ल्यात गावातले लोक शेती करत असल्यामुळे त्यांनी जागोजागी कुंपण आणि जाळ्या लावल्यामुळे या खोल्यांपर्यंत पोहोचत येत नाही. .किल्ल्याच्या चोर दरवाजातून बाहेर पडल्यावर समोरच एक विहिर आहे. तेथून समुद्रकिनार्याकडे चालत जाऊन पुढे किनार्यावरुन दिसणार्या गोल बुरुजाकडे जावे. हा सुटा बुरुज दक्षिण दिशेकडून होणार्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी व टेहळणीसाठी बांधलेला आहे. बुरुजात तोफ़ांसाठी अनेक झरोके आणि जंग्या आहेत. बुरुजाच्या आत जाण्यास एक लहानसा दरवाजा आहे. पण तो सध्या बंद करण्यात आला आहे. हा बुरुज बघितला की आपली अर्नाळा किल्ल्याची फ़ेरी पूर्ण होते. संपूर्ण किल्ला बघण्यास एक तास लागतो. | |||||||
पोहोचण्याच्या वाटा : | |||||||
पश्चिम रेल्वेवरच्या विरार स्थानकातून पश्चिमेला (फ़लाट क्रमांक १) चर्चगेट दिशेला बाहेर पडावे. विरार पासून अर्नाळा अंदाजे १० किमी वर असून तेथे जाण्यासाठी एस् टी बस , पालिकेच्या बस व रिक्षा यांची सुविधा आहे. अर्नाळा गावातून १० मिनिटे चालत गेल्यावर आपण जेटी पाशी पोहोचतो. जेटीवरुन बोटीनेच किल्ल्यावर जाता येते. ही बोट सकाळी ६.०० ते संध्याकाळी ७.०० या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते. समुद्रकिनार्यावरुन समोरच दिसणार्या अर्नाळा किल्ल्यावर बोटीने जायला ५ ते १० मिनीटे लागतात. | |||||||
राहाण्याची सोय : | |||||||
संपूर्ण गड एक तासात बघून बोटीने किनार्यावर परतता येत असल्याने राहण्याची गरज नाही. | |||||||
जेवणाची सोय : | |||||||
गडावर जेवणाची सोय नाही. | |||||||
पाण्याची सोय : | |||||||
गडावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. | |||||||
जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||||||
विरार पासून १ तास लागतो . |
जिल्हा Thane | आजोबा (आजा पर्वत) (Ajoba) | बळवंतगड (Balwantgad) | बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) | भैरवगड (मोरोशी) (Bhairavgad(Moroshi)) |
भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg) | भवानगड (Bhavangad) | भूपतगड (Bhupatgad) | चंदेरी (Chanderi) |
दांडा किल्ला (Danda Fort) | दार्या घाट (Darya Ghat) | धारावी किल्ला (Dharavi Fort) | दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort) |
फिरंगकोट (Firang kot) | गंभीरगड (Gambhirgad) | घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort) | घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara)) |
गोरखगड (Gorakhgad) | कामणदुर्ग (Kamandurg) | कांबे कोट (Kambe Kot) | केळवे किल्ला (Kelve Fort) |
केळवे पाणकोट (Kelve Pankot) | खारबाव कोट (Kharbao kot) | माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim)) | माहुली (Mahuli) |
मलंगगड (Malanggad) | नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort) | नांदरुखी कोट (Nandrukhi Kot) | पिंपळास कोट (Pimplas Kot) |
शिरगावचा किल्ला (Shirgaon) | सिध्दगड (Sidhhagad) | ताहुली (Tahuli) | टकमक गड (Takmak) |
तांदुळवाडी (Tandulwadi) | वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai)) | वसई (Vasai) | वेहेळे कोट (Vehele Kot) |