मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

चंदेरी (Chanderi) किल्ल्याची ऊंची :  2300
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: माथेरान
जिल्हा : ठाणे श्रेणी : कठीण
मुंबई - पुणे लोहमार्गावरून कल्याणहून कर्जतकडे जाताना उजवीकडे एक डोंगररांग दिसते, ती म्हणजे बदलापूर डोंगररांग .नाखिंड, चंदेरी, म्हैसमाळ, नवरी, बोयी, पेब , माथेरान ही शिखरे याच डोंगररांगेत येतात. या डोंगररांगेत आपला भलाथोरला माथा उंचावलेला एक प्रचंड सुळका दिसतो, त्या किल्ल्याचे नाव आहे "चंदेरी". बदलापूर - वांगणी स्थानका दरम्यान बदलापूर - कर्जत रस्त्यावर गोरेगाव नावाचे गाव आहे. येथूनच चंदेरीची वाट आहे.
चंदेरीच्या पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाट अन्‌ मुरमाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड आव्हान आहे .तामसाइ गावाच्या हद्दीत असणारा असा हा दुर्ग प्रस्तरारोहण कलेची आवड असणार्‍या गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहे.
6 Photos available for this fort
Chanderi
इतिहास :
किल्ल्यावरील गुहेच्या अलीकडे एक पडक्या अवस्थेतील शेष तटबंदी दिसते. किल्लेपणाची हीच काय ती खूण उरलेली आहे. मे १६५६ मध्ये शिवरायांनी कल्याण ,भिवंडी ,रायरी पर्यंतचा सारा मुलूख घेतला, तेव्हा त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. अल्प विस्तार,पाण्याची कमी साठवणूक, बांधकामाचा अभाव, मर्यादित लोकांची मुक्कामाची सोय, अतिशय अवघड वाट हे सारे पाहून हा किल्ला नसून, एक लष्करी चौकी असावी असेच वाटते.
काही जणांच्या मते ७ ऑक्टोबर १९५७ रोजी चंदेरी किल्ल्याच्या सुळक्यावर संघटित प्रस्तरारोहणाचा प्रारंभ झाला.
पहाण्याची ठिकाणे :
गुहेत पूर्वी एक शिवलिंग व नंदी होता. शिवपिंडी भंगलेल्या अवस्थेत आहे. तर नंदीचे अपहरण झाले आहे. गुहेच्या अलीकडेच एक सुमधुर पाण्याचे टाके आहे. ऑक्टोबर शेवट पर्यंतच त्यात पाणी असते. ८ ते १० जणांच्या मुक्कामासाठी गुहा उत्तम आहे. गुहेच्या थोडे पुढे सुळक्याच्या पायथ्याशी देखील एक टाके आहे.कातळमाथ्याचा विस्तार फक्त लांबी पुरताच आहे. रुंदी जवळजवळ नाहीच. दरड कोसळल्यामुळे सुळक्याचा माथा गाठणे फारच कठीण झाले आहे. सुळक्यावरून उगवतीला माथेरान, पेब, प्रबळची डोंगररांग इ दिसते. तर मावळतीला भीमाशंकरचे पठार ,सिध्दगड, गोरक्षगड, पेठचा किल्ला इ दिसतात.
गडाच्या पायथ्याचा परिसर पावसाळ्यात फारच रमणीय व विलोभनीय असतो. धबधब्याचा आस्वाद घ्यायला अनेक पर्यटक येथे येतात.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई - कर्जत लोहमार्गावरील ‘वांगणी’ या रेल्वे स्थानकावर उतरावे. तेथून लोहमार्गाच्या कडेकडेने (बदलापूरच्या दिशेस) जाणार्‍या वाटेने गोरेगाव गाठावे. मुख्य रस्त्यावरून डावीकडे जाणारी वाट चिंचोली या पायथ्याच्या गावी घेऊन जाते. बदलापूर स्थानकात उतरून चिंचोलीस साधारण पाऊण तासाची पायपीट करूनही पोहचता येते. (वांगणी स्थानकातून गोरेगाव पर्यंत जाण्यास भाड्याची वहानेही मिळतात.)

चिंचोली गावास उजवीकडे ठेऊन वर जाणार्‍या दोन वाटा आहेत. एका लहानश्या टेकाडाच्या दोन बाजूंनी ह्या वाटा जातात. टेकडीच्या उजवीकडून जाणारी वाट दगडधोंड्यांमधून जाणारी खडकाळ आहे. तर टेकडीच्या डावीकडून जाणारी वाट घसरडया लाल मातीवरील झाडांझुडपांतून जाणारी आहे. ह्या दोन्हीही वाटा मध्यभागी असणार्‍या एका लहानशा पठारावर घेऊन जातात. तेथून दोन डोंगराना सामाइक असणारी, इंगजी ’T’ अक्षराच्या आकाराची खाच दिसते. त्या दिशेने चालत राहावे, ह्या खाचेच्या उजवीकडचा डोंगर म्हैसमाळचा, तर डावीकडचा उंच सुळका असणारा डोंगर चंदेरी होय. पठारावरून थोडे पुढे गेल्यावर पाण्याचे काही ओहोळ लागतात. त्याच्याचवर धबधब्याचा मार्ग आहे. धबधब्याचे पात्र ओलांडून ,धबधब्याच्या डावीकडे असणार्‍या पाय वाटेने गड चढण्यास सुरवात करावी. साधारणत: तासाभराच्या चढणीनंतर आपण एका चिंचोळ्या माथ्यावर पोहोचतो. त्याच्या दोन्ही बाजूस दरी आहे. तेथून डावीकडे जाणारी वाट थेट गुहेपाशी घेऊन जाते.नवीनच गिर्यारोहण करणार्‍यांनी सोबत वाटाड्या नेणे उत्तम.
राहाण्याची सोय :
गडावरील गुहेत ८ ते १० जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची व्यवस्था नाही., आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
ऑक्टोबरच्या शेवट पर्यंत (पावसावर अवलंबून आहे) टाक्यात पाणी असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
चिंचोली गावातून दीड तास लागतो.
सूचना :
गडमाथा गाठण्यास अवघड असे प्रस्तरारोहण करणे आवश्यक आहे.
जिल्हा Thane
 आजोबा (आजा पर्वत) (Ajoba)  बळवंतगड (Balwantgad)  बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)  भैरवगड (मोरोशी) (Bhairavgad(Moroshi))
 भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg)  भवानगड (Bhavangad)  भूपतगड (Bhupatgad)  चंदेरी (Chanderi)
 दांडा किल्ला (Danda Fort)  दार्‍या घाट (Darya Ghat)  धारावी किल्ला (Dharavi Fort)  दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)
 फिरंगकोट (Firang kot)  गंभीरगड (Gambhirgad)  घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort)  घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara))
 गोरखगड (Gorakhgad)  कामणदुर्ग (Kamandurg)  कांबे कोट (Kambe Kot)  केळवे किल्ला (Kelve Fort)
 केळवे पाणकोट (Kelve Pankot)  खारबाव कोट (Kharbao kot)  माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))  माहुली (Mahuli)
 मलंगगड (Malanggad)  नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort)  नांदरुखी कोट (Nandrukhi Kot)  पिंपळास कोट (Pimplas Kot)
 शिरगावचा किल्ला (Shirgaon)  सिध्दगड (Sidhhagad)  ताहुली (Tahuli)  टकमक गड (Takmak)
 तांदुळवाडी (Tandulwadi)  वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वसई (Vasai)  वेहेळे कोट (Vehele Kot)