| बळवंतगड  
                                       (Balwantgad) | किल्ल्याची ऊंची : 
	  	  630 | 
    
		| किल्ल्याचा प्रकार  : गिरीदुर्ग | डोंगररांग: त्र्यंबकेश्वर | 
	
	
				
				| जिल्हा : ठाणे | श्रेणी : मध्यम | 
		
	
		
			| कसारा ते इगतपुरी दरम्यान असलेल्या प्राचीन थळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच जव्हार त्र्यंबकेश्वर मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी थळ घाटाच्या समोरच्या डोंगरावर बळवंतगड हा टेहळणीचा किल्ला बांधण्यात आला होता . थळ घाटाच्या समोर मुख्य डोंगर रांगेपासून वेगळ्या झालेल्या डोंगरावर बळवंतगड किल्ला आहे. मुंबईहुन एका दिवसात करता येण्यासारखा हा छोटासा ट्रेक आहे. किल्ला छोटा असल्याने सर्व ऋतूत करता येतो. किल्ल्यावर पाणी नसल्याने पाणी मात्र सोबत बाळगावे. 
 | 
	
	
	
        |  | 
								
	
	
	| पहाण्याची ठिकाणे : | 
			
	
		
| किल्ल्याचा डोंगर पूर्व पश्चिम पसरलेला आहे . पश्चिमे कडील ढासळलेल्या तटबंदीतून आपला गडावर प्रवेश होतो. या भागात एकावर एक दगड रचून तटबंदी बनवण्यात आलेली आहे . याठिकाणी तटबंदी आणि फांजीचे अवशेष अजूनही पाहायला मिळतात . तटबंदी पाहून पश्चिममेकडे निघाल्यावर किल्ल्याच्या मधोमध छोटा उंचवटा आहे . तो चढून गेल्यावर एका झाडाखाली काही शेंदुर लावलेले दगड पाहायला मिळतात. स्थानिक लोक याला वेताळ म्हणून ओळखतात. वेताळाचे दर्शन घेउन पुढे गेल्यावर दोन घरांची जोती पाहायला मिळतात. 
 उंचवट्यावरुन खाली उतरुन पुढे गेल्यावर उजव्या बाजूला खळग्यात पिंड ,नंदी आणि हातात तलवार घेतलेली आणि पायाखाली पनवतीला दाबून ठेवलेली मुर्ती पाहायला मिळते. या ठिकाणाच्या खालच्या अंगाला किल्ल्यावरचे पाण्याचे  प्रचंड मोठ टाक आहे . पण ते पाहाण्यासाठी थोडे पुढे जाउन उजवीकडे वळसा घालून खाली उतरावे लागते . टाक्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्यात पाणी साठत नाही . टाक पाहुन परत किल्ल्याच्या पठारावर येउन पश्चिम टोकाकडे चालत गेल्यावर लांबवरचा प्रदेश दृष्टीपथात येतो. थळ घाट , मुंबई आग्रा महामार्ग , रेल्वेलाईन आणि कसारा गाव इथून दिसते . किल्ल्यावरुन दिसणारा प्रदेश पाहुन या डोंगरावर टेहळणीचा किल्ला का बांधला हे समजते.
 
 | 
	
	
		| पोहोचण्याच्या वाटा : | 
	
		| १) रेल्वेने :- कसारा लोकलने किंवा मेल एक्सप्रेस गाडीने  कसारा गाठावे. कसारा स्थानका बाहेरुन विहीगावला जाण्यासाठी एसटी बसेस व जीप्स मिळतात. त्याने मालफाट्यावर उतरावे. विहीगावातून माल गावात जाणारा रस्ता इथूनच सुरु होतो. या घाट रस्त्याने १.५०० किमी चढल्यावर डाव्या बाजुस एक पायवाट डोंगरात शिरते. (या ठिकाणी खास अशी खुण नाही रस्त्यावर जे मैलाचे दगड असतात त्यावरील १/४०० आणि १/६०० च्या मध्ये किल्ल्यावर जाणारी पायवाट डाव्या बाजुस आहे.) या पायवाटेने माल गावाच्या दिशेने चढत गेल्यावर १० मिनिटात किल्ल्याच्या उध्वस्त तटबंदीतून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. 
 कसार्याहून माल गावासाठी थेट जाणार्या जीप्स मिळाल्यास त्यांना बळवंतगड फाट्यावर उतरवायला सांगावे.
 
 २) खाजगी वाहानाने :- मुंबई - आग्रा महामार्गावरील कसार्याच्या पुढे थळ घाट सुरु होतो . घाटात ३ किमी अंतर कापल्यावर एक रस्ता डावीकडे खोडाळ्याकडे जातो. या रस्त्यावर विहीगाव आहे. विहीगावातून माल गावात एक रस्ता जातो. या रस्त्यावर १/४०० ते १/६०० मैलाच्या दगडा दरम्यान डाव्या बाजूला किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे .
 
 | 
	
		| राहाण्याची सोय : | 
		| किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही | 
	
		
| जेवणाची सोय : | 
		| किल्ल्यावर किंवा विहीगावात जेवणाची सोय नाही . | 
	
		
| पाण्याची सोय : | 
		| किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही | 
	
		
| जाण्यासाठी लागणारा वेळ : | 
		| विहीगावातून चालत पाउण तास लागतो. | 
	
		
| जाण्यासाठी उत्तम कालावधी : | 
		| सर्व ऋतूत किल्ल्यावर जाता येते. |