प्रबळगड

गिरीदुर्ग रायगड माथेरान
🏔️
श्रेणी नुसार स्तर
मध्यम
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
2300
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
रायगड

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Prabalgad from base Village

Prabalgad from base Village

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

जून्या मुंबई - पुणे हमरस्त्यावरुन जातांना एक दुर्ग चटकन आपले लक्ष वेधून घेतो तो म्हणजे प्रबळगड. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला, तसेच जवळच असलेला इर्शाळगड असा चहूबाजूंनी वेढलेला हा किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड. प्रबळगड व त्याच्या बाजूचा कलावंतीणीचा सुळका याच्या मध्ये इंग्रजी "व्ही" आकाराची खाच आहे. माथेरानच्या "सनसेट पाँईंट"वरून दिसणारा सूर्यास्त याच प्रबळगडाच्या खाचेत होतो.
प्रथम इंग्रजांनी प्रबळगडाचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्याचा विचार केला होता. मात्र पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे तो विचार मागे पडला.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यासाठी असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्य निर्मित गुहांमुळेच उत्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्र्‍यांनी त्याला लष्करी चौकी बनवून नाव दिले मुरंजन. बहामनीच्या काळात हा किल्ला आकारास आला असावा. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्त होतांना शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल बादशहा शहाजहान आणि विजापूरचा अदिलशहा त्यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या तेव्हा शहाजीराजे पळ काढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. नंतर कोकणात जंजिर्‍याच्या सिद्दिकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्या वर चौलला पोर्तुगीजांकडे गेले. पण त्र्‍यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला, त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशहाचीच सत्ता होती.

पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव याने कल्याण, भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचे नाव बदलून किल्ले "प्रबळगड" असे ठेवण्यात आले. पुढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्र्‍यां मध्ये प्रबळगड किल्ला होता.जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे किल्ले परत घेत असतांना मराठ्यांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला. तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले. शिवरायांच्या आदेशानुसार त्याने सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती मिळाली.

महत्त्वाची ठिकाणे

प्रबळगडाचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. हे पठार जंगलाने व्यापलेले आहे. गडावर एक गणेशमंदिर आहे. तसेच दोन - तीन पाण्याच्या टाक्या सुद्धा आहेत. मात्र ही टाकी शोधण्यासाठी व गडावर फिरण्यासाठी वाटाड्या घेणे आवश्यक आहे. गडावर तीन चार इमारतींचे अवशेष आहेत. घनदाट कारवीच्या जंगलामुळे गडावरील वाटा नीट दिसत नाहीत. मात्र गडावरून माथेरानचे विविध पाँईंटस्‌ फार सुंदर दिसतात.

किल्ला पाहून झाल्यावर पुन्हा माचीवर यावे. किल्ला व कलावंतीणीचा सुळका यामधील खिंडीतून कलावंतीणीच्या सुळक्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍यांची वाट आहे. या वाटेवर पाण्याचे टाक आहे. माथ्यावर कुठलेही अवशेष नाहीत.

कसे पोहोचावे

१ शेडुंग मार्गे :-
मुंबईहून किंवा पुण्याहून येणार्‍यांनी पनवेल गाठावे. जून्या पनवेल - पुणे हमरस्त्यावर शेडुंग गावाकडे जाणारा फाटा आहे. एस्‌टी चालकांना सांगून शेडुंग फाट्यावर उतरावे. हमरस्त्यावरून जाणारी वाट पकडावी अर्ध्या तासाच्या रस्त्यावर शेडुंग गाव लागते. शेडुंग गावापासून (अंतर ५ किमी) ठाकुरवाडीपर्यंत चालत जावे. ठाकुरवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून बैलगाडीची वाट थेट आपल्याला प्रबळमाचीवर घेऊन जाते. प्रबळमाचीवर जाण्यास १ तास लागतो. प्रबळमाची गावातून समोरच किल्ला व कलावंतीणीचा सुळका यामधील खिंडीतून कलावंतीणीच्या सुळक्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍यांची वाट आहे. या घळीतून कलावंतीणीच्या सुळक्यावर जाण्यासाठी पाऊण तास लागतो.
प्रबळमाची गावातून किल्ल्याचा माथा डावीकडे ठेवत ३० मिनीटे चालल्यावर एक घळ दिसते . येथून गडावर जाण्यास एक तास पुरतो. ठाकूरवाडी जाण्यास पनवेलहून बसेस आहेत,


२ पोईंज मार्गे :
पनवेल चौक मार्गावर शेडुंगच्या पुढे पोईंज फाटा आहे. तिथे उतरून पोईंज गावात पोहचावे. येथे समोरच असणार्‍या डोंगर सोंडेवरून प्रबळमाची या गावात जावे. येथून दीड ते दोन तासात प्रबळगड गाठावा.

३ माथेरान ते प्रबळगड :
माथेरान जवळील शार्लोट जलाशया जवळील श्री पिसरनाथ मंदिराजवळून डावीकडे वळल्यावर दहा मिनिटात आपण एका घळीत येऊन पोहोचतो. लोखंडी शिड्यांच्या साहाय्याने दोन तासात आकसर वाडी या गावात पोहोचता येते. आकसर वाडीतून प्रबळगडचा डोंगर चढत काल्या बुरूजाखाली असलेल्या पठारावरून घळीतून वर चढत गडमाथा गाठावा लागतो.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ पायथ्यापासून ३ ते ४ तास लागतात.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

गडावर रहाण्याची सोय नाही. शेडुंग गावातील शाळेच्या कट्ट्यावर २५ ते ३० माणसांची झोपण्याची सोय होऊ शकते.

🍽️

अन्न व्यवस्था

जेवणाची सोय आपणच करावी.

💧

पाणी उपलब्धता

बारमाही पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत.

सर्वोत्तम काळ

🌤️ सप्टेंबर ते मार्च

जवळील गावे

शेडुंग

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा

किल्ले स्वच्छ ठेवा

किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.