राजाचे कुर्ले गढी
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Kalchuri Dynesty inscription, Rajache Kurle
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत
सर्व नकाशांचा संग्रह पहाप्रस्तावना
सातारा जिह्ल्यात अनेक छोट्या मोठ्या गढ्या आहेत. त्यातील काही गढ्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तर काही गढ्या त्यांच्या मालकांनी अजून चांगल्या प्रकारे जतन केलेल्या आहेत. सातार्या पासून ५० किलोमीटर आणि कराडपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले गावात एक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली गढी आहे. या गावात साडे आठशे वर्षापूर्वीचा कलचुरी राजघराण्याने कोरलेला शिलालेख आहे. गावापासून ५ किलोमीटरवर डोंगरमाथ्यावर पूरातन गिरीजाशंकर मंदिर आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
छ्त्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळात अनेक सरदार घराणी उदयास आली. यातील एक महत्त्वाचे घराणे म्हणजे खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील फत्तेसिंह राजेभोसले यांचे घराणे. फत्तेसिंह भोसले यांचे मूळ घराणे सरदार लोखंडे यांचे. परंतु, एका युद्धामध्ये लढताना फत्तेसिंह यांचे वडील कामी आल्यामुळे फत्तेसिंह यांची पुढील सर्व जबाबदारी शाहू महाराजांनी घेतली. त्यानंतर फत्तेसिंह राजेभोसले म्हणून ते इतिहासात प्रसिद्ध झाले. शाहू छत्रपतींनी त्यांना अक्कलकोट परगण्याची जहागिरी दिली आणि त्यांची योग्य व्यवस्था केली. पुढे त्यांच्या मुलांमध्ये वाद निर्माण होऊन त्यांच्या तीन शाखा वेगवेगळ्या प्रांतावर आपापल्या परिने वर्चस्व गाजवू लागल्या. अक्कलकोट, पिलीव आणि राजाचे कुर्ले येथे फत्तेसिंह राजेभोसले यांचे पुढील वारसदार राहू लागले. राजेभोसले घराण्याचे वारस आजही या गढीत वास्तव्यास आहेत.
महत्त्वाची ठिकाणे
राजेभोसले यांनी ही गढी बांधली. त्याकाळी परिसरातील महसूलच्या कामासाठी आणि संरक्षणासाठी या गढीचा उपयोग केला जात होता. गावात प्रवेश करताना गावाच्या वेशीवर नव्याने बांधलेल्या कमानीत कोरीव दगड व हत्ती , फ़ूल यांची शिल्प वापरलेली आहेत. कमानीतून आत गेल्यावर उजव्या बाजूच्या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर आपण गढीच्या प्रवशेव्दारा समोर पोहोचतो. गढीचे प्रवेशव्दार पुर्वाभिमुख आहे. त्याची कमान आजही शाबूत आहे. प्रवेशव्दारच्या संरक्षणासाठी पुढच्या बाजूला अजून एक तटबंदी असावी, त्याचे काही अवशेष येथे पाहायला मिळतात. गढीचा आकार चौकोनी असून चार बाजूला बुरुज आहेत. त्यापैकी ३ बुरुज सध्या शिल्लक आहेत. प्रवेशव्दारातून गढीत प्रवेश केल्यावर मुख्य प्रवेशव्दारच्या आत काटकोनात दुसरे प्रवेशव्दार आहे. या दोन प्रवेशव्दारांमध्ये पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत, गढीत शिरल्यावर उजव्या बाजूला वाड्याचा चौथरा आणि त्यावर जाण्यासाठी असलेल्या पायर्या दिसतात. वाड्याचा चौथरा दगडात आणि भिंती विटांनी बांधलेल्या आहेत. गढीत एकुण ४ वाडे होते. आज ते उध्वस्त झालेले असून चौथर्यावर झाडी माजलेली आहे.
पुढे गेल्यावर एक विहिर आणि त्याच्या बाजूला गढीच्या आत नव्याने बांधलेल्या घर पाहायला मिळते. या घरात राजे भोसले यांचे वंशज राहातात. या गोलाकार विहिरीत तळापर्यंत उतरत जाणाऱ्या सर्पिलाकार पायर्या आहेत. या विहीरीत असलेल्या शिलालेखानुसार ही विहीर तुळजाजी शिवाजीराजे भोसले यांनी शके १८४७ म्हणजे सन १९२५ साली बांधली आहे.
गढीचे बुरुज आणि तटबंदी घडीव दगडात बांधलेले असुन त्यांचा फांजीवरील भाग विटांनी बांधला आहे. बुरुजांच्या बांधकामात झरोके आणि जंग्या पाहायला मिळतात. बुरुजाच्या आतील बाजुने बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. बुरुजावर मोठया प्रमाणात झाडी वाढली असल्याने वरील भागात जाता येत नाही. गढी पाहाण्यासाठी १५ मिनिटे लागतात.
साडे आठशे वर्ष जूना शिलालेख :-
राजाचे कुर्ले गावाचे ग्रामदैवत असणारे धाकूबाईचं मंदिरच्या परिसरात असलेल्या श्री गुरव यांच्या घराच्या भिंतीत कलचुरी राज घराण्याने शके १०८५ (इसवीसन ११६३ ) मध्ये कोरलेला एक शिलालेख होता. घराचे नवीन बांधकाम करतांना तो शिलालेख दोन तुकड्यांमध्ये तुटला आहे. सध्या हा शिलालेख गुरव यांच्या घराजवळ धाकूबाई मंदिराच्या पायर्यांजवळ पडलेला आहे.
या शिलालेखाच्या वरच्या बाजूला राजा आणि प्रजेचे प्रतिक असलेले गाय वासरु कोरलेले आहे. मध्यभागी शिवलिंग कोरलेले आहे . त्याच्या बाजूला सूर्य आणि चंद्र कोरलेले आहेत. हा अंदाजे २० ओळीचा शिलालेख देवनागरी लिपीमध्ये आहे. या शिलालेखाची सुरुवात शके १०८५ सुभानु नाम संवत्सर याने झाली आहे. या शिलालेखावर 'सुवर्ण वृषभ ध्वज, समस्त भुवन आश्रय, श्री पृथ्वी वल्लभ, कालांजरपुरवराधिश्वर या पदव्यांनी वर्णन केलेला कलचुरी चक्रवर्ती भुजबलमल्ल देव म्हणजेच बिज्जलदेव द्वितीय याचा मांडलिक, महामंडलेश्वर, पंचमहाशब्द प्राप्त, विष्णू वंशोद्भव, जादव नारायण, जादवकुलकमल, विकसित भास्कर या पदव्यांनी गौरविलेला जे सिंघदेव याने हे भूमिदान दिलेलं आहे. हे दान चंद्रग्रहणाच्या दिवशी दिलेले आहे, असा उल्लेख आढळतो. सातर्याच्या जिज्ञासा संस्थेने या शिलालेखाचे वाचन केलेले आहे.
धाकुबाई मंदिरात वीरगळ पाहायला मिळते. गावत काही घरांजवळ वीरगळीचे अवशेष पाहायला मिळतात.
गिरीजाशंकर मंदिर :- राजाचे कुर्ले गावाच्या मागे असलेल्या डोंगराच्या पठारावर गिरीजा शंकर मंदिर आहे. गावातून डांबरी रस्त्याने ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिरा पर्यंत थेट वाहानाने जाता येते. दगडी बांधणीच्या मंदिराच्या सभामंडपात गणपतीची मुर्ती आहे. गर्भगृहात शिवपिंड पाहायला मिळाते. मंदिराच्या डाव्या बाजूला कातळात खोदलेला तलाव आहे. मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूला एक छोटा तलाव आहे.
कसे पोहोचावे
सातार्या पासून ५० किलोमीटर आणि कराडपासून २५ किलोमीटर अंतरावर आणि पुसेसावळी येथुन ५ कि.मी. अंतरावर राजाचे कुर्ले गाव आहे. सातारा आणि कराडहून पुसेसावळी गावात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटी वसची सोय आहे.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ N/A
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
गढीत राहाण्याची सोय नाही.
अन्न व्यवस्था
जेवणाची सोय पुसेसावळी गावत आहे,
पाणी उपलब्धता
गढीत पिण्य़ाच्या पाण्याची व्यवस्था नाही.
सर्वोत्तम काळ
जवळील गावे
राजाचे कुर्ले , पुसेसावळी
सातारा जिल्ह्यातील इतर किल्ले
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.