सज्जनगड
प्रस्तावना
प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग पूर्वेकडे जाते या रांगेला शंभूमहादेव या नावाने ऒळखतात. या रांगेला तीन फाटे फुटलेले आहेत. त्यापैकी एका रांगेवर सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली इथली माती प्रत्येकाने भाळी लावावी.
अनंत कवींनी या पावन भूमीचे अतिशय उत्तम वर्णन केले आहे
‘‘सहयाद्रीगिरीचा विभाग विलसे,मांदार श्रुंगापरी।
नामे सज्जन जो नृपे वसविला,श्री उर्वशीचे तिरी।
साकेताधिपती कपी भगवती,हे देव ज्याचे शिरी।
येथे जागृत रामदास विलसे,जो या जना उद्धरी।।’’
सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा किमी अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोर्यात हा दुर्ग उभा आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या किल्ल्याला ’आश्वालायनगड’ म्हणू लागले. या शब्दाचा अपभ्रंश म्हणजे अस्वलगड हे देखील नाव मिळाले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११व्या शतकात केली. या गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव होते, म्हणूनच ह्याला परळीचा किल्ला असे देखील संबोधले जात असे. चवथा बहमनी राजा महंमदशहा (१३५८ - १३७५) याच्या कारकिर्दीत या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. पुढे हा किल्ला बहमनी राज्याचे वारसदार आदिलशहा कडे गेला. इ.स.१६३२ पर्यंत फाजलखान ह्या किल्ल्याचा किल्लेदार असल्याचा उल्लेख आढळतो. २ एप्रिल १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून धेतला.
शिवरायांच्या विनंती वरून समर्थ रामदास गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नामकरण करण्यात आले "सज्जनगङ". राज्याभिषेकानंतर शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले. दिनांक ३/११/१६७८ रोजी शिवरायांनी संभाजी महाराजांना समर्थांकडे पाठवले, पण ३/१२/१६७८ रोजी संभाजी महाराज सज्जनगडावरून पळून जाऊन दिलेरखानाला मिळाले. शिवरायांच्या निधनानंतर १८ जानेवारी १६८२ रोजी श्री राममूर्तींची गडावर स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी १६८२ मध्ये समर्थांचे निधन झाले. समर्थांनी आपल्या पश्चात सर्व अधिकार दिवाकर गोसाव्याला दिले असले तरी गडाची व्यवस्था भानजी वरामजी गोसावी यांच्याकडे सोपवली होती. पुढे यांत भांडणतंटा सुरू झाला ही गोष्ट संभाजी महाराजांच्या कानावर जाताच त्यांनी २/६/१६८२ रोजी सज्जनगडाचा मुद्राधारी जिजोती काटकर हयाला पत्र लिहले की,
‘‘श्री स्वामी अवतार पूर्ण करण्याअगोदरच आज्ञा केली होती. ऐसे असता उद्धव गोसावी उगीच द्रव्य लोभास्तव भानजी व रामजी गोसावी यांसी कटकट करितात, तुम्ही उद्धव गोसावी यांसी पत्रे व वस्त्रे भानजी व रामजी यांजकडून देवविली म्हणून कळो आले. तरी तुम्हास ऐसे करावयाचे प्रयोजन काये व उद्धव गोसावी यांसी कटकट रावया गरज काये? या उपरी जे जे वस्त्रभाव व द्रव्य उधव गोसावी यांचे आधीन करविले असेली ती मागते भानजी व रामजी याचे स्वाधीन करणे. उधव गोसावी यांसी कटकट करू न देणे. श्री स्वामींचे पहिलीच आज्ञा करणे. वेदमूर्ती बिवाकर गोसावी यांचे विद्यमाने आम्हास श्रुत होऊन होणे. तो होईलया उपरी घालमेलीत पडावया प्रयोजन नाही. श्री स्वामींच्या समुदायांशी काडीइतके अंतर पडो न देणे या पत्रा प्रमाणे राहाटी करणे’’.
या नंतर पुढे २१ एप्रिल १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून १७००ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे ’नौरसतारा’ म्हणून नामकरण झाले. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.
महत्त्वाची ठिकाणे
गडावर शिरतांना लागणार्या पहिल्या दरवाजाला ’छत्रपती शिवाजी महाराजद्वार’ असे म्हणतात. हे द्वार आग्नेय दिशेस आहे. दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला ’समर्थद्वार’ असेही म्हणतात. आजही हे दरवाजे रात्री दहा नंतर बंद होतात. दुसर्या दारातून शिरतांना समोरच एक शिलालेख आढळतो त्याचा मराठी अर्थ खालील प्रमाणे;
१) ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे.
२) हिंमत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लीत करत आहे.
३) तू विंवंचना दूर होण्याचे स्थान आहेस. परंतु पुन्हा विवंचना मुक्त आहे.
४) तुझ्या पासून सर्व विवंचना दूर होतात.
५) परेली किल्ल्यावरील इमारतीच्या दरवाज्याचा पाया ३ जनादिलाखर या तारखेस तयार झाला. आदिलशहा रेहान याने काम केले.
ज्या पायर्यांनी आपण गडावर प्रवेश करतो. त्या पायर्या संपायच्या अगोदर एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने ५ मिनिटे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते. ही रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती.
गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे वळावे. समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या मागच्या बाजूस एक मशिदवजा इमारत आहे. तर समोरच आंग्लाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना चाफळच्या राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली. मंदिरा समोरच ध्वजस्तंभ आहे. नंतर आल्या मार्गाने पुन्हा तळयापाशी यावे व सरळ पुढे चालत जावे.
वाटेतच उपहारगृह, श्री समर्थ कार्यालय आणि धर्मशाळा लागतात. धर्मशाळेच्या समोरच सोनाळे तळे आहे. याच तळ्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात. तळ्याच्या मागील बाजूस पुष्पवाटीका आहे. सोनाळे तळ्याच्या समोरून जाणारी वाट पकडावी आणि आपण मंदिराच्या आवारात येऊन पोहोचतो. समोरच पेठेतल्या मारुतीचं मंदिर आहे, तर बाजूला श्रीधर कुटी नावाचा आश्रम आहे. उजवीकडे श्रीरामाचे मंदिर, समर्थांचा मठ आणि शेजघर आहे. या ठिकाणी समर्थांच्या वापरातील सर्व वस्तू ठेवल्या आहेत. हे सर्व पाहून झाले की मंदिराच्या पुढच्या द्वारातून बाहेर पडायचे आणि डावीकडे वळावे प्रथम ‘ब्रम्हपिसा’ मंदिर लागते आणि पुढे गेल्यावर धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे. समोरच किल्ल्याचा तट आहे. येथून सभोवतालचा परिसर फारच सुंदर दिसतो. गड फिरण्यास दोन तास लागतात.
कसे पोहोचावे
गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत त्यांपैकी एक गाडीमार्ग आहे
१) परळी पासून:-
सातारा ते परळी अंतर १० किमी आहे. परळी पासून गडावर जाण्यासाठी पायर्या आहेत. साधारण ७८० पायर्यांनंतर गडाचा दरवाजा लागतो. गडावर जाण्यास परळीपासून एक तास लागतो.
२) गजवाडी पासून :-
सातारा परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे ३ किमीवर गजवाडी गाव लागते. तेथून थेट गडाच्या कातळ माथ्यापर्यंत गाडीने जाता येते. येथून पुढे १०० पायर्यांनंतर दरवाजा लागतो. रस्त्यापासून गडावर जाण्यास १५ मिनिटे लागतात.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ परळी गावातून पायर्यांनी १ तास व गाडीमार्गाने १५ मिनिटे
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
१) गडावर राहण्यासाठी श्री समर्थ सेवा मंडळ कार्यालय तर्फे खोल्या उपलब्ध होतात.
२) गडावर धर्मशाळा देखील आहेत.
३) सज्जनगड ( सेवा मंडळाच्या ) खोल्याही राहण्यासाठी उपलब्ध होतात.
अन्न व्यवस्था
गडावर जेवण्याची सोय होते.
पाणी उपलब्धता
गडावर बारामही पिण्याचे पाणी आहे.
सर्वोत्तम काळ
🌤️ N/A
जवळील गावे
परळी.
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.