मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort)) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी
पोर्तुगिज, इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी युरोपातील विविध देशातील व्यापारी भारतात बनणारा माल (मसाले, सुती कपडे,सोन्या चांदीच्या वस्तू इ.) युरोपात विकून भरपूर नफा कमवत असत. तर युरोपात तयार होणारा माल (बंदुका, तोफा, दारू, काच सामान, लोकरीचे कपडे, दुरदर्शिका,चष्मे इ.) भारतात आणून विकत असत. या सागरी मार्गाने होणार्‍या व्यापारातील माल साठवण्यासाठी या परदेशी व्यापार्‍यांनी ठिकठिकाणी बंदरांजवळ आपल्या वखारी (वेअर हाऊस/ गोडाऊन) स्थापन केल्या. व्यापारा बरोबरच राज्य विस्तार हा सुप्त हेतू मनात असल्यामुळे अनेक ठिकाणी या वखारींची उभारणी किल्ल्यांप्रमाणे करण्यात आली होती. महारष्ट्राच्या सागर किनार्‍यावर पोर्तुगिज, इंग्रज, डच यांच्या वखारी होत्या. त्यापैकी डचांची एकमेव वखार वेंगुर्ले बंदरात आहे. वेंगुर्ले शहरात आजही या वखारीचे अवशेष पहायला मिळतात.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. त्यात डचांची एकमेव वखार वेंगुर्ले बंदरात आहे. त्याची डागडूजी करून त्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिल्यास ते एक चांगले पर्यटन केंद्र होऊ शकेल. या वखारीतून आयात -निर्यात होणार्‍या वस्तू, त्याकाळचे डचांचे पोषाख, पुतळे, तोफा यांच्या प्रतिकृती यात ठेऊन पर्यटकांना आकर्षित करता येईल.


Dutch Vakhar (ware House) Vengurla

9 Photos available for this fort
Dutch Warehouse( Vengurla Fort)
इतिहास :
शिवचरीत्रात २५ टोपीकर व्यापार्‍यांचा उल्लेख आहे. आपापल्या रिवाजा प्रमाणे, देशाप्रमाणे हे व्यापारी निरनिराळ्या टोप्या वापरत असत.त्यापैकी हॉलंडहून आलेल्या डच व्यापार्‍यांचा मराठी ऎतिहासिक कागदपत्रात "वलंदेज" या नावाने उल्लेख आढळतो. या डच व्यापार्‍यांनी १६ व्या शतकात हिंदुस्थानात प्रवेश केला. कोकण किनार्‍यावर त्यावेळी आदिलशहाची सत्ता होती. आदिलशहाने डचांना वेंगुर्ल्यात वखार बांधण्याची परवानगी दिली. डचांनी १६४६ मध्ये एक तात्पुरती इमारत बांधली, पण १६५४ साली पडलेल्या धुवाधार पावसात ही इमारत कोसळली. त्यामुळे १६५५ साली डचांनी आत्ता अवशेष स्वरूपात उभी असलेली वखार बांधली. व्यापारा बरोबरच राज्य विस्तार हा सुप्त हेतू मनात असल्यामुळे तसेच व्यापारातील प्रतिस्पर्धी गोव्याचे पोर्तुगिज व मुंबईचे इंग्रज यांच्या पासून संरक्षणाच्या हेतूने वखार बांधतांनाच भूईकोटाप्रमाणे बांधण्यात आली. या बांधकामासाठी ३००० तोळे सोने खर्च करण्यात आले.या वखारीवर १० तोफा व २०० सैन्याचा पहारा ठेवण्यात आला होता. इ.स.१६७१ मध्ये बडीबेगमने हज यात्रेस जाण्यापूर्वी या वखारीत मुक्काम केला होता. इ.स. १६८० मध्ये वखारीच्या भोवताली खंदक खोदून त्यावर पुलाची सोय करण्यात आली. अडचणीच्या वेळी हा पूल उचलून घेण्याची सोय होती.

वेंगुर्ल्याच्या वखारीत डचांशी वाटाघाटी करण्यासाठी आदिलशहाचे सरदार मुस्तफाखान, अफजलखान, शिवाजी महाराजांतर्फे रंगो पंडीत, नेतो पंडीत येऊन गेल्याची इतिहासात नोंद आहे. औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याने काही काळ येथे वास्तव्य केले होते. इ.स.१७३६ मध्ये करवीरकरांच्या फौजेने डच वखार लुटली.त्यानंतर त्यांच्यात झालेल्या तहाततील एका कलमानुसार डचांनी मालवण बंदरात वखार बांधण्याची परवानगी मिळविली.

इ.स.१७६५ मध्ये इंग्रजांनी वाडीकरांचे यशवंतगड व भरतगड हे किल्ले काबिज केले. त्यावेळी झालेल्या तहात इंग्रजांनी भरतगड किल्ला परत केला व युध्द खर्चापोटी २ लाख रुपये मिळेपर्यंत वेंगुर्ला इंग्रजांच्या ताब्यात राहील अशी अट घातली. त्याप्रमाणे इ.स.१७८० पर्यंत वेंगुर्ला इंग्रजांच्या ताब्यात होते. त्याच वर्षी वाडीकरांनी हल्ला करून वेंगुर्ला शहर व कोट ताब्यात घेतले.

इ.स. १७८६ मध्ये करवीरकर व पेशवे यांच्या संयुक्त फौजेने वेंगुर्ला कोट ताब्यात घेतला., पण त्यांची पाठ वळताच वाडीकर व पोर्तुगिज यांच्या संयुक्त सैन्याने तो पुन्हा ताब्यात घेतला. इ.स.१८१३ मध्ये करवीरकर व सावंतवाडीकर यांच्यात झालेल्या युध्दात इंग्रजांनी मध्यस्ती केली. युध्द खर्चापोटी सावंतवाडीकरांनी वेंगुर्ला शहर व कोट इंग्रजांच्या ताब्यात दिले.

पहाण्याची ठिकाणे :
वेंगुर्ले वखारीची तटबंदी १० फूट उंच व १ मीटर रूंद आहे. वखारीच्या चारही टोकाला पोर्तुगिज धाटणीचे चौकोनी बुरुज आहेत. बुरुजांमध्ये तोफा ठेवण्यासाठी जंग्यांची रचना केलेली आहे. वखारीच्या प्रवेशव्दाराची कमान अर्धवर्तूळकार आहे. प्रवेशव्दाराच्या आतल्या बाजूस पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दातून आत शिरल्यावर समोरच ३० मीटर लांब व १५ मीटर रूंद दुमजली इमारत आहे. या इमारतीची बरीच पडझड झालेली आहे, तरी आपल्याला दुसर्‍या मजल्यावर जाता येते. इमारतीच्या मागच्या बाजूस चौकोनी विहिर आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी सुंदर जीना आहे. दोनही मजल्यावर भरपूर दालन आहेत. पहिल्या मजल्यावरील एका दालनाच्या भिंतीत समोरासमोर अनेक खोबण्या आहेत व त्यातील बर्‍याच खोबण्यांत लाकडाचे तुकडे आहेत. या ठिकाणी पूर्वी लाकडाची मांडणी (रॅक्स) असावी, त्याचा उपयोग काच सामानाच्या वस्तू ठेवण्यासाठी होत असावा असा तर्क करता येतो. इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर जाण्यासाठी अरूंद जीना आहे, वरून संपूर्ण वखार दृष्टीच्या टप्प्यात येते.
१९६३ सालापर्यंत या वखारीच्या जागी सरकारी कार्यालये होती. त्यानंतर ही इमारत खाली झाल्यावर त्यातील तुळ्या, वासे, दरवाज्या चौकटी हे सामान चोरीस गेले व इमारतची पडझड होऊन ती केवळ अवशेष रुपाने उभी आहे. वखारीवरील तोफा आज तेथे नाहीत पण वेंगुर्ला बंदरावर २ तोफा उलट्या पुरलेल्या पहायला मिळतात, त्यांचा उपयोग बोटी बांधण्यासाठी केला जातो.
पोहोचण्याच्या वाटा :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहर सावंतवाडी पासून ३२ किमी अंतरावर आहे. मुंबई पासून कोकण रेल्वेने सावंतवाडीला जाता येते. तेथून एसटीने वेंगुर्ल्याला जाता येते.किंवा मुंबई - पुण्याहून वेंगुर्ल्यासाठी थेट एसटी सेवा आहे. वेंगुर्ल्याच्या बाजारातून बंदरावर जाणार्‍या रस्त्यावर डाव्या बाजूच्या एका गल्लीच्या टोकाला वखार आहे.
राहाण्याची सोय :
रहाण्यासाठी वेंगुर्ल्यात हॉटेल्स आहेत.
जेवणाची सोय :
खाण्यासाठी वेंगुर्ल्यात हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
पावसाळ्याचे ४ महीने सोडून वर्षभर गडावर जाता येते.
सूचना :
) मालवणहून खाजगी वहानाने सकाळी निघून निवतीचा किल्ला(२५ किमी) + वेंगुर्ल्याची डच वखार (३० किमी) + यशवंतगड रेडी(२० किमी) + तेरेखोलचा किल्ला(७ किमी) पाहून मालवणला परत येता येते किंवा तेरेखोलहून(४० किमी) पणजीला मुक्कामी जाता येते.
२) निवतीचा किल्ला, यशवंतगड रेडी, तेरेखोलचा किल्ला यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
जिल्हा Sindhudurg
 बांदा किल्ला (Banda Fort)  भगवंतगड (Bhagwantgad)  भरतगड (Bharatgad)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)
 डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))  हनुमंतगड (Hanumantgad(Sindhudurg))  खारेपाटण (Kharepatan fort)  कोटकामते (Kotkamate)
 महादेवगड (Mahadevgad)  मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad)  नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli))  निवतीचा किल्ला (Nivati Fort)
 पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan))  राजकोट (Rajkot)  रामगड (Ramgad)  सदानंदगड (Sadanandgad)
 सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))  शिवगड (Shivgad)  सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan))  सिंधुदुर्ग (Sindhudurg)
 वेताळगड (Vetalgad)  विजयदुर्ग (Vijaydurg)  यशवंतगड (रेडीचा किल्ला) (Yashawantgad (Redi Fort))