मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

यशवंतगड (रेडीचा किल्ला) (Yashawantgad (Redi Fort)) किल्ल्याची ऊंची :  150
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी
महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनार्‍यावरील शेवटचा किल्ला म्हणजे रेडीचा यशवंतगड. लोह, मँगेनीजच्या खाणी व स्वयंभू गणपती ह्यामुळे प्रसिध्द असलेले रेडी गाव प्राचिन काळी रेवती द्वीप म्हणून प्रसिध्द होते. या गावात समुद्रकिनारी असलेला हा अप्रतीम किल्ला प्रत्येकाने एकदा तरी पाहावा असा आहे. या किल्ल्याची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. रेडीच्या खाडीच्या मुखावर बांधण्यात आलेल्या या किल्ल्याचा उपयोग समुद्रातून खाडीमार्गे होणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी केला गेला

Yashwantgad(Redi fort)

22 Photos available for this fort
Yashawantgad (Redi Fort)
Yashawantgad (Redi Fort)
Yashawantgad (Redi Fort)
इतिहास :
इ.स. ६१० ते ६११ मध्ये चालुक्य राजा स्वामीराजाचे रेडी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्याकाळी हा किल्ला बांधण्यात आला असावा. किल्ल्याचा ज्ञात इतिहास विजापूरकर आदिलशहापासून चालू होतो. आदिलशहाकडून या किल्ल्याचा ताबा वाडीच्या सावंतांकडे गेला. त्यांच्याकडून शिवाजीमहाराजांनी जिंकला व त्याची दुरुस्ती करुन किल्ला मजबूत बनविला. १८१७ मध्ये पोर्तुगिजांनी केलेल्या हल्ल्यात त्यांना फोंड सावंतांकडून हार पत्करावी लागली
पहाण्याची ठिकाणे :
यशवंतगडाची वैशिष्ट्ये म्हणजे त्याची बांधणी व गडावरील मोठ्या प्रमाणात आस्तित्वात असलेले अवशेष होत. रेडी गावातून गडावर प्रवेश करण्यासाठी छोटेखाणी प्रवेशद्वार व त्याचे रक्षण करणारे बुरुज व तटबंदी नजरेस पडते. प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपण गडाच्या माचीवर प्रवेश करतो. पायवाटेने चालत गेल्यावर थोड्या उंचीवर गडाचा पहिला दरवाजा लागतो. या दरवाज्याच्या पुढे २० फूट खोल खंदक लागतो. हा खंदक पूर्ण किल्ल्याभोवती फिरवलेला असून तो दगडांनी बांधून काढलेला आहे. खंदकाच्या पूढे दुसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा पहिल्या दरवाजाच्या काटकोनात आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला बुरुज आहेत. पुढे थोड्या उंचीवर तिसरा दरवाजा(मुख्य प्रवेशद्वार) लागतो. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या डाव्या हाताच्या बुरूजात छोटा दिंडी दरवाजा व आत जाण्यासाठी वळण रस्ता (भूयार) आहे. मुख्य प्रवेशद्वार बंद असतांना दिंडी दरवाजाचा उपयोग केला जात असे. गडावरील सर्व दरवाजांच्या कमानी शाबूत आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोर व उजव्याबाजूला पहारेकर्‍यांसाठी बांधलेल्या कमानदार खोल्या (देवड्या) आहेत. चौथा दरवाजा तिसर्‍या दरवाजाच्या काटकोनात असून त्यापूढे (अंदाजे ७ फूट लांब) बोगद्याप्रमाणे रचना केलेली आहे. आतमध्ये पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. या दरवाजाच्या बाजूने असलेली २० फूट उंच तटबंदी सर्व किल्ल्याला वेढते. बालेकिल्ल्यात आत शिरल्यावर आपल्याला राजवाडा आणि कचेरीची दुमजली इमारत दिसते. या इमारतीची रचना भुलभुलैयासारखी आहे. बालेकिल्ल्याचा १/३ भाग व्यापणार्‍या या इमारतीत फिरतांना आपण कुठल्या दालनातून कोठे आलो हे कळत नाही. इमारतीचा पहिला व दुसरा मजला शाबून नाही. पण तूळ्यांसाठी भिंतीत असलेल्या खाचा, पहिल्या व दुसर्‍या मजल्याच्या उंचीवर असलेले दरवाजे, खिडक्या, कोनाडे, झरोके पाहाता येतात. या इमारतीच्या भिंतीवर वाढलेल्या वृक्षांच्या मुळांमुळे अनेक प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण आकार तयार झालेले आहेत. इमारतीच्या एका चौकात हौद किंवा तरण तलाव असून तो २०×२० फूट मापाचा आहे. त्यात उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायर्‍या आहेत. हौदाच्या काठावर दगडी स्तंभ असून त्यावर चुन्यात रेखलेली पानफूल आहेत. इमारतीच्या भूलभूलैयातून बाहेर पडल्यावर उत्तरेकडील व पूर्वेकडील तटात आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण पहार्‍याच्या जागा पाहायला मिळतात. तटाच्या आत जाण्यासाठी चोर दरवाजांप्रमाणे छोटे दरवाजे ठेवलेले आहेत. त्याच्या आत ३ फूट उंच भिंतीचा आडोसा केला असून त्या भिंतीच्या आड बसून दूर पर्यंतच्या प्रदेशावर नजर ठेवता येते. उत्तर बुरुजावरुन अरबी समुद्र व रेडीची खाडी यांच्या संगमाचे अप्रतिम दृश्य दिसते. बुरुजावरील जंग्यांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या व्यतिरीक्त गडावर एक कोठारासारखी इमारत प्रवेशद्वारासमोर आहे. गडावर पाण्याच टाक, तलाव अथवा विहिरीचे अवशेष दिसत नाहीत. याशिवाय रेडी गावात स्वयंभू गणपतीचे मंदिर व माऊली मंदिर व रेडीचा समुद्रकिनारा पाहाण्यासारखा आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
रेडी हे गाव वेंगुर्ले शहरापासून २६ किमीवर आहे. मुंबई - कुडाळ - वेंगुर्ले - रेडी ह्या मार्गे किल्ल्यावर जाता येते. वेंगुर्ल्याहून रेडीला जाण्यासाठी बसची ठराविक अंतराने सोय आहे. रेडी गावात उतरुन १५ मिनिटे पायी चालत यशवंतगडावर जाता येते. गाडीने आल्यास गाडी थेट गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत जाते. गावात रस्ता विचारत जाणे सोईचे पडते. रेडी पासून ७ किमीवर असलेला तेरेखोलचा किल्ला व यशवंतगड एका दिवसात पाहून होतात.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही.
सूचना :
१) खाजगी वहानाने मालवणहून निघाल्यास २५ किमी वरील निवतीचा किल्ला, तेथून ४० किमी वरील यशवंतगड व ७ किमी वरील तेरेखोल किल्ला पाहून परत मालवणला मुक्कामी किंवा ४० किमी वरील पणजीला जाता येते.
२) निवतीचा किल्ला, तेरेखोल किल्ला यांची माहिती साईटवर आहे
जिल्हा Sindhudurg
 बांदा किल्ला (Banda Fort)  भगवंतगड (Bhagwantgad)  भरतगड (Bharatgad)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)
 डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))  हनुमंतगड (Hanumantgad(Sindhudurg))  खारेपाटण (Kharepatan fort)  कोटकामते (Kotkamate)
 महादेवगड (Mahadevgad)  मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad)  नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli))  निवतीचा किल्ला (Nivati Fort)
 पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan))  राजकोट (Rajkot)  रामगड (Ramgad)  सदानंदगड (Sadanandgad)
 सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))  शिवगड (Shivgad)  सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan))  सिंधुदुर्ग (Sindhudurg)
 वेताळगड (Vetalgad)  विजयदुर्ग (Vijaydurg)  यशवंतगड (रेडीचा किल्ला) (Yashawantgad (Redi Fort))