मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

तैलबैला (Tailbaila) किल्ल्याची ऊंची :  3332
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: लोणावळा
जिल्हा : पुणे श्रेणी : अत्यंत कठीण
सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. या लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. त्यापैकी एक रचना म्हणजे "डाईक "; तैलबैला उर्फ कावडीचा डोंगर हे अशा रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. तैलबैलाचा डोंगर हा अशाच प्रकारच्या दोन कातळभिंतीमुळे लक्ष वेधून घेतो. तैलबैलाची भिंत साधारणपणे १०१३ मीटर / ३३२२ फूट उंच असून उत्तर - दक्षिण अशी पसरलेली आहे. या भिंतीच्या मध्यावर "V " आकाराची खाच आहे. यामुळे या भिंतीचे २ भाग झालेले आहेत. या भिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे.

प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठे पर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली असे. कोकणातील पाली गावातून घाटमाथ्यावरील लोणावळा - खंडाळा परीसरात येण्यासाठी प्राचिन काळापासून दोन घाटमार्ग आहेत.
१) पाली - सरसगड - ठाणाळे लेणी - वाघजाई घाट - तैलबैला - कोरीगड.
२) पाली - सरसगड - सुधागड - सवाष्णीचा घाट - घनगड - तैलबैला - कोरीगड.
त्यातील एक म्हणजे "वाघजाई घाट ". या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी तैलबैलाचा उपयोग करण्यात येत असावा. तैलबैला ते ठाणाळे लेणी हा प्राचीन घाटमार्ग आजही वापरात आहे. तैलबैला वरून नैऋत्येस सुधागड , आग्नेयेस घनगड आणि ईशान्येस कोरीगड नजरेस पडतात. आकाश निरभ्र असल्यास पश्चिमेच्या बाजूने सरसगडाचा माथा दिसतो.
53 Photos available for this fort
Tailbaila
पहाण्याची ठिकाणे :
तैलबैला गावातून विशाल भिंतींच्या दिशेने चालत गेल्यावर, उजव्या बाजूच्या पायवाटने आपण तैलबैलाच्या माचीवर येऊन पोहोचतो. माचीवरून सरळ जाणारी रुळलेली वाट तैलबैलाच्या "V " आकाराच्या खिंडीत येऊन पोहोचते. खिंडीत उभं राहील्यावर तैलबैलाच्या कातळभिंतींच्या विशालतेचा अंदाज येतो.

तैलबैलाच्या दक्षिण दिशेकडे पसरलेल्या भिंतीच्या पोटामध्ये एक गुहा आहे. या गुहेमध्ये २-४ शेंदूर लावलेले दगड आणि पूजेचे साहित्य आहे. हे ग्रामस्थांच श्रद्धास्थान असून २०१३ मध्ये तेथे छोटेखानी मंदिर उभारण्यात आले आहे. गुहेमध्येच उजव्या बाजूला एक बारामाही पाण्याचं टाकं देखील आहे आणि त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या गुहेमध्ये ३ ते ४ जण व्यवस्थित राहू शकतात.

तैलबैलाच्या माचीवर पोचल्यावर जी रुळलेली वाट आपल्याला खिंडीत घेऊन जाते; त्या वाटेवरून चालताना उजव्या बाजूच्या वरच्या अंगाला उत्तरेकडे पसरलेली भिंत आपल्याला साथ देत असते. खिंडीतून ५-६ पावलं खाली येऊन डाव्या बाजूने वरच्या वाटेने तसेच पुढे जावे. या बाजूस उत्तरेकडे पसरलेल्या भिंतीच्या पोटात आपल्याला २ गुहा बघायला मिळतात. त्यामधील एक गुहा छोटी तर दुसरी गुहा बर्‍यापैकी रुंद आहे. गुहेच्या थोड पुढे एक सुकलेल टाकं देखील बघायला मिळत.

गिर्यारोहणाच सामान न वापरता आपण तैलबैलाच्या खिंडीत जाऊन वरील ठिकाणे पाहू शकतो.

तैलबैलाच्या दक्षिण दिशेकडे पसरलेल्या कातळ भिंतीवर चढाई करण्यासाठी खिंडीतल्या गुहेच्या उजवीकडून रोपच्या सहाय्याने चढाईची सुरुवात करावी. दक्षिण दिशेकडे पसरलेली ही कातळभिंत अर्ध्यापर्यंत चढून गेल्यावर, डाव्या बाजूला थोड्याच अंतरावर कातळात खोदलेल्या ४ ते ५ पायर्‍या आहेत. त्या पायर्‍या चढून गेल्यावर एक गुहा लागते. गुहेमध्ये साधारण ४-५ माणसं नीट बसू शकतात. या गुहेवरून तसेच पुढे चालत गेल्यावर कातळावर ३ गिरीदेवातांच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात. त्यापुढे दुसरी गुहा आहे. गुहेच्या पुढे स्वछ व पिण्यायोग्य असे पाण्याचे खांब टाके आहे. हे टाके ओलांडून कातळावरून पुढे गेल्यावर १०-१५ पावलांवर दुसरे टाके आढळून येते.

हे सर्व पाहून परत दुसर्‍या गुहेच्या बाजूस असलेल्या टाक्यापाशी येऊन रोपच्या सहाय्याने वरचा कातळ चढून गेल्यावर डाव्या बाजूस कातळात खोदलेल्या पायर्‍या दिसून येतात. या पायर्‍यांवरून थोडा चढ चढल्यावर आपण भिंतीच्या माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर बर्‍यापैकी सपाटी असून, डावीकडील टोकापर्यंत जायला एक वाट आहे. तेथे १-२ जांभूळची झाडे आहेत. परंतु बाकी पूर्ण परिसरात एकही झाड दृष्टीस पडत नाही.

उत्तर दिशेकडे पसरलेल्या कातळभिंतीच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी मात्र पूर्णपणे गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. या भिंतीच्या मध्ये दक्षिणेकडील भिंतीप्रमाणे कुठेही गुहा किंवा पाण्याचे टाके नाही. 

तैलबैलाच्या दोन्ही भिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे तंत्र पूर्णपणे अवगत असणे आणि गिर्यारोहणाचे सामान असणे अत्यावशक आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
तैलबैला गावात पोहोचण्यासाठी प्रथम मुंबई / पुणे येथून लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भांबुर्डे कडे जाणारी एस. टी पकडावी. पेठशहापूर (हे कोरीगडाच्या पायथ्याचे गाव आहे.) येथून तैलबैलाचा फाटा अंदाजे ८.५ किमी अंतरावर आहे. मुख्य रस्त्यावरून उजव्या बाजूला वळणार्‍या रस्त्यावर तैलबैला असा फलक लावलेला आहे. या फाट्यावर उतरावे. फाट्यापासून तैलबैला हे गाव साधारण ३ किमी अंतरावर असून, हे अंतर पायी १५ ते २० मिनिटात कापून आपण गावामध्ये पोहोचतो. लोणावळा बस स्थानकातून संध्याकाळी तैलबैला गावासाठी थेट बस सुटते. ती बस रात्री तैलबैला गावात थांबून सकाळी परत जाते.

खाजगी वहानाने तैलबैलाच्या पायथ्याशी असणार्‍या तैलबैला गावात जाण्यासाठी प्रथम लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भूशी डॅम, आय.एन.एस.शिवाजी मार्गे Aamby Valley च्या दिशेने जावे. लोणावळ्यापासून २० किमीवर असलेल्या पेठशहापूर गावातून (हे कोरीगडाच्या पायथ्याचे गाव आहे) उजव्या बाजूचा फाटा भांबुर्डे गावाकडे जातो. येथून भांबुर्डेकडे जाणारा रस्ता पकडावा. या खडबडीत डांबरी रस्त्याने ८.५ किमी गेल्यावर तैलबैला गावात जाणारा फाटा लागतो. या फाट्यापासून तैलबैला हे गाव साधारण ३ किमी अंतरावर आहे.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही. पण तैलबैला गावात किंवा गावात असलेल्या हनुमान मंदिरामध्ये रात्री पुरती रहाण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
खिंडीमध्ये असलेल्या गुहेत बारामाही पाण्याचे टाके असून त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
सूचना :
जून ते ऑक्टोबर गडावर जाणे टाळावे.
१) तैलबैला सर करण्यासाठी गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे व साहित्य बरोबर असणे असणे आवश्यक आहे.
२) सोबत २- ३०० फूटी दोर घेतल्यास कातळटप्पे चढता उतरताना खोळंबा होत नाही.
श्रेणी: Very difficult
 अलंग (Alang)  औंढा (अवंध) (Aundha)  भैरवगड (मोरोशी) (Bhairavgad(Moroshi))  चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक (Chandragad to Arthur seat)
 गडगडा (घरगड) (Gadgada (Ghargad))  लिंगाणा (Lingana)  मदनगड (Madangad)  मलंगगड (Malanggad)
 पदरगड (Padargad)  सांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat)  तैलबैला (Tailbaila)