मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

वेताळवाडी गड (Vetalwadi gad) किल्ल्याची ऊंची :  1900
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अजंठा
जिल्हा : औरंगाबाद श्रेणी : मध्यम
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात वेताळगड उर्फ वसईचा किल्ला या नावाचा सुंदर किल्ला आहे. या किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुज व यावरील इमारती आजही शाबूत आहेत. त्यामुळे हा किल्ला पहातांना एक परीपुर्ण किल्ला पाहील्याचे समाधान मिळते. वेताळगड जवळच्या डोंगरात असलेली रुद्रेश्वर लेणीही पहाण्यासारखी आहेत.


Vetalwadi Fort
50 Photos available for this fort
Vetalwadi gad
Vetalwadi gad
Vetalwadi gad
पहाण्याची ठिकाणे :
वेताळगड किल्ल्याच्या एका बाजूला हळदा घाट रस्ता झाल्यामुळे या मार्गाने आपण जवळ जवळ किल्ल्याच्या प्रवेशव्दारात पोहोचतो. प्रथम दोन भव्य बुरुज आपले स्वागत करतात. त्यांच्या मागे या या दोन बुरुजां पेक्षा उंच व भव्य बुरुज आहे. त्याला नक्षीदार सज्जा आहे. दरवाजा पर्यंत पोहोचलेल्या शत्रूवर थेट हल्ला करण्यासाठी या बुरुजाची रचना केलेली आहे. दोन बुरुजांमधून फरसबंदी केलेली वाट काटकोनात वळून उत्तराभिमुख प्रवेशव्दाराकडे जाते. या प्रवेशव्दाराचे तोंड जंजाळा किल्ल्याकडे असल्यामुळे याला "जंजाळा दरवाजा" म्हणत असावेत. दरवाजाची उंची २० फूट असून त्याच्या दोन बाजूस शरभ शिल्प कोरलेली आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. दरवाजाच्या वर जाण्यासाठी जीना आहे. या जीन्याने वर गेल्यावर दरवाजाच्या छतावर एक चौकोनी खाच केलेली आहे. त्यातून उतरणारा जीना आपल्याला एका मोठ्या खोलीत घेऊन जातो. दरवाजावर उभे राहील्यावर आपल्याला लांबवर पसरलेली तटबंदी, त्या खालचा हळदा घाट व सर्वात खाली वेताळवाडी धरण पहायला मिळते. तर वरच्या बाजूला बालेकिल्ल्याची तटबंदी पहायला मिळते.

प्रवेशव्दारावरून खाली उतरून उजव्या बाजूला थोडेसे वर चढल्यावर एक कोरडे खांब टाके लागते. ते पाहून पुन्हा दरवाजापाशी येऊन तटबंदी उजव्या हाताला ठेऊन चालू लागल्यावर उजव्या बाजूस भव्य बुरुजात जाण्याचा प्रवेश मार्ग दिसतो. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वटवाघळे असल्यामुळे आत शिरता येत नाही. थोड पुढे गेल्यावर आपण तटबंदीतील पूर्व टोकाच्या बुरुजापाशी पोहोचतो. येथून दरी उजव्या हाताला ठेऊन चढत गेल्यावर आपण ५ मिनिटात बालेकिल्ल्यावर पोहोचतो. बालेकिल्ल्याच्या पूर्व बुरुजाजवळ एक छोटी घुमट असलेली इमारत आहे. या इमारतीच्या छ्ताला एक झरोका आहे. येथून तटबंदीवर चढून मधल्या बुरुजापर्यंत चालत जावे. मधल्या बुरुजावरून खाली उतरून सरळ चालत गेल्यावर आपल्याला जमिनीत बांधलेले तेल तुपाचे टाक पहायला मिळत. या टाक्याच्या बाजूला धान्य कोठाराची इमारत आहे. या इमारतीच्या समोर एक भग्न इमारत आहे. पुढे गेल्याव्रर नमाजगीर नावाची इमारत (मस्जिद) आहे. त्याच्या भिंतीवर निजामाचे चिन्ह व त्याखाली क्रॉस कोरलेला आहे. नमाजगीरच्या उजव्या बाजूला कोरीव दगड बसवलेली कबर आहे. नमाजगीरच्या समोर तलाव आहे.

किल्ल्याच्या उत्तर टोकावर बारदरी नावाची २ कमान असलेली इमारत दुरुन नजरेत भरते. या इमारतीकडे जातांना डाव्या बाजूला एक इमारत आहे. बारादरी ही किल्ल्याच्या उत्तर टोकाला आहे. या इमारतीत २ कमानींच्या दोन रांगा आहेत. राजघराण्यातील लोकांना उन्हाळ्यात हवा खाण्यासाठी अशी इमारत देवगिरी किल्ल्यावरही बांधलेली आहे. बारादरीतून खालच्या बाजूस किल्ल्याचा मुख्य दरवाजा व त्याखालील वेताळवाडी गाव दिसते.

किल्ल्याच्या मुख्या दरवाजाकडे जाण्यासाठी बारादरी पासून थोडे मागे येऊन खाली उतरावे पुढे ही वाट बारादरी खालून उतरत खाली जाते. येथे एक बुजलेले टाके आहे. त्याच्या बाजूला ६ फूट १० इंच लांबीची तोफ पडलेली आहे. उजव्या बाजूच्या तटबंदीत चोर दरवाजा आहे. दोन बुरुजात बसवलेले किल्लाचे मुख्य प्रवेशव्दार उत्तराभिमुख आहे. प्रवेशव्दार २० फूट उंच असून त्याच्या दोनही बाजूला शरभ शिल्प कोरलेली आहेत. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. दुसरे प्रवेशव्दार पश्चिमाभिमुख आहे. हे प्रवेशव्दार पाहीले की आपली गड फेरी पूर्ण होते. येथून २० मिनिटात आपण वेताळवाडी गावात पोहोचतो.


रुद्रेश्वर लेणी :- वेताळवाडीच्या पूर्वेला असलेल्या डोंगरात रुद्रेश्वर लेणी आहेत. ही हिंदू (ब्राम्हणी) लेणी असून यात नरसिंह, गणेश, भैरव व सप्तमातृका यांची शिल्पे आहेत. याशिवाय लेण्यात शिवलिंग व नंदी आहे. वेताळवाडीतून रुद्रेश्वर लेण्यांपर्यंत जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :
स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून २ मार्गांनी जंजाळा गडावर जाता येते.
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडच्या पुढे १४ किमीवर गोळेगाव आहे. गोळेगावच्या अलिकडे डाव्याबाजूस उंडणगावाकडे जाणारा फाटा फूटतो. येथून उंडणगाव ५ किमीवर आहे. उंडणगावहुन १२ किमीवर हळदा गाव आहे. हळदा गावापुढे घाट सुरु होतो. या घाटातच हळद्यापासून ३ किमी अंतरावर वेताळवाडी किल्ला आहे. घाट चढल्या पासूनच वेताळवाडी किल्ला दिसू लागतो. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ न उतरता किल्लासुरु होतो तेथे उतरावे. इथून पायवाट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाते.

२) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. सोयगाव ते वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावातून किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.

स्वत:चे वहान नसल्यास / गडा खालील जरंडी व वेताळवाडी गावातून पायी गड चढण्यासाठी
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर - चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. येथे येण्यासाठी औरंगाबादहून थेट एसटी सेवा आहे. सोयगाव - वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावात जाण्यासाठी सोयगावहून एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय गडावर नाही, सोयगावातील हॉटेलांत होऊ शकते.
पाण्याची सोय :
गडावर पिण्यायोग्य पाणी नाही. पाणी बरोबर बाळगावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) वेताळवाडी गावातून गडावर जाण्यासाठी ४५ मिनीटे लागतात. २) हळदा घाट रस्त्यावरून गडावर जाण्यासाठी १० मिनीटे लागतात.
सूचना :
१) स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून पहाटे निघून जंजाळा किल्ला , घटोत्कच लेणी, वेताळगड व रुद्रेश्वर लेणी एका दिवसात पहाता येतात.
२) जंजाळा किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: V
 वैराटगड (Vairatgad)  वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur))  वर्धनगड (Vardhangad)
 वारुगड (Varugad)  वसई (Vasai)  वसंतगड (Vasantgad)  वासोटा (Vasota)
 वेताळगड (Vetalgad)  वेताळवाडी गड (Vetalwadi gad)  विजयदुर्ग (Vijaydurg)  विजयगड (Vijaygad)
 विलासगड (Vilasgad (Mallikarjun))  विसापूर (Visapur)  विशाळगड (Vishalgad)