मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

विजयगड (Vijaygad) किल्ल्याची ऊंची :  400
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रत्नागिरी श्रेणी : मध्यम
जयगड खाडी जेथे समुद्राला मिळते त्या ठिकाणी दोन किल्ले बांधलेले आहेत. खाडीच्या उत्तर तीरावर असलेला विजयगड किल्ला आणि खाडीच्या दक्षिण तीरावर असलेला जयगड किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभे आहेत. जयगड खाडी मार्गे चालणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. रत्नागिरी किंवा गुहागर येथून हे दोन्ही किल्ले एका दिवसात पाहून होतात.
12 Photos available for this fort
Vijaygad
Vijaygad
Vijaygad
पहाण्याची ठिकाणे :
तवसाळ गावातून तवसाळ जेट्टीला जाण्यासाठी घाट उतरायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला विजयगड किल्ल्याचा भव्य बुरुज दिसतो. यावर भगवे झेंडे लावलेले आहेत. या बुरुजा पासून डोंगर उतारावर तटबंदी किनार्‍या पर्यंत बांधलेली आहे. बुरुज उजव्या बाजूला ठेऊन औढे गेल्यावर कोसळलेल्या तटबंदीतून किल्ल्यात उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच दोन उध्वस्त वास्तूंचे प्रशस्त चौथरे दिसतात. चौथरे पाहून पुढे बुरुजाला लागून किनार्‍यापर्यंत उतरत गेलेल्या तटबंदीच्या दिशेने जाऊन तटबंदीच्या बाजूने खाली उतरल्यावर समोर दगडात कोरलेली वैशिष्ट्यपूर्ण विहिर आहे. विहिरीच्या पुढे डाव्या बाजूला उध्वस्त वास्तूंच्या भिंती पाहायला मिळतात. या वास्तूं मधून किल्याच्या डाव्या बाजूच्या तटबंदी पर्यंत जाता येते. येथून खालच्या बाजूला तवसाळ बीच दिसतो. आल्या मार्गाने पुन्हा विहिरीपाशी येउन विहिरीला वळसा घालून पुढे गेल्यावर आपण तटबंदीवर पोहोचतो. किल्ल्याला दोन बाजूला किनार्‍यापर्यंत उतरत जाणार्‍या तटबंदी आहेत तशाच ठराविक अंतरावर आडव्या तटबंद्यां आहेत. यशवंतगड (नाटे) किल्ल्यावरही अशा प्रकारची रचना आढळून येते. तटबंदी वरुन डाव्या बाजूला चालत गेल्यावर आपण थोड्या वेळापूर्वी ज्या तटबंदीवरुन तवसाळ किनारा पाहिला होता त्याच्या बाहेरच्या बाजूला येतो. येथे तटबंदीला लागून चौकोनी बांधीव तलावासारखी रचना केलेली आहे. कदाचित यात पाणी साठवत असावेत.

येथून आल्या मार्गाने तटबंदीवर यावे. तटबंदीतून खाली दाट झाडी दिसते. या झाडीत एक फ़ट आहे. त्यातून एक निसरडी पायवाट खाली उतरते. यावाटेने थोडे अंतर गेल्यावर झाडी दाट होत जाते. सध्या तरी पुढे मार्ग नसल्याने आल्या मार्गाने पुन्हा किल्ला चढून बुरुजापाशी आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते.

पोहोचण्याच्या वाटा :
१) मुंबई - चिपळूण - शृंगारतळी - तवसाळ यामार्गाने तवसाळ गाठावे. तवसाळ जेट्टीकडे जाणार्‍या रस्त्यावर घाट उतरायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला विजयगड किल्ल्याचा भव्य बुरुज दिसतो. येथूनच सध्या किल्ल्यात जाण्याचा मार्ग आहे.

२) गुहागर मार्गे :- गुहागर जवळ गोपाळगड (अंजनवेलचा किल्ला) आहे. तो पाहून गुहागर- वेळणेश्वर - हेदवी मार्गे तवसाळ (अंतर ४८ किलो्मीटर) गाठाता येते. गुहागर ते नरवण दर तासाला एसटी बस आहेत. या बसने नरवण पर्यंत जाऊन पुढे रिक्षाने तवसाळ जेट्टीकडे जाण्याच्या रस्त्यावर (अंतर ६ किलोमीटर) रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या विजयगडच्या बुरुजापर्यंत जाता येते. पण नरवण पासून विजयगडचे भाडे रिक्षावाले अव्वाच्या सव्वा सांगतात. त्यापेक्षा खाजगी गाडीने वरील सर्व ठिकाणे पाहून विजयगड आणि जयगड हे किल्लेही एका दिवसात पाहून होतात.

३) रत्नागिरी मार्गे :- रत्नागिरी- गणपतीपुळे मार्गे जयगड अंतर ५३ किलोमिटर आहे. रत्नागिरीहून खाजगी वाहानाने किंवा एसटीने जयगड किल्ल्यावर जाता येते. जयगड किल्ला पाहून बोटीने पलिकडील काठावर असलेले तवसाळ गाठावे. तवसाळ जेट्टीपासून १ किलोमीटरवर विजयगड किल्ल्याचा भव्य बुरुज रस्त्यालगतच आहे.
खाजगी वहान असल्यास रत्नागिरीहून जयगड किल्ला पाहून गाडी बोटीने खाडी पलिकडे जाता येते. तेथुन विजयगड किल्ला पाहून गुहागर मार्गे अंजनवेल (गोपाळगड) किल्ला पाहात येतो. मुक्काम गुहागर, वेळणेश्वर किंवा चिपळूण येथे करता येईल.
राहाण्याची सोय :
राहाण्याची सोय वेळणेश्वर, हेदवी येथे आहे.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय वेळणेश्वर, हेदवी येथे आहे.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पाणी नाही.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
नोव्हेंबर ते मे
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: V
 वैराटगड (Vairatgad)  वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur))  वर्धनगड (Vardhangad)
 वारुगड (Varugad)  वसई (Vasai)  वसंतगड (Vasantgad)  वासोटा (Vasota)
 वेताळगड (Vetalgad)  वेताळवाडी गड (Vetalwadi gad)  विजयदुर्ग (Vijaydurg)  विजयगड (Vijaygad)
 विलासगड (Vilasgad (Mallikarjun))  विसापूर (Visapur)  विशाळगड (Vishalgad)