भिवगड / भिमगड
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Bhivgad(Bhimgad)
प्रस्तावना
मुंबई - पुण्याहून एका दिवसात करता येण्यासारखा सोपा किल्ला म्हणजे भिवगड उर्फ भिमगड. कर्जत जवळील वदप व गौरकामत गावामागे छोट्याश्या टेकडीवर हा किल्ला आहे. ‘‘ढाक’’ ला जाण्याचा एक मार्ग वदप गावातून आहे. या मार्गावर भिवगडच्या खिंडीत पोहचल्यावर उजव्या बाजूची वाट ‘‘ढाक’’ला जाते, तर डाव्या बाजूची वाट भिवगडावर जाते.
भिवगड छोटा किल्ला असल्यामुळे गौरकामत गावातून चढुन किल्ला पाहुन वदप गावात उतरल्यास छान छोटा ट्रेक होतो व किल्ला पूर्ण पाहून होतो.
महत्त्वाची ठिकाणे
गौरकामत गावातून किल्ल्यावर चढाई करताना कातळात खोदलेलं पाण्याच टाक दिसते. या टाक्याच्या डाव्या बाजूला कातळात कोरलेल्या पायर्यांचा मार्ग आहे. या पायर्या चढतांना उजव्या बाजूला उंचावर दोन गुहा दिसतात. या गुहां जवळ चढून जाण्यासाठी दगडात खोबण्या खोदलेल्या आहेत. पहिल्या गुहेच्या बाहेर एक वीरगळ आहे. दुसरी गुहा पहिल्या गुहे पेक्षा थोडी वरच्या बाजूला आहे. तिथे जाण्यासाठी कातळात पायर्या कोरलेल्या आहेत. या दोन्ही गुहांचा उपयोग किल्ल्यावर येणार्या वाटांच्या टेहळणीसाठी होत असावा. सध्या दोन्ही गुहेत वटवाघुळांचा वावर आहे. गुहा बघुन पुन्हा पायर्यांच्या मार्गावर आल्यावर ५ मिनिटात आपण उध्वस्त प्रवेशव्दारापाशी येतो. येथे तटबंदीचे अवशेष दिसतात. प्रवेशव्दारा जवळील पायर्या घडीव दगडांच्या आहेत.
उध्वस्त प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच एक खांब टाक पाहायला मिळते. याठिकाणी स्थानिक गावकरी पूजा करतात. टाक्याच्या बाजूने वर चढून गेल्यावर दोन पायवाटा फ़ुटतात. उजव्या बाजूची वाट किल्ल्याच्या उत्तर दिशेकडील टोकाकडे जाते. या ठिकाणी भगवा झेंडा लावलेला आहे. या टोकावरुन खाली गौरकामत गाव आणि गावातून गडावर येणारी वाट दिसते. उत्तर टोक पाहून पुन्हा वाटेवर येऊन सरळ चालत गेल्यावर ५ मिनिटात एक डावीकडे जाणारी एक वाट दिसते. यावाटेने चालत गेल्यावर आपण दोन टाक्यांपाशी पोहोचतो. यातील एक खांब टाक असून त्यात पाणी आहे. तर दुसरे टाकं कोरडे आहे. या टाक्यावरुन एक वाट पुढे वदप मार्गावरील टाक्याकडे जाते. तिथे न जाता किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावरील अवशेष पाहाण्यासाठी आल्या मार्गाने पुन्हा मुळ पायवाटेवर येऊन २ मिनिटे चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो. इथे पाण्याची दोन टाकी आहेत. यातील मोठ्या टाक्या जवळ वाड्याचे जोतं आहे. या जोत्याच्या बाजूला असलेल्या पायवाटेने पुढे गेल्यावर वाट खाली उतरायला लागते. येथून खालच्या बाजूला एक खिंड दिसते. या खिंडीतून वदपला जाणारी वाट उतरते. खिंडीतून समोरच्या डोंगरावर चढणारी पायवाट ही ढाक किल्ल्यावर जाणारी वाट आहे.
पायवाटेने खिंडीच्या दिशेने उतरायला सुरुवात केल्यावर घरांची जोती पहायला मिळतात. पायवाटेच्या डाव्या बाजूला एक पाण्याचे टाक आहे. हे टाक पाहून थोडे पुढे चालत गेल्यावर तटबंदीचे अवशेष दिसतात. तटबंदी ओलांडून पुढे उतरत गेल्यावर ५ मिनिटात आपण एका खंदकापाशी पोहोचतो. हा मानव निर्मित खंदक आहे. ढाकच्या डोंगर रांगेपासून किल्ल्याला वेगळा करण्यासाठी हा खंदक खोदलेला होता. खंदक ओलांडून ५ मिनिटे उतरल्यावर आपण खिंडीत पोहोचतो. या खिंडीतून ३ वाटा फ़ुटतात एक वदप गावात , दुसरी, भिवगड/ भिमगडकडे तर तिसरी वाट ढाक किल्ल्याकडे जाते. या खिंडीतून उतरणार्या मळालेल्या वाटेने १५ मिनिटात वदप गावात उतरता येते. गौरकामत गावातून चढून किल्ला पाहून वदप गावात उतरण्यासाठी २ ते २.५ तास पुरतात.
कसे पोहोचावे
कर्जतहून ७.५ कि.मीवर वदप गाव आहे. वदपच्या पुढे १ कि.मीवर गौरकामत गाव आहे. या दोन गावांच्या मध्ये भिवगड आहे.
वदप गावा मार्गे :- वदपच्या धबधब्याच्या फाटा सोडल्यावर पुढे उजव्या हाताला एक रस्ता गावातील् घरांमधून् भिवगडकडे जातो. रस्ता संपल्यावर मळलेल्या पायवाटेने भिवगड डावीकडे ठेवत १५ मिनिटे चढल्यावर आपण भिवगडच्या खिंडीत येतो. येथे दोन वाटा फुटतात उजव्या बाजूची वाट ‘ढाक किल्ल्याकडे’ तर डाव्या बाजूची वाट भिवगडवर जाते. खिंडीतुन १० मिनिटात गडावर जाता येते.
गौर कामत गावा मार्गे :- गौरकामत गावातील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या समोरील रस्ता गावातील घरांमधून भिवगडकडे जातो. गावा बाहेर पडून कच्च्या रस्त्याने ५ मिनिटे चालल्यावर , उजवीकडे एक पायवाट खिंडीत जाते. या पायवाटेने खिंडीत पोहोचल्यावर खिंडीत उतरलेल्या भिवगडाच्या डोंगराच्या सोंडेवरुन भिवगडवर २० मिनिटात जाता येते.
कर्जतला उतरल्यावर ,कर्जत पूर्वेला (फलाट क्रमांक ४ च्या बाजूला) बाहेर पडल्यावर गौरकामत पर्यंत जाण्यासाठी टॅक्सी मिळतात.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ गौरकामत व वदप गावातून ३० मिनिटे लागतात.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
गडावर रहाण्याची सोय नाही, पण वदप गावात रहाण्याची सोय होऊ शकते.
अन्न व्यवस्था
गडावर जेवणाची सोय नाही, पण वदप गावात जेवणाची सोय आहे.
पाणी उपलब्धता
गडावरील टाक्यात जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पाणी असते.
सर्वोत्तम काळ
🌤️ वर्षभर
जवळील गावे
गौरकामत व वदप
या परिसरातील इतर किल्ले कर्जत
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.