माहुली
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Pinacle groups from Vashind village
प्रस्तावना
ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात आसनगावाजवळ एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली - भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाण कोणाही निसर्गप्रेमी माणसाला आपल्या निसर्गसौंदर्याने वेड लावते. अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो. माहुलीचे दोन खोगिरामुळे तीन भाग पडले आहेत उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड. या तीन गडांमुळे माहुलीचे ठाणे अभेद्य झाले होते.त्यामुळेच निजामशाही वाचवण्यासाठी शहाजी महाराजांनी माहुली गडाचाच आधार घेतला.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
या किल्ल्याची मूळ उभारणी कोणी केली, हे ज्ञात नाही. पण १४८५ च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजाम शाहीच्या संस्थापक असलेल्या मलिक अहमद याच्याकडे आले. पुढे शहाजीराजे निजामशाहीचे संचालक बनल्यावर दिल्लीच्या मोगल फौजा व आदिलशाही सेना संयुक्तपणे निजामशाही बुडवण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. १६३५- ३६ च्या सुमारास शहाजींनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून जुन्नर , शिवनेरीहून जिजाबाई व बाळ शिवाजीसह माहुलीला मुक्काम हलवला. खानजमान म्हणजे महाबतखानाच्या मुलाने माहुलीला वेढा दिला. शहाजीराजांनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली, पण त्यांनी नकार दिला असता शहाजींनी शरणागती पत्करली.
पुढे १६५८ मध्ये ८ जानेवारी रोजी शिवरायांनी हा किल्ला मोगलांकडून परत मिळवला. पण १६६१ मध्ये तो मोगलांना परत द्यावा लागला. लगेच तो परत जिंकून घेतला गेला. १६६५ च्या पुरंदरच्या तहात हे दुर्गत्रिकुट परत गमवावे लागले. त्यानंतर मोगलांचा मनोहरदास गौड हा धोरणी कर्तबदार सरदार माहुलीवर कारभार पाहू लागला. त्याने गडावर बरेच बांधकाम करून घेतले. फेब्रुवारी १६७० मध्ये खुद्द शिवाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली माहुलीवर केलेला हल्ला अयशस्वी ठरला. दीड हजार मराठी मावळ्यांपैकी तब्बल हजार मावळे मोगलांनी कापून काढले. मराठ्यांचा दणदणीत पराभव झाला. या यशानंतरही मनोहरदास गौडने किल्लेदारी सोडली. त्याच्या जागी अलाविर्दी बेग हा नवा किल्लेदार रुजू झाला. नंतर १६ जून १६७० रोजी दोन महिन्यांच्या वेढ्या नंतर मोरोपंत पिंगळ्यांनी माहुली, पळसगड व भंडारगड हे त्रिकूट स्वराज्यात सामील करून घेतले. संभाजी महाराजांच्या असे पर्यंत मोगलांना हा किल्ला जिंकता आला नाही, पण त्यांच्या वधानंतर व्दारकोजी या किल्लेदाराने फितुरीने किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला व त्यांची चाकरी पत्करली. त्यानंतर प्रयत्न करूनही मराठ्यांना हा किल्ला १७३५ पर्यंत जिंकता आला नाही. गडावर हल्ला चढवून गड घेणे अवघड असल्यामुळे भेदनीतीचा वापर करुन गड ताब्यात घेतला.पुढे दुसर्या बाजीरावाने जून १८५७ मध्ये इंग्रजांशी झालेल्या तहानुसार माहुली किल्ला इंग्रजांच्या ताब्यात दिला.
महत्त्वाची ठिकाणे
आसनगाव मार्गे माहुली गावातून शिडीच्या वाटेने किल्ल्यावर आल्यावर समोरच पाण्याची दोन टाकी आहेत. येथून तीन वाटा फुटतात. येथून उजवीकडील वाट महादरवाजा व पळसदुर्गाकडे जाते, डावीकडची वाट तळ्याकडे व भंडारदुर्गाकडे जाते आणि समोर जाणारी वाट नमाजपीर म्हणून ओळखल्या जाणार्या भिंतीकडे जाते. प्रथम उजवीकडे वळून महादरवाजाकडे जातांना आणखी एक पाण्याचे टाके आहे. टाक्यापासून उजवीकडे गेल्यावर पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. समोरच ढासळलेल्या अवस्थेतला महादरवाजा आहे. येथून खाली जाणार्या पायर्या तुटलेल्या आहेत. इथून भातसा राशी, अलंग, मदन, कुलंग व कळसूबाई पर्वतरांग दिसते. तर पूर्वेला हरिश्चंद्रगड, आजोबा, दक्षिणपूर्वेला माथेरान रांग, दक्षिण पश्चिमेला तानसा खोरे, तुंगारेश्वर रांग असलेला प्रचंड मुलूख दिसतो.
शिडीच्या वाटेने आल्यावर डावीकडे एक वाट जंगलात जाते. वाटेतच छप्परवजा असणारे महादेवाचे (माहुलेश्वराचे) मंदिर आहे. जवळच वाड्यांचे काही अवशेष आढळतात. समोर पाण्याचा फार मोठा तलाव आहे. पुढे गेल्यावर एक स्त्रीशिल्प पाहायला मिळते. पुढे जांभळाचे रान लागते. ही वाट खिंडीत जाऊन पोहोचते. ही खिंड म्हणजे माहुली आणि भंडारगड दरम्यानची खिंड आहे. खिंडीच्या थोडे वर गेल्यावर उजव्या बाजूस ५०० ते ६०० फूट खाली उतरल्यावर कड्यालगतच कल्याण दरवाजा आहे. या दरवाज्यातून भंडारगडावर जायचे झाल्यास प्रस्तरारोहणाची गरज पडते. खिंडीतून वाटेने वर चढत गेल्यावर झाडीमध्ये बारमही पाण्याचं भुयारी टाके आहे येथून पुढे जाणारी वाट गडाच्या दक्षिण टोकापाशी म्हणजेच भंडारगडावर घेऊन जाते.
भंडारगडावरुन समोरच उभे असणारे भटोबा, नवरा व नवरीचे सुळके दिसतात समोरच उजवीकडे असणार्या डोंगररांगेवर वजीरचा सुळका दिसतो. सभोवतालच्या परिसराचे दृश्य अतिशय रमणीय असते.
कसे पोहोचावे
१ आसनगाव मार्गे :-
मुंबई - नाशिक लोहमार्गावरील आसनगाव गाठावे. इथून ५ किमी अंतरावरील गडाच्या पायथ्याशी असणार्या माहुली या गावी पायी अथवा रिक्षाने जाता येते. गडाच्या पायथ्याशी महादेवाचे सुंदर मंदिर आहे. रात्री तेथे राहण्याची सोय होते. इथून उजवीकडे एक ओढा पार करून ३ किमी चा खडा चढ चढून जावे लागते. वाटेत एक लोखंडी शिडी आहे, ती पार करून वर गेल्यावर समोरच पाण्याची दोन टाकी दिसतात. या वाटेने गडावर जाण्यास २ तास लागतात.
२ वाशिंद मार्गे :-
लोकलने किंवा एस्टी ने वाशिंदला उतरावे. उत्तरेला दहागाव आणि पुढे चाप्याचा पाडा गाठावा. चंदेरीचा डोंगर उजवीकडे ठेवून माहुलीच्या दक्षिण टोकापासून निघालेल्या व पश्चिमेला पसरलेल्या सोंडेवर चढावे. सोंडेवरून नवरानवरी सुळके उजवीकडे ठेवत अवघड श्रेणीचा कातळटप्पा चढून कल्याण दरवाजाने भंडारगडावर प्रवेश करावा. कल्याण दरवाजावर एक शिलालेख आढळतो. ही वाट खूप अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे साहित्य जवळ असणे आवश्यक आहे.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ आसनगाव मार्गे दोन तास लागतात. कल्याण दरवाजा मार्गे ६ ते ८ तास लागतात.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
किल्ले माहुलीवर रहाण्यासाठी पहारेकर्यांच्या देवड्या आहेत, पण शक्यतो हा ट्रेक एक दिवसाचाच करावा
अन्न व्यवस्था
किल्ल्यावर जेवणाची सोय आपणच करावी.
पाणी उपलब्धता
किल्ले माहुलीवर पहारेकर्यांच्या देवड्यांसमोर पाण्याचे टाके आहे. येथील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. भंडारगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे तेथे असताना पाण्याचा साठा जवळ ठेवावा.
सर्वोत्तम काळ
🌤️ N/A
अतिरिक्त माहिती
भंडारगड व पळसदुर्गाची माहीती साईटवर दिलेली आहे.
जवळील गावे
आसनगाव,माहुली
या परिसरातील इतर किल्ले माहुली
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.