मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

चंदन वंदन (Chandan-vandan) किल्ल्याची ऊंची :  3800
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सातारा
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
कथा आणि कादंबर्‍यांमध्ये जुळ्या भावा विषयी आपण नेहमीच वाचत असतो. मात्र दुर्गविश्वातही अशी जुळी भावंडे आढळतात. त्यांच्यापैकीच एक चंदन-वंदन किल्ले आहेत.सातार्‍याच्या अलीकडे २४ कि.मी अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे. ऊसाच्या पिकामुळे हा सर्व परिसर सधन झालेला आहे. त्यामुळे रस्ते, वीज, एस्‌टी या सर्व प्राथमिक सुविधा गावा गावां पर्यंत पोहोचल्या आहेत. सपाट माथा असल्यामुळे, पुणे - सातारा मार्गावरून हे किल्ले सहजच ओळखता येतात. यांच्या पूर्वेस जरंडेश्वर, कल्याणगड (नांदगिरी), भवानीचा डोंगर, पश्चिमेस वैराटगड, पांडवगड एका बाजूस महाबळेश्वर प्रांत तर दुसरीकडे सातारा शहर यांच्या सीमेवर हे किल्ले उभे आहेत.
7 Photos available for this fort
Chandan-Vandan
Chandan-vandan
Chandan-vandan
Chandan-vandan
Chandan-vandan
इतिहास :

इ.स ११९१ - ११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. १६५९ च्या सुमारास शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत यांना देखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत सन १६८५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात अमानुल्ला खानाने चंदनवंदन येथे असणार्‍या मराठ्यांच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत मोघलांच्या हातात २५ घोडी, २० बंदुका, २ निशाणे, १ नगारा सापडला. पुढे १६८९ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला. छत्रपती शाहुमहाराजांनी सन १७०७ मध्ये पावसाळ्यात हा प्रदेश जिंकून घेतला. पुढे सन १७५२ मध्ये ताराबाइवर लक्ष ठेवण्यास पुरेसा फौजफाटा देऊन बाळाजी विश्वनाथांनी या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केली.
पहाण्याची ठिकाणे :
चंदनच्या प्रवेशद्वाराजवळील रस्ता पूर्वी बराच कठीण होता. मात्र सध्या तेथे असलेल्या मशिदीमुळे हा रस्ता बराच रुंद झाला आहे. दोन अर्धवट पडलेले बुरूज आपणास प्रवेशद्वाराची जाणीव करून देतात. येथून साधारण १५ पायर्‍या चढून गेले असता, डाव्या बाजूस एक पडकी वास्तू दिसते. तिच्या वरच्या अंगास एक वडाचे झाड आहे. पाच वडांचा मिळून बनलेला असल्यामुळे त्यास ‘पाचवड‘ म्हणतात. बाजूलाच एक शंकराचे मंदिर आहे. यातील दोन्ही महादेवाच्या पिंडी या पाच लिंगांच्या आहेत. ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. श्रावणात येथे यात्रा असते (येथून दहा एक पायर्‍या चढून गेल्यावर समोरच मोठ्या शिळा रचलेल्या दिसतात ).

चंदनप्रमाणेच येथेही एक दर्गा आहे. दर्ग्याच्या बाजूस एखाद्या वाड्याच्या भिंतीसारखे बांधकाम आढळते. एका अर्धवट दरवाज्यासारखे काहीतरी दिसते. साधारण सदरेसारखे येथील बांधकामाचे अवशेष दिसतात. याच्या मागील भागात सुद्धा अनेक उद्‌ध्वस्त अवशेष आपणास दिसतात. हीच गडावरील मुख्य वस्ती असावी. गडाच्या उत्तर टोकावर मजबूत बांधणीचा अगदी सुस्थितीत असलेला एक बुरूज आढळतो. याच वाटेवर एक समाधी आढळते, याच्या वरील बाजूस अस्पष्ट असे शिवलिंग आहे आणि एका बाजूस मारुतीची मूर्ती आहे. गडाच्या दक्षिणेकडे तीन कोठ्या असलेली पण वरचे छप्पर उडालेली वास्तू आढळते. गावकर्‍यांच्या मते हे कोठार म्हणजे दारूगोळा साठवण्याची जागा होती. गडाच्या मध्यभागी प्रशस्त चौथरा आहे. यावर काय वास्तू होती याचा मात्र अंदाज लागत नाही
पोहोचण्याच्या वाटा :
चंदन आणि वंदन या दोन्ही किल्ल्यांवर जाणार्‍या सयुंक्त वाटा आहेत. पुणे - सातारा मार्गावर भुइंज गाव आहे. तेथुन २० कि.मी अंतरावर किकली गाव आहे. वाइ आणि सातारा या दोन्ही ठिकाणाहून किकलीला येण्यासाठी बस आहेत. किकलीच्या जवळच बेलमाची नावाचे गाव आहे. या बेलमाची गावाचे दोन भाग आहेत. एक आहे ती खालची बेलमाची तर दुसरी वरची बेलमाची, येथूनच एक वाट चंदन आणि वंदन यांच्या खिंडीत पोहोचते. डावीकडे राहतो तो चंदन तर उजवीकडे वंदन किल्ला आहे.
राहाण्याची सोय :
दर्ग्यात रहायचे असल्यास ३० ते ४० जणांना रहाता येते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची व्यवस्था नाही, आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
पाण्याची सोय फक्त पावसाळ्यात आहे, अन्यथा गडावर पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
बेलमाची गावातून अडीच ते तीन तास लागतात.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: C
 चाकणचा किल्ला (Chakan Fort)  चांभारगड (Chambhargad)  चंदन वंदन (Chandan-vandan)  चंदेरी (Chanderi)
 चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक (Chandragad to Arthur seat)  चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad))  चांदवड (Chandwad)  चापोरा किल्ला (Chapora Fort)
 चौगावचा किल्ला (Chaugaon Fort)  चौल्हेर (Chaulher)  चावंड (Chavand)  कुलाबा किल्ला (Colaba)