मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक (Chandragad to Arthur seat) किल्ल्याची ऊंची :  4127
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: महाबळेश्वर
जिल्हा : रायगड श्रेणी : अत्यंत कठीण
सह्याद्री डोंगररांगांमुळे महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी सह्याद्रीची रांग व त्यावरील पठार किंवा घाटमाथा असे तीन भाग पडले आहेत. येथील राज्यकर्त्यांचा प्राचीन काळापासून परदेशासी व्यापार चाले. कोकण किनारपट्टीवर उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे. त्यामुळे या परिसरात संपन्न बंदरे, शहरे, बाजारपेठा तयार झाल्या. त्याकाळी वापरण्यात येणारी शिडांची गलबते समुद्रातून खाडी मार्गे आतपर्यंत येत. त्यामुळे कल्याण, महाड, राजापूर सारखी बंदरे/बाजारपेठा तयार झाल्या होत्या.

महाबळेश्वरी ऊगम पावणारी सावित्री नदी अरबी समुद्राला बाणकोट जवळ मिळते. प्राचीन काळा पासून महाड गावातून वाहाणार्‍या सावत्री नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (वरंधा, आंबेनळी, पार घाट, मढ्या घाट, ढवळे घाट इत्यादी) घाटमार्गंनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. त्यापैकी वरंधा घाट (महाड ते भोर) व आंबेनळी घाट (पोलादपूर ते महाबळेश्वर) यामार्गांवर रस्ते बनवल्यामुळे आजही वापरात आहेत. या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. सावित्री नदीच्या (खाडीच्या) मुखावर असलेला बाणकोटचा किल्ला, घाटमार्गाचे रक्षण करणारा कावळा, चंद्रगड, मंगळगड, प्रतापगड हे किल्ले आणि घाटमाथ्यावर असणारे कमळ, केंजळ इत्यादी किल्ले अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे.

चंद्रगड ते आर्थरसीट पॉईंट (मढी महल) हा सुध्दा प्राचीन ढवळे घाटमार्ग होता. चंद्रगड किल्ला, बहिरीची घुमटी, जोरचे पाणी हे प्राचीन अवशेष याची साक्ष देत आजही उभे आहेत. चंद्रगड ते आर्थरसीट पॉईंट (मढी महल) हा सह्याद्रीतील अतिकठीण ट्रेकपैकी एक आहे. या ट्रेक मध्ये कुठेही रोप लावून चढावे लागत नाही, तरीही आपण समुद्रसपाटी पासून (४७२१ फूट उंच) महाबळेश्वर पर्यंत एका दिवसात चढून जातो. त्यामुळे हा ट्रेक शरीराची व मनाची कसोटी पाहाणारा आहे.

28 Photos available for this fort
Chandragad to Arthur seat
पहाण्याची ठिकाणे :
चंद्रगड ते आर्थरसीट (महाबळेश्वर) ही रेंज प्रामुख्याने खालीलप्रकारांत विभागता येऊ शकते :

१. ढवळे गाव ते चंद्रगड
२. चंद्रगड ते बहिरीची घुमटी
३. बहिरीची घुमटी ते गाढवाचा माळ
४. गाढवाचा माळ ते आर्थरसीट पॉईंट (मढी महल)

(१) ढवळे गाव ते चंद्रगड (लागणारा वेळ :- अंदाजे २ ते २.३० तास)

चंद्रगड हा किल्ला ढवळे गावाच्या पूर्वेला असून तो गावामधून लगेच दृष्टीस पडत नाही. सुरुवातीला दिसणार्‍या एका डोंगराच्या मागे आणि थोडेसा डावीकडे चंद्रगड आहे. गावातील मंदिर डावीकडे ठेवत चालायला सुरुवात करून शेतामधून काही वेळ चालल्यावर वाट जंगलात शिरते. पुढे चंद्रगडाच्या समोर असलेल्या डोंगराला वळसा घालून आपल्याला १५-२० मिनिटांची वाट चालावी लागते. सुरुवातीला दरी डावीकडे आणि नंतर उजवीकडे ठेवत ही वाट पार केल्यावर आपण चंद्रगडच्या पायथ्याशी पोहोचतो.

चंद्रगडाच्या डोंगराला भिडल्यावर मध्यम चढ आहे. येथील माती भुशभुशीत असल्याने जरा जपून चढावे लागते. जेथे गडचढाई चालू होते तेथे ग्रामस्थांनी एक मोठा बोर्ड लावला आहे. १५-२० मिनिटांच्या चढाई नंतर आपण छोटाश्या पठारावर पोहोचतो. येथून गडावर जाण्यासाठी कातळावर चढून जावे लागते. मध्ये काही ठिकाणी कातळात पायर्‍या खोदल्या आहेत. पुढील १० मिनिटांत गडावरील पठारावर येउन पोहोचतो. पूर्वदिशा उजवीकडे राहते. येथे एक शंकराची पिंड आणि नंदी दृष्टीस पडतो. शेवटचा छोटा कातळटप्पा (रॉक पॅच) पार केल्यावर आपण गडमाथ्यावर येऊन पोहोचतो. गडावर उत्तरेकडे जाणार्‍या वाटेवर उजवीकडे एक पाटा-वरवंटा दिसतो. उत्तरेकडे जाणार्‍या वाडेवर एक पाण्याचे टाके आहे. यातील पाणी खराब आहे. याच्याच खालच्या बाजूला २ पाण्याची टाकी असून ती कोरडी आहेत. या टाक्यां पर्यंत जाता येत नाही. उत्तरेकडील ही वाट पुढे एका बुरुजावर उतरते. तेथून उजवीकडे थोड पुढे चालत गेल्यावर ५ टाकी आहेत. त्यातील ३ टाकीच नजरेस पडतात. या ३ मधील २ टाकं सुकलेली आहेत, तर एकामध्ये खराब पाणी आहे. गडावरून प्रतापगड व मंगळगड दिसतो.

(२). चंद्रगड ते बहिरीची घुमटी (लागणारा वेळ :- अंदाजे ५ तास)

या रेंज मधील सगळ्यात जास्त कठीण आणि शरीर व मनाची कसोटी पाहाणारा भाग म्हणजे चंद्रगड ते बहिरीची घुमटी हा आहे. चंद्रगड बघून आल्यावाटेने खाली उतरावे आणि चढताना शेवटी लागणारा कातळटप्पा पार करावा. येथून उजवीकडे जाणारा रस्ता ढवळे गावात जातो, तर डावीकडील रस्ता एका घळीत उतरतो. माथ्यावरून इथे पोहोचायला १५ मिनिटे लागतात. येथे डावीकडे वळावे आणि चन्द्रगडाची कातळभिंत डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत ही खिंड पार करावी. ही वाट अतिशय निसरडी असून सर्वत्र गवत पसरलेले असल्यामुळे काळजीपूर्वक खाली उतरावे लागते. येथून पुढे खाली उतरणारी वाट पूर्णत: झाडी आणि भुशभूशीत मातीतून आहे. सुरुवातीची २० मिनिटे झाडीतून आणि नंतरचा अर्धा तास दगडातून उतरल्यावर ही वाट एका नळीच्या (ओढ्याच्या) वाटेवर आणून सोडते. येथून उजवीकडे (दक्षिणेकडे) वळल्यावर बहिरीच्या घुमटीची चढाई चालू होते. ही वाट पूर्णपणे जंगलातून आहे, त्यामुळे उन्हाचा त्रास जाणवत नाही. . चढ मध्यम स्वरूपाचा असून दरी डाव्या बाजूला ठेवत आपण वर चढत जातो.

चंद्रगड ते बहिरीची घुमटी हा मार्ग विस्तृत आणि सतत चढाईचा असल्यामुळे हा पट्टा शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहतो. जंगलातील वाट नळीच्या वाटेशी संपते आणि येथून आपल्याला १८० अंशात वळावे लागते. नंतरचा चढ हा परत खडा असून माती भुशभुशीत आहे. हा चढ शेवटी एका माळरानावर संपतो. चंद्रगड उत्तरेकडे मागच्या बाजूस खाली राहतो. आपण गाठलेल्या उंचीसमोर चंद्रगड खुजा (ठेंगणा) वाटायला लागतो. येथून पुढची वाट परत "C shape" मध्ये असून उघड्या माळावरून जाणारी आहे. ही वाट जेथे संपते तेथे छोटासा कातळटप्पा आहे. तो पार केल्यावर आपल्याला बहिरीची घुमटी दिसते. येथे काही देव-देवतांच्या दगडी मूर्त्या आहेत. घुमटीच्या थोडे आधी एक वाट उजवीकडे वळते येथे पूरातन पाण्याची टाकी आहेत याला "जोरचे पाणी" म्हणतात. येथून पूर्वेकडील रस्ता जोर गावात उतरतो म्हणून यास जोरचे पाणी म्हणतात. येथील पाणी थंड, सुमधूर आणि पिण्यायोग्य आहे. (चंद्रगडाच्या पायथ्यापासून जोरचे पाणी या ठिकाणा पर्यंत पाणी साठा नाही आहे त्यामुळे भरपूर पाणी सोबत न्यावे)


(३). बहिरीची घुमटी ते गाढवाचा माळ (आर्थरसीट प्रथमदर्शन) (लागणारा वेळ :- अंदाजे १५ मिनिटे)

जोरचे पाणीवरून उजवीकडील वाट दक्षिणेकडील गाढवाच्या माळावर जाते. ही वाट जंगलातून असून चढ सोपा आहे. ही वळणावळणाची वाट १५-२० मिनिटे चालल्यावर पठारवर आणून सोडते. येथून दक्षिणेकडे महाबळेश्वरचे बुलंद पठार आणि आर्थरसीट पॉईंटचे (मढी महल) प्रथम दर्शन होते.

(४). गाढवाचा माळ (आर्थरसीट प्रथमदर्शन) ते आर्थरसीट पॉईंट (मढी महल) (लागणारा वेळ :- अंदाजे १.३० तास)

हा रेंजमधील शेवटचा टप्पा आहे. ही वाट मिश्र स्वरूपाची (जंगल आणि उघडा रानमाळ) आणि वळणावळणाची आहे. शेवटच्या काही भागात माती भुशभुशीत असल्याने थोडी काळजी घ्यावी लागते. सगळ्यात शेवटच्या भागात एक १२-१५ फूटांचा कातळटप्पा (रॉक पॅच) आहे. चढायला सोपा असणार्‍या या कातळटप्प्या मध्ये जागोजागी खोबण्या आहेत. हा कातळटप्पा चढून गेल्यावर आपण आर्थरसीटवर पोहोचतो.

अशाप्रकारे चंद्रगड पायथा ते चंद्रगड आणि चंद्रगड ते आर्थरसीट ही रेंज पार करण्यासाठी जवळपास ११ तास चालावे लागते. (ट्रेकर्सची संख्या व अनुभव यानुसार १ ते २ तासांचा फरक पडू शकतो.)

चंद्रगड ते आर्थरसीट हा ट्रेक करताना पाळावयाच्या काही सूचना :

१. या ट्रेकसाठी ढवळे गावातून गाईड घेणे आवश्यक आहे. ही वाट फारशी वापरात नसल्याने, तसेच रस्त्यात मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही भेटत नसल्याने चुकण्यापेक्षा गाईड घेणे चांगले. (गाईड ठरवतांना नीट बोलणी करणे आवश्यक आहे. ढवळे गावातून येणारे गाईड बर्‍याच वेळा जोरचे पाणी पर्यंतच येतात, तेथून परत फिरले तरच ते गावात अंधारापूर्वी पोहचू शकतात. महाबळेश्वर पर्यंत येण्यासाठी ते जास्त पैसे आकारतात. कारण त्यांना बसने परत ढवळे गावी यावे लागते.)

२. चंद्रगडसाठी उन्हाचा फार त्रास होत नाही. पण घुमटीच्या आधी उघडा रानमाळ असल्याने आणि दुपार होत असल्याने उन्हाचा त्रास होऊ शकतो. सोबत ग्लुकोज, काकड्या, फळे ठेवल्यास ह्या त्रासाची तीव्रता कमी करता येऊ शकते.वाट अनेकदा दाट झाडीतून जात असल्याने हात आणि पाय पूर्ण झाकणारे कपडे घालावेत.

३. ढवळेमधून चालायला सुरुवात केल्यावर फक्त घुमटीजवळील "जोरचे पाणी" येथे (अंदाजे ७ तास) पिण्यायोग्य पाणी आहे. त्यामुळे सोबत भरपूर पाणीसाठा बाळगावा.

४. पाणी कमी प्यायल्यामुळे किंवा चाल भरपूर असल्याने पायात गोळे (Cramp) येण्याचा किंवा Muscle Paining चा त्रास होऊ शकतो. सोबत स्वतःचे Medical Kit आणि इतर औषधे बाळगावीत.

५. पूर्ण रेंजमध्ये १ छोटा आणि १ मोठा Rock Patch आहे. दोन्ही सोपे असून प्रस्तारोहाणाच्या साधनाची गरज भासत नाही. तरी सोबत ५०/१०० फुटी दोर बाळगावा.

६. पावसाळ्यात चंद्रगड ते आर्थरसीट हा रेंज ट्रेक टाळावा. पावसाळ्यात ढवळे गावातून फक्त चंद्रगड करणे शक्य आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
जाण्यासाठी:- मुंबई- गोवा महामार्गावर मुंबई पासून १८३ किमी अंतरावर पोलादपूर आहे. पोलादपूरहून महाबळेश्वरला जाणार्‍या रस्त्यावर पोलादपूरहून ८ किमीवर कापडे फाटा आहे. या फाट्यावरून १८ किमीवर चंद्रगडच्या पायथ्याचे ढवळे गाव आहे.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: C
 चाकणचा किल्ला (Chakan Fort)  चांभारगड (Chambhargad)  चंदन वंदन (Chandan-vandan)  चंदेरी (Chanderi)
 चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक (Chandragad to Arthur seat)  चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad))  चांदवड (Chandwad)  चापोरा किल्ला (Chapora Fort)
 चौगावचा किल्ला (Chaugaon Fort)  चौल्हेर (Chaulher)  चावंड (Chavand)  कुलाबा किल्ला (Colaba)