मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

चांदवड (Chandwad) किल्ल्याची ऊंची :  3995
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सातमाळ
जिल्हा : नाशिक श्रेणी : अत्यंत कठीण
भरुच , सुरत ही गुजरात किनाऱ्यावरील प्राचीन बंदरे आणि नाशिक येथे असलेली बाजारपेठ यांना जोडणारा सुरत- नाशिक तसेच सुरत - औरंगाबाद हे व्यापारी मार्ग चांदवड गावावरून जात होते . तसेच राजकीय आणि सैन्याच्या हालचालीसाठी महत्वाचा असलेला दिल्ली - नाशिक मार्गांही चांदवड गावावरुन जात होता . त्यामुळे हा किल्ला प्राचीन काळापासून ते पेशवाई पर्यंत महत्त्वाचा आणि नांदता किल्ला होता.

पेशवाईत चांदवड किल्ल्यावर बांधलेली टाकसाळ , गावातील रंगमहाल , रेणुकामाता मंदिर , चंद्रेश्वर मंदिर इत्यादी अनेक ऐतिहासिक ठिकाणे चांदवड शहरात आजही पाहायला मिळतात .

चांदवड किल्ल्याच्या माची वरुन बालेकिल्ल्यावर जाणारा कातळात कोरलेला जीना इंग्रजांच्या काळात उध्वस्त केला गेला. त्यामुळे किल्ल्यावर जाण्यासाठी गिर्यारोहण तंत्राचा आणि साहित्याचा वापर करावा लागतो. परंतु किल्ल्याच्या माचीवर सहज जाता येते . त्यामुळे चांदवड गावातील ऐतिहासिक मंदिरे, रंगमहाल आणि माचीवरील तलाव , टाकसाळ सामान्य पर्यटकांनाही पाहाता येतात .
58 Photos available for this fort
Chandwad
इतिहास :
पौराणिक कथेनुसार अगस्ती मुनींचा आश्रम चांदवड गावाजवळील डोंगरावर होता एकदा त्यांना भूक लागली असता त्यांनी चार रोडगे भाजले आणि त्यावर लावण्यासाठी तूप मागण्यासाठी ते गावात गेले. पण गावात त्यांना कोणीही तूप दिले नाही. त्यामुळे त्यांनी या नगरीला चांडाळ नगरी असे नाव ठेवले. त्याचाच पुढे अपभ्रंश होऊन चांदवड हे नाव पडले. अगस्ती मुनींनी आपल्या जवळील चार रोडग्या पैकी अर्धा रोडगा गाईला दिला आणि उर्वरित रोडगे तेथेच सोडून दिले. चांदवड किल्ल्यासमोर असलेल्या डोंगराला त्यामुळे साडे तीन रोडग्यांच्या डोंगर असे नाव पडले आहे .

चांदवड किल्ला कोणी बांधला व केव्हा बांधला हे ज्ञात नाही पण नांदगाव येथे सापडलेल्या चालुक्य नरेश चांद्रदित्य उर्फ नागवर्धन (इसवीसन ६५०) यांच्या ताम्रपटात चंद्रादित्यपूर म्हणजेच चांदवडचा उल्लेख आढळतो म्हणजे त्याकाळी हा किल्ला अस्तित्वात होता .

इसवीसनाच्या अकराव्या शतकात यादवांच्या ताम्रपटात चांद्रादित्यपूरचा उल्लेख आढळतो. निजामशहाच्या काळात मुघल बादशहा शहाजहान याने शाहिस्तेखानाला महाराष्ट्रातपाठवले होते. शाहिस्तेखानाने आपला अधिकारी अलीवर्दीखानाकडे चांदवड परिसरातील किल्ले घेण्याची जबाबदारी सोपवली होती. इसवीसन १६३६ मध्ये अलीवर्दीखानाने चांदवड किल्ला आणि गाव जिंकून घेतले.

दुसऱ्या सुरत लूटी नंतर छत्रपती शिवाजी महाराज बागलाणातून राजगडावर जात होते. त्यासुमारास औरंगजेबाला सूरत लुटीची बातमी कळली आणि त्याने खानदेशचा सुभेदार दाऊदखान कुरेशी याला आदेश दिले की शिवाजी महाराजांकडून खजिना हस्तगत करावा. त्यानुसार दाऊदखान पाच हजार सैन्यानिशी चांदवड किल्ल्यावर पोहोचला. त्याने याठिकाणी कांचनाच्या लढाईची तयारी केली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात इसवीसन १६८२ मध्ये मराठ्यांची एक तुकडी चांदवड वर चालून गेली होती.

पहिल्या बाजीरावाच्या काळात चांदवड किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. पुढे नानासाहेब पेशव्यांनी चांदवडचा किल्ला मल्हाराव होळकर यांच्या ताब्यात दिला. पेशव्यांच्या काळात चांदवड किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे. तुकोजी होळकर यांच्या कारकिर्दीत थोरल्या माधवराव पेशवे यांच्या परवानगीने किल्ल्यावर चांदोरी रुपयांची टांकसाळ चालू केली. इसवीसन अठराशे पर्यंत ही टांकसाळ किल्ल्यात होती व या टाकसाळीत चांदीची नाणी पाडली जात असत. इसवीसन अठराशे मध्ये किल्लेदार आणि टाकसाळ अधिकारी यांच्यातील तंट्यामुळे ही टाकसाळ चांदवड गावात हलवली गेली. याच वर्षी यशवंतराव होळकरांच्या सैन्यातील अहमद खान व आमिर खानाने मालेगाव व चांदवड लुटले.

इसवीसन १८०४ मध्ये कर्नल वॉलेस याने चांदवडचा किल्ला जिंकून घेतला, परंतु तो किल्ला लगेचच होळकरांच्या ताब्यात देण्यात आला. इसवीसन १८१८ मध्ये थॉमस हिस्लॉप याने हा किल्ला जिंकून घेतला. इसवीसन १८२९ मध्ये चांदवड टांकसाळीतील चांदीच्या रुपयाची नाणी पाडण्याचे काम बंद करण्यात आले. १८३० मध्ये तांब्याची नाणी पाडण्याचे काम थांबवण्यात आले आणि त्यानंतर टांकसाळ बंद करण्यात आली.
पहाण्याची ठिकाणे :
चांदवड किल्ला मुंबई-आग्रा महामार्गाजवळ आहे. महामार्गावर चांदवड गावापुढे ६ किलोमीटरवर उजवीकडे चंद्रेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावरुन जाताना कमानीजवळ फ़ाटक लागते. या फ़ाटका जवळ आपल्याला वनविभागाचा टोल भरावा लागतो. कमानी पासुन हा रस्ता आपल्याला थेट चंद्रेश्वर मंदिराकडे घेऊन जातो. रस्त्यावरुन जाताना उजव्या बाजुला पाण्याचा तलाव आहे. चंद्रेश्वर मंदिराजवळ पोहोचल्यावर मंदिरात चंद्रेश्वराचे दर्शन घेउन किल्ले चढाईस प्रारंभ करावा. मंदिरातून जाणारी वाट आपल्याला किल्ल्याकडे घेउन जाते. या वाटेवर ५ मिनिटे चालल्यावर आपल्याला उजव्या बाजूस एक पाण्याचे बांधीव तलाव दिसतो. तलावाच्या उजव्या बाजूला तीन मोठ्या समाध्या आहेत. पाण्याच्या बांधीव तलावा समोर ७ थडगी आहेत. त्या पाहून पायवाटेने गणपती मंदिराकडे जावे. गणपतीचे दर्शन घेऊन डाव्या बाजूच्या पायवाटेने टांकसाळीच्या दिशेने चालत जातांना एक मोठा चौथरा दिसतो. चौथरा पाहून खडा चढ चढून आपण १५-२० मिनिटात टांकसाळीपाशी पोहोचतो. टांकसाळीचे अवशेष पाहून उजव्या बाजूला वळून किल्ल्याच्या डोंगराच्या पश्चिम टोकाकडे चढत जावे. या ठिकाणी एका बुरुजाचे आणि तटबंदीचे अवशेष आहेत. चांदवड किल्ल्याच्या माचीवरील हे अवशेष पाहून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी डाव्या बाजूला कातळभिंती पर्यंत चालत जावे. या ठिकाणी पायर्‍या उध्वस्त केलेल्या असल्यामुळे एक लोखंडी शिडी लावलेली आहे. या शिडीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आणि पश्चिम कड्यावर कातळात कोरलेल्या काही गुहा आहेत. आज मात्र या गुहा बुजलेल्या आहेत. शिडीच्या डाव्या बाजूला दोन उध्वस्त बुरुज आणि तटबंदीचे अवशेष आहेत. यापैकी एका बुरुजातल्या खोलीचे अवशेष आजही तग धरुन आहेत. शिडीच्या उजव्या बाजूला फ़ारसी शिलालेख आहे. त्यात "इसवीसन १६३६ मध्ये शहाजहान बादशहाचा सेवक अलीवर्दी खान याने हा किल्ला जिंकून घेतलेला आहे", असे कोरलेले आहे. शिडी चढून गेल्यावर पुढचा कातळ टप्पा प्रस्तरारोहण करुन पार करावा लागतो. हा टप्पा चढण्यासाठी गिर्यारोहण साहित्य आणि रोपची आवश्यकता आहे. हा कातळटप्पा चढून गेल्यावर पायर्‍या आहेत. या पायर्‍यावर शरभ शिल्प आहे. पायर्‍या चढून गेल्यावर पश्चिमाभिमुख उध्वस्त प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दारातून आत आल्यावर समोरच पाण्याचे टाके आहे.

या टाक्याच्या बाजूला असलेल्या पायर्यांनी वर चढून गेल्यावर दोन पाण्याची टाकी आहेत. त्याच्या थोडे पुढे पाण्याचे अजून एक टाके आहे. या टाक्याजवळ उध्वस्त वाड्याचे अवशेष आहेत. हे अवशेष पाहून किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे चालत जातांना वाटेत उध्वस्त घरांचे चौथरे दिसतात. चौथरे पाहून मागे वळून गडमाथ्यावर चालत जावे. याठिकाणी पाण्याचा मोठा तलाव आहे. तलाव पाहून खाली उतरल्यावर आपण प्रवेशव्दारा पुढील टाक्याजवळ पोहोचतो. या ठिकाणी आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गडमाथ्यावरुन इंद्राई, साडे तीन रोड्ग्यांचा डोंगर, कोळधेर दिसतात.

पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई - आग्रा महामार्गावर नाशिकच्या पुढे ६१ किलोमीटरवर चांदवड गाव आहे. मनमाड पासून २५ किलोमीटरवर चांदवड गाव आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्यापासून २ तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
सप्टेंबर ते मार्च
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: C
 चाकणचा किल्ला (Chakan Fort)  चांभारगड (Chambhargad)  चंदन वंदन (Chandan-vandan)  चंदेरी (Chanderi)
 चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक (Chandragad to Arthur seat)  चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad))  चांदवड (Chandwad)  चापोरा किल्ला (Chapora Fort)
 चौगावचा किल्ला (Chaugaon Fort)  चौल्हेर (Chaulher)  चावंड (Chavand)  कुलाबा किल्ला (Colaba)