मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

करमाळा (Karmala Fort) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सोलापूर श्रेणी : सोपी
पुणे - सोलापूर रस्त्यावर भिगवण गावातून एक रस्ता करमाळा गावात जातो. थोडीशी वाट वाकडी केली तर हा तासाभरात हा भुईकोट किल्ला पाहून होतो. किल्ल्याच्या आत आनि बाहेरही गाव वसलेले असल्यामुळे किल्ल्याचे अवशेष अतिक्रमणात लुप्त होत चालले आहेत.सोलापूर,अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने ऐतिहासिकदृष्टीने करमाळा किल्ल्याला खूप महत्व होते.
20 Photos available for this fort
Karmala Fort
इतिहास :
रावरंभाराव व त्यांचे पुत्र जानोजीराव निंबाळकर यांनी इसवीसन १७२७ -१७३० च्या दरम्यान करमाळा किल्ला बांधल्याचा उल्लेख आढळतो. निंबाळकर हे निजामाचे सरदार होते. त्यांच्याकडे असलेल्या जहागिरीत बीड, उस्मानाबाद, जामखेड, खर्डा, भूम, कर्जत, करमाळा या प्रदेशांचा समावेश होता.
पहाण्याची ठिकाणे :
करमाळा बस स्थानकात उतरुन चालत १० मिनिटात आपण किल्ल्यापाशी पोहोचतो. हा भुईकोट असल्याने पूर्णपणे खंदकाने वेढलेला होता, आता त्यावर रस्ता बांधलेला आहे. रस्त्याने किल्ल्याच्या बाहेरच्या तटबंदीत असलेल्या दरवाजातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. स्थानिक लोक याला वेस या नावाने ओळकतात. समोरच काळ्या मारुतीचे मंदिर आहे. मंदिरा जवळ वीरगळ आणि सतीच्या शिळा आपले लक्ष वेधून घेतात. तिथूनच उजव्या बाजूला ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे(खोलेश्वर) मंदिर पाहावयास मिळते. मंदिराजवळ भग्न झालेल्या वीरगळी आहेत. मंदिराच्या मागिल बाजूस पुष्कर्णी आहे. पण ती पाहाण्यासाठी पुन्हा वेशीतून बाहेर येऊन डाव्या बाजूला जावे लागते. पुष्कर्णीच्या भिंतींवर नक्षीदार कोनाडे आहेत. एके काळी या कोनाड्यात मुर्ती असाव्यात पण आज ते रिकामे आहेत.

पुष्कर्णी पाहून परत वेशीतून आत आल्यावर मारुती मंदिराच्या समोरच किल्ल्याचे उत्तराभिमुख प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दार दगडात बांधलेले असून त्याचा वरचा भाग वीटांनी बांधलेला आहे. त्यात ३ झरोके आहेत. प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूस अष्टकोनी बुरुज आहेत. किल्ल्याचा लाकडी दरवाजा आणि त्यावरील लोखण्डी खिळे अजुन शाबूत आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस दरवाजाच्या वर चढून जाण्यासाठी पायर्‍या आहेत. दरवाजा वरून सध्या किल्ल्यातच वसलेले गाव आणि पसरलेली तटबंदी आणि बुरुज दिसतात. या गावाच्या वाढीमुळे किल्ल्याचे अवशेष लुप्त झालेले किंवा नष्ट झालेले आहेत. दरवाजावरून खाली उतरून उजव्या बाजूला चालत गेल्यावर बांधिव तलाव आहे. तलावात दोन बाजूने उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. तलावाच्या काठावर कमानी असलेला छोटेखानी महाल आहे. उन्हाळ्यात तलावाच्या काठावर जमिनी खाली बांधलेल्या या महालामुळे थंडावा मिळत असे. राजघराण्यातील लोक या ठिकाणी विश्रांतीसाठी आणि स्नानासाठी येत असत. या महालातून जानोजीरावांच्या महालात जाण्यासाठी भुमिगत रस्ता आहे. तलाव पाहून पक्क्या रस्त्याने पुढे चालत गेल्यावर कोर्टाची इमारत इतर सरकारी कार्यालय आहेत. याठिकाणी जानोजीरावांचा महाल होतो. महाल आयताकृती असुन मध्ये मोठे अंगण आहे. अंगणात विहिर आहे. महालाच्या मागच्या बाजूस बाहेर जाण्यासाठी एक छोटा दरवाजा ठेवलेला आहे. महाल पाहून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या दुसर्‍या टोकाच्या तटबंदीत असलेल्या दरवाजापाशी पोहोचतो. याठिकाणी दुहेरी तटबंदी आहे. त्याकाळी बाहेरील तटबंदीतही दरवाजा असावा. आज मात्र त्याचा मागामुस दिसत नाही. दरवाजातून बाहेर पडून तटबंदीच्या कडेकडेने चालत गेल्यावर खंदकातील विहिरीपाशी पोहोचतो. किल्ल्यात वस्ती आणि घाण असल्याने बाकीचे किल्ल्याचे अवशेष पाहाण्यासाठी तटबंदी व बुरुजावरुन फ़िरावे लागते. किल्ल्याला १८ बुरुज असल्याचा संदर्भ सापडतो. अनेक ठिकाणी तटबंदी उध्वस्त झालेली आहे. किल्ला पूर्ण पाहायला अर्धा ते पाऊण तास पुरेसा आहे.


करमाळा किल्ल्या व्यतिरिक्त गावात कमालाभवानी मंदिर, बारव आणि समाध्या पाहाण्यासारख्या आहेत.


कमालाभवानी मंदिर
किल्ल्याच्या बुरुजांवरून उंच कळस (गोपुरे) लक्ष वेधून घेतात. गावापासून दोन किलोमीटरवर उंच टेकडीवर कमलाभवानी मातेचे मंदिर आहे.मं दिर सुंदर असून चोहोबाजूंनी गोपुरांची रचना आहे. आत प्रवेश केल्यावर तीन उंच दीपमाळा लक्ष वेधून घेतात. ९६ खांबी मंदिर, मंदिराच्या बाजूला असलेल्या ओवर्‍यां मधिल ९६ कमानी, शिखरावरील ९६ शिल्पे वैशिष्टपूर्ण आहेत. मंदिराचे भव्य प्रांगण दाक्षिणात्य मंदिरांची आठवण करून देते. मंदिराच्या अवारात दोन मोठ्या पितळी घंटा ठेवलेल्या आहेत.


बारव आणि समाध्या :-
मंदिराच्या समोर डाव्या बाजूला बांधिव तलाव आहे त्याला लाल तलाव या नावाने ओळखले जाते. मंदिराच्या समोर निंबाळकरांच्या घराण्यातील काही व्यक्तींच्या घुमटाकार समाध्या आहेत. त्यावरील नक्षीकाम पाहाण्या सारखे आहे. त्याच्या मागेच असलेले बारव शिल्पकलेचा अव्दितीय नमुना आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
करमाळा हे तालुक्याचे ठिकाण रस्त्याने सर्व गावांशी जोडलेले आहे. पुण्याहून पाटसमार्गे (पुण्यापासून अंतर १६३ किमी) साडे-तीन तासात करमाळा गाठता येईल. सोलापूर पासून अंतर करमाळा १३८ किलोमीटर अंतरावर आहे.

खाजगी वहानाने परांडा, करमाळा हे दोन किल्ले एका दिवसात पाहून सोलापूरला मुक्काम करत येईल. दुसर्‍या दिवशी सोलापूर आणि नळदुर्ग हे दोन भुईकोट पाहता येतील.
राहाण्याची सोय :
करमाळा गावात राहाण्याची सोय आहे.
जेवणाची सोय :
करमाळा गावात जेवणची सोय आहे.
पाण्याची सोय :
करमाळा गावात पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
प्रकार: Land Forts
 अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort)  अजिंठा (Ajintha Fort)  अजिंठा सराई (Ajintha Sarai)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)
 अंमळनेर (Amalner)  अमरावतीचा किल्ला (Amravati Fort)  बहादरपूर (Bahadarpur Fort)  बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort))
 बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad)  बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)  बेळगावचा किल्ला (Belgaum Fort)  चाकणचा किल्ला (Chakan Fort)
 धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi)  दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)  डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))  फर्दापूर सराई (Fardapur Sarai)
 हिराकोट (Hirakot)  इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi))  जामगावचा किल्ला (Jamgaon Fort)  काळाकिल्ला (Kala Killa)
 कंधार (Kandhar)  करमाळा (Karmala Fort)  खर्डा (Kharda)  कोटकामते (Kotkamate)
 माचणूर (Machnur)  माढा गढी/किल्ला (Madha Fort)  मालेगावचा किल्ला (Malegaon Fort)  मंगळवेढा (Mangalwedha)
 मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort)  नगरचा किल्ला (Nagar Fort)  नगरधन (Nagardhan)  नळदुर्ग (Naldurg)
 नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri))  नस्तनपूरची गढी (Nastanpur)  पाचाड कोट (Pachad Fort)  पळशीचा किल्ला (Palashi Fort)
 परांडा (Paranda)  पारोळा (Parola)  रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort))  शिरगावचा किल्ला (Shirgaon)
 सिंदखेडराजा (Sindkhed Raja)  सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)  सुभानमंगळ (Subhan Mangal)  सुलतान गढी (Sulatan Gadhi)
 यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort))