मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

नगरचा किल्ला (Nagar Fort) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : नगर श्रेणी : सोपी
इ.सनाच्या १५ व्या शतकात अहमदशाह बादशहाने अहमदनगरचा किल्ला आणि शहर वसविले. निजामशाहीची ही राजधानी होती. त्याकाळापासून गेली ५०० वर्ष या किल्ल्यावर इतिहास घडत होता. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी या किल्ल्यात अनेक राष्ट्रीय नेत्यांना स्थानबध्द केले होते. त्यावेळी या किल्ल्यात पंडित जवाहरलाल नेहरुंनी `डिस्कव्हरी ऑफ इंडिया ` हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला होता. आजही हा किल्ला लश्कराच्या ताब्यात आहे. त्यामुळे किल्ला पाहाण्यासाठी खाली दिलेल्या सुचना पाळाव्यात.
१) सुरेक्षेच्या कारणास्तव नगरचा किल्ला सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळातच पाहाता येतो.
२) किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी राज्य किंवा भारत सरकारने दिलेले फोटो आयडेंटी कार्ड जवळ असणे आवश्यक आहे.
उदा. पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड इत्यादी.
३) नगरचा किल्ला केवळ तटबंदीवरूनच (फांजीवर फिरुन) पाहाता येतो. सुरक्षेच्या कारणावरून तटबंदीच्या विरुध्द बाजूला तारांचे कुंपण घालून किल्ल्यात उतरणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.
४) नगरच्या किल्ल्यातील "लीडर्स ब्लॉक" हे एकमेव ठिकाण पाहात येते.
30 Photos available for this fort
Nagar Fort
इतिहास :
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्‍हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे १६३६ पर्यंत टिकली. मोगल बादशहा शाहजहानने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला तर १८१७ रोजी ब्रिटिशांनी अहमदनगरवर विजय मिळवला.

१९४२ च्या "चले जाव" आंदोलनातील पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित गोविंद वल्लभ पंत, पंडीत हरेकृष्ण मेहताब, आचार्य जे.बी. कृपलानी, डॉ. सय्यद महसूद, डॉ. पट्टाभी सीतारामय्या, बॅ. असफअली, डॉ. पी. सी. घोष, शंकरराव देव, आचार्य नरेंद्र देव अशा १२ राष्ट्रीय नेत्यांना १० ऑगस्ट १९४२ पासून २८ एप्रिल १९४५ या काळात ब्रिटीशांनी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात स्थानबध्द केले होते. पंडित जवाहरलाल नेहरुंनी या किल्ल्यातील स्थानबध्दतेच्या काळात अवघ्या ५ `महिन्यात` `डिस्कव्हरी ऑफ इंडिया ` हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला होता.
पहाण्याची ठिकाणे :
नगरचा किल्ला १४९० मध्ये अहमद निजामशाहने बांधला होता. त्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी किल्ल्याच्या बांधकामात भर घातली. इंग्रज राजवटीत किल्ल्यातील अनेक इमारती पाडून नव्या इमारती बांधल्या गेल्या. लष्करी वाहानांच्या सोईसाठी किल्ल्याचे प्रवेशव्दार ही बदलण्यात आले. आज आपण किल्ल्यात ज्या प्रवेशव्दारातून प्रवेश करतो, त्याच्या उजव्या बाजूला किल्ल्याचे खरे प्रवेशव्दार आहे.

किल्ल्याच्या भोवती अंदाजे ५० मीटर रुंदीचा खंदक आहे. खंदकाच्या एका बाजूला किल्ल्याची तटबंदी असून दुसर्‍या बाजूची भिंतही दगडाने बांधलेली आहे. पूर्वीच्या काळी या खंदकात पाणी सोडलेले असे. यावरील पुल काढता - घालता येत असे. सुर्यास्त ते सुर्योदय खंदकावरील पुल काढून घेतला जात असे. आज मात्र खंदकावर बांधलेल्या पुलावरून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराशी २ तोफा ठेवलेल्या आहेत. किल्ल्यात शिरल्यावर उजवीकडे नोंदणीकक्ष व डावीकडे वाहान तळ आहे. वाहान तळाच्या बाजूला किल्ल्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी जिना आहे. या जिन्याने आपण फांजीवर पोहोचतो. येथून किल्ला पाहायला सुरुवात करून परत याच ठिकाणी आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते.

किल्ल्याला एकुण २२ बुरुज असून तटबंदीची लांबी अंदाजे दोन किलोमीटर आहे. फांजी वरून चालायला सुरुवात केल्यावर आपल्याला एकामागोमाग एक तटबंदीतील बुरुज पाहायला मिळतात. या बुरुजांच्या व तटबंदीच्या बांधकामात अनेक कलाकुसर केलेले दगड पाहायला मिळतात. वेगवेगळ्या राजवटीत या किल्ल्याचे बांधकाम वाढवण्यात आले, मजबुतीकरण करण्यात आले. त्यासाठी किल्ल्यातील जुन्या बांधकामाचे दगड वापरण्यात आले. इंग्रजांच्या काळात बुरुजावर बर्‍याच ठिकाणी बॅरॅक्स बांधलेल्या आढळतात. पहिल्या बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. पुढे चालत गेल्यावर आपण (किल्ला पाहायला सुरुवात केली तेथून ७ वा बुरुज) भव्य बुरुजावर पोहोचतो. या भव्य बुरुजाच्या बाजूला दोन छोटे बुरुज आहेत. त्यावर बॅरॅक्स बांधलेल्या आहेत. या छोट्या बुरुजाच्या भिंतीवर फारसी शिलालेख कोरलेला आहे. या बुरुजावरून खाली तटबंदीत उतरण्यासाठी छोटे दार आहे. या दारातीन खाली उतरण्यासाठी जिना आहे. या जिन्याने आपण तटबंदीतील भूयारी मार्गात शिरतो. हा मार्ग बुरुजावर बाहेर पडतो.(या मार्गाने जाण्यासाठी विजेरी सोबत बाळगावी). या भूयारी मार्गाचा उपयोग शत्रूला फसवून त्यावर हल्ला करण्यासाठी होत असे.

७ क्रमांकाच्या भव्य बुरुजाला दुहेरी तटबंदी आहे. या बुरुजावर एक उंच खांब रोवलेला आहे. या खांबावर रात्रीच्या वेळी तेलाचा दिवा लावला जाई. याच बुरुजावर लोखंडाच्या कड्या एकमेकात गुंफून बनवलेला झुलता पुल पाहायला मिळतो. पुढे गेल्यावर ९ व १० क्रमांकाच्या बुरुज व फांजी खाली खोल्या असून त्याच्या छताला जाड साखळदंड लावलेले पाहायला मिळतात. १२ क्रमांकाच्या बुरुजाच्या पुढे तटबंदीत एक पीर आहे. साधारण १७ व्या बुरुजा नंतर फांजीवर पाय‍र्‍यांसारखे तीन स्तर करण्यात आले आहेत.

नगरच्या किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार दुहेरी आहे. फिले प्रवेशव्दार भव्य बुरुजात बनविलेले आहे. प्रवेशव्दारा समोर तटबंदी व बुरुजाचा आडोसा उभा करण्यात आला आहे. जेणे करून दरवाजावर सरळ हल्ला करता येऊ नये. दरवाजावर खिळे बसवलेले आहेत. दरवाजाच्या वरच्या दोन्ही बाजूस फुल कोरलेली आहेत. दुसरा दरवाजा पश्चिमाभिमुख असून त्यावर शरभाने आपल्या दोन पायात हत्ती पकडले आहेत असे व्दारशिल्प आहे. दोन्ही दरवाजांना सामावून घेणार्‍या बुरुजावर काही खोल्या बनवलेल्या आहेत.

किल्ल्याचे प्रवेशव्दार पाहून पुढे गेल्यावर आपण पुन्हा किल्ल्याच्या आत्ताच्या प्रवेशव्दारापाशी येतो. प्रवेशव्दारातून किल्ल्यात जाणार्‍या डांबरी रस्त्याने आपण "लीडर्स ब्लॉक" या ठिकाणी येतो. हे ठिकाण पाहिल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. किल्ला आरामात पाहाण्यासाठी २ तास लागतात.

याशिवाय नगरमध्ये पाहाण्यासाठी चांदबिबी महाल , रनगाडा म्युझियम ही ठिकाण आहेत.

चांदबिबी महाल :-
अहमदनगर पासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर, अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर शाह डोंगरावर (खरे तर टेकडीवर) चांदबिबीचा महाल नावाने ओळखली जाणारी वास्तू आहे. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीचा हा ७० फूट उंचीचा, तीन मजली चिरेबंदी व अष्टकोनी महाल. त्याच्या जमिनीखाली एक तळमजला आहे. तो चांदबिबीचा म्हणून ओळखला जात असला, तरी तो मूळचा सलाबतखानाचा महाल आहे.

सलाबतखान हा निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह याचा मंत्री होता. त्याचे मूळ नाव शाह कुली. सलाबतखान ही निजामाने त्याला दिलेली पदवी. त्याने १५८० मध्ये हा तीन मजली महाल बांधला. अहमदनगर शहरात खापरी नळातून यानेच पाणी आणले.

अहमदनगर ही निजामशाहीची राजधानी. नगर हा पठारी प्रदेश. लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा. त्यामुळे येथे राजधानी उभारण्यात आली. शहराच्या संरक्षणासाठी आजूबाजूला अनेक बांधकामे उभारण्यात आली. त्यातीलच एक म्हणजे हा महाल असे मानण्यात येते. हा महाल अशा ठिकाणी आहे, की जेथून अहमदनगरकडे चाल करून येणारी फौज सहज दिसू शकते. या महालाचे दुसरे नाव दुर्बिण महाल असेही आहे, हे येथे लक्षात घेण्याजोगे आहे.

रणगाडा म्युझियम :- आशियातील सर्वात मोठे रणगाडा म्युझियम नगर सोलापूर रस्त्यावर आहे. रणगाडा म्युझियम वर्षभर ९.०० ते ५.०० या वेळात चालु असते. भारतीय सेनेने तयार आणि सुंदरपणे मांडलेल्या या म्युझियममध्ये पहिल्या महायुध्दाच्या काळापासून आजपर्यंतचे रणगाडे पाहायला मिळतात.
पोहोचण्याच्या वाटा :
अहमदनगर हे शहर रस्त्याने व रेल्वेने देशाशी जोडलेले आहे. महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या शहरातून नगरसाठी एसटीच्या बसेस आहेत. नगर -नांदेड रस्त्यावर नगर एसटी स्थानकापासून २ किमीवर नगरचा किल्ला आहे.
प्रकार: Land Forts
 अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort)  अजिंठा (Ajintha Fort)  अजिंठा सराई (Ajintha Sarai)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)
 अंमळनेर (Amalner)  अमरावतीचा किल्ला (Amravati Fort)  बहादरपूर (Bahadarpur Fort)  बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort))
 बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad)  बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)  बेळगावचा किल्ला (Belgaum Fort)  चाकणचा किल्ला (Chakan Fort)
 धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi)  दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)  डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))  फर्दापूर सराई (Fardapur Sarai)
 हिराकोट (Hirakot)  इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi))  जामगावचा किल्ला (Jamgaon Fort)  काळाकिल्ला (Kala Killa)
 कंधार (Kandhar)  करमाळा (Karmala Fort)  खर्डा (Kharda)  कोटकामते (Kotkamate)
 माचणूर (Machnur)  माढा गढी/किल्ला (Madha Fort)  मालेगावचा किल्ला (Malegaon Fort)  मंगळवेढा (Mangalwedha)
 मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort)  नगरचा किल्ला (Nagar Fort)  नगरधन (Nagardhan)  नळदुर्ग (Naldurg)
 नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri))  नस्तनपूरची गढी (Nastanpur)  पाचाड कोट (Pachad Fort)  पळशीचा किल्ला (Palashi Fort)
 परांडा (Paranda)  पारोळा (Parola)  रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort))  शिरगावचा किल्ला (Shirgaon)
 सिंदखेडराजा (Sindkhed Raja)  सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)  सुभानमंगळ (Subhan Mangal)  सुलतान गढी (Sulatan Gadhi)
 यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort))