भोरवाडीचा किल्ला
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Bhorwadi Fort
प्रस्तावना
माळशेज घाट चढून आल्यावर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सपाट पठारी भाग दिसू लागतो. याच पठारी भागात असलेल्या म्हसोबा झाप गावातील भोरवाडीच्या मागे असलेल्या डोंगरावर छोटासा किल्ला आहे. किल्ल्याचे स्थान आणि त्याचा आकार पाहाता या किल्ल्याची निर्मिती टेहाळणीसाठी केलेली होती. किल्ल्यावर माऊलाई देवीचे ठाणं आहे. दरवर्षी नागपंचमीला देवीची यात्रा असते. स्थानिक लोक या किल्ल्याला "चुचळा " या नावाने ओळखतात.
नाशिकच्या वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेच्या सुदर्शन कुलथे यांनी २०२१ मध्ये हा किल्ला प्रकाशात आणला.
भोरवाडीचा किल्ल्यापासून १७ किलोमीटर अंतरावर टाकळी ढोकेश्वरची लेणी आहेत. तर १० किलोमीटर वर गुळंचवाडीचा नैसर्गिक दगडी पूल आहे. ही दोन्ही ठिकाण किल्ल्या सोबत पाहाता येतात.
कसे पोहोचावे
मुंबईहून :- कल्याण - नगर महामार्गावर कल्याण पासून १५२ किलोमीटर अंतरावर असलेल्या अणे गावाच्या पुढे ३ किलोमीटरवर डाव्या बाजूला एक रस्ता जातो. या रस्त्याने शिंदेवाडी, गुरवेवाडी मार्गे (१० किलोमीटर अंतरावरील) म्हसोबा झाप गावातील भोरवाडीत जाता येते. भोरवाडीच्या मागे किल्ल्याचा डोंगर दिसतो. भोरवाडीतून कच्च्या रस्त्याने डोंगराच्या पायथ्या पर्यंत चालत जाण्यासाठी १५ मिनिटे लागतात. किल्ल्याचा डोंगर व त्याच्या बाजूला असलेला डोंगर यांच्या मधील खिंडीतून किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. वाट ठळक आणि मळलेली आहे. यावाटेने किल्ल्यावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो.
कल्याण - नगर महामार्गावरील टाकळी ढोकेश्वरहून – कर्जुले हरेश्वर – मांडओहोळ धरण मार्गे म्हसोबा झाप भोरवाडी हे अंतर ३८ किलोमीटर अंतरावर आहे. भोरवाडी
नाशिकहुन:- किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी नाशिक पुणे महामार्गावरील बोटा या गावापासून पूर्वेकडे लागणाऱ्या रस्त्याहून केलेवाडी, कटाळवेढे, शिंदेवाडी मार्गे म्हसोबा झाप या गावाची भोरवाडी वस्ती २४ किलोमीटर अंतरावर आहे.
महत्त्वाची ठिकाणे
भोरवाडीतून किल्ल्याच्या डोंगराच्या पायथ्या पर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने किल्ल्याचा डोंगर व त्यालगत असलेला छोटा डोंगर यांच्या मधील खिंडी खाली जाता येथे. येथून ५ मिनिटांची चढाई केल्यावर आपण दोन डोंगरां मधील खिंडीत पोहोचतो. खिंडीतून उजव्या बाजूच्या डोंगरावर थोडी चढाई केल्यावर कातळात खोदलेल्या लांब रुंद पायर्या आणि त्याच्या दरी कडील बाजूला असलेला कठडा पाहायला मिळतो. पायर्या चढून वर गेल्यावर तटबंदीचे दगड व कातळात खोदलेली चौकोनी छिद्र दिसतात . टेहळणी करण्यासाठी बसणार्या टेहळ्य़ांना आडोसा मिळावा यासाठी या छिद्रांमध्ये खांब रोऊन त्यावर छप्पर घातले जाई. याठिकाणी असलेल्या तटबंदीच्या दगडांना बर्याच ठिकाणी शेंदूराचे पट्टे ओढलेले पाहायला मिळतात.
कातळातील पायर्या चढून वर आल्यावर गडमाथ्यावर जाण्यासाठी मातीत खोदलेल्या पायर्या दिसतात. पायर्या सुरु होतात त्या ठिकाणी उजव्या बाजूला दरीच्या टोकाकडे पाण्याचे एक लांब रुंद टाक आहे, पण माती पडून ते पूर्णपणे बुजलेले आहे. हे टाक पाहून थोड्या पायर्या चढल्यावर डाव्या बाजूला एक पायवाट दरीच्या दिशेला गेलेली दिसते. या पायवाटेने डोंगराला वळसा घालून ५ मिनिटे चालल्यावर पाण्याचे दोन टाकी पाहायला मिळतात. दोन्ही टाकी २६ फूट लांब , १० फूट रूंद आणि १० फ़ूट खोल आहेत. त्यातील एक टाके माती आणि गाळाने अर्धे बुजलेले आहे, दुसर्या टाक्यात पाणी आहे पण ते पिण्यायोग्य नाही. टाकी पाहून आल्या वाटेने परत पायर्यांपाशी येऊन गडमाथ्यावर जाण्यास ५ मिनिटे लागतात. गडमाथा निमुळाता आहे. त्यावर मोठे मोठे खडक आहेत. या खडकांमधून गड माथ्याच्या टोकाला गेल्यावर माऊलाई देवीचे ठाणं आहे. किल्ल्याच्या डोंगरावर चकचकीत दगड (Quartz) सापडतात. त्यापैकी काही दगड येथे पुजण्यासाठी ठेवलेले आहेत. याठिकाणी भगवा झेंडा लावलेला आहे. किल्ल्याच्या आजूबाजूला लांबलचक पसरलेले पठार असल्याने दूरवरचा प्रदेश दिसतो. किल्ल्याची उंची पायथ्या पासून १२० मीटर आहे त्यामुळे किल्ला चढायला अर्धा तास लागतो.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
अन्न व्यवस्था
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.
पाणी उपलब्धता
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जवळील गावे
Mhasoba Zap
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा