मच्छिंद्रगड
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Chunyacha Ghana , Machindragad
प्रस्तावना
सांगली जिल्ह्यात मच्छिंद्रनाथचे स्थान आणि सोन्याचा डोंगर म्हणून मच्छिंद्रगड प्रसिद्ध आहे. किल्ल्याला धार्मिक स्थानाचा "क" दर्जा मिळाल्याने त्यावर जाण्यासाठी गडाच्या पश्चिमेला असलेल्या येडे मच्छिंद्रगड गावातून सिमेंट मध्ये बांधलेल्या पायाऱ्या आणि रस्ता झालेला आहे. तर गडाच्या ईशान्येला असलेल्या बेरडमाची गावातून सिमेंट मध्ये बांधलेल्या पायाऱ्या आहेत.
मुख्य डोंगर रांगेपासून सुट्या असलेल्या या डोंगरावर किल्ला टेहळाणीसाठी बांधलेला होता.
कसे पोहोचावे
१) येडे मच्छिंद्रगड मार्गे :-
अ) कराड - पळूस रस्त्याने कराडपासून १७ किलोमीटर अंतरावर येडे मच्छिंद्रगड गाव आहे. गावातून पायाऱ्यांच्या मार्गाने पाऊण ते एक तासात गडावर जाता येते . गडावर जाणार्या रस्त्याने थेट गाडी घेऊन गडावर जाता येते.
ब) मुंबई - बंगलोर महामार्गावरुन कराड - वाठार - रेठरे मार्गे येडे मच्छिंद्रगड गाव २३ किलोमीटर अंतरावर आहे. गावातून पायाऱ्यांच्या मार्गाने पाऊण ते एक तासात गडावर जाता येते . गडावर जाणार्या रस्त्याने थेट गाडी घेऊन गडावर जाता येते.
२) बेरडमाची मार्गे :-
क) मुंबई - बंगलोर महामार्गावरुन कराड - वाठार - रेठरे - येडे मच्छिंद्रगड मार्गे - बेरडमाची गाव २६ किलोमीटर अंतरावर आहे. गावातून पायाऱ्यांच्या मार्गाने एक ते दिड तासात गडावर जाता येते .
ड) इस्लामपूर - बेल्हे मार्गे बेरडमाची गाव १५ किलोमीटर अंतरावर आहे. गावातून पायाऱ्यांच्या मार्गाने एक ते दिड तासात गडावर जाता येते .
महत्त्वाची ठिकाणे
येडे मच्छिंद्रगड गावातून सिमेंट मध्ये बांधलेल्या पायाऱ्याच्या मार्गाने गडावर जाता येते. गडाच्या अर्ध्या उंचीवर या पायाऱ्यांच्या मार्गाच्या बाजूला राम टाकं आहे. त्यात दगड कोसळल्यामुळे ते स्थानिक वाटड्या सोबत असल्या शिवाय सहजासहजी सापडत नाही. किल्ल्याच्या डोंगराच्या पाऊण उंचीवर पायर्या रस्त्याला मिळतात. यापुढे रस्त्याने किंवा पायर्यांमार्गे गडावर जाता येते.
पायर्यांमार्गे गडावर गेल्यास आपण गडाच्या पश्चिम सोंडेवर असलेल्या बुरुजावर पोहोचतो. गडाच्या डोंगराला पश्चिम, दक्षिण आणि ईशान्य अशा तीन दिशेला तीन सोंडा पसरालेल्या आहेत. येडे मच्छिंद्रगड गावातील पायाऱ्यांच्या मार्गने गडावर येताना गडाच्या पश्चिम बुरुजाच्या खालून आपण गडावर येतो, तर बेरडमाची गावातून येतांना ईशान्य दिशेला असलेल्या बुरुजाजवळून आपण गडावर जातो.
गडाच्या पश्चिम बुरुज आणि बाजूची तटबंदी नव्याने बांधून त्यावर सिमेंटचा घुमट बांधून त्याला सुशोभित केलेले आहे. येथून पुढे पायर्यांच्या मार्गाने गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचल्यावर गहीनीनाथांचे मंदिर आहे. थोडे खाली उतरुन गेल्यावर समोरच मच्छिन्द्रनाथांचे मंदिर भव्य मंदिर आहे. मंदिर परिसरात तुटलेल्या तोफ़ा विखुरलेल्या आहेत, तर दोन चांगल्या अवस्थेतल्या तोफ़ा मंदिराच्या प्रवेशव्दाराजवळ लाकडी गाड्यावर ठेवलेल्या आहेत. मंदिर परिसरात असलेल्या झाडाचा पार बांधतांना त्यामध्ये शिलालेख कोरलेला दगड बसवलेले आहे. मंदिरात मच्छिन्द्रनाथांची मुर्ती आहे. गर्भगृहाच्या दरवाजावर लावलेल्या संगमरवरी पाटीवर " हे मंदिर इसवीसन १९३१ ते ३६ या काळात लवणमाची आणि बेरडमाची गावातल्या लोकांनी ९२५१/- रुपये खर्च करुन आणि अंगमेहनतीने बांधले आहे", असे कोरलेले आहे. मंदिराच्या मागे म्हसोबाचे मंदिर आहे. जुन्या मंदिराचे दगडी अवशेष आणि वीरगळाचे अवशेष परिसरात विखूरलेले आहेत.
मंदिर उंचवट्यावर असून त्याच्या भोवती तटबंदी बांधलेली आहे. तटबंदीत असलेल्या पायर्या उतरुन खाली आल्यावर आपण गडावर येणार्या रस्त्यावर येतो. समोरच चोखा मेळा यांचे मंदिर आहे रस्ता ओलांडून मंदिरात जाता येते . मंदिराच्या द्वारपट्टीवर नृत्य गणेश प्रतिमा कोरलेली आहे. मंदिर पाहून उजव्या हाताला गडमाथ्याकडे चालत गेल्यावर गहिनीनाथ मंदिराच्या खालच्या बाजूला रस्त्याला लागून पाण्याचे "मच्छिंद्र टाक" आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे .
हे टाक बघून पुन्हा मंदिराच्या पायर्यांपाशी येऊन तटबंदी जवळून जाणार्या पायवाटेने मंदिराच्या मागच्या बाजूला गेल्यावर पायवाटेच्या उजव्या बाजूला कातळात खोदलेली एक कोरडी विहिर आहे. तर डाव्या बाजूला चुन्याचा घाणा आहे. हे दोन्ही अवशेष पाहून पुन्हा रस्त्यावर येऊन गावाच्या दिशेला २ मिनिटे उतरुन गेल्यावर डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला दोन समाध्या आहेत. त्यातील एक समाधी किल्लेदाराची आहे असे सांगितले जाते.
समाध्यांच्या मागच्या बाजूला दक्षिण टोकावरील बुरुज आहे. या बुरुजावर सिमेंटची छत्री बांधलेली आहे. बुरुजाच्या तळाला दुहेरी बुरुजाप्रमाणे बांधकाम करुन मजबुती आणलेली आहे. दक्षिण दिशेला उतरणार्या डोंगर सोंडेवर हा बुरुज बांधलेला आहे. या बुरुजावरुन दुरवरचा प्रदेश दिसतो. तळाला येडे मच्छिंद्र गाव त्यामागे दुरवर कृष्णा नदीचे पात्र दिसते. गडावरुन सदाशिवगड आणि विलासगड दिसतात.
बुरुजावरुन पुन्हा रस्त्यावर येऊन मंदिराकडे न जाता रस्त्याने सरळ चालत गेल्यावर भगवा झेंडा लावलेला बुरुज दिसतो. या बुरुजाकडे जातांना एक मंदिर आहे. त्यात मच्छिंद्रनाथांच्या दगडात कोरलेल्या पादूका आहेत . येथे बेरडमाची गावातून येणार्या पायर्या रस्त्याला येईन मिळतात. १०-२० पायर्या उतरुन पायवाटेने ईशान्य टोकावरील बुरुजावर जाता येते. हा बुरुज पूर्ण ढासळलेला आहे. बुरुजावर झेंडा लावलेला आहे. बुरुज पाहून परत पायर्यांपाशी येऊन बेरडमाची गावाकडे उतरताना डोंगराच्या अर्ध्या उंचीवर पायर्यांच्या उजव्या बाजुला किल्ल्याच्या उध्वस्त दरवाजाचे आणि त्याच्या बाजूला असलेल्या बुरुज व तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. पुन्हा पायर्यांच्या वाटेवर येऊन थोडे खाली उतरल्यावर एक वाट डावीकडे दत्त मंदिराकडे जाते. दत्त मंदिराजवळ "केशव टाक" आहे. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. दत्त मंदिर आणि टाक पाहून पुन्हा किल्ल्यावर आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ला पाहाण्यासाठी एक तास लागतो.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
मंदिरात १० जणांची राहाण्याची सोय होऊ शकेल
अन्न व्यवस्था
जेवणाची सोय स्वत: करावी.
पाणी उपलब्धता
गडावर पिण्याचे पाणी आहे.
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा