प्रतापगड

गिरीदुर्ग सातारा महाबळेश्वर
🏔️
श्रेणी नुसार स्तर
सोपी
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
3556
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
सातारा

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Pratapgad

Pratapgad

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

प्रस्तावना

‘‘महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात’’ शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला तो म्हणजे ‘‘प्रतापगड‘‘. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध ह्याच किल्ल्याच्या पायथ्याशी केला. ह्या सुप्रसिध्द घटनेमुळे व महाबळेश्वरच्या सानिध्यामुळे सर्वांना माहीती असलेला हा किल्ला आजही सुस्थित उभा आहे.


ऐतिहासिक पार्श्वभूमी

१६५६ मध्ये चंद्रराव मोर्‍यांचा पराभव करुन शिवाजी महाराजांनी ‘जावळी‘ ताब्यात घेतली. जावळीच्या खोर्‍यात पारघाटाच्या तोंडावर व रडतोंडी घाटाच्या नाकावर ‘‘भोरप्या डोंगर‘‘ एखाद्या रखवालदारासारखा उभा होता. ह्या भोरप्या डोंगरावर किल्ला बांधायची आज्ञा महाराजांनी मोरोपंतांना दिली. मोरोपंतांनी दूर्गबांधणीचे कौशल्य पणाला लावून १६५८ साली बुलंद व अभ्येद्य किल्ला तयार केला; तोच हा प्रतापगड. प्रतापगडचे पहिले किल्लेदार म्हणून महाराजांनी अर्जोजी यादव ह्यांची नेमणूक केली.

इ.स १६५९ साली अफजलखान प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आला. महाराजांनी युक्तीने त्याला प्रतापगडाखाली जावळीच्या खोर्‍यात आणले. दिनांक ९ नोव्हेंबर १६५९ रोजी दूपारी २ वाजता शिवरायांनी अफजलखानाचा वध केला आणि त्याच्या प्रचंड सैन्याचा गनिमी काव्याने धुव्वा उडवून स्वराज्यावर आलेले हे संकट उधळून लावले. इ.स १६६१ मध्ये महाराजांनी गडावर महिषासूरमर्दिनी भवानी देवीची स्थापना केली.
इ.स १६५९ ते १८१८ ह्या प्रदिर्घ कालखंडात १६८९ सालातील काही काळ वगळता हा किल्ला शत्रुला जिंकता आला नाही.

महत्त्वाची ठिकाणे

प्रतापगडाच्या दक्षिणेस असलेल्या टेहाळणी बुरुजा खाली वाहनतळ आहे. या बुरुजा खालून असलेल्या वाटेने गडावर जाताना उजव्या बाजूच्या तटबंदीत विविध पातळीवर जंग्यांची रचना केलेली दिसते. या रचनेमुळे प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रु, बंदुकीच्या व बाणांच्या टप्प्यात रहात असे. याच मार्गाने काही पायर्‍या चढून गेल्यावर आपण तटबंदीत लपवलेल्या पश्चिमाभिमूख महाद्वारापाशी येतो. या महाद्वाराची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे की, तोफांचा मारा थेट दरवाजावर करता येऊ नये. जमिनीपासून उंचावर असलेल्या महाद्वारामुळे हत्तीं किंवा ओंडक्यांनी धडका देवून दरवाजा तोडता येत नसे. प्रतापगडावर शिवनिर्मित गडांची सर्व वैशिष्ट्ये एकत्र पहाता येतात. महाद्वाराच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. यातील उजव्या हाताच्या देवडीत एक प्रचंड तोफ आहे. महाद्वारातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूची वाट टेहाळणी बूरुजावर (सूर्य बुरुज) जाते. हीच ती प्रतापगडाच्या सर्व छबींमध्ये दिसणारी प्रतापगडाची माची. या बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. बुरुजावरुन उजव्या बाजूस खाली रस्त्याच्या पलिकडे अफजलखानाची कबर व पाठीमागच्या बाजूस आडवा पसरलेला प्रतापगडाचा बालेकिल्ला दिसतो. महाद्वारातून बाहेर पडल्यावर पायर्‍यांच्या वाटेने चढून गेल्यावर आपण श्रीभवानी मंदिरात पोहोचतो. या पायर्‍यां चढतांना डाव्या हाताला सध्या वापरात नसलेली वाट व त्या वाटेवरचा दूसरा आणि तिसरा दरवाजा दिसतो. भवानी मंदिराकडे जाणार्‍या पायर्‍यांच्या चढतांना उजवीकडे एक वाट जाते. त्या वाटेने पुढे गेल्यावर एक तलाव पाहायला मिळतो.
तलाव पाहून पायर्‍या चढून श्रीभवानी मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर ५ ते ६ छोट्या तोफा पाहायला मिळतात. मंदिरातील महिषासूरमर्दिनीच्या रुपातील भवानी मातेची मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीच्या काठावरुन आणलेल्या खास शिळेमधून घडवलेली आहे. मंदिरात स्फटीकाचे शिवलिंग आहे. मंदिरा समोर दगडी दिपमाळा आहेत. मंदिरा मागील पायवाटेने आपण गडाच्या टोकावर असलेल्या स्नानाचे तळे (नैऋत्य तलाव) व त्याच्या पुढे टोकावर असलेल्या बुरुजावर जाण्यासाठी दोन दरवाजे आहेत, त्यातील एक दरवाजा उध्वस्त झालेला आहे तर एक बुजलेला आहे.
बुरुजाकडून परत श्रीभवानी मंदिराकडे येऊन बालेकिल्ल्याच्या पायर्‍या चढतांना उजव्या हातास श्रीसमर्थांनी स्थापन केलेला हनुमान आहे. पाय‍र्‍या चढून वर आल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशव्दारपाशी येतो. बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच केदारेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला असलेल्या तटबंदीत गुप्त दरवाजा आहे. बालेकिल्ल्यावर शिवरायांचा अश्वारुढ पुतळा व छोटी बाग आहे. गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाला अनुक्रमे तिहेरी बांधणीचा यशवंत बुरुज व रेडका बुरुज आहे. या दोन बुरुजांच्या मधल्या भागात नासके तळे व गोडे तळे आहे. रेडका बुरुज पाहून पश्चिमेच्या तटबंदीच्या बाजूने चालत भवानी मंदिराकडे येतांना एका बुरुजाच्या बाजूला तटबंदीत गुप्त दरवाजा आहे. पुढे गेल्यावर तटबंदीत शौचकुप पाहायला मिळते. हे सर्व पाहून बालेकिल्ल्याच्या दरवातून बाहेर पडून उजव्या बाजूच्या वाटेने यशवंत बुरुजाकडे जातांना एक विहिर पाहायला मिळते. विहिर पाहून पुन्हा मुख्य प्रवेशव्दारपाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते.

याखेरीज गडावर वेताळाचे मंदिर, , घोरपडीचे चित्र असलेली राजपहार्‍यांची दिंडी, कडेलोट, सूर्यबुरुज इत्यादी ठिकाणे आहेत.

कसे पोहोचावे

महाराष्ट्रातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर येथून खाजगी वहानाने किंवा बसने ४० मिनीटात प्रतापगडाच्या पायथ्याशी जाता येते. याखेरीज मुंबई - गोवा महामार्गावरील पोलादपूरहून आंबेनळी घाटाने प्रतापगडावर जाता येते.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ N/A

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

गडावरील विश्रामगृहात रहाण्याची सोय होऊ शकते.

🍽️

अन्न व्यवस्था

गडावर जेवणासाठी अनेक उपहारगृह आहेत.

💧

पाणी उपलब्धता

बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

सर्वोत्तम काळ

🌤️ N/A

अतिरिक्त माहिती

१) गडावरील प्रमुख ठिकाणे पहाण्यासाठी १ तास पुरेसा आहे.

२) संपूर्ण गड पहाण्यासाठी ३ ते ४ तास लागतात.

जवळील गावे

प्रतापगड

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा

किल्ले स्वच्छ ठेवा

किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.